Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीतील मराठीपण

0

दीर्घ लढ्यानंतर देशाच्या नकाशावर महाराष्ट्राला स्वतःच स्थान मिळालं. तेव्हा खरंतर माझी पिढी (मिलेनिअल्स जनरेशन) जन्माला देखील आली नव्हती. त्यामुळे आमच्या तरुणाईने तो काळ अनुभवला तो पुस्तकांतून आणि ज्येष्ठांच्या गोष्टी मधून, भारताच्या भाषावार प्रांतरचनेत खऱ्या अर्थानं मराठी वारसा जपणान्या आणि जगणाऱ्याजनमानसाला न्याय मिळाला.

मराठी ही केवळ भाषा नाही, ती संवादाच्या माध्यमापलीकडे जाऊन एक भावना आहे, ओजस्वी संस्कृतीचा एक विशाल वटवृक्ष आहे ज्याची मुळं ज्ञानेश्वरांच्या पसायदानापासून ते कुसुमाग्रजांच्या काव्यापर्यंत मनामनात रुजली आहेत. 

काही वर्षांपूर्वी मी शिक्षणासाठी दिल्लीत आलो, दिल्लीच्या ऐतिहासिक आणि राजधानीच्या पार्श्वभूमीचं कुतूहल मनात होत. प्रथमच घराबाहेर राहायला आणि दिल्लीत नवखा असल्यान नवी आव्हान होती. हजारो वर्षांचा इतिहास असणारी पुरानी दिल्ली माझ्या साठी मात्र नवीन होती, नवं शहर आपल्याला अधिक स्वातंत्र्य आणि कोर कॅनव्हास देऊ करत, हळू हळू इथल्या जीवनपद्धती पासून ते नैसर्गिक प्रकृती पर्यंत सार समजायला उमजायला लागलं. माणूस शिकतो आणि प्रगल्भतेकडे जातो ते संस्कृतीच्या वाटेवरून, हे इथं आल्यावर अधिक प्रकर्षानं जाणवलं. दख्खनच्या कुशीतून निघून गंगा-यमुनेच्या मैदानात आल्यावर मराठी-हिंदी संस्कृतीतील साधर्म्य आणि वेगळेपण हे दोन्ही चौकस मराठी मनाला जाणवल्याशिवाय राहत नाही.

महाराष्ट्रीय जगण्यातला साधेपणा, मातीशी जोडलेली नाळ, इतिहासाचा जाज्वल्य अभिमान, संत साहित्याचा विपुल वारसा, कलेमधली वाखाणण्याजोगी रुची, धार्मिक समभाव, सांस्कृतिक जाणिवा, आर्थिक बाबींतला काटेकोरपणा, राजकीय आकांक्षा व मुत्सद्देगिरी आदी मराठीपणाची वैशिष्टये काळ आणि स्थळ बदललं तरी इथे दिल्लीत देखील अनुभवायला मिळेल हे नक्की.

दुसरीकडे खरे दिल्लीकर कोण असतील बरं? दिल्ली कुणी वसवली असेल? ह्या प्रश्नांचा मी मागोवा घेतला तो भाषिक-सांस्कृतिक औत्सुक्यापोटी. अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मी दिल्लीत ज्या वेग-वेगळ्या भागात आणि घरात राहिलो ते घर कधी सिंधी, कधी पंजाबी तर कधी हिमाचली मालकांचं होत. मग मुळात जे स्थलांतर करून इकडे स्थायिक झाले ते दिल्लीला आपलं घर मानू लागले हि सद्यस्थिती असली तरी इतिहासकारांच्या मते दिल्ली परिसरातील गावांमध्ये राहणारे जाट, गुर्जर, हरियाणवी, यादव इ. या भागातील मूळ रहिवासी आहेत. आजच्या घडीला कॉस्मोपॉलिटिअन म्हणून ओळख असणारी दिल्ली देशभरातून आणि परदेशातूनही येणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाचं केंद्र आहे. खरं पाहायला गेलं तर दिल्ली आज स्थलांतरित लोकांच शहर आहे.           

