Take a fresh look at your lifestyle.

तब्बल ४३८ दिवस माणूस समुद्रात एकटा जीवंत राहीला

मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क ९६५० किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता.

0

मागच्या वर्षभरात आपण सर्वांनी कोरोनाचा मोठा काळ अनुभवला आहे. या काळात आपल्याला 14 दिवस क्वॉरंटाइन राहायला अवघड जात होते. पण असा एक व्यक्ती आहे जो तब्बल ४३८ दिवस एकटा राहिला.

जोस साल्वादोर अल्वारेन्गा असं या व्यक्तीचे नाव.  ही गोष्ट म्हणजे त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तिचे अनोखे उदाहरण आहे.

काही घटना या अविश्वसनीय आणि माणसाच्या संघर्षाची परिसीमा गाठणाऱ्या असतात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, ज्या ठिकाणी मानवाचे सर्व उपाय खुंटलेले आहेत, आपले अस्तित्व पुढे टिकवून ठेवणे, जगणे अशक्य आहे. अशा प्रसंगामधून जेव्हा माणसे जीवंत परत येतात आणि सामान्य जीवन जगतात तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

जोस अल्वारेन्गा मेक्सिकन मच्छिमाराची बोट समुद्रामध्ये भरकटल्यानंतर तो चक्क ४३७ दिवस जीवंत राहिला.

बचाव पथकानेही शोधकार्य थांबविले

जोस अल्वारेन्गा 17 नोव्हेंबर 2012 रोजी तो कॉर्डोबा नावाच्या मित्रासह बोट घेऊन प्रशांत महासागरात मासे पकडण्यासाठी निघाला. त्यांच्या सोबत पुढील दोन तीन दिवस पुरेल इतकीच साधन सामग्री होती. सुरुवातीच्या काही तासातच त्यांना चांगले मासे मिळाले होते. ते आनंदातच होते.

पण तेवढ्यात भयंकर वादळाला सुरुवात झाली. जोरजोरात पाऊस कोसळू लागला. त्यांनी घाईने किनारा गाठायचा प्रयत्न केला. पण वादळामध्ये रस्ताच सापडत नव्हता आणि त्यांची बोट समुद्रामध्ये भरकटत जाऊ लागली.

वादळ पुढे ५ दिवस तसेच सुरु राहिले. त्यामूळे ते किनाऱ्यापासून खूप दूर गेलेले होते. वादळामुळे बोटीचे खुप नुकसान झाले, बोटीवरची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद झाली. रेडिओवरून बोट मालकाशी संपर्क करायचा प्रयत्न केला.

पण वादळामूळे शोधकार्याला अडथळे आले. या वादळात ते जीवंत राहीले नसतील, हे समजून बचाव पथकानेही शोधकार्य थांबविले.

स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माश्यांमधील रक्त पिऊन दिवस काढले

जोस अल्वारेन्गा तरबेज मच्छिमार होता. त्यामूळे मासे, कासव आणि समुद्रपक्षी तो अगदी शिताफीने पकडायचा त्यामूळे खाण्याची तरी चिंता नव्हती. अगदी काही दिवसात बोटीवर असलेले सर्व खाद्यपदार्थ काही दिवसात संपले. पावसाचे पाणी साठवून त्यांनी ते प्यायला सुरुवात केली. पण पाऊस ठराविक काळात पडतो. इतरवेळी त्यांनी स्वतःचे मूत्र पिऊन किंवा माश्यांमधील रक्त पिऊन दिवस काढले.

कोणतीही बोट किंवा विमान पण दिसत नव्हते आणि जरी पडले तरी सगळी उपकरणे खराब झाल्यामुळे संपर्क करता येत नव्हता.

दोघांनाही आता कळून चुकले होते कि आता परत घरी जाण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. असे दिवसामागून दिवस जाऊ लागले. महिन्या मागून महिने गेले पण त्यांना किनारा काही सापडत नव्हता. यामुळे ते साहजिकच निराशेने घेरले गेले.

या अथांग समुद्रामध्येच भरकटत असताना एखाद्या दिवशी मृत्यू येणार या निराशेने ते हवालदिल झाले.

मित्राचा मृत्यू झाला

जोस स्वतःला गुंतवून ठेवायचा पण कॉर्डोबा मात्र निराशेत गेला. त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर होत होता. रोज कच्चे अन्न खावे लागत असल्यामुळे तो वैतागला आणि त्याने खाणे पिणे सोडून दिले. काही दिवसांमध्ये त्याचा भुक आणि निर्जलीकरणामुळे मृत्यू झाला. आपल्या मित्राचा अशा प्रकारे झालेला मृत्यू बघून जोसला जबर मानसिक धक्का बसला.

त्याने कॉर्डोबाचा मृतदेह 5/6 दिवस तसाच ठेवला. काय करावे त्याला सुचेना. त्याच्या मनात पण आता आत्महत्येचे विचार यायला लागले. पण त्याने मनाशी दृढनिश्चय केला आणि मित्राचा मृतदेह पाण्यात फेकून दिला आणि आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याचा निश्चय केला.

तब्बल ४३८ दिवसानंतर त्याला मार्शल बेटाचा किनारा दिसला

पुढे अजून ७/८ महिने तो समुद्रामध्ये असाच भरकटत होता. तब्बल ४३८ दिवसानंतर त्याला मार्शल बेटाचा किनारा दिसला, तो किनाऱ्यावर पोचला.

मेक्सिकोच्या ज्या गावातून त्याने प्रवास सुरू केला होता तेथून तो चक्क ९६५० किलोमीटर दूर अंतरावर येऊन पोचला होता.

अश्या प्रकारे प्रतिकूल परिस्थितीमध्ये, नैसर्गिक आव्हानांचा सामना करत जोस अल्वारगेन्गाने आव्हानांचा सामना करत कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडता येते हे सिद्ध केले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.