पूजेला कर्नाकटच्या मुख्यमंत्र्यांना बोलावू, यामुळे चर्चेत असलेला माउली कॉरीडॉर काय आहे ?
काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा चर्चेत आला आहे. यामध्ये अजून एका गोष्टीची यात भर पडली आहे. पंढरपूरमधील नागरिकांनी आम्ही पुढच्या वेळी थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पूजेसाठी बोलावू असं म्हणत एका नव्या चर्चेला तोंड फोडलं आहे. तर नक्की हे प्रकरण काय आहे आणि वादात असलेला हा माउली कॉरीडॉर काय आहे, हेच या व्हिडीओमधून जाणून घेऊ
नेमकं प्रकरण काय आहे ?
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला पंढरपूरच्या विकासासाठी नवीन विकास आराखडा अर्थात माउली कॉरिडॉर राज्य सरकारकडून सादर केला गेला. या विकास आराखड्याला स्थानिकांचा टोकाचा विरोध होताना दिसत आहे. शासनाकडून हा विकास आराखडा राबवण्यासाठी टेंडर प्रक्रियेला सुरुवात झाल्यानं नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये संताप आहे. यालाच विरोध करण्यासाठी पंढरपुरात ‘नो कॉरिडॉर’ असे काळे फलक आणि काळे झेंडे हाती घेतले आहेत.
या सगळ्यात धक्कादायक म्हणजे आंदोलन करणाऱ्यानी आमच्यावरील अन्याय दूर न झाल्यास आषाढीच्या पूजेला कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्यात येईल, असं धक्कादायक वक्तव्य संघर्ष समितीचे अध्यक्ष रामकृष्ण महाराज वीर आणि आदित्य फत्तेपूरकर यांनी केलं आहे.
त्यांचं म्हणणं आहे कि सरकार जबरदस्तीनं सर्व गोष्टी इथे करण्याचा प्रयत्न करत आहे. या कॉरिडॉर आणि विकास आराखड्यामुळं हजारो लोक बेघर होणार आहेत. जुने पुरातन वाडे नष्ट होणार आहेत. त्यामुळं जबरदस्तीनं हा कॉरीडर राबवला तर आम्हाला देखील जत तालुक्याप्रमाणं निर्णय घ्यावा लागेल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.
माउली कॉरिडॉर काय आहे ?
पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी म्हटलं जात. दरवर्षी लाखो भावीक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. आषाढी-कार्तिकी एकादशीला तर मोठ्या संख्येत भाविक येतात, परिणामी मंदिर परिसरात मोठी गर्दी होते. पंढरपुरात यापूर्वी १९८२ मध्ये रस्तारुंदीचे काम करण्यात आले होते. हीच अडचण लक्षात घेऊन राज्य सरकारकडून माउली कॉरिडॉरच्या प्लॅन आखला आहे.
पंढरपुरातील विठठल मंदिर परिसरातील चौफाळा ते महाद्वार घाट या भागात माउली कॉरिडॉर आखला जाणार आहे. यामध्ये मंदिराकडे जाणारा हा मुख्य रस्ता २०० फुटापर्यंत वाढवला जाणार आहे. सोबतच मंदिर परिसरातील आणखी १७ रस्त्याची रुंदी वाढवली जाणार आहे. या आराखड्यानुसार परिसरातील १००० हुन अधिक नागरिकांची दुकाने आणि घरे जमीनदोस्त होणार आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला होता प्लॅन
मागच्याच महिन्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत माहिती दिली होती. कॉरिडोरच्या माध्यमातून पंढरपूरच्या देवळांच्या भव्य जीर्णोद्धारासह विस्तीर्ण उद्याने, मोकळ्या जागा, परिसराचे सुशोभीकरण, मूलभूत सोयीसुविधा तयार केल्या जाणार आहेत.
याशिवाय दोन्ही देवस्थानांच्या स्थळी भाविकांना व पर्यटकांना पोहोचण्यासाठी चांगल्या दर्जाच्या दळणवळणाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली होती.
स्थानिकांचा विरोध का ?
गेल्या काही वर्षातील देशातील प्रमुख तीर्थस्थाने असलेल्या वाराणसी व उज्जैन अशा ठिकाणी नवीन प्रशस्त असे कॉरीडॉर बांधण्यात आले आहेत. माउली कॉरीडॉरच्या नियोजित आराखड्यानुसार मंदिर परिसरातील १००० हुन अधिक नागरिकांची दुकाने आणि घरे जमीनदोस्त होणार आहेत.
येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी स्थानिक लोकांना बेघर करण्यात येणार का ? असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम