Take a fresh look at your lifestyle.

‘ए मेरे वतन के लोगों’ या अजरामर गाण्याला लतादीदींनी नकार दिला होता

1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त जेव्हा त्यांना 'ए मेरे वतन के लोगों' गाण्याची ऑफर आली, तेव्हा त्यांनी आधी हे गाणे गाण्यास नकार दिला होता.

0

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.

कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या.

मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.

त्यांच्या आवाजाने देशाच्या पंतप्रधानांनाही भुरळ पडली होती. ते गाणे ज्याने आजही प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे येतात, ते अजरामर गीत म्हणजे, ऐ मेरे वतन के लोगों.’ आज याच गाण्याची एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१९६२ साली चीनसोबतच्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे केवळ राजकारण्यांचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचे मनोधैर्य खचले होते. देशाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांची नजर चित्रपटविश्वावर आणि कवींवर होत्या.

सरकारच्या वतीने चित्रपटसृष्टीला देशाला नवसंजीवनी देईल असे काहीतरी करण्यास सांगितले होते. ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गाणे रचणारे कवी प्रदीप यांनी अनेक देशभक्तीपर गीते लिहिली होती, त्यामुळे त्यांच्याकडे हा प्रस्ताव आला होता.

लता मंगेशकर यांनी एका मुलाखती दरम्यान या गाण्याचा किस्सा सांगितला होता.

1963 मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त जेव्हा त्यांना ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याची ऑफर आली, तेव्हा त्यांनी आधी हे गाणे गाण्यास नकार दिला. त्यांच्याकडे गाण्याचा सराव करण्यासाठी वेळ नव्हता. या गाण्यामागची संपूर्ण कहाणी लताजींनी मुलाखतीत सांगितली.

या गाण्याचे अजरामर बोल कवी प्रदीप यांनी लिहिले असल्याचे लता मंगेशकर यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. कवी प्रदीप यांनी त्यांना गाण्याची विनंती केली होती.

त्यावेळी त्या बिझी असल्यामुळे लतादीदींंना गाण्यावर विशेष लक्ष देणं शक्य नव्हतं. कवी प्रदीप यांनी त्यांना गाण्यासाठी प्रवृत्त केल्यावर त्या आशा भोसले यांच्यासोबत गाण्यास तयार झाल्या. मात्र ऐन कार्यक्रमापूर्वी आशा दीदींना दिल्लीला जाण्यास नकार दिला.

‘ऐ मेरे वतन के लोगों’ या प्रकल्पाचे सूत्रसंचालन करणारे संगीतकार हेमंत कुमार यांनीही आशा भोसले यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला, पण त्या मान्य झाल्या नाहीत. अशा स्थितीत लता मंगेशकर यांना स्वतःच गाण्याची तयारी करावी लागली.

‘ए मेरे वतन के लोगों’ हे गाणे रचणारे सी. रामचंद्र हेही चार-पाच दिवसांपूर्वी दिल्लीला रवाना झाले होते. अशा स्थितीत लता मंगेशकर यांना रियाझची साथ मिळू शकली नाही.

रामचंद्र यांनी त्यांना गाण्याची टेप दिली होती, ती ऐकूनच लतादीदींना गाण्याचा रियाज केला. कार्यक्रमासाठी विमानाने दिल्लीला जाताना लताजी रामचंद्रांनी दिलेल्या टेप्स ऐकत राहिल्या. मात्र दिल्लीत पोहचताच गाण्याच्या काळजीने त्यांच्या पोटात दुखु लागले होते.

मात्र 27 जानेवारी 1963 रोजी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियममध्ये त्या पोहचल्या आणि ए मेरे वतन के लोगों हे गाणे गायले.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.