Take a fresh look at your lifestyle.

उद्यमशीलता, माहिती तंत्रज्ञान आणि शेतीचे भविष्य

0

२०१९ सालातील भारतीय कृषी क्षेत्राचे थोडक्यात विश्लेषण करायचे म्हंटले तर ‘प्रचंड मोठी आव्हाने आणि तितक्याच प्रमाणात  संधी असणारे क्षेत्र’ असे म्हणता येईल. कारण दीडशे कोटींकडे वाटचाल करणाऱ्या या लोकसंख्येस लागणारे अन्न उत्पादने अधिक नाविन्यपूर्ण पद्धतीने पुरविणे, त्याचे उत्पादन करणे असा प्रचंड मोठा आवाका आणि उलाढाल असणार हा उद्योग विकेंद्रित, पारंपारिक पद्धतीने चालतो आहे. त्यात नवनवीन व्यावसाईक मॉडेल्सची निर्मिती होते आहे, आयआयटी, आयआयएम सारख्या नामवंत संस्थांतून शिकलेले आयटी तंत्रज्ञ, अभियंते, व्यवस्थापन तज्ञ यांचे लोंढे या क्षेत्राकडे येत आहेत.

शेतकरी उत्पादक कंपन्या शेकडो कोटींची उलाढाल करू शकतील असे चित्र दिसू लागले,  हे नक्कीच आशादाई चित्र आहे अनेक विविध कौशल्ये असणाऱ्या कुशल मनुष्यबळामुळेच फ्लिपकार्ट, पेटीएम, ओला नंतर जर एखादा ‘युनिकोर्न’ (१०० कोटी डॉलर्स चे मूल्य असणारा टेक उद्योग) उद्योग उदयास येणार असेल तर तो कृषीक्षेत्रातून असू शकेल असे मार्केटचे अहवाल सांगतात. थोडक्यात कृषीक्षेत्राची भविष्यातील वाटचाल ‘टेक’ (डेटा, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती तंत्रज्ञान) च्या माध्यमातून होणार हे नक्कीच आहे. नासकॉमच्या अहवालानुसार 2019 मध्ये 450 भारतीय ऍग्रीटेक स्टार्टअप्स मध्ये तब्बल 1750 कोटी रु. ची गुंतवणूक झालेली आहे. यात मागील वर्षीच्या  तुलनेत तीन पटींनी वाढ झाली आहे. यातून लक्षावधी रोजगार निर्मिती होऊ शकेल 

स्टार्टअप्स                    गुंतवणूक कोटी

निन्जा कार्ट                   700 

ऍग्रोस्टार                       290 

स्टेलॅप्स                        99

EM3 ऍग्री                    92 

क्रॉपइन                        82 

नाशिक येथील ‘सह्याद्री फार्म्स ‘ मध्ये नेदरलँड ने  120 कोटी गुंतवणुकीची नुकतीच घोषणा केली. थोडक्यात कृषीउद्योगात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणे हे चित्र आशादायी आहे. 

कृषी क्षेत्रापुढील समस्या आणि संधी: 

अल्पभूधारकता

समस्या- कृषी क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात असंघटित आहे. दरडोई क्षेत्र सरासरी  एक हे. हुन कमी असल्याने शेतकऱ्याची पत, गुंतवणूक क्षमता, कमी आहे. 

संधी- शेतकरी कंपन्या स्थापन  करून त्याद्वारे ही अडचण सोडवता येणे शक्य आहे. सुदैवाने मागील  काही वर्षात याकरिता मोठा निधी पुरविला गेला असून हळू हळू त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. नाशिकचं सह्याद्री फार्म्स, हिंगोलीचे ‘गोदा फार्म्स’ अशी काही उदाहरणे आहेत. मात्र हजारो कंपन्या स्थापन होऊनही केवळ बोटावर मोजता येण्याइतक्याच कंपन्या व्यावसायिक रीतीने वाटचाल करत प्रगती करत आहेत. 

1893 ला स्थापन झालेली अमेरिका स्थित ‘सनकीस्ट ग्रोवर्स’ ही पूर्णतः संत्राउत्पादक शेतकऱ्यांचे नियंत्रण असणारी सहकारी कंपनी आहे. स्वतःच्या ब्रॅण्ड ने विविध संत्रावर्गीय फळांच्या उत्पादन विक्रीतुन वर्षाला 8400 कोटींची उलाढाल हि कंपनी करत आहे. 

