जयराम रमेश : भारत जोडो यात्रेमध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका बजावणारा व्यक्ती
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेने नुकतीच महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये प्रवेश केला. तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून 7 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या या यात्रेने आतापर्यंत सहा राज्यांतील 28 जिल्ह्यांना भेट दिली आहे.
राहुल गांधी हेच या यात्रेच्या भूमिकेत असले तरी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नेते, सामाजिक कार्यकर्ते यात सहभागी होत आहेत. त्या त्या राज्यातील काँग्रेस नेतेही यात सहभागी होत आहेत. प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात राहुल गांधींना सोबत करणाऱ्या काँग्रेस नेत्यासोबत एक नेता मात्र सतत राहुल गांधी यांच्या सोबत आहे, तो नेता म्हणजे जयराम रमेश.
जयराम रमेश काँग्रेसचे मीडिया प्रभारी असले तरी भारत जोडो यात्रेमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. भारत जोडो यात्रेत रोज माध्यमांना ब्रिफींग करणे, विरोधी पक्षांना उत्तर देण्यापासून ते समविचारी लोकांना जोडण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जयराम रमेश दिसत आहेत.
मूळचे कर्नाटकमधील असणारे जयराम रमेश उच्चशिक्षित आहेत. आय.आय. टी. मुंबई आणि एम.आय.टी. अमेरिका सारख्या ठिकाणहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले आहे. वर्ल्ड बँक आणि त्यांनतर भारत सरकारच्या अनेक मंत्रालयात त्यांनी सल्लागार म्हणून काम पहिले आहे. सक्रिय राजकारणात आल्यानंतर ते मध्यप्रदेशमधून राज्यसभेवर निवडून गेले. युपीए सरकारच्या काळात त्यांनी मंत्री म्हणून देखील काम पाहिलं. आणि सध्याही ते राज्यसभा सदस्य आहेत.
काँग्रेसच्या बदलात महत्वाची जबाबदारी
काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षांतर्गत वाद चालू असताना काँग्रेसने जयराम रमेश यांना काँग्रेसचे मीडिया प्रभारी म्हणून जबाबदारी दिली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेची घोषणा केल्यांनतर भारत जोडो यात्रेच्या संपूर्ण नियोजनात जयराम रमेश सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहेत.
भारत जोडो यात्रा कन्याकुमारीपासून निघाल्यापासून जयराम रमेश रोज माध्यमांशी संवाद साधत आहेत. दिवसातील महत्वाच्या घटना आणि दुसऱ्या दिवसाचं नियोजन ते सांगतात. नियोजनात काही बदल असतील तरी तेच सगळ्यांना सांगतात.
राहुल गांधी सावरकराबद्दल वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यावेळी महाविकास आघाडी तूटणार का ? अशाही चर्चा झाल्या. त्याही वेळी जयराम रमेश माध्यमासमोर आले आणि वेगळी भूमिका असली तरी महाविकास आघाडीला काही होणार नाही. असं स्पष्टीकरण दिल.
काल भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून मध्यप्रदेश मध्ये प्रवेश करताना जयराम रमेश म्हणाले,
आपण फिरुन फिरुन सावरकरांच्या मुद्द्यावर येत आहोत. पण हा विषय आता इथेच थांबवायला हवा. मात्र भाजपला सांगणं आहे की, ज्यादिवशी तुम्ही आमच्या सर्व नेत्यांबद्दल खोटा इतिहास सांगणे बंद कराल, त्या दिवशी आम्हीही तुमच्या नेत्यांबद्दल खरा इतिहास सांगणं बंद करू.
जयराम रमेश यांच्या याच वाक्यातून त्यांचा काँग्रेसच्या निर्णयातील सहभाग आणि अंदाज समजून घेऊ शकता.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम