Take a fresh look at your lifestyle.

गेल्या ६० वर्षात या गावात एकदाही निवडणूक झाली नाही

0
  • ऋतुराज संजय देशमुख (करमाळा)

सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे चालू आहे. गावागावात लोक समोरासमोर उभे राहतायेत. अश्यातच काही लोकप्रतिनिधींनी कोरोना काळात काळजी म्हणून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यासाठी बक्षीस म्हणून लाखो रुपयाच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली. त्याला अनेक गावांनी पाठिंबाही दिला आणि अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. अश्या गावाचं आणि तिथल्या लोकप्रतिनिधींचे कौतुकही केले जातंय.

पण राज्यात असं एक गाव आहे. ज्या गावात गेल्या ६० वर्षात एकदाही निवडणूक झाली नाही. ते गाव म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर हे गाव. १९६२ साली ‘अनगर’ गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून आजगायत ग्रामपंचायतीची एकही निवडणूक झाली नाही.

बाबुराव अण्णा पाटील यांचा विचार

अनगर गावाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यामागे स्व. बाबुराव अण्णा पाटील यांची प्रेरणा होती. बाबुराव अण्णाचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. घरात पाटीलकी पूर्वापार चालत आलेली होती. गावप्रमुख म्हणून पाटील परिवार फार पूर्वीपासून काम पाहत होते. मात्र राजकारणाशी तसा फार संबंध नव्हता. अण्णांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अण्णांनी स्व:ताची नवी ओळख निर्माण केली. इतर चार गावांसारखे असणारे ‘अनगर’ गाव अण्णांच्या कार्यकर्तृत्वाने सुविख्यात झाले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९५२ साली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. आमदारकीच्या या निवडणुकीला बाबुराव अण्णा उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि राजकीय पटलावर ‘पाटील’ परिवाराचा उदय झाला.

अण्णा उत्तम संघटक होते, धाडसी होते आणि कोणत्याही संकटाशी दोन हात करण्याची धमक त्यांच्या अंगी होती. जनसामान्याविषयी खूप प्रेम होते व गरजूंना मदत करणे हा त्यांचा स्वभावधर्म होता. त्यांनी पैसा कधीच मोठा मानला नाही. माणूस मोठा मानला. अनगर गाववरती मनापासून प्रेम केले. या गावाला एक शिस्त दिली. नवी ओळख दिली.

१९६२ साली ‘अनगर’ गावच्या ग्रामपंचायतीची स्थापना झाली. तेव्हापासून आजगायत ग्रामपंचायतीची एकही निवडणूक नाही. उभ्या महाराष्ट्रात असे गाव शोधूनही सापडेल का नाही या विषयी शंका आहे.

अश्या अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टी ही गावाची वेगळी ओळख आहे. या गावातील लोक एकमेकांशी गुण्यागोविंदाने वागतात. कोणतेही जातीय , धार्मिक संघर्ष या गावात झाले नाहीत . गावपातळीवर अनेक निर्णय सामंजस्यपूर्ण विचाराने घेतले जातात.

पंचक्रोशीतील गावांवरही पगडा

अनगर सोबतच आजबाजूच्या ग्रामपंचायती बिनविरोध करण्यासाठी कायम प्रयत्न केले. त्याच्या परिणाम म्हणजे अनगर सोबत कुरणवाडी, बिटले, खंडोबाची वाडी, पासलेवाडी, गलंदवाडी, नालबंदवाडी या सात ग्रामपंचायतीमध्ये देखील निवडणुका बिनविरोध होतात. यंदाच्या वर्षी देखील या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान’ खूप अलीकडे आले. अनगर गावामध्ये हे अभियान फार पूर्वीपासून चालू आहे , अनगर गाव तंटामुक्त आहे. काही समस्या निर्माण झालीच तर त्याचे निवारण गावपातळीवर केले जाते. कधीही पोलिस स्टेशनशी कसलाही संबंध ग्रामसस्थांचा येत नाही. या गावात एकही दारूचे दुकान नाही, बियर शॉपी नाही.

स्व . लोकनेते अण्णा यांनी घालून दिलेला विचार, शिस्त, राजकीय वारसा त्यांचे सुपूत्र राजन पाटील यांनी अतिशय समर्थपणे जपला आहे. अण्णांनी घालुन दिलेला सुसंपन्न राजकीय वारसा मनोभावे तो अधिक गौरवशाली केला आहे. १५ वर्षे सलगपणे विधानसभा सदस्य म्हणून अतिशय जबाबदारीने काम पाहिले. आपल्या मतदार संघातील प्रलंबित कामे त्यांनी पूर्णत्वास नेली. ‘सामान्य माणसाचा विकास’ हा अण्णांनी घालून दिलेला विचार त्यांनी मनापासून जपला आहे. विविध सहकारी संस्थांची उभारणी करून राजन पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी यांना मोठा आधार दिला आहे.

बाळराजे पाटील व अजिंक्यराणा पाटील यांच्या रूपाने पाटील परिवारातील ही तिसरी पिढी पाटील परिवाराचा राजकीय वारसा अतिशय सक्षमपणे पुढे चालवीत आहे.

उत्तम संघटन कौशल्य हे दोन्ही युवानेते राजकीय आणि सामाजिक जीवनात आपले यशस्वी योगदान देत आहेत. बाळराजे पाटील हे लोकनेते शुगरचे अध्यक्ष या नात्याने शेतकऱ्यांची प्रगती व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत तर अजिंक्यराणा पाटील हे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम काम पहिले होते. विद्यार्थ्याच्या असणाऱ्या मूलभूत समस्यांचे निराकरण करण्यासाठी आजही ते सतत आग्रही असतात.

स्व. लोकनेते अण्णा यांनी घालून दिलेला राजकीय , सामाजिक वारसा मा.आ. राजनजी पाटील यांनी समर्थपणे सांभाळून आपल्या दोन्ही मुलांकडे मा. बाळराजे पाटील व मा. अजिंक्यराणा पाटील यांच्याकडे सुपूर्द केला व दोन्ही युवानेते हा वारसा अतिशय प्रभावीपणे पुढे चालवित आहेत हे अनगर गावच्या मातीच वैशिष्ट आहे .

‘अनगर’ हे केवळ गाव नाही तर एक परिवार आहे ,पाटील परिवार हे या गावाचे कुटुंबप्रमुख आहेत व इथल्या प्रत्येक व्यक्तीशी प्रेमाच्या धाग्याने बांधले गेले आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.