Take a fresh look at your lifestyle.

जनतेच्या हितासाठी संघर्ष कायम राहणार

0

शरद पवार यांची कन्या म्हणून सुप्रिया सुळे राजकारणात आल्या. पण सक्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. बारामती मतदारसंघातून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर लोकसभेतील त्या अभ्यासू खासदार म्हणून त्या ओळखल्या जातात. २०१४ मध्ये देशात भाजप सरकार आले. त्यानंतर विरोधी पक्षात काम करताना त्यांची आक्रमक भूमिकाही सगळ्यांनी पहिली. दिल्लीतील अनुभव, शरद पवारांचे एक वडील म्हणून मार्गदर्शन, सोशल मिडिया, दिल्ली आणि महाराष्ट्र, लोकसभेतल्या कामाचा अनुभव असा खुप मोठा राजकीय अनुभवांचा कॅनव्हास उलगडत जाणारी खासदार सुप्रिया सुळे यांची विशेष मुलाखत…

 • तुम्हाला दिल्लीत जावून आता जवळपास  १० वर्षे उलटून गेली आहेत, मागच्या दहा वर्षात दिल्लीत नक्की काय अनुभवता आलं ?

माझं बालपण मुंबईत गेलंय. मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही कॉस्पोपॉलिटन कल्चर असणारी शहरं आहेत. मुंबई ही देशाची औद्योगिक राजधानी आहे. जनतेच्या आशिर्वादाने खासदार झाल्यानंतर मी देशाच्या राजकीय साजधानीत अर्थात दिल्लीत आले. दिल्ली हे देशाच्या राजधानीचं शहर आहे. या शहरात देशभरातील सर्व संस्कृतींचा मिलाफ झालेला आहे. दुसऱ्या शब्दांत तुम्ही दिल्लीत संपूर्ण भारताचं दर्शन घडतं असं म्हणू शकता. देश शिकायचा असेल तर दिल्ली अवगत करुन घेणं महत्त्वाचं असतं. दिल्लीत पोहोचणारा सामान्य माणूस अचानक असामान्य होऊन जातो. आपण मिडास राजाची गोष्ट ऐकलीय, त्यानुसार हे शहर ज्याला स्पर्श करतं त्याचं एका अर्थानं सोनं होऊन जातं.मराठी माणसांनी दिल्ली अवगत करायला शिकलं पाहिजं असं आदरणीय शरद पवार साहेब नेहमी सांगतात. त्यांचे शब्द लक्षात ठेवून दिल्ली अवगत करण्याचा प्रयत्न करतेय. दिल्लीनं मला आपला देश, संस्कृती, इतिहास यांची कदर करायला शिकवलं.

 • राजकारणात येण्यापूर्वी पवार साहेबांनी असा एखादा सल्ला दिला होता, जो तुम्ही आजवर पाळला. ज्याचा तुम्हाला खूप फायदा झाला ?

खरं सांगू तर साहेब आम्हाला कधीच सल्ला वगैरे देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. तुमचं तुम्ही अनुभवातून शिकत जा या टाईपचा त्यांचा अप्रोच असतो. पण राजकारणात येण्यापुर्वी त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण समजावून सांगितली होती. राजकारण केवळ निवडणूकीपुरतं आणि त्यानंतर केवळ  समाजकारण करायचं असं त्यांनी सांगितलं. केवळ २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण असं आपल्या कामाचं सुत्र ठेवायचं असं त्यांनी सांगितलंय. तेच सुत्र अंगिकारणाच्या मी सदैव प्रयत्न करीत असते.

 • देशभरात पवार साहेबांच्या नावाच एक वलय आहे. त्यांच्या कामाचा आवाका खूप मोठा आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा देखील असतात. त्यामुळे त्यांची मुलगी म्हणून काम करताना कधी दडपण येते का ?

नाही, कधीच नाही. कारण काम मी माझ्या समाधानासाठी करते. शेवटी लोक चांगल वाईट बोलत राहतात. त्यामुळे ऐकायचं. चांगले असेल तर आपल्यात सुधारणा आणायचा प्रयत्न करायचा.

 • काही दिवसापूर्वी तुम्ही संसदेत “राईट टू डीसकनेक्ट” विधेयक मांडले. त्याची बरीच चर्चा झाली, यामागची नक्की भूमिका काय होती ?