प्रगत तंत्रज्ञान, मजुरांचा अभाव 

समस्या- भारतीय शेती हि कॉर्पोरेट पद्धतीची नसल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यास तंत्रज्ञानात गुंतकणूक करता येणे शक्य नसते. मजुरांची समस्या देखील आहेच. 

संधी- ओला उबेर च्या धर्तीवर अत्याधुनिक अवजारे, यंत्रे, कुशल मजूर पुरवणारे स्टार्टअप्स ना या क्षेत्रात प्रचंड वाव आहे. नुकतेच कृषमंत्रालयाने ‘CHC Farm Machinary’ नावाने प्लेस्टोरवर एक ऍप  उपलब्ध करून दिले आहे. यातून शेतकरी, सेवा पुरवणारे एकमेकांशी जोडले जाऊ शकतील. मजुरांची समस्या सोडविणेकामी काही ‘एग्रीगेटर’ स्टार्टअप्स ना भविष्यात मोठा वाव राहील. कारण एकाच पंचक्रोशीत मजुरांची टंचाई आणि बेरोजगारी एकाच वेळी नांदत असते. इंटरनेट, डेटा याची मदत घेऊन यात नक्कीच सेवा व्यवसाय उभा करता येईल. शेकडो नवउद्योजकांनी नक्कीच उतरावे असे हे क्षेत्र आहे. येत्या काळात सेन्सर्स, आयओटी, डेटा, रिमोट सेन्सिंगचा वापर करत अगदी ऑफिसमधून शेतातील कामांचे  नियंत्रण करणे शक्य होईल.

आयआयटी तील एका अभियंत्याने ‘ऑक्झेन फार्म’ नावाने असेच स्टार्टअप चालू केले आहे. ते शेतकऱ्यांना भाडे तत्त्वावर अवजारे व सेवा पुरवितात. 

नेमका कृषीसल्ला आणि डेटा चा अभाव

समस्या- शेतीच्या समस्येचं मूळ हे डेटाच्या अभावात आहे. आजही देशात अमुक एका पिकाची किती लागवड झाली आहे, बाजापेठेत रोज किती आवक- विक्री होते, कसे दर मिळतात याबाबत गुणवत्तापूर्ण आकडेवारी उपलब्ध होत नाही. सरकारी सांख्यिकी विभागाची डेटा गोळा करणे आणि विश्लेषण करणे यापद्धती संशोधनाचा विषय आहे. कृषीसल्ला देण्याची पद्धत अतिशय निरुपयोगी आहे.

संधी- मोठ्या प्रमाणात रिअल टाइम  डेटा गोळा करणाऱ्या प्रणालीचा अंगीकार केला जावा. पिकाच्या लागवडीपासून  काढणीपर्यंतचा डेटा गोळाकरतायेऊ शकेल. याकामी रिमोट सेन्सिंग व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उत्तमरीत्या वापर करता येईल. किसानहब, क्रॉपइन सारख्या स्टार्टअप्स यातकरतआहेत. अमेरिकेतील 6th Grain  Global मागील वर्षीपासून महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र मापन करत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीचे जियटॅगिंग देखील केले जात आहे, यातून शेतकऱयांना हवामान आणि पिकाच्या अवस्थेनुसार पीकसल्ला देण्यात येतो. सह्याद्री फार्म देखील हवामान आधारित कृषीसल्ला मिळेल अशा प्रणालीचा वापर करत आहे. काढणी पश्चात कृषीमालाची माहिती (साठा, वाहतूक,  विक्री) यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा वापर सुरु झाला आहे. मंचर (पुणे येथील कृषीउत्पन्न बाजारसमितीने ‘APMC Manchar ‘ ऍपच्या सहाय्याने सर्व व्यवहार ऑनलाईन केले असून, विक्रीचे संदेश तात्काळ शेतकऱयांना जातात. केवळ सहा महिन्यातच या प्रणालीतून 150 कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार नोंदविले आहेत, पावतीचा वापर थांबला आहे, बाजारसमितीच्या सेस मध्येही वाढ झाली आहे. शासकीय संकेतस्थळांवर कृषिमालाचे भाव आजही अद्ययावत व अचूक नसतात. त्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरू शकेल.