चित्तवेधक गोष्ट अशी कि इ.स. सातव शतक हे महाराष्ट्रीय आणि दिल्लीच्या इतिहासात महत्त्वाचं आहे. सातव्या शतकात भारतातील बौद्ध धर्म अभ्यासण्यासाठी आलेल्या चिनी अभ्यासक ‘ह्वेन त्सांग’ च्या लेखनात ‘महाराष्ट्र या शब्दाची पहिली नोंद सापडते. अर्थात मध्ययुगीन व आधुनिक काळात महाराष्ट्र हे नाव लाभण्यामागे इतर कारण आहेत. दिल्लीचे संदर्भ पौराणिक गीतेतील इंद्रप्रस्थ पासून ते सातव्या शतकातील तोमर घराण्याच्या इतिहासापर्यंत उपलब्ध आहेत. तोमर घराण्याचा राजा अंगपाल याने इ.स. ७३६ मध्ये अरावली च्या सानिध्यात मेहरौली भागात ‘लाल कोट हे किल्लेवजा बंदिस्त शहर वसवलं ज्याचं कालपरत्वे दिल्लीत रूपांतर झालं. पुढे दिल्लीने अनेक आक्रमणं झेलत मुघल, ब्रिटिश ते स्वतंत्र भारताची राजधानी आणि आज जगातील प्रमुख शहर इथवरचा प्रवास केला, बशीर बद्र यांच्या ढंगात सांगायचं झालं तर “दिल की बस्ती पुरानी दिल्ली है, जो भी गुज़रा है उस ने लूटा है”. आजही दिल्लीचा ऐतिहासिक व राजकीय डोलारा पाहण्याजोगा आहे. मला व्यक्तिशः आकर्षित केलं ते दिल्लीच्या ऐतिहासिक स्मारकांनी आणि शैक्षणिक संस्थांनी. 

राजधानी दिल्ली शहराचा अवाढव्य विस्तार, केंद्रशासित प्रदेश व भारत सरकारच अधिष्ठान म्हणून
इथल्या कार्यप्रणालीच वेगळ स्वरूप, कैक वर्षापासून स्थलांतरीत होऊन मैदानी प्रदेशात स्थायिक झालेले भिन्न चालीरीतींचे-पार्श्वभूमीचे लोक आणि शतकानुशतके आक्रमणं झेलत तयार झालेली एक संमिश्र जीवनपद्धती व इथल्या स्वभावातला धीट व उग्रपणा आदी बाबी सहज जाणवण्यासारख्या आहेत.

मुंबई आणि दिल्लीतील द्वंद्व आणि त्यावर होणाऱ्या मजेशीर कोट्या हे काही नवं नाही. तुमच्याकडे काय आणि आमच्याकडे काय आहे; हि मराठी-अमराठी गरमा-गरम चर्चा अखेर थांबते ती, “आमच्याकडे समुद्र आहे।” या वाक्यावर. दिल्लीत कार्यरत राहून राज्याशी एक निरंतर संपर्क साधणाऱ्या संस्थाचा अभाव जे स्वातंत्र्योत्तर काळात नव्यानं निर्माण झालेल्या राज्यांच्या बाबतीतही झालं होत. ते पाहून महाराष्ट्र सरकारनं सामान्य प्रशासन विभाग संकल्प, १९६० अन्वये राजधानीत आपलं पहिल शासकीय राज्यस्तरीय कार्यालय स्थापन केलं. याला महाराष्ट्र राज्य सूचना कार्यालय व सूचना केंद्र असं नाव देण्यात आलं. पुढे १९६३ साली महाराष्ट्र सरकार भवन आणि संचार विभाग ने कोपर्निकस मार्गावर ‘महाराष्ट्र सदन’ वसवलं. सध्या दिल्लीत राज्याच्या विविध कामांची धुरा सांभाळण्यासाठी महाराष्ट्राचे निवासी आयुक्त कार्यालय’ कार्यरत आहे. राज्याचे जुनं व नवं असे एकूण दोन सदन मध्यवर्ती दिल्लीत आहेत. जिये राज्यातून येणाऱ्या सरकारी सेवक व जनतेसाठी निवास व भोजनाची उत्तम सुविधा आहे. दिल्लीत राहून भाकरी, ठेचा, पुरणपोळी आणि श्रीखंडाचा स्वाद घ्यायचं असेल तर महाराष्ट सदनाशिवाय दुसरी उत्तम जागा नाही.         

दोन्हीं सदनांमध्ये वर्षभर मराठीपण जपत विविध कार्यक्रम व उत्सव साजरे केले जातात, ज्यात अगदी
मराठमोळ्या गणेशोत्सव पासून ते मायभूमी साठी दैदिप्यमान योगदान देणा च्या व्यक्तींना मानवंदना देण्यासाठी कार्यक्रम आयोजित होतात. अलीकडेच सदन परिसरात साजरा झालेला शिवजयंतीचा भव्य उत्सव त्यापैकीच एक, महाराष्ट्र सदनाकडून आणि दिल्लीत राहणाऱ्या मराठी जनतेने असे कार्यक्रम आणि त्यामागचा मूळ विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणखी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. शासनाची धोरणे व संसाधने आणि लोकांचा संवेदनशील जागरूक सहभाग एकत्र आल्यास महाराष्ट्र धर्म वृद्धिंगत होईल. विविध संस्कृतीचा मिलाप होऊन संक्रमणाकडे वाटचाल करणं सहज होईल.       