लोकसभेत ‘राईट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक मांडत असताना मानसिक थकव्याला सामोरे जाणाऱ्या या पिढीचा विचार माझ्यासमोर होता. माझ्या अगोदरच्या पिढीतील लोक आपल्या दैनंदिन धावपळीतून स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी छान असा वेळ काढत असतं. माझे सासरे ‘महिंद्रा अँड महिंद्रा’मध्ये होते. सकाळी नऊच्या ठोक्याला ते ऑफीसमध्ये हजर असत आणि संध्याकाळी पाच वाचता त्यांचे काम थांबत असे. तेथून आले की, ते टेनिस खेळायला जात. महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपनीत उच्चपदावर ते कार्यरत होते. कंपनीशी संबंधित धोरणात्मक निर्णयांत त्यांचा सहभाग असे. अशाप्रकारचे काम करणाऱ्या व्यक्ती कामात प्रचंड गढलेल्या जरी असल्या तरी स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, याचं गणित त्यांना जमलेलं होतं. त्यामुळेच ते मला कधीही डिप्रेस्ड किंवा कामाच्या ताणामुळे खुप थकलेले वगैरे वाटले नाहीत.हे जे मागच्या पिढ्यांना जमलं ते आजच्या पिढ्यांना का जमत नाही, असं कोडं मला सातत्याने पडत होतं. हेच कोडं मी या विधेयकाच्या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.  राईट टू डिस्कनेक्ट या विधेयकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक ‘क्वालिटी लाईफ’ लाभावं असा विचार आहे. या विधेयकात प्रामुख्याने चर्चा आहे ती, आपल्याला स्मार्टफोन असो किंवा इतर त्याप्रकारचे गॅझेट, त्यापासून डिस्कनेक्ट होण्याचा अधिकार असायला हवा याची…. यामुळे होईल काय तर, कामाचे तास कमी होतील हे जरी खरी असलं तरी अधिक सक्षमपणे काम करण्याचे तास वाढतील. या विधेयकाच्या माध्यमातून कामाचे ‘परिणामकारक तास’ कशा प्रकारे वाढविता येतील यावर प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न केला आहे.

 • राजकारणात अजूनही महिलांचं प्रमाण कमी आहे. ५० टक्के महिला मतदार असुनही त्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी मिळत नाही. राज्यात शरद पवार साहेबांनी, महिला विधेयक आणले. लोकसभेत त्या विधेयकावर फक्त चर्चा होते. अजूनही ते पास होत नाही. विधेयक पास होण्यासाठी तुम्ही एक महिला खासदार म्हणून काही विशेष प्रयत्न करत आहात का ?

यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आलो आहे. लोकसभेत देखील आम्ही महिला आरक्षणाचे बिल पास व्हावे यासाठी प्रयत्न करतो आहे. पण या सरकारने सत्तेत येण्या अगोदर वचन दिले होते, कि हे सत्तेत आल्यानंतर ‘महिला आरक्षण विधेयक’ आणतील. पण ते त्यांनी अजूनही आणले आहे. पण त्यांना आमचा आग्रह आहे कि त्यांनी ते बिल लवकरात लवकर आणावे म्हणजे जेणेकरून महिलांना आरक्षण मिळेल. परिणामी राजकारणात देखील महिलांचे प्रमाण वाढेल.

 • अधिवेशनाच्या काळात तुम्ही जास्तीत जास्त काळ उपस्थित राहता, चर्चेत सहभागी होता, सर्वाधिक प्रश्न विचारणार्या यादीत तुमचा नंबर अगदी वरती येतो. पण आपल्याच राज्यातून काही नेते लोकसभेत निवडून जातात. पण लोकसभेत मात्र क्वचित दिसतात. तर काही नेते उपस्थित असतात, पण बोलत काहीच नाही. तर लोकप्रतिनिधी म्हणून ते कमी पडतायेत अस तुम्ही म्हणता का ? या बाबतीत तुमची भूमिका काय आहे ?

याबाबत प्रत्येकाचे वेगळ मत असत. मी तर निवडून जाते ते फक्त माझ्या महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील प्रश्न देशाच्या पातळीवर मांडता यावे. मग ते सत्तेत असो किंवा विरोधात. खरंतर आम्ही खासदार म्हणून यासाठीच तर निवडून जातो.