कृषीमालप्रक्रिया आणि काढणी  पश्च्यात व्यवस्थापन 

समस्या- कृषिमाल प्रतवारी, प्रक्रिया न केल्यामुळे प्रमाणात नुकसान होते. याकरिता लागणाऱ्या पायाभूत सुविधांची अजूनही मोठी कमतरता आहे.

संधी-  कांदा, धान्य, फळे, कापूस, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ केवळ प्राथमिक प्रतवारी  प्रक्रिया केल्याने मोठे मूल्यवर्धन होते. यामुळे मोठा रोजगारही उपलब्ध होतो. उदा. मक्याचे केवळ आर्द्रता कमी केल्याने 10-20 टक्क्यांनी मूल्यवर्धन होते. याकरिता ड्रायपोर्ट ची गरज आहे. सर्वच फळे मुख्यतः डाळिंब, आंबा,  सीताफळ, तसेच कांदा, बटाटा, टोमॅटो, हळद, कडधान्ये यामध्ये ग्रेडिंग अतिआवश्यक आहे. योग्य साठवणूक सुविधा, चाळी, गोदामे, शीतगृहे यांचे विकेंद्रित पणे जाळे निर्माण केल्याने केवळ प्राथमिक प्रक्रिया द्वारे मोठे मूल्यवर्धन होऊ शकते. त्यापुढे जाऊन निर्यातीयोग्य अवशेषमुक्त मालाचा पुरवठा, फ्रोजन फूड्स यांसाठीही मोठा वाव आहे. 

फार्मलिंक, निन्जाकार्ट, बिग बास्केट या स्टार्टअप्स थेट शेतकऱ्यांकडून माल घेऊन  प्रतवारी करून ठोक तसेच किरकोळ विक्री करतात. दौंड (पुणे येथील ऍग्रीवाला ही स्टार्टअप शेतकऱयांसोबत अवशेषमुक्त भाजीपाला पिकविण्यासाठी करारशेती करते आणि अन्नप्रक्रिया उद्योगांना, निर्यातदारांना प्रमाणित माल पुरवते. 

वित्तपुरवठा

समस्या- शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी बँका फारशा इच्छुक नसतात. कर्ज थकीत होणे, राजकीय ध्येयधोरणे यांमुळे गरजू शेतकऱयांना नेहमीच समस्येचा  सामना करावा लागतो. गरजेपेक्षा नेहमीच तुटपुंजा वित्तपुरवठा होतो. 

संधी- कृषीमध्ये मोठ्या प्रमाणात फिनटेक स्टार्टअप्स ना वाव आहे. व्यवहार  अधिकाधिक बँकिंग प्रणालीत आणले गेल्याने चांगली उलाढाल तसेच पत असणाऱ्या शेतकऱयांना पतपुरवठा सेवा पुरविण्यास मोठा वाव आहे. चीन ने मागील दीड दशकात मोठ्या प्रमाणात कृषी आणि ग्रामीण वित्तपुरवठा वाढवत नेऊन ग्रामीण जनतेकडून विविध उत्पादनांची मोठी मागणी निर्माण करत उद्योगांची भरभराट साधली. 

बंगळुरूस्थित फार्मिंझेन या स्टार्टअप ने शहरी गुंतवणूकदारांकडून थेट शेतीत  गुंतवणूक करण्याचे छान मॉडेल बनवले आहे. त्यांना २ कोटींचे सीड फन्डिंगही मिळाले आहे. पुण्यातील स्टार्टअप ‘रिफॉर्मिस्ट इंडिया आयटी’ ‘सुलभ व्यापार ऍप’ च्या माध्यमातून कृषिनिविष्ठा विक्रेत्यांना शेतकऱ्यांच्या व्यवहाराची माहिती देते आणि जोखीम स्तर निश्चित करते. यामुळे चांगली पत असणाऱ्या शेतकऱ्यांना  खाजगी पतपुरवठादार/ व्यावसायिक हे पत/कृषिनिविष्ठा पुरवू शकतात.