सांस्कृतीक मानववंशशास्त्रानुसार (कल्चरल अंथ्रोपोलॉजि) भाषा आणि मानवी संस्कृती यांमध्ये घनिष्ठ
संबंध आहे. पाचिमात्य विचारवंतांनी पुरस्कृत केलेला भाषिक निर्धाराचा सिद्धांत (लिंम्विस्टिक डिटरमिनिझम) जो एक भाषा शिकल्या अथवा अगिकारल्यानंतर दुसन्या भाषा-संस्कृती विषयी निर्माण होणा्या प्रतिरोधक भावनेला अधोरेखित करतो, याउलट सामाजिकभाषा (सोशिओलिंग्विस्टिक्स) अभ्यासणारे विचारवंत म्हणतात कि भाषा सामाजिक आणि सांस्कृतिक स्थितीचा दरपण असते. भाषा त्वहर ते ती सामाजिक जडण-घडणीतून, भारतात इतक्या विभिन्न भाषा (संविधानात नमूद केलेल्या २२ आणि इतरही शेकडो) बोलल्या जात असतानाही वेगवेगळ्या भाषिक जीवनपद्धती व संस्कृतीमध्ये असणारी एकत्वाची भावना टिकून आहे. यामागे कधी राष्ट्रीयत्वाची भावना, कधी आर्थिक परस्परसंबंध तर कधी सामाजिक-राजकीय साधर्म्य कारणीभूत आहेत. संसाधनांवरून राज्या-राज्या मध्ये होणार्या चकमकींना ‘आर्थिक आणि संसाधन नियोजनाच्या दृष्टिकोनातून’ पाहायला हवं असं मला वाटतं. अश्या बाबींना सामाजिक वा सांस्कृतिक कलहाचे स्वरूप देणे हे देशाच्या एकात्मतेला व सांस्कृतिक वाटचालीला घातक आहे.    

उत्तर भारत आणि दक्षिण भारताच्या मध्ये सांस्कृतिक समन्वय साधण्याची जबाबदारी महाराष्ट्रानं कित्येकदा पार पाडली आहे. सह्याद्रीनं आपल्या हृदयाच्या कपारीत जितकं उत्तरेतील लोकांना स्थान दिल तितकंच दक्षिणेतील लोकांनाही, त्यामुळे पुण्यातील फर्म्युसन रोडवर एखाद्या कॅफेत दिल्लीकर तरुणी आणि तमिळ तरुण कॉफ़ी शेयर करताना दिसले तर त्यात नवल नाही, अगदी असंच दिल्लीत मराठी माणसं हिंदी व इतर भाषीय लोकांमध्ये सहज मिसळून जातात.
“माझ्या मन्हाटीची बोलू कवतुके,         
परी अमृतातेही पैजा जिंके॥”

अमृताहूनी गोड असणाऱ्या मराठीचा गोडवा दिल्लीच्या संमिश्र सांस्कृतिक वातावरणात (कल्चरल मोझेक) मध्ये देखील तसाच टिकून आहे. तुम्हाला वाचून नवल वाटेल पण एकट्या दिल्लीत (आणि एन.सी. आर. मध्ये) मराठी भाषिक लोकांनी महाराष्ट्रीय लोकांसाठी स्थापन केलेल्या साधारण ४७ संस्था कार्यरत आहेत. दिल्लीत जवळपास दीड लाख मराठी कुटुंब अर्थात साधारण साडेपाच ते सहा लाख महाराष्ट्रीय लोक आहेत, एकट्या दिल्लीत इतक्या संस्था तयार होण्यामागे दोन कारणे आहेत, पहिल, दिल्लीचा भौगोलिक विस्तार आणि दुसरं, विभिन्न भागात विखुरलेली मराठी लोकांची वसाहत. त्यामुळे कालानुरूप दिल्लीच्या प्रत्येक भागात स्थानिक मराठी लोकांनी एकत्र येऊन संस्थांची निर्मिती केली.  

यामध्ये अगदी स्वातंत्र्याच्या कित्येक दशकांआधी इ. स. १९१९ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाजा’ पासून ते अगदी अलीकडे उदयास आलेल्या ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठान’ सारख्या संस्थांचा समावेश आहे. गतिमान आयुष्यामूळे फुरसतीने वेळ काढून सलोख्याने एकत्र येण्याचे औचित्य कमी होत आहे आणि एकूणच महाराष्ट्रीय आणि उत्तर भारतीय दिल्लीच्या संस्कृतीत देखील विलक्षण बदल झाले आहेत. अश्यात उत्तरभारतातही आपलेपणाचं अनुभव या मराठी संस्था देऊ करतात, अशी भावना गेल्या अध्या शतकभर बदलणार महाराष्ट्र आणि दिल्ली दोन्ही जवळून अनुभवणारे श्री. महादनी यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्रालयातून निवृत्त झाल्यानंतर दिल्लीतच ते स्थायिक झाले आहेत व सध्या दिल्लीतील महाराष्ट्र स्नेह संवर्धक समाजाचे अध्यक्ष आहेत.        