 • याच  प्रश्नाच्या अनुषंगाने, असंही बोललं जात कदाचित हिंदी किंवा इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे खासदार बोलायला इच्छुक नसतात ?

असं काही नाही. कारण प्रत्येक खासदार आपआपल्या परीने प्रयत्न करत असतो आणि दुसऱ्या खासदारांच्या बाबतीत बोलायचं झाल तर मी कोणावर टीका करणार नाही. शेवटी प्रत्येक जण आपआपल्या परीने करत असतो. मी देखील माझ्या परीने काम करतच असते.

 • भाजप सरकारच्या काळात अनेक तरुण सरकार विरोधी चेहरे म्हणून समोर आले. मीडियात, सोशल मिडियामध्ये त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला पण सक्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही. याच तुम्हाला काय कारण वाटत ? आणि या सगळ्या प्रक्रियेकडे तुम्ही कस पाहता ?

याबाबतीत माझं म्हणणे असे आहे कि लगेच कशाला यश मिळायला पाहिजे. प्रत्येकांनी संघर्ष करत राहिला पाहिजे. पण जे काही जण सरकारच्या विरोधात महत्वाची भूमिका घेत आहेत. ते सर्वजण चांगले आहेत. आज नसेलही, पण भविष्यात ते सगळेजण देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात मोठी झालेली दिसतील. सध्या काही जणांना अपयश आले असेलही पण त्यामुळे त्याचे करिअर संपले असे मुळीच होणार नाही. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.   

 • सध्या सोशल मिडियाचा वापर सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या निवडणुकामध्ये सोशल मिडिया सर्वाधिक महत्त्वाचा ठरतो आहे. पण याची एक दुसरी एक बाजू आहे. ते म्हणजे ट्रोलिंग. आजकाल याच प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यातही कधी कधी महिलांच्या बाबतीत पातळी सोडून टीका केली जाते आणि हे दोन्ही बाजूने होतेय. तुम्ही या सगळ्या कडे कसं पाहता ?

सार्वजनिक क्षेत्रात काम करीत असताना तुमच्यावर टिका-टिपण्णी होणारच. अर्थात यापुढे जाऊन आपण विचार करण्याची आणि काम करण्याची गरज. असते. आजकाल सोशल मिडियाचा बोलबाला आहे. या माध्यमातून लोक व्यक्त होत आहेत. अनेकदा लोक व्यक्त होताना अगदी खालच्या पातळीवर जाऊन टिका करतात. हे खरं तर खुप वेदनादायी असतं. लोकांनी मग ते कोणत्याही बाजूजे असोत टिका टिपण्णी करीत असताना पातळी सोडू नये.

 • दिल्लीत तुम्ही कायम विरोधी पक्षातील अनेक खासदारासोबत दिसता, तुमच्या सोशल मिडीयावर ते फोटो आम्ही पाहतोही. विरोधी पक्षातील इतर मैत्री कशी जपता ?

आदरणीय पवार साहेबांनी आम्हा सर्वांना शिकविलेलं सुत्र मी या मुलाखतीच्या सुरुवातीसच नमूद केलं आहे. विरोधी पक्षात जरी असते तरी त्यांच्याशी मैत्री असू नये असं थोडीच असतं. वाद वैचारीक असतात, लोकशाहीत अशा मुक्त वैचारीक वादांची गरज आहे. या वादांतून नव्या विचार पुढे येतात. मतभेद असावेत पण मनभेद असू नयेत हे सुत्र महत्वाचं.

 • दिल्लीत एक गोष्ट सांगितली जाते, इतर राज्यातील खासदार आपल्या-आपल्या राज्यासाठी पक्षाच्या पलीकडे जावून लॉबिंग करतात, यात महाराष्ट्राचे खासदार कमी पडतात. अस वाटत का ?

एकतर यावर मी असे म्हणेन कि अशी लॉबिं वगैरे काही नसत आणि महाराष्ट्रातील खासदार देखील राज्यातील प्रश्नासाठी, मुद्द्यासाठी एकत्र असतात. तसंही दिल्लीत कोणीच खासदार आपली लॉबी वगैरे अस काही तयार करायला जात नसतात. प्रत्येकजण काहीतरी नवीन शिकायला तिथे जातात. बाकीच्या राज्यातील खासदार तिकडे काही चांगले काम करत असतील तर ते काम आपल्या मतदारसंघात कसं करता येईल. यासाठी प्रयत्न करायचे असतात आणि शेवटी प्रयत्न तर सगळ्यांनी  एकत्र मिळून करायचे असतात.