इ कॉमर्स द्वारे विक्री 

समस्या- कृषिमाल पुरवठा साखळीचे व्यवस्थापन खर्चिक आणि जिकरीचे आहे. नाशवन्त मालाची मोठी नासाडी यातून होते. थेट शेतकरी या साखळीमध्ये सहभागी होण्यास फारच कमी इच्छुक असतो. ई कॉमर्स व्यावसायिक मॉडेल्स राबविणे अतिखर्चिक असून परतावा दीर्घकाळाने आहे.

संधी- इंटरनेट क्रांती, अमेझॉन, फ्लिपकार्ट नंतर अनेक ई कॉमर्स व टेक सेवा उद्योगांना भारतीय मार्केट उपलब्ध झाले आहे. उदा.बिग बास्केट या ऑनलाईन कृषिमाल पुरविणाऱ्या कम्पनीचा चालूवर्षातील टर्नओव्हर  3600 कोटींचा आहे. स्वीगी कंपनीने देखील ऑनलाईन पद्धतीने कृषिमाल, अन्न पुरविण्यास सुरवात केली आहे. पुढील वर्षात ऑनलाईन ग्रॉसरी विक्री मध्ये 35000 कोटींपर्यंत उलाढाल होण्याचे मार्केट विश्लेषकांचे अनुमान आहेत. एकूण किरकोळ ग्रॉसरी व्यवसायात ईकॉमर्सचा वाटा अर्धा टक्क्याहूनही कमी आहे. म्हणजेच  या क्षेत्रात येत्या काळात वाढीला मोठा वाव आहे. अशा प्रकारच्या व्यवसायिक मॉडेल्स ची अजून एक मोठी उपयोगिता हि असते कि अकुशल व अर्धकुशल मनुष्यबळास मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. 

यापुढे जाऊन  सर्वच क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ  हे. कृषिउद्योगासाठी उपयोगीपडणार आहेत. आयटीतंत्रज्ञ, व्यवस्थापनतज्ज्ञ, कृषीपदवीधर , अभियंते, अशा  विविध शाखांच्या योगदानानेच कृषिउद्योग भरारी घेईल यात वाद नाही. शेतीसमोरील मूलभूत समस्या जसे की वीज, पाणी, विमा, अशाश्वत उत्पन्न अशा अनेक मुद्द्याना या लेखात हात घातला नाही अन्यथा हा लेखप्रपंच फार लांबला .

आज बंगळूर शहर स्टार्टअप हब म्हणून प्रामुख्याने केंद्रस्थानी आहे. महाराष्ट्राने देखील पुणे स्टार्टअप हब होईल यासाठी योग्य ती पावले उचलावीत.कारण मला एक विश्वास नक्की आहे की, शेतीतील जवळपास निम्मे प्रश्न हे येत्या काळात नवीनउद्योजक आणि स्टार्अप्स सोडवतील. सरकारने खाजगी उद्योजकांना, उद्योगांना यात मोठा वाव द्यावा, पतपुरवठा होईल याकरिता प्रयत्न करावेत. कारण शेतीमध्ये पैसा हे उद्योजकच आणतील. एकदा ते घडू लागले तर शेती हा उत्तम करियरचा पर्याय म्हणून तरुण नक्कीच निवडतील. 

ब्लॉकचेन कृषिमाल विक्री होईल पारदर्शी 

सुरक्षित, रसायनमुक्त अन्न सर्वांनाच हवे आहे. मात्र या क्षणी तुम्ही खात असलेल्या फळाचा इतिहास तुम्हास माहिती आहे का? असे विचारल्यास तुम्ही बुचकाळ्यात पडाल. ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सांगू शकेल. की तुम्ही खात असलेले फळ ‘क्ष’ गावातील ‘अमुक’ शेतकऱ्याच्या शेतातून अमुक दिवशी तोडणी करण्यात आले आहे. त्याची खरेदी कुणी केली, प्रक्रिया केली असेल तर काय आणि कधी, कोणत्या दुकानातून तुम्ही खरेदी केले इत्यादी. जर तुम्ही सेंद्रिय माल घेत असाल, तर ते कृषिउत्पादन खरेच सेंद्रिय आहे काय? प्रमाणित कधी व कुणी केले? त्याची प्रजाती काय आहे? वाहतूक कधी केली? कोणत्या वेअरहाउस ला ठेवले गेले? आणि दुकानात दाखल होऊन तुम्ही विकत केव्हा घेतले? अशी सर्वच माहिती मिळू शकेल, केवळ त्या उत्पादनावरील बारकोड अथवा क्यूआर कोड द्वारे. या प्रक्रियेत तुमच्या उत्पादनाशी संबंधित कोड हा प्रत्येक वेळी स्कॅन केला जातो आणि त्या माहितीचा एक ब्लॉक तयार होतो की जो ब्लॉकचेन शी जोडला जातो. ही सर्व माहिती जगभरातील संगणक आणि सर्वर च्या जाळ्यावर साठवली जात असते. शेवटी ग्राहकाला या ब्लॉकचेन मध्ये साठवलेली माहिती प्राप्त होते. यामुळे ग्राहकाची फसवणूक होऊ शकत नाही, उत्पाद्कासही उत्तम गुणवत्तेचे उचित मूल्य मिळणे शक्य होते. थोडक्यात गुणवत्तापूर्ण उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रीमियम दर मिळणे शक्य होईल. आणि बनावटगिरी करणारे उत्पादक स्पर्धेच्या बाहेर जातील.

