Take a fresh look at your lifestyle.

एकाच मतदारसंघातून ११ वेळा निवडून येणं गणपतराव देशमुख यांना कसं जमलं ?

मंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर देखील गणपतराव (Ganpatrao Deshmukh) यांनी वसंतराव नाईक (Vasantrao Naik) (CM Of Maharashtra) यांना निरोप पाठवला, "आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून कधीही आलो नाही. सत्तेचं अजिबात आकर्षण नाही."

0

महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या काही दिवसापासून मोठा सत्तासंघर्ष चालू आहे. शिवसेनेचा एक मोठा गट एकनाथ शिंदे यांच्या सोबत पक्षातून बाहेर पडला आणि त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली.  या सगळ्या काळात एक मुद्दा अनेकदा उपस्थित करण्यात आला, तो म्हणजे राजकारणातील निष्ठा.

रातोरात आपल्या निष्ठा बदलून सत्तेच्या मागे धावणाऱ्या या काळात अनेकदा एका नावाची कायम चर्चा होते, ते नाव म्हणजे गणपतराव देशमुख. 

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील सांगोला विधानसभा (Sangola Vidhansabha) मतदारसंघाच त्यांनी तब्बल अकरा वेळा प्रतिनिधित्व केलं. तेही शेतकरी कामगार पक्षासारख्या (Peasants and Workers Party of India) कायम विरोधात असलेल्या पक्षाच्या तिकिटावर. 

वकिलीतून राजकारणात

गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांचे मूळ गाव मोहोळ (Mohol) तालुक्यातील पेनूर. पेनूर या गावी १० ऑगस्ट १९२७ रोजी परंपरागत शेती व्यवसाय असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला. पेनूर मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यांनतर   माध्यमिक शिक्षण पंढरपूरमध्ये पूर्ण केलं. त्यांनतर ते शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात कायदयाचे शिक्षण पूर्ण करत असतानाच ते तत्कालीन शेतकरी कामगार पक्षातील अनेक नेत्यांशी त्यांचा जवळचा संबंध येऊ लागला.  

याच काळात सांगोला तालुक्यातील एका प्रकल्पामध्ये शेतकऱ्याची हजारो एकर जमीन गेली होती. नुकतेच कायदयाचे शिक्षण पूर्ण केलेले गणपतराव या शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन कोर्टात गेले. पण कोर्टासोबत कोर्टाबाहेर देखील मोठी लढाई उभी केली होती. वकील म्हणून त्यांनी हा खटला लढला आणि जिंकलाही.

त्यांच्या या लढ्यामुळे त्यांच्यामागे सांगोला तालुक्यातील लोक उभे असल्याचं पाहून शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांना 1958 ची विधानसभा लढण्यास सांगितलं गेलं. पण मतदारसंघात पुरेस काम नसल्याचं सांगून त्यांनी विधानसभा न लढण्याचं ठरवलं. पण त्यानंतरची 1962 ची विधानसभा ते लढले आणि पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. 

शेतकरी कामगार पक्ष का ?

गणपतराव देशमुख यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शेकाप मधून केली आणि त्यानंतर ते अखेरपर्यंत शेकापमध्येच राहिले. शेकापचे संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या तुळशीदास जाधव यांचा गणपतराव यांच्या जडणघडणीत मोठा प्रभाव होता. ते पुण्यात शिकत असताना देखील केशवराव जेधे, शंकरराव मोरे यांच्याशी त्यांचा सहवास वाढत होता. 

विद्यार्थी दशेत हातात घेतलेला शेकापचा झेंडा त्यांनी आयुष्यभर हातात जपला.

नंतरच्या काळात अनेकदा गणपतराव यांना कॉंगेस मधून बोलावणे येत राहिले, अनेकदा मंत्रीपदाची देण्याची तयारी दाखवली गेली. पण गणपतराव सांगत राहिले, मी राजकारणात पद मिळाव म्हणून कधी आलो नाही. मला सत्तेच अजिबात आकर्षण नाही. 

मंत्रिपदाच्या ऑफर तरीही पक्षांतर नाही

1962 साली पहिली निवडणूक जिंकलेले गणपतराव 1972 आणि 1995 अशा दोनच निवडणूक हरले. तेही फार कमी फरकाने. तब्बल 55 वर्षे सक्रिय राजकारणात असताना ते फक्त दोनदा मंत्री झाले.

