Take a fresh look at your lifestyle.

कथेतील ‘खलनायक’ जिवंत करणारा नायक..!!

0

नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला.

सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला. मराठी सोबतच निळू भाऊंनी हिंदी सिनेमात देखील आपला ठसा उमटवला.

त्यापैकी ‘कुली , गुमनाम है कोई , जरा सी जिंदगानी , रामनगरी , नागिन – २’ यात त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या. ‘नामदेव शिंपी’नंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपटात काम करायचे नाही, असे ठरवले होते. पण निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आग्रहास्तव काही आश्वासने त्यांनी पूर्ण केली.

व्ही. शांतारामांच्या ‘पिंजरा’त निळूभाऊंची भूमिका छोटी होती. मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे.’पिंजरा’त मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं ‘सामना’ करताना दोघांनाही मजा आली.

निळूभाऊंना ‘सखाराम बाईंडर’ या नाटकानंतर तेंडुलकरांच्याच सामना मध्ये निळू भाऊंना ‘हिंदूराव धोंडे पाटील’ साकारण्याची संधी मिळाली.

निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीने गाजलेला ‘सामना’ हा माईल स्टोन.

‘सामना’त निळूभाऊंचा सामना डॉक्टरांशी होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग रसिकांना मिळाला. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी समर्थपणे न्याय दिला.

व्यक्तिरेखा खलनायकी असल्या तरी निळूभाऊ अत्यंत भला माणूस होते. ते म्हणायचे, की प्रत्येक कलावंताला आपल्या भूमिकेला न्याय दिला पाहिजे. मी माझ्या जीवनात अत्यंत साधा आहे, पण पडद्यावर मात्र खलनायक. पण मी या भूमिका किती प्रभावीपणे करतो हे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आजही मी सामाजिक कामाच्या निमित्ताने खेड्यापाड्यात जातो, तेव्हा माझ्या पडद्यावरची खलनायकी भूमिका किती प्रभावी आहे याची पावती मिळते.

चित्रपटातल्या भूमिकांनी निळू फुले देशभर पोहोचले असले तरी नाटक हीच त्यांची मूळ आवड होती. ‘नाटक करताना मजा येते, असं ते म्हणायचे. नाटक करताना सावधगिरी बाळगावी लागते. तुमच्या प्रत्येक संवादावर लगेचच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. तिथेच खर्‍या अभिनेत्याची कसोटी लागते, असं ते म्हणत.

आज निळूभाऊंना आपल्यातुन जाऊन बारा वर्षे झाली..पण आजही त्यांचे चित्रपट, नाट्य आणि तुफान गाजलेल्या संवादामुळे ते मराठी रसिकांच्या मनामध्ये जिवंत आहेत असेच वाटते..!

कथेतील खलनायक जिवंत करणाऱ्या या अभिजात कलाकाराला भावपूर्ण आदरांजली…. !!

  • स्वप्नील कुलकर्णी, मुंबई.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.