आयबीएम कंपनी ने ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित ‘सप्लायचेन’ प्रणालीची सेवा मागील वर्षी कार्यान्वित केली असून वालमार्ट या जगातील सर्वात मोठ्या कंपनीने याचा वापर सुरु केला आहे.

ब्लॉकचेनचा_सुरक्षित_अन्नवितरण_प्रणालीत_वापर: काही नोंदी 

१. २०१६- एजवर्व- इन्फोसीस या कंपनीची उपकंपनी असून २०१६ पासून ते ब्लॉकचेन तंत्रज्ञान विकसित करत आहेत. सध्या शेती आणि प्रक्रिया उद्योगात या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. 

२. २०१७- आयबीएम- अमेरिकेतील बलाढ्य सॉफ्टवेयर कंपनीने उद्योगांसाठी ब्लॉकचेनवर आधारित सुविधा तयार केली असून यात मालाचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक, आवेष्टन, विक्री, व्यवहार अशी सर्व माहिती संग्रहित केली जाते. त्यासाठी त्यांनी एक खास ‘संगणकाच्या’ हार्ड ड्राईव्ह च्या आकाराचे छोटे उपकरण तयार केले असून हे उपकरण प्रत्येक उत्पादनाचे कोड स्कान करून सदर माहिती सर्वर ला पाठवत असते.आयबीएम स्टार्टअप साठी गुंतवणूक करत असून यात वेगाने विस्तार करत आहे.

३. २०१७- मिखाईल (रशियन शेतकरी) – रशियातील कोलीअन गावातील या शेतकऱ्याने ‘कोलीअन’ नावाने डिजिटल चलन सुरु केले असून ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापार करण्यास सुरवात केली आहे. शेतकरी या चलनातून व्यापार करत आहेत. १ कोलीअन म्हणजे १० अंडी अथवा १० किलो बटाटे असे काहीसे या चलनाचे मूल्य आहे. 

४. २०१७- इंडियाचेन- नीती आयोग या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात शेती, जमिनीची मोजणी आणि वीजपुरवठा यावर लक्ष केंद्रित करणार आहे. आधार क्रमांक जोडणीचा यात समावेश असेल.

दुग्धव्यवसाय,शेळी, कुक्कुटपालन आणि मांस उद्योग 

ब्लॉकचेनच्या माध्यमातून दुधाचा स्त्रोत, गुणवत्ता, उत्पादकाची माहिती मिळेल. पोल्ट्री उद्योगात यांचे अनन्यसाधारण महत्व राहील. चीनमध्ये संपूर्ण पोल्ट्री उद्योग ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यवस्थापन केले जाणार आहे.यातून पिल्लांची निर्मिती, जोपासना, लसीकरण, खाद्य तसेच आरोग्य याबाबत माहिती मिळू शकेल. भारतातही पोल्ट्री उद्योग जोमात पसरत आहे. अंडी उत्पादकांच्या पुरवठा, वाहतूक आणि मागणी यांचे रियल टाईम व्यवस्थापन यातून शक्य होईल. मांस उद्योगामाध्येही मांसाचा पशु स्त्रोत, पशुची वंशावळ, गुणवत्ता याची माहिती प्राप्त होऊ शकेल. पशूच्या नोंदणीकरणासाठी कानाला बिल्ले लावले जात आहेत, त्या सांकेतिक क्रमांकाचा यात उपयोग करता येईल.