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्याआधी दिल्लीत नया बाजार परिसरात मराठी लोकांच वास्तव्य होतं,
पहिली मराठी संस्था, महाराष्ट्रीय स्नेह संवर्धक समाज’ ची मुहूर्तमेढ इथेच रोवण्यात आली. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथा’ हे ब्रीदवाक्य घेऊन कार्यरत असणाऱ्या या दिल्लीतील मराठी संस्थेने नुकतंच आपल्या शतक महोत्सवी वर्षात पदार्पण केलं. येत्या डिसेंबर महिन्यात संस्थेचा शतकमहोत्सव साजरा करण्याचं आयोजिले आहे असं सांगत श्री. महादनींनी मला आमंत्रित ही केलं.           

वाहतुकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या सुविधेंमुळे महाराष्ट्र-दिल्ली संबंध अधिक सहज होत गेले. कालानुरूप मराठी लोकांनी एकत्र येऊन बनवलेल्या संस्था बहरल्या. १९२९ मध्ये दिल्लीच्या आराम बाग या मध्यवर्ती भागात तत्कालीन नेते एन. व्ही. गाडगीळ व मराठी समुदायाच्या पुढाकाराने ‘नूतन मराठी शाळेची स्थापना झाली, आजतागायत हि शाळा कित्येक पिढ्या घडवत आहे विशेष नोंद करायचं झालं तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. अगदी असंच दिल्लीत नावारूपाला आलेली महाराष्ट्राची आणखी एक जुनी संस्था म्हणजे मराठा मित्र मंडळ, १९४६ साली सुरु झालेल्या या संस्थेने पुढे परिसरात राहणाऱ्या मराठी जनांच्या लेकरांसाठी ज्ञानरूपी रोपटं लावून शिशुविहार चालवायला सुरुवात केली. १९५६ मध्ये याच रूपांतर ‘चौगुले पब्लिक स्कूल’ मध्ये झालं. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी “ही शाळा म्हणजे राष्ट्रीय राजधानीत मिनी महाराष्ट्र आहे” असा गौरव केला होता. दिल्लीत बदली होऊन येणाऱ्या मराठी जनतेच्या पुढच्या पिढीला घडवण्याचं काम या शाळांनी केलं.           

महाराष्ट्र-दिल्ली संबंधाविषयी माझ्या विचारांना दुजोरा मिळाला तो दिल्ली स्थित मराठा मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल पाठक यांच्याकडून. त्यांच्याशी झालेल्या दीर्घ संवादात- मराठी माणूस राज्याबाहेर पडण्याची व न पडण्याची कारणे, राजधानीत कार्यरत असलेल्या अनेक महाराष्ट्रीय संस्था, त्यांच्या कामाचं स्वरूप, वर्षानुवर्षे होणारे उपक्रम, मराठी जनतेनं दिल्लीत स्थापन केलेल्या शाळा, कालपरत्वे पिढयांमध्ये होणारे बदल, मराठी लोकांसाठी दिल्लीत सुविधा निर्माण करण्यात जनभागीदारीच महत्त्व आणि तरुणाईच्या अदम्य ताकदीवर असलेला विश्वास, इत्यादी अनेक मुद्द्यांवर सकारात्मक संवाद झाला.

“मराठी माणसात कठोर परिश्रमाची तयारी, सचोटी आणि तल्लख बुद्धिकौशल्य है तिन्ही असतानाही  महाराष्ट्रीय लोक हवं तितक्या प्रमाणात मुख्य प्रवाहात झळकत नाहीत, हे राजधानीत प्रकर्षानं जाणवत.” यावर भाष्य करताना श्री. पाठक म्हणाले की “याची जी काही कारणं आहेत त्यात मुख्यत्वे; बदलल्या गोष्टींशी अल्पावधीत एकरूप होऊन नव नव्या संधींचा शोध घेणं अर्थात ‘एक्सपोजर’ याची कमतरता, जे मराठी लोक अनुकरणीय काम करून समाजापुढे आदर्श निर्माण करतं आहेत अश्या सकारात्मक गोष्टी मुख्य माध्यमांमध्ये अथवा प्रवाहामध्ये पोहोचवले जात नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे असलेल्या बहुरंगी समृद्ध वारसेची जाण कमी असणं.”           

संस्थेच्या एकंदर प्रवासाबद्दल विचारलं असता श्री. पाठक यांनी ‘मराठा मित्र मंडळ’ यातील मराठाम्हणजे केवळ एक विशिष्ट जाती-समूह सूचक नसून जे जे महाराष्ट्रातून मराठीजन दिल्लीत आले आहेत ते सर्व या संस्थेच्या उपक्रमाचा लाभ घेऊ शकतात अस सांगितले, “महाराष्ट्रातही जे मूळ सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा कमी होतं आहे ते सण देखील आम्ही इकडे एकत्र येऊन साजरे करतो. अर्थात यात कुठलाही अभिमान वाटण्यापेक्षा हे आमचं कर्तव्य आहे असं आम्हाला वाटतं. दिल्लीत येऊन शिकणाऱ्या विद्यार्थयांन सहाय्य करण्यातही आम्ही प्रयत्नशील आहोत.”   