 • अधिवेशनाच्या काळात किंवा इतर काही कामाच्या निमित्ताने दिल्लीत बराच काळ मुक्काम राहिला कि महाराष्ट्रातल्या कोणत्या गोष्टीची आठवण येते ?

माझा लोकसभा मतदारसंघ

 • यावर्षीच्या आमच्या अंकाची थीम “दिल्लीतला महाराष्ट्र” अशी आहे. याच विषयावर दिल्लीतील काही विद्यार्थी त्यांचे अनुभव लिहितायेत. त्यात एका प्रश्नाची चर्चा झाली. राज्यातून अनेक तरुण शिक्षणासाठी, स्पर्धा परीक्षासाठी दिल्लीत जातात. पण दिल्लीत राज्यातल्या मुलांची राहण्याची विशेष सोय नाही. राज्य सरकारला दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाच्या सुविधा निर्माण करता येतात. यासाठी तुम्ही काही प्रयत्न करता आहात का ?

नक्कीच, यावर काही चांगले प्रयत्न करता येतील. आपण नुकतेच दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधले. महाराष्ट्र सदनामुळे दिल्लीत जाणाऱ्या लोकांची चांगली सोय झाली. विद्यार्थ्यांची वसतिगृहाची तशी मागणी असेल, तर आपण सगळे मिळून नक्कीच प्रयत्न करू शकतो.

 • याला जोडून ताई असा एक प्रश्न होता कि जसे उत्तरप्रदेश किंवा बिहार मधून येवून देशपातळीवर नवे तरुण नेतृत्व तयार झाले. तसे महाराष्ट्रातून कोणी दिल्लीत तरुण नेतृत्व दिल्लीत तयार झाले नाही. याला आपण कुठे कमी पडलो ?

यात फारस काही तथ्य नाही. दिल्लीत फक्त उत्तर प्रदेश, बिहार मधीलच नेते तयार होतात असं मला मुळीच वाटत नाही. मागच्या काही दिवसात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ किंवा दिल्ली विद्यापीठ अश्या काही संस्थामधून विद्यार्थी नेते घडले. पण आपल्या कडील फार विद्यार्थी दिल्लीत शिकायला जात नाही. त्यामुळे तिथल्या चळवळीत आपल्याकडील मुले दिसत नाहीत. आपल्याकडील शिक्षण खूप चांगले आहे. त्यामुळे आपल्याकडे शिकायला तिकडची मुले येतात. आपली मुले तिकडे शिकायला जात नाहीत.  

 • तुम्ही विरोधी पक्षात आहात. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर तुम्ही टीका करताच. पण या सरकारचे अस कोणत काम आहे का ? जे तुम्हाला चांगले वाटते ?

मला विचार करावा लागेल. (थोडा वेळ विचार करून) स्वतःच्या जाहिरातीचे काम चांगले केले. 

 • पारंबी दिवाळी अंकाच्या माध्यमातून तुम्ही नवीन पिढीला काय संदेश देवू इच्छिता ?

ही दिवाळी आपल्या वाचकांसह सर्वांनाच सुख समाधानाचा जावो. महाराष्ट्रावरील दुष्काळ, आकर्षण आदीचे संकट दूर व्हावे. राज्यातील कृषिव्यवसाय नफ्यात यावा, जनतेला कायदा आणि सुव्यवस्था, उत्तम आरोग्य,शिक्षण आणि पायाभूत सुविधा मिळाव्या यासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही सदैव आपल्यासोबत आहोत,यापुढेही राहू. युती सरकार आपल्या समस्यांबाबत उदासिन असले तरी खचून जायचं नाही कारण एक कवी म्हणतात त्याप्रमाणे –

हे असे असले तरीही,
हे असे असणार नाही
दिवस आपुला येत आहे
तो घरी बसणार नाही.
लढू आणि जिंकू देखील.

शेवटी सर्वाना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!

सदर मुलाखत यापूर्वी पारंबी दिवाळी अंक २०१ ९ मध्ये यापूर्वी प्रकशित झालेली आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.