Take a fresh look at your lifestyle.

शिक्षणासाठी दिल्लीत जाताना

0
  • अभिपर्णा भोसले (लेखिका दिल्ली विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत आहेत)

मुळात पानिपत मध्ये येऊन लढण्याची गरज नसतानाही लढणारा महाराष्ट्र आणि सर्व सुविधा आणि संधी उपलब्ध असतानाही दिल्ली बाबत उदासीन असलेला महाराष्ट्र हि दरी फार मोठी आहे. अडीच शतकात महाराष्ट्राची दिल्ली बद्दलची मानसिकता आणि दृष्टिकोन का बदलला याचा शोध घेण्याचा हा एक प्रयत्न.

भारतातील शिक्षण पद्धती त्रिस्तरीय आहे. दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेचा विचार करता दिल्ली राज्य सरकारच्या अखत्यारीत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाचा समावेश आहे तर उच्च शिक्षण विभाग हा उच्च शिक्षण संचालनालयाच्या अधिकार कक्षेत येतो. आजघडीला दिल्लीतील प्रतिष्ठित शिक्षण संस्था आणि सर्व विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखांपेक्षाही जास्त आहे.

साधारणत सर्व शैक्षणिक पदवी पदव्युत्तर आणि संशोधन अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते, काही अभ्यासक्रमात प्रवेश परीक्षेतून उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम निवडीसाठी मुलाखत घेतली जाते. यातील बहुतांश शिक्षण संस्था आणि विद्यापीठे ही फार जुनी आणि प्रतिष्ठित आहे त्यामुळे संबंधित विषयांमध्ये राष्ट्रीय पातळीवर आजपर्यंत कडून आलेली एकंदर प्रगती आणि विविध संशोधन याची संपूर्ण माहिती करून घेता येते. केवळ दर्जेदार शिक्षणच नव्हे तर व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. प्रशिक्षण संस्था आणि विद्यापीठे राज्य आणि केंद्र सरकारच्या अधिकार कक्षेत येतात. त्यातील शिक्षण शुल्क हे साधारण आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यासाठी परवडेल इतके अल्प आहे. सर्वच महाविद्यालयांमध्ये उतम सुविधा पुरवल्या जातात ज्यामध्ये संगणकयुक्त ग्रंथालय, खेळ संकुल, वायफाय सुविधा आणि स्वच्छ आणि प्रशस्त आवार यांचा समावेश होतो.

प्रवेश प्रक्रिया ते अंतिम निवड

या प्रवासाची तयारी साधारणतः सहा ते आठ महिने अगोदर करावी लागते. दिल्लीतील प्रतिष्ठितशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपूर्ण देशभरातून विद्यार्थी अर्ज करत असल्याने स्पर्धा तीव्र असते.JNU सारख्या विद्यापीठांमध्ये स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहे तर बहुतांश विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यासाठीनवनिर्वाचित नॅशनल टेस्टिंग एजन्सी ऑनलाइन परीक्षा घेते. देशातील मोठ्या शहरांमध्ये परीक्षा केंद्रेअसतात. प्रवेश अर्ज दाखल केल्यानंतर प्रवेश होईपर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाइन आहे. त्यानंतर केवळकागदपत्र पडताळणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहावे लागते. त्यामुळे भारतात कुठेही असलेला विद्यार्थीकेवळ इंटरनेटच्या माध्यमातून दिल्लीतील प्रवेश निश्चित करू शकतो.

