Take a fresh look at your lifestyle.

आषाढी-कार्तिकी दोन्ही पूजेचा मान मिळणारे देवेंद्र फडणवीस पहिले व्यक्ती

या शासकीय पूजेला जसा मोठा इतिहास आहे, तश्याच या पूजेसंदर्भात काही मनोरंजक आठवणी आणि किस्से देखील आहेत.

0

कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाईची शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली. उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील साळुंखे दाम्पत्याला मिळाला.

आषाढी-कार्तिकी दोन्ही पूजेचा मान

राज्याचे उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आजची पूजा पार पडली असली तरी त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर नवा विक्रम प्रस्तावित झाला आहे. आपल्या प्रथेनुसार राज्याचे मुख्यमंत्री आषाढी एकादशीला पूजा करतात. तर उपमुख्यमंत्री किंवा जेष्ठ मंत्री कार्तिकी एकादशीची पूजा करत असतात.

देवेंद्र फडणवीस हे २०१४ ते २०१९ असे पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे या काळात त्यांनी आषाढी एकादशीला महापूजा केली होती. राज्यातील नव्या राजकीय समीरणामुळे सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांना यावेळी कार्तिकी एकादशीच्या पूजेचाही मान मिळाला आहे. 

 

शासकीय पूजेच्या संदर्भात इतिहासात अनेक संदर्भ सापडतात. अगदी देशात ब्रिटिशांचे सत्ता असताना हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत. इंग्रज सरकार पूजाअर्चेसाठी या देवस्थानाला वर्षांला दोन हजार रुपयांचे अनुदान देत असे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील पहिली काही वर्षे हे शासकीय अधिकारीच विठ्ठलाची पूजा करीत. पण संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राजारामबापू पाटील मंत्री असताना पूजेसाठी पंढरपुरात आले होते. त्यांनी या देवस्थानचे वार्षिक अनुदान दोन हजार रुपयांवरून २० हजार रुपये केले. त्यानंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्याची प्रथा चालू झाली.

या शासकीय पूजेला जसा मोठा इतिहास आहे, तश्याच या पूजेसंदर्भात काही मनोरंजक आठवणी आणि किस्से देखील आहेत.

पूजा बंद पडल्याने राज्यात दुष्काळ

१९७० मध्ये काही समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून राज्यात जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ साली शासकीय पूजा झाली नाही. १९७२ मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. शेतकरी हवालदिल झाले. लोक आपली शेतीवाडी, गुरेढोरे सोडून कामधंद्यासाठी शहरांकडे जाऊ लागले.

वारकरी म्हणू लागले, सरकारने पूजा बंद केली, म्हणून विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला. वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना साकडे घातले. त्यांनीच ही बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू केली, ती आजतागायत चालू आहे.

नास्तिक शरद पवारांनीही केली होती पूजा

शरद पवार मूळचे नास्तिक त्यामुळे ते देवळात येत नसत. पण एकदा पत्नीने फारच आग्रह केल्यावर ते एकदा विठ्ठल मंदिरात आले. पत्नी मनोभावे पूजा करत होती. बाहेरच्या हत्ती दरवाजातील कट्टय़ावर बसून शरदराव कार्यकर्त्यांशी गप्पा मारत होते.

पत्रकारांनी खवचटपणे विचारले, तुम्ही देव मानीत नाहीत, तर मग पांडुरंगाच्या पूजेला कसे काय आलात? राजकारणात मुरलेल्या पवारांनी लगेच, हजरजबाबी उत्तर दिले, ‘माझ्या महाराष्ट्राची कोटय़वधी जनता पांडुरंगास देव मानते, त्यांच्या धार्मिक भावनेचा आदर करण्यासाठी आज मी इथे आलो आहे.’

आषाढीला मुख्यमंत्री तर कार्तिकीला उपमुख्यमंत्री

मनोहर जोशी मुख्यमंत्री म्हणून पूजेस आले, तेव्हा महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती होती. जुलै महिना अर्धा झाला तरी पाऊस पडला नव्हता. त्यांनी पांडुरंगासमोर हात जोडून विनवणी केली. ‘बा पाडुरंगा, महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडू दे.’

याच काळात राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. सत्तेचा समान वाटा या सूत्राने आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही नवीन प्रथा मनोहर जोशी यांच्या काळातच चालू झाली.

मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यालाही मिळाला मान

राज्यातील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांनी आजवर अनेकदा पूजा केली आहे. पण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना देखील पूजेचा मान मिळाला आहे. दिग्विजय सिंह हे स्वताला विठ्ठलाचे भक्त मानतात.

दिग्विजय सिंह यांनी 1994 साली राज्याचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सोबत पूजा केली होती. तर 1997 साली राज्याचे मुख्य सचिव दिनेश अफजलपुरकर यांच्या सोबत दिग्विजय सिंह यांनी पूजा केली होती.

मुख्यमंत्री यांच्या पूजेला विरोध

2014 साली राज्यात पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री झाला. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले. 2015 ते 17 अशी सलग तीन वर्ष त्यांनी पूजा केली. पण 2018 साली त्यांच्या हस्ते पूजेला विरोध करण्यात आला.

2018 साली राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन चालू असताना फडणवीस यांना पंढरपूरात येण्यावरून मोठे वादंग उठले, त्यामुळे 2018 साली फडणवीस यांनी आपल्या घरीच पूजा केली.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.