Take a fresh look at your lifestyle.

बालगंधर्व रंगमंदिर बांधताना जगभरातील उत्तमोत्तम थिएटर्सचा अभ्यास करण्यात आला होता

बालगंधर्व रंगमंदिर पाडून तिथे नवीन इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे व्हायला हवं की नको यावर नाट्यप्रेमींची वेगवेगळी मतं आहेत.

0

बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा आराखडा आता तयार झाल्याचं पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नवीन बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीसाठी सकारात्मकता दाखवल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

महापालिकेने बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासासाठी सर्व प्रक्रिया राबवली असली तरीही सध्याचे रंगमंदिर पाडून नवे बांधायचे की अस्तित्वातील रंगमंदिर कायम ठेवून आणखी एक नाट्यगृह उभारायचे, याचा निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे रसिक आणि कलाकारांच्या मनावर कोरल्या गेलेल्या या वास्तूचे अजून किती दिवस शिल्लक आहेत हा प्रश्न अजूनही कायम असणार आहे.

या सगळ्यामध्ये मात्र बालगंधर्व नाट्यगृहाच्या निर्मितीचा इतिहास रंजक आहे.

पुण्यातील बालगंधर्व चा इतिहास

पुण्याचे वैभव सन १९६१ मध्ये पानशेतच्या पुरात पाण्यात वाहून गेले. पूर ओसरल्यानंतर एक नवे शहर वसविण्याचे आव्हान पुण्याच्या पालिका प्रशासनासमोर होते.

अशातच मुठा नदीच्या काठावर विस्तीर्ण जागेत अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असं एक नाट्यगृह बांधावे अशी संकल्पना जेव्हा पूढे आली.

तेव्हा त्याला विरोध झाला. काहींनी शहरापासून दूर असल्याचं कारण सांगितलं. तर काहींनी त्या भागातले झोपडपट्टीवासी कुठे जातील असा प्रश्न उपस्थित केला.

…आणि प्रकल्पाला मान्यता दिली

छत्रपती संभाजी महाराज उद्यानाला लागून असलेल्या जागेत पालिकेने नाट्यगृह उभारावे, असा आग्रह स्थानिक नगरसेवक भाऊसाहेब शिरोळे यांनी धरला आणि पालिका प्रशासनाने जागेची पाहणी करून नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला. महापौर नानासाहेब गोरे यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मान्यता दिली. आणि अखेर 8 ऑक्टोबर 1962 झाली खुद्द बालगंधर्व यांच्याच उपस्थितीमध्ये या इमारतीचं भूमिपूजन झालं.

त्याकाळी ४० लाख रुपयांचा निधी खर्च केला

तत्कालीन स्थायी समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कारळे यांनी प्रकल्पासाठी बजेट मंजूर केले. बालगंधर्व रंगमंदिराची बांधणी करायचे ठरल्यानंतर महापालिकेने पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. बी. जी. शिर्के यांच्या कंपनीला नाट्यगृहाच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी देण्यात आली.

नाट्यगृहाचे बांधकाम सहा वर्षे सुरू होते. त्यासाठी त्याकाळी ४० लाख रुपयांचा निधी खर्च केला गेला.”मोठ्या मेकअप रुम, प्रशस्त स्टेज, एवढा मोठा रंगमंच आधी कुठल्याही नाट्यगृहाला नव्हता. भिंती, एक स्टेज आणि भोवताली गर्दी अशी परिस्थिती होती.

बालगंधर्व रंगमंदिर बांधताना तत्कालीन राज्यकर्ते, प्रशासन आणि पुलंसारखे नाट्यप्रेमी यांनी जगभरातील उत्तमोत्तम थिएटर्सचा अभ्यास केला होता.

त्यातले काय चांगले आपल्याकडे आणता येईल, याचा विचार केला होता. रंगमंदिराचं काम पूर्ण होऊन त्याचं उद्घाटन होईपर्यंत बालगंधर्व हयात नव्हते. 26 जून 1968 रोजी बालगंधर्व यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्याहस्ते बालगंधर्व रंगमंदिराचं उद्घाटन झालं.

कलाकार, रसिक प्रेक्षक, तंत्रज्ञ यांच्या सोयीचा विचार करून ऐसपैस, सर्वोत्तम ध्वनिव्यवस्था आणि प्रशस्त रंगमंचासह नेपथ्य सामानाची गाडी रंगमंचावर उतरविण्याची सोय करण्यापासून ते कुरकुरणाऱ्या मुलांचा व्यत्यय येणार नाही यासाठी ‘ग्लासबॉक्स’ची सोय करण्यापर्यंतचा विचार पुलंनी केला आणि एक उत्कृष्ट रंगमंदिर साकारले गेले.

पु. ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी कष्ट घेतले.

ज्येष्ठ चित्रकार गोपाळराव देऊस्कर यांच्याकडून पुलंनी ‘स्वयंवर’मधील रुक्मिणीच्या वेषातील आणि पुरुष वेषातील अशी बालगंधर्व यांची दोन मोठय़ा आकारातील तैलचित्रे करून घेतली.

विशेष म्हणजे बालगंधर्वाच्या नाटकात वापरण्यात आलेला ऑर्गनही रंगमंदिरात तैलचित्रांखाली ठेवण्यात आला आहे.

अनेक कलाकारांचं करिअर रंगमंदिरात घडलंय

मागच्या 50 वर्षांत तर ही वास्तू नाट्यप्रेमी आणि कलाकारांच्या आयुष्यातील अविभाज्य अंग बनली. शहराच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका विस्तिर्ण परिसरातील ही इमारत फक्त कला आणि नाट्याचे सादरिकरणच नव्हे तर विसाव्याचे काही क्षण घेण्याचीही जागा बनली आहे. अनेक कलाकारांचं करिअर त्या रंगमंदिरात घडलंय.

कोरोनामुळे दोन वर्ष सगळंच बंद होतं. बालगंधर्व पाडलं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं काम अजूनही सुरुच आहे. मग प्रयोग करायचे कुठे. त्यामुळे तशी आधी पर्यायी व्यवस्था करा अशी मागणी आहे. पण आता मात्र हे बालगंधर्व रंगमंदिर पाडून तिथे नवीन इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे व्हायला हवं की नको यावर नाट्यप्रेमींची वेगवेगळी मतं आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.