दिल्लीतील मराठी संस्कृती विषयी चर्चा करताना, “मराठी लोकांबद्दल जो अपप्रचार केला जातो. त्याला सकारात्मक कृतीतून आणि प्रसंगी वक्तव्यातून प्रतिसाद दिल गेलं पाहिजे. मराठी लोक आणि संस्कृती कात टाकून पुढे सरसावते आहे हे देशाला समजायला हवं आणि यासाठी राजधानी दिल्ली सारखं उत्तम व्यासपीठ दुसरं कुठे मिळेल. इथल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संधी, नवी माहिती व केंद्राची अधिकाधिक मदत व संसाधन महाराष्ट्रापर्यंत नेण्याचं काम दिल्लीतील सुज्ञ मराठी जनसमुदायाने करायला हवं.” अशी भावना मराठा मित्रमंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली. दिल्लीत असलेल्या अनेक महाराष्ट्रीय संस्थांना एकत्र आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, ज्यायोगे नानाविध प्रकारे होणाऱ्या उत्तम कामांची माहिती दिल्लीकर मराठी व इतर जनतेला उपलब्ध होईल.” असं ‘दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या श्री. अभिजीत गोडबोले यांनी आपल्या संस्थेबाबत माहिती देताना सांगितलं, प्रतिष्ठान दिल्लीतील मराठी लोकांसाठी आयोजित करत असलेल्या विविध उपक्रमाबाबत बोलताना ते म्हणाले; आधुनिक समाजात बदललेल्या सण-उत्सवाचं स्वरूप पाहता, केवळ सण साजरं करण्यापलीकडे जाऊन संस्कृतीच पर्यावरणाशी असलेली नाळ कशी टिकवता येईल यावर आम्ही विशेष लक्ष देत आहोत. उत्सव साजरे करताना मूळ पारंपरिक स्वरूप जपून निसर्गाशी एकरूप होणं गरजेचं आहे. कला आणि उत्सवाचा समागम साधताना आमच्या प्रतिष्ठान तर्फे इंडिया गेट च्या प्रांगणात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन केलं जात, प्रसिद्ध मराठी कलाकारांनी आजवर यात आपलं योगदान दिल आहे. मराठी संस्थेला राजधानीत इंडिया गेट समोर सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायची संधी लाभणं हे महाराष्ट्रीय संस्कृतीच्या प्रसारातलं एक अभिमानच पाउल आहे.”    

अगदी उत्साहानं मराठी आणि दिल्ली याविषयी चर्चा होत असताना, श्री, अभिजीत यांनी आजवर मराठी प्रतिष्ठानच्या उपक्रमांसाठी पाच हजार मराठी प्रवेशिका आल्या आहेत असं सांगितलं, खरं तर राजधानीतील मराठी जनांची संख्या (साडेपाच ते सहा लाख) पाहता आणखी प्रतिसाद अपेक्षित आहे. कामाचं स्वरूप आणि व्यस्त आयुष्य यामुळे इच्छा असूनही कित्येक मराठी लोक अश्या उपक्रमामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. परदेशातून येणारे अभ्यासक आणि कलाकार इ. ना मराठी इतिहास, संस्कृती व समाजजीवन याविषयी आवश्यक माहिती व सहाय्य देण्याचं देखील दिल्ली मराठी प्रतिष्ठान प्रयत्न करतं.

मराठी-हिंदीचा संबंध आणि दिल्ली काबीज करण्याचे मराठी मनसुबे काही नवीन नाहीत. खरंतर भौगोलिक प्रदेश काबीज करण्याचा काळ जरी केव्हाच लोटला असला तरी आपल्या प्राज्ञ कर्तृत्वाने आणि कुशलतेच्या जोरावर केंद्र सरकारच्या दरबारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर, कित्येक खाजगी संस्थांमध्ये उच्चपदांवर आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अनुकरणीय रीतीने मराठी लोक आपला ठसा उमठवीत आहेत. दिल्लीत जवळपास दीड लाख मराठी कुटुंब आहेत. काही जण सेवानिवृत्तीनंतर दिल्लीतच वास्तव्यास आहेत, उत्तर भारतात दख्खनच्या संस्कृतीला जपण्याची धुरा अश्या मंडळींनी सांभाळली आहे. तर काही जण दिल्लीला कर्मभूमी बनवल्यानंतर पुन्हा मायभूमी महाराष्ट्रकडे परततात. शेवटी “प्रवासी मी दिगंताचा, युगे युगे माझी वाट.” हे मराठी मनावर कोरल गेलंय यात नवल नाही.
 अर्थात अस असताना, महाराष्ट्रीय माणसाने बहुआयामी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून देखील केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवेत घटणारा मराठी टक्का असो किंवा खाजगी क्षेत्रात व्यवसाय करताना जोखिम घेण्याच्या प्रवृत्तीतल्या उणीवा असो, अश्या नानाविध मुझ्यावर होणारया चर्चा देखील दखल घेण्याजोग्या आहेत. दिल्लीच्या ख्यातनाम संस्थांमध्ये मराठी लोकांचं प्रमाण समाधानकारक नाही हे मी स्वतः पाहिलं आहे. मराठी विचार, संस्कृती आणि एकूण जीवनपद्धती कात टाकून जागतिकीकरणाच्या नव्या दुनियेत नव्या उमेदीने पुढे सरसावत आहे. यामुळे टीकात्मक गोष्टींचा कमीपणा वाटून घेण्याऐवजी सकारात्मक रीतीने जिथे कुठे त्रुटी असतील त्यावर निर्भीड चर्चा करून योग्यतो सर्वसमावेशक उपाय शोधण्याकडे वाटचाल करायला हवं अस मला वाटतं 