विद्यार्थिदशेत काम करण्याची संधी

दिल्लीत विद्यार्थी म्हणून राहत असताना अनेक ठिकाणी बहुतांश लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते. देशाच्या राजधानीचे ठिकाण असल्याने राजकीय संस्था, खाजगी कंपन्या, स्टार्ट अप्स, प्रसारमाध्यमे, डिजिटल मार्केटिंग, सोशल मीडिया, कंटेन्ट लेखन आणि तांत्रिक लेखन अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यासाठी पगारी आणि बिनपगारी इंटरशिप उपलब्ध आहेत. यात पूर्वानुभव नसला तरी इंटर्नशिप मिळू शकते. ज्या विषयामध्ये शिक्षण सुरू आहे त्या विषयाशी निगडित इंटर्नशिप मिळाली तर व्यावसायिक बाबींचा परिचय होतो तसेच अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शनही मिळते. पदवी आणि पदव्युत्तर पदवी पूर्ण झाल्यानंतर पुढे कोणत्या दिशेस वाटचाल करायची हे स्पष्ट होते. पगारी इंटर्नशिप आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी हातभार लावते. अंतिम शैक्षणिक वर्षापर्यंत असे पाच-सहा इंटर्नशिप अनुभव गाठीशी असल्यास त्याचा करिअर साठी फायदाच होतो. इंटर्नशिप दरम्यान संपूर्ण देशभरातून आलेल्या लोकांशी संवाद साधता येतो. यातून वैचारिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आदानप्रदान होते. नवीन अनुभव येतात. आयुष्याकडे एका विशिष्ट चौकटीतून न पाहता अधिक खुल्या दृष्टिकोनातून पाहता येते. सोबत अभ्यास करणारे विद्यार्थीमित्र आणि कामाच्या ठिकाणी असणारे वातावरण खेळीमेळीचे असते.

इथे चालीरीती आणि खादयसंस्कृती बद्दल जाणून घ्यायला लोक उत्सुक असतात. अशा संवादांमधून एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा जाणवत राहते. दिल्लीत रुळण्यासाठी जरा वेळ लागतो पण सर्वसमावेशक शिक्षण पद्धती आणि खेळीमेळीच्या वर्क कल्चरमुळे ताण तणाव जाणवत नाही.

उच्चशिक्षणाचा विचार करता महाराष्ट्रातील तरुणांचा ओढा दिल्लीकडे तितका दिसून येत नाही. महाराष्ट्राची समृद्ध शैक्षणिक परंपरा पाहता तिथे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व व्हायला हवे. या विषयावर अधिक विचार केला असता असे लक्षात येते की सर्वप्रथम देशात शैक्षणिक सुधारणांचा श्रीगणेशा महाराष्ट्रात झाला आहे. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातच मुंबई आणि पुणे येथे महाविद्यालयांची स्थापना झाली. वैदयकीय, अभियांत्रिकी, विधी, कला, विज्ञान, वाणिज्य या शाखांमध्ये शिक्षण घेण्यासाठी या शहरांकडे स्थलांतर होऊ लागले. शैक्षणिक कारणास्तव स्थलांतर हे अशा मोजक्या शहरापुरते मर्यादित राहिले. केंद्रीय सेवा आणि वाणिज्य क्षेत्रात काम करणारे मराठी लोक राज्य बाहेर पडले असले तरी उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी महाराष्ट्रात असण्याकडे कल दिसून येतो. उच्च प्रतीचे शिक्षण आणि समाधानी पगाराची नोकरी; शिवाय मुळ गावी हवी तेव्हा भेट देता येते या कारणांमुळे मराठी लोक महाराष्ट्रात राहणे पसंत करतात. आयटी सेक्टरमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्याने फार फार तर बंगलोर पर्यंत मराठी माणूस स्थलांतर करतो पण दिल्लीसारख्या शहरात शिक्षण आणि नोकरीसाठी येणे तितकेसे पसंत केले जात नाही. थोडक्यात मराठी माणसाची कम्फर्ट झोन बाहेर येण्याची तयारी नाही. त्यामुळे येथील राजकारणात, तसेच प्रमुख प्रशासकीय संस्थांमध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये, न्याय व्यवस्था, खाजगी क्षेत्र आणि कॉर्पोरेट क्षेत्रात मराठी लोक तुरळक आढळतात.

विद्यापीठ पातळीवरील राजकारण

दिल्लीतील महाविद्यालयीन आणि विद्यापीठाच्या निवडणुका हा एक सोहळाच असतो. दिल्लीतून संपूर्ण देशाची सूत्रे हलत असल्याने सर्व राजकीय पक्षांच्या युथ विंग्स या निवडणुकांमध्ये अॅक्टिव असतात. भारतातील सर्वात जास्त केंद्रीय विद्यापीठे दिल्लीत असल्याने दिल्लीतील स्टूडेंट युनियनच्या निवडणुका भारतीय राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे, हे दर्शवतात. दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, ज्येष्ठ काँग्रेस नेते अजय माकन आणि दिल्ली भाजपचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात याच निवडणुकांमधून झाली आहे. राष्ट्रीय राजकारणाचा विचार करताना दिल्लीत राजकारणात शिरकाव करण्याची ही पहिली पायरी आहे.

