Take a fresh look at your lifestyle.

‘फादर्स डे’ साजरा होण्यामागे ‘या’ मुलीचा हात आहे

0

आज 21 जून ! जून महिन्याचा तिसरा रविवार. आजच्या दिवशी भारतात तसेच जगभरातल्या अनेक देशांमधे ” फादर्स डे ” साजरा केला जातो. आणि बाकीच्या अनेक देशांमधे वेगवेगळ्यां दिवशी “फादर्स डे ” साजरा केला जातो.

आपल्याला सुखकर आयुष्य मिळावं म्हणून प्रचंड कष्ट करणाऱ्या वडीलांचा आज सन्मान केला जातो. खरंतर या दिवसाची सुरूवात विसाव्या शतकाच्या सुरूवातीलाच झालेली.

फादर्स डे सर्वप्रथम 19 जून 1910 ला अमेरिकेतल्या वाशिंग्टन मधल्या स्पोकेन मध्ये साजरा केला गेला.

याची एक छानशी कहानी आहे. “सोनोरा स्मार्ट डोड” या मुलीची आणि तिच्या वडीलांवरच्या प्रेमाची.

सोनोरा लहान असतानाच तिच