मी देशातली अनेक राज्य, शहर पाहिली आहेत. अवतीभोवतीच्या परिस्थितीच निरीक्षण करताना एक तरुण जागरूक नागरिक म्हणून माझी कर्तव्य काय आहेत यावर अधिक लक्ष देणं मला गरजेचं वाटतं. दिल्लीत राहताना, दिल्ली अनुभवताना आणि अभ्यासताना मला जाणवलं कि जगातील मुख्य आर्थिक राजकीय शक्ती असणाऱ्या लोकशाही भारताची हि राजधानी कित्येक बाबींवर विचार करायला लावणारी आहे. जसं कि नमूद करायचंच झालं तर प्रचंड अनियंत्रित लोकसंख्या आणि त्यामुळे पायाभूत सुविधांवर असलेला असहनीय ताण, प्रदूषणाची अति गंभीर समस्या, गुन्ह्यांचे वाढलेलं प्रमाण, मध्यवर्ती दिल्ली (लुटीयन्स दिल्ली) सोडता इतर भागातील अस्वच्छता, किफायतशीर निवासी सुविधांचा अभाव, वाहनांची अति रहदारीची समस्या, वाहन उभी करायला जागेचा अभाव, संसाधनांचा होणारा अपव्यय आणि तत्सम गोष्टी इथे अनुभवल्याने मला वाटतं की दिल्लीत राहणार्या मराठी लोकांनी महाराष्ट्रात परत जाताना इथून धडा घेऊन आपल्याकडे या सर्व मुद्द्यांबाबत योग्य जाणीव निर्माण करायला हवं. उदा. महाराष्ट्रातील शहरांनी शाश्वत स्वरूपाच्या पायाभूत नागरी सुविधांकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. मुंबई, पुणे, नागपूर, इ. मोठ्या शहारांव्यतिरिक्त देखील महाराष्ट्र आहे हे न विसरता, जिथे आवश्यक आहे तिथे ‘सुनियोजित शहरीकरण (टाउन प्लॅनिंग) आणि पायाभूत सुविधांची उपलब्धता (ऍक्सेस टू बेसिक इंफ्रास्ट्रक्चर) यावर लक्ष केंद्रित कराव. अद्ययावत, लोकाभिमुख सुशासनासाठी जनभागीदारी वर भर द्यायला हवं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाबींची रेलचेल असणान्या राजधानीतील उत्तम माहिती आणि अनुकरणीय गोष्टी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याची सामाजिक जबाबदारी दिल्लीत राहणाऱ्या प्रत्येक मराठी वयक्तिवी आहे असं मला वाटतं.

कालची आधुनिकता हि आजची परंपरा आहे, आजची आधुनिकता हि उद्याची परंपरा असेल. त्यामुळे
महाराष्ट्राबाहेर पडून राजधानी दिल्लीला (आणि इतर कुठल्याही प्रदेशाला) आपली कर्मभूमी बनवणाऱ्या मराठी जनतेनं आपण ज्या सामाजिक पार्श्वभूमीमूळे घडलो, ज्या वीरांच्या, संतांच्या आणि साहित्याच्या परंपरेतून विचारांची फुलं वेचत इथवर आलो त्या मराठी मातीचा सुगंध भारताच्या नसानसात दरवळत राहील यासाठी प्रयत्नशील राहायला हवं, मग हे प्रयल मोठ्या स्तरावरच व्हायला हवेत असं नाही, व्यक्तिगत पातळीवर अगदी छोट्या छोट्या कृतींमधून सांस्कृतिक समभावाची जागृत नांदी व्हायला लागली कि खऱ्या अर्थाने ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… असे अभिमानाने म्हणता येईल.