दिल्ली विद्यापीठातील राजकारणात मराठी प्रतिनिधित्व नाही कारण एकदम दिल्लीत येऊन कुठलाच विद्यार्थी निवडणुकीसाठी उभा राहू शकत नाही. उत्तर प्रदेश, बिहारची लोकसंख्या आणि त्यांचा दिल्लीत येण्याकडे असलेला कल विरुद्ध महाराष्ट्राची लोकसंख्या आणि मराठी तरुणांचा दिल्लीकडे येण्याचा कल यात प्रचंड तफावत आहे. आपले राज्य क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या निकषांवर मोठे असले तरी दिल्लीत ठसा उमटवला इतके आपले मनुष्यबळ नाही. अंतराचा विचार करता उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा या राज्यांना दिल्ली तुलनेने जवळ आहे आणि हे त्यांच्या दिल्लीत येण्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. दिल्लीतील राजकारणावर उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि पंजाब या राज्यांतील राजकारणाची छाप आहे. भावनिक आवाहने आणि लोंढ्याने मिळणारे समर्थन ही उत्तरेतील राजकारणाची वैशिष्ट्ये आपल्याकडे नाहीत. महाराष्ट्रात साक्षरतेचे प्रमाण जास्त असल्यामुळे समाजाने अंगिकारलेली वैचारिक मानसिकता हा महाराष्ट्रातील राजकारणाचा पाया आहे.

महाराष्ट्रातील महाविद्यालयीन आणि विद्यापीठातील विद्यार्थी निवडणूका बंद करण्यात आल्याने ते स्पिरिट राज्यपातळीवर उरलेले नाही त्यामुळे देश पातळीवर मराठी प्रतिनिधित्व नसणे ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही. दिल्लीतील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असल्याने संबंधित राज्यातील विद्यार्थी राजकीय पटलावर कार्यान्वित होतात आणि त्यांना त्यांच्या राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. ते आपल्या राज्यातील तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडू शकतात आणि समस्यांकडे लक्ष वेधू शकतात त्यामुळे या निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत. पण वोट बँक तयार होऊ शकत नसल्याने विद्यार्थी संघटनेच्या मराठी प्रतिनिधित्व प्रश्नच येत नाही.

संस्कृतीतील फरक आणि महाराष्ट्राबद्दल असलेले अज्ञान

मराठी माणूस उत्तर भारतीय संस्कृतीत मिसळू शकला नाही. आपला इतिहासही सगळ्यांना कळेल अशा पद्धतीने अजून देशासमोर आला नाही. इथल्या लोकांना आपल्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे. 2018 मध्ये लाल किल्ल्यावर ‘जाणता राजा’ चा हिंदी प्रयोग झाला. किमान एक लाख लोकांनी तो  प्रयोग पाहिला. तेथील हिंदी भाषिक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया अशा होत्या की त्यांना महाराष्ट्राचा इतिहास चार-पाच होळी पलीकडे माहितीच नव्हता. त्यामुळे मराठी माणूस ही कुठेतरी कमी पडला आहे, असे म्हणण्यास वाव आहे. मराठी अस्मितेच्या नावाखाली आपण आपला इतिहास, आपल्याकडे झालेल्या शैक्षणिक सामाजिक आणि वैचारिक सुधारणा आपल्या पुरत्याच मर्यादित ठेवत आहोत का, असा प्रश्न पडतो. लोकमान्य टिळकांबद्दल आजही उत्तर प्रदेश मध्ये प्रचंड आदर आहे तसा मराठी आयकॉन स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपण निर्माण करु शकलो नाही हे आपले दुर्दैव आहे.

करियर आणि स्थायित्व

मराठी माणूस दिल्लीत स्थायित्व पत्करत नसल्यामागे असलेले एक कारण म्हणजे येथील हवामानहोय. महाराष्ट्रात तीन ऋतू आहेत पण दिल्लीत मात्र आठ महिन्यांचा उन्हाळा आणि चार महिन्यांचीथंडी अनुभवायला मिळते. येथील उन्हाळा आणि हिवाळा अतिशय तीव्र असल्याने सुरुवातीचे एक वर्षवातावरणाशी जुळवून घेण्यात जाते. घर आणि विद्यापीठ किंवा कार्यालय यांच्यात अंतर असल्यासएनर्जी ड्रेन होत असल्याचे जाणवते. त्यामुळे तब्येत जपून कार्यक्षमता टिकून ठेवणे हे मोठे आव्हान आहे.