पहिल्यांदा शरद पवार यांनी वसंतदादाच सरकार पाडून राज्यात पुलोदचा प्रयोग केला होता, त्या मंत्रिमंडळात गणपतराव मंत्री झाले होते. त्यांनतर 1999 साली आघाडी सरकाराला शेकापने पाठिंबा दिला होता. त्या सरकारमध्ये काही काळ गणपतराव मंत्री होते. बाकी संपूर्ण राजकारण त्यांनी विरोधी बाकावर बसून केलं. 

गणपतराव विरोधी पक्षात होते त्यांना अनेकदा काँग्रेसमध्ये घेण्याचा प्रयत्न त्यावेळच्या काँग्रेस नेतृत्वाकडून करण्यात आला. पण गणपतराव त्यास बधले नाहीत.

स्वतः गणपतराव देशमुख एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

“अनेक वेळा मला कॉंग्रेसमध्ये बोलावण्यात आलं. स्वत:  यशवंतरावांनीच मला त्याबद्दलचा निरोप काडादींमार्फत पाठवला होता. काडादी कॉंग्रेसचे खासदारकीचे उमेदवार होते. मी त्यांना नम्रपणे सांगितलं, दाजिबा देसाई, एन.डी. पाटील, मी, अशा आम्ही सर्वांनी मिळून पक्ष पुढे न्यायचा ठरवलं आहे. शब्द मोडून कॉंग्रेस पक्षात यायचं, हे योग्य होणार नाही.”

पण पुढे यशवंतराव चव्हाण यांच्या माध्यमातूनच शेकापचे अनेक जेष्ठ नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले. राज्यातील शेकाप पक्ष कमजोर झाला. पुढे वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शंकरराव पाटील यांच्या मार्फत निरोप पाठवला होता,

“तुम्ही कॉंग्रेसमध्ये या. सोलापूर जिल्ह्यातून कोणी मंत्री नाही. तुम्हाला आम्ही राज्यमंत्रिपद देऊ.”

मंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर देखील गणपतराव यांनी वसंतराव नाईक यांना निरोप पाठवला,

“आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून कधीही आलो नाही. सत्तेचं अजिबात आकर्षण नाही. माझ्याकडं काही नसताना मला लोकांनी मदत केली आहे. माझे सहकारी जिवाभावाचे आहेत. माझ्या हातून पक्षांतर घडणार नाही.”

मुख्यमंत्रीपदाची संधी, पण… 

1999 सालचा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. निकालात काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे  75 जागा त्या नंतर शिवसेनेचाय 69 आणि राष्ट्रवादीच्या 58 आणि तर भाजपच्या 56 जागा निवडून आल्या होत्या. पण यामुळे राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली होती.

तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंना आपण परत सत्ता स्थापन करण्याचा आत्मविश्वास होता. मात्र भाजपला मुख्यमंत्रीपद हवे होते. त्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा होणार असा पेच निर्माण झाला होता. मात्र याच पेचातून गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री पदाची संधी आली होती.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमात हा प्रसंग सांगितला होता.

ते म्हणाले की “आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार की भाजपचा होणार अशी चर्चा सुरू होती. पण बहुमत नसल्याने आमदार आपल्यासोबत येणार नाहीत, हेही दिसत होते. त्यावेळी शेकापचे तीन आमदार निवडून आले होते.

तर दोन्ही पक्षातून मुख्यमंत्री पदासाठी नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांची नावे चर्चिली जात होती. पण यावेळी गोपीनाथ मुंडेही मुख्यमंत्री नको आणि नारायण राणेही नको, गणपतराव देशमुखांना मुख्यमंत्री करा! असा विचार पुढे आला होता आणि त्यावर सर्व सहमतही झाले होते. पण नंतर ते झालं नाही.”

तीन पिढ्याच नेतृत्व

गणपतराव देशमुख 1956 साली पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2014 पर्यंत ते सांगोला मतदारसंघातून निवडून येत राहिले. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही सांगोला तालुक्यातील जनतेने त्यांना निवडून दिले.

राजकारणात त्यांना निवडून देण्यामध्ये जेवढा जेष्ठ लोकांचा सहभाग होता. तेवढाच सहभाग तरुणांना देखील होता. 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी निवडणूक न लढण्याच त्यांनी जाहीर केल्यानंतर त्यांनीच उमेदवारी घ्यावी यासाठी त्यांच्या घराबाहेर जमलेली गर्दी हि त्यांनी केलेल्या तीन पिढ्याचं नेतृत्व दाखवत होत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.