स्वानुभव सांगायचं झालं तर हिंदी बोलण्याच्या सौम्य लहज्यावरून इथे खूप लोकांनी मला विचारलं कि “आप दिल्ली के नहीं लगते, कहां से हैं आप?” उत्तरादाखल जेव्हा मी महाराष्ट्र, मुंबई किंवा पुणे अस ज्याला जस कळेल तस सांगतो तेव्हा लगेच कुणी तुटक मराठीत एखादं वाक्य बोलू लागतो, कुणी ओजस्वी छत्रपती शिवाजींबद्दल माहित असल्याचं सांगतं कुणी मुंबईच्या सिनेसृष्टी बद्दल कुतूहलाने विचारू लागतात, कुणी मराठी संताबद्दल तर कुणी राजकीय असामी किंवा घटनांबद्दल बोलू लागतात. काही जण महाराष्ट्रात काम करताना, भेट देताना आपल्याला आलेल्या अनुभवांबद्दल मोकळेपणानं बोलतात. असच एका प्रवासादरम्यान, मुंबईत काही वर्षे काम करून दिल्लीत परतलेल्या एक दिल्लीकर वयस्कर कारचालकांशी संवाद घडला. मी मराठी हे कळताच त्यांनी आपल्याकडे असलेली मराठी गाणी लावली. मोकळेपणाने बोलताना त्यांनी दिलेली प्रतिक्रिया लक्षात राहण्याजोगी होती, “साहब, मै मुंबई में एक बड़े साहब की गाडी चलाता था, काम के वास्ते सारा महाराष्ट्र घूमा. सच कहता हूँ, मुंबई के समुंदर में और मराठी लोगों में आनेवाले को अपनेमें समाने की ताकद है ना, वो शायद ही किसी और जगह दिखेगी।” त्या कारचालकाचं बोलणं ऐकताना मराठी असल्याच अभिमान वाटलं. “भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणणाऱ्या तुकोबांचे आपण वारस असल्याच्या जाणीवेने पुन्हा मनात उभारी घेतली.          

दुसरा अनुभव देखील अश्याच धाटणीचा, दिल्लीत वकिली करणाऱ्या माझ्या एका मित्रा सोबत दक्षिण दिल्लीतील जंगपुरा जवळील बाजारात फिरताना, लिंबू सरबत पिण्यासाठी एका माहितीच्या गाड्यावर तो मला घेऊन गेला. मी महाराष्ट्रीय आहे हे ठाऊक होताच, त्या गाड़ा चालवणाच्या व्यक्तीने आपण मूळचे राजस्थानचे पण नाशिक, कोल्हापूर इथे काही वर्षे काम केल्याचं सांगितलं आणि विशेष म्हणजे हे ते मराठीत सांगू लागले. सरबत बनवताना त्यांनी आपण अभंग गाऊ शकतो असं म्हणत सुरेल आवाजात मराठी अभंग गायला सुरवात केली. तिथून सरबतीच्या सोबतीला सूर अनुभवून निघताना माझ्या मनात प्रश्न होता, अश्या किती बहुभाषिकांच्या ओठांवर मराठी मातीतल्या संतांचे अभंग पोहोचले असतील? आणि नव्या पिढीतल्या किती मराठी ओठांवर असे अभंग उरले असतील? विवेकी विचाराला स्थळ, काळ आणि भाषेचं बंधन नसत हेच खरं.    

दिल्लीतील हिंदी भाषिक दोस्तांशी, महाविद्यालयात सहकर्मीशी आणि सार्वजनिक ठिकाणी गप्पा-चर्चा करताना इतर भाषिकांना महाराष्ट्राच्या लोककलेपासून ते सिनेमापर्यंत, महाराष्ट्राचे सहकार क्षेत्रातल्या योगदानापासून ते राष्ट्रीय राजकारणात मराठी नेत्यांच्या योगदानापर्यंत अश्या बहुरंगी गोष्टींबद्दल काहीशी माहिती असते, काहींना जाणून घेण्याचं औत्सुक्य असतं तर काहींना आश्चर्यकारकरित्या महाराष्ट्राच्या एखाद्या विषयावर मराठी माणसापेक्षा अधिक सखोल माहिती असते. या नाण्याची दुसरी बाजू देखील आहेच, काहींच्या मनात महाराष्ट्रीय व्यक्ती आणि संस्कृतींबद्दल गैरसमज देखील आहेत. अर्थात त्यामागची विविध कारणं काय या उहापोहात पडणं हा या लेखाचा विषय नाही. मराठी विचार आणि महाराष्ट्राची संस्कृती देशाच्या व जगाच्या पाठीवर इतरत्र पोहोचताना तिच्या मूळ भेसळमुक्त स्वरूपात पोहोचावी इतकंच यामागचा हेतू, “जगात काय म्हटलयं यापेक्षा कुणी म्हटलयं यालाच अधिक महत्व आहे हे मला कळून चुकलंय.” अ्स म्हणणारे पु.ल. मला दिल्लीतही आठवतात. देशाच्या एकंदर समाज राजकारण व अर्थकारणात मराठी आवाजाला महत्त्व आहे. मराठी माणूस जे काही बोलेल त्यातून संभाव्य राष्ट्रीय समीकरण घडू-बिघडू शकतात