मराठी माणसाला सुरक्षित वातावरणात जगण्याची सवय आहे. इथलं ‘भाईसाब कल्चर’ त्याला मानवतनाही. तोंडावर गोड बोलून आपले काम करून घेणे आणि संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसायला मराठीमाणूस धजावत नाही. आपल्याला जे वाटते ते स्पष्ट बोलून मोकळे होणे ही मराठी वृती आहे. इथे”भाईसाब, भाईसाब” म्हणून तुमचा पता कधी कापला जाईल याचा पता लागत नाही. आपण या सेटअप मध्ये तग धरू शकणार नाही याची कुठेतरी जाणीव असल्याने मराठी माणूस शिक्षणासाठी दिल्लीत आलाच तरी तीन-चार वर्षे राहन माघारी जातो. फार तर दहा वर्ष कामाचा अनुभव घेऊन परतीच्या प्रवासाची तयारी करतो. इथे राहण्यापेक्षा माघारी जाण्याकडे आपला अधिक कल आहे. एकंदरीत दिल्ली चा पोषक अशी आपली परिसंस्था नसल्याने दिल्लीत करिअर घडवण्याची मानसिकता अजून तयार झालेली नाही.

राष्ट्रीय भान

राज्यपातळीवर राज्यातील प्रश्न सोडवायचे असतील तर महाराष्ट्रात राहणे प्रशस्त आहे, पण तेथे काम करताना काही मर्यादा आहेत. राष्ट्रीय पातळीवर काही वेगळे करायचं असेल, मोठ्या अपेक्षा असतील आणि जरा ब्रॉड अनुभव घ्यायचा असेल तर दिल्ली शिवाय पर्याय नाही. दिल्लीत तसे पाहिले तर प्रत्येक राज्यातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि नोकऱ्यांमध्ये कार्यरत आहेत. प्रसारमाध्यमांचे उदाहरण घेतल्यास इंडियन न्यूज पेपर सोसायटीमध्ये भारतातील प्रत्येक वर्तमानपत्राचे कार्यालय आहे. तिथे काम करणाऱ्या व्यक्तीस देशाच्या कानाकोपऱ्यातील बित्तंबातमी कळते; त्यामुळे तिथे काम करणाऱ्या व्यक्तीस एकूण राष्ट्रीय आवाका कळतो.

ल्युटीयन्स दिल्ली मधील मोठ्या इमारतीच्या परिसरात वावरताना एक दडपण जाणवत राहते. येथे खऱ्या अर्थाने सताकेंद्र असल्याची जाणीव होते. आपल्याही नकळत एक जबाबदार नागरिक म्हणून आपण देशाच्या उभारणीत आपला खारीचा वाटा कसा पार पाडू शकतो याची टोचणी लागून राहते. मुंबईत राहून एखादी गोष्ट करणे हे पुण्यात राहून तीच गोष्ट करण्यापेक्षा जसे वेगळे आहे तसेच दिल्लीत काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असणे हे भारतात इतरत्र कुठेही स्थिरावण्यापेक्षा वेगळे आहे. येथील आव्हानांचे स्वरूप मोठे किंवा भीतीदायक नाही तर वेगळे आहे. ते वेगळे अशा अर्थाने आहे की दिल्लीत राहत असताना, शिक्षण घेत असताना किंवा नोकरी करत असताना राष्ट्रीय भान असणे फार गरजेचे आहे.

मराठी माणूस हे कायम जाज्वल्य अभिमानाने सांगतो की सदाशिरावभाऊंनी दिल्ली चे तख्त फोडले होते. मराठी माणसाची ही मुळात सवय असते की आपल्याला नको त्या गोष्टींचा अभिमान असतो. पण तख्त फोडल्याचा कसला अभिमान? सदाशिवराव तख्तावर बसले असते तर संपूर्ण भारताचा इतिहास किती वेगळा राहिला असता हा विचार आपण का करत नाही? त्यावेळी असलेले राष्ट्रीय भान मराठी माणसामध्ये परत येण्यासाठी आणि केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित विचार न करता देशाचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीला येणे आवश्यक आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.