Take a fresh look at your lifestyle.

बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी याद राखा; राज ठाकरेंनी दिला होता मनसे स्टाईल इशारा

बाबासाहेब पुरंदरे यांचा पुरस्कार समारंभ उधळून लावण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी पुरंदरेंच्या बाजूने ठामपणे उभं राहत विरोधकांना थेट आव्हान दिलं होतं.

0

बाबासाहेब पुरंदरे यांना २०१५ साली राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान केला होता. पण त्यावेळी यावरुन बराच गदारोळ झाला होता. या सगळ्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देखील ढवळून निघालं होतं.

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. दरम्यान, त्यांना हा पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी थेट कोर्टात याचिका देखील करण्यात आली होती. मात्र, कोर्टाने ती याचिका देखील फेटाळून लावली होती. ज्यानंतर त्यांना पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता.

बाबासाहेब पुरंदरे यांच्या आधी साहित्यिक पु.ल. देशपांडे, प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि गायक पं.भीमसेन जोशी यांच्यासारख्या दिग्गजांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी वेचली आहेत. त्यामुळेच ते महाराष्ट्रात शिवशाहीर म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविल्याबद्दल शिवचरित्राचे अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांची ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. परंतु, पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ देण्यास राज्यातील काही संघटनांनी विरोध केला होता.

जितेंद्र आव्हाड यांनी दर्शवला होता विरोध…

‘ज्यांनी शिवाजी महाराज आणि जिजाऊंची बदनामी केली, इतिहासाचे विकृतीकरण केले त्यांच्या लिखाणाला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या निमित्ताने राजमान्यता मिळणार आहे. हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळा दिवस आहे.’ असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी त्यावेळी पुरंदरेंच्या या पुरस्कार सोहळ्याला विरोध दर्शवला होता.

त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता त्यांनी जे लिहिलं त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजी महाराज आणि आई जिजाबाई यांच्या सन्मानाला धक्का पोहोचला आहे. यामुळेच बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये यासाठी विरोध दर्शविण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पुरस्काराला प्रचंड विरोध केला होता.

कोणी-कोणी केला होता बाबासाहेबांना विरोध?

पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, संभाजी ब्रिगेड, काही साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला होता.

राज ठाकरेंनी याबाबत उघडउघड हल्लाबोल केला होता

बाबासाहेब पुरंदरे यांचा पुरस्कार समारंभ उधळून लावण्याची धमकी देण्यात आल्यानंतर राज ठाकरे यांनी पुरंदरेंच्या बाजूने ठामपणे उभं राहत विरोधकांना थेट आव्हान दिलं होतं.

‘राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भाजपमधीलच काही मंत्री यांनी मिळून हे विरोधाचं राजकारण सुरु केलं आहे. मला काही देवेंद्र फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही. पण ते मुख्यमंत्री झाल्यापासून हे राजकारण सुरू आहे.

शरद पवार यांना भाजपमधील कोण-कोणते मंत्री सामील आहेत ते मला महित आहेत. फडणवीस पक्षात ज्युनियर आहेत. तसेच ते ब्राम्हण आहेत. म्हणूनच हे राजकारण सुरु आहे.’ असं म्हणत राज ठाकरेंनी याबाबत उघडउघड हल्लाबोल केला होता.

‘बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार तसेच भाजपमधील काही मंत्री आहेत जे गलिच्छ राजकारण करत आहे.’ असा आरोप तेव्हा राज ठाकरेंनी केला होता.

‘केवळ एखाद्या वाक्यासाठी जे शिवचरित्र लिहण्यात आलं आहे त्यावर आक्षेप घेणं काही बरोबर नाही. जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा केली जाऊ शकते. त्यासाठी राजकीय गदारोळ करण्याची गरज नाही.’ असंही राज ठाकरे यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

महाराष्ट्रात तांडव करेन

काही संघटनांनी तर त्यांचा पुरस्कार सोहळाच उधळून लावण्याचा इशारा दिला होता. ज्यानंतर राज ठाकरे अत्यंत आक्रमकपणे निषेध करणाऱ्यांना मनसे स्टाइल इशारा दिलेला. ‘जर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी याद राखा मी महाराष्ट्रात तांडव करेन’, असं राज ठाकरे म्हणाले होते.

पुरस्कार बहाल करण्यात आला

दरम्यान, 19 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते बाबासाहेब पुरंदरे यांना राजभवनातील दरबार हॉलमध्येच पुरस्कार बहाल करण्यात आला होता.या पुरस्कारानंतर साधारण चार वर्षांनी म्हणजे 2019 साली भारतातील दुसऱ्या क्रमांकाच सर्वोच्च पुरस्कार पद्मविभूषण देखील जाहीर झाला होता.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.