त्यामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यात आपण जे बोलतोय, जसं वागतोय आणि ज्या विचारसरणीचा पुरस्कार करतोय याकडे आपलं जाणीवपूर्वक लक्ष असायला हवं, अर्थात ते आहेच, मात्र कुठेही मराठी लोक आत्मकेंद्री आणि इतर विचारांचा संस्कृतींचा तिरस्कार करतात हा नकारात्मक संदेश जायला नको. कारण मुळात तस नाहीये. सध्या दृकश्राव्य माध्यमांमूळे दंतकथांचा जमाना आला आहे. जिथं सकारात्मक गोष्टीपेक्षा नकाराला हाहाकार बदलण्याचा हेतुपुरस्सर प्रमाण अधिक पाहायला मिळेल. अश्या वातावरणात महाराष्ट आणि मराठी विचार, सामाजिक इतिहास व धारणा, राजकीय विचारधारा आणि सांस्कृतिक समभाव यांबद्दलच खर सर्वसमावेशक स्वरूप आणि विचारामागची तर्कसंगत भूमिका भारतीय बंधू-भगिनीपर्यंत पोहोचवणं हि देखील मराठी मातीला दिलेली मानवंदनाच असेल. केवळ उत्तम पिकवून उपयोग नाही, योग्य ठिकाणी ते पोहोचवण्याची, प्रस्तुत करण्याची व प्रसंगी विकण्याची कला देखील आत्मसात करणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. 

दिल्लीत कला व साहित्य विषयक कार्यक्रमांची रेलचेल असते. कित्येक परदेशी कलाकृतींना इथे पाहण्याची संधी लाभते. दिल्लीच्या हिवाळ्यात हिंदी-उर्दू साहित्य संमेलनामध्ये गालिब, मीर, नागार्जुन, दिनकर इ. ऐकत अनुभवत असताना मनात मढेकरांची ‘उरे घोटभर गोड हिवाळा’ गुणगुणत राहणं यात काही औरच मजा आहे. कबीर समजून घेताना तुकोबांच्या ओव्यांचा नाद अंतर्मनात होऊ लागतो. कुठेतरी संस्कृतींची विलक्षण नाळ जोडली आहे असं वाटतं.     

दिल्लीतील हजारोंच्या संख्येने येणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना शिक्षण प्राप्त करताना असंख्य असुविधचा सामना कसा करावा लागतो हे मी स्वतः देखील अनुभवलंय, त्यामुळे दिवाळीत उसंत म्हणून महाराष्ट्राच्या कुठल्याही बड्या नेत्याने हा अंक हाती घेतला तर माझे शब्द सरकार दरबारी व जनता दरबारी पोहोचतील या आशेनं मी हे लिहितोय. दिल्लीत राहणार्या मराठी विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन सवलतीच्या दरात वसतिगृह, अभ्यासिका युवा क्रीडा संकुल, कला व साहित्य मंडळ, आरोग्य सेवा इत्यादींची तरतूद करणं अपेक्षित आहे. प्रचंड संख्येने (साधारण दहा हजार) मराठी विद्यार्थी विविध प्रकारचं शिक्षण प्राप्त करण्यासाठी राजधानीत येतात आणि कित्येकदा सोयींअभावी राहतात. सध्या दिल्लीत आणि राज्यात एकाच राजकीय पक्षाचं सरकार असल्याने संघराज्याच सहकार्यभाव जपून मराठी जनसमुदायासाठी उत्तम काम करता येईल, अश्या पायाभूत गोष्टींची तरतूद करण्यासाठी प्रचंड संसाधने आणि निधीची आवश्यकता आहे. यामध्ये विशेषतः
दिल्लीत राहणान्या मराठी जनतेनं आणि महाराष्ट्रातील संबंधित लोकांनी देखील आर्थिक व इतर यथायोग्य सहभाग ध्यायला हवं. संपूर्णतः शासनावर जबाबदारी घालण्यापेक्षा सरकार व जनभागीदारीतून अशी कामे झाली तर ते अधिक परिणामकारक होईल.


सरते शेवटी या लेखाचा हा शब्द-प्रपंच कशासाठी तर मायभूमी वरील आणि सांस्कृतिक एकात्मतेवरील प्रेमासाठी! “शब्दें वांटूं धन जनलोकां म्हणणाऱ्या तुकोबांच्या परंपरेचे वारस म्हणून माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला माझं कर्तव्य वाटलं माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी…” असं म्हणणान्या सुरेश भटांसारख्या साहित्य परंपरेचे वारस असणारे आपण भिन्न संस्कृतींच्या सूर्यमालेत संवेदनशील विचारांचा काजवा जरी होऊ शकलो तरी हे जगणं सार्थ आहे।

मातीनं मनाला साद दिली,

मनाने मातीचा वेध घेतला,

सुपिकतेचा सुगंध घेऊन,

ओलावा मनात उतरला।

विचारांच है वृक्ष बहरल,
जाणिवांच खत लाभलं,
संस्कृतीच्या श्वासामध्ये
भाषेच अत्तरदरवळलं।

  • ( वजूद ) अजय रेवणसिद्ध तांबुळकर

(लेखक दिल्ली येथे विधी विषयाचे प्राध्यापक आहे)

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.