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचे व्यावसाईक फायदे 

१. गुणवत्ता निर्धारण: उत्पादनाची गुणवत्ता समजू शकेल 

२. व्यवस्थापन : वाहतुकीचे नियोजन, वेयरहाऊसिंग (साठवणूक), विक्रीचे योग्य व्यवस्थापन करता येईल 

३. प्रक्रिया: प्रक्रियेचा कालावधी, पद्धती, गुणवत्तेची मानके अशी माहिती प्रमाणितरित्या सादर करता येईल 

४. लेजर-एन्ट्री: प्रत्येक पातळीवरील व्यवहार माहिती आणि प्रक्रिया ब्लॉकचेन मध्ये साठवली जाईल आणि तत्काळ जगभरातील सर्वरच्या जाळ्यात ती माहिती साठवली जाईल.

५. विशासार्हता : व्यवहार करण्यापूरवी माहिती तपासून पाहिली जाईल, व्यवहार थेट खात्यावर होतो, मध्यस्थी यंत्रणेचे शुल्क वाचतील. 

६. ग्राहक समाधान: ग्राहकास तो घेत असलेल्या मालाचा स्त्रोत आणि गुणवत्ता समजल्याने समाधान होते. थेट उत्पाद्काशी व्यवहार करता येऊ शकतो.

७. गुणवत्तेला योग्य मूल्य: पारदर्शकता आल्याने गुणवत्तापूर्ण मालास योग्य मूल्य मिळते. गुणवत्तेची स्पर्धा निर्माण होते

८. सुरक्षित अन्न निर्मिती : सुरक्षित अन्नासाठी उचित मूल्य मिळाल्यास उत्पादक सुरक्षेची काळजी घेतील आणि ग्राहकांचे आरोग्यही जपले जाईल.

प्रशासकीय_पातळीवर_उपयोग:

ब्लॉकचेन च्या माध्यमातून निधी, अनुदान यांचे वाटप तपासता येईल, यात भ्रष्टाचारस पूर्ण प्रतिबंध होईल. जमिनीचे मोजमाप आणि नोंदणी बदलणे शक्य होणार नाही तसेच सदर नोंदी तात्काळ उपलब्ध होतील.

मृदापरीक्षणासोबत रासायनिक अवशेष परीक्षण यामध्ये समाविष्ट केल्यास सेंद्रिय माल विक्रीसाठी तो डेटा वापरता येईल. बँकीग प्रणाली यात अंतर्भूत केल्यास कर्ज वाटप, बाकी, लाभार्थी, पात्र शेतकरी अशा सर्वच बाबत माहिती चुटकीसरशी उपलब्ध होईल. याकामी आधार क्रमांक जोडणी केली जाऊ शकेल.

कृषिविभागासमोरील आव्हान असणारी पिकविमा योजनेतील हवामान आकडेवारीची गडबड ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे पूर्णपणे निकालात निघेल. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर होईल. त्यासाठी सर्व स्वयंचलित हवामान केंद्र तसेच सरकारी हवामान केंद्र यांकडून प्राप्त होणारी आकडेवारी सातत्याने ब्लॉकचेनमध्ये साठविण्यात यावी. यासाठी शासनाने स्वतःची प्रणाली विकसित करावयास हरकत नाही.

सदर तंत्रज्ञान हे क्रांतिकारी असून याचा वापर प्रत्येक क्षेत्रात केला जात आहे. बँकिंग आणि सप्लाय चेन (पुरवठा साखळी), ई- कॉमर्स अशा अनेक ठिकाणी याचा वापर होत आहे. मुळातच यावर कुणाचाही अंकुश नसल्याने, यात ढवळाढवळ होऊ शकत नाही आणि ‘फेयर ट्रेड’ वाढीस लागून व्यापाराचे खऱ्या अर्थाने लोकशाहीकरण होऊ शकेल अशी खात्री सध्या तरी वाटत आहे. सारांशाने हेच कि, नवीन उद्यमशीलता, माहिती तंत्रज्ञान या सर्वाचा एकत्रित वापर शेतीला तारणारा आहे.

लेखक-

डॉ. नरेश शेजवळ

(कृषिउद्योजक व शेतीप्रश्नाचे अभ्यासक) [email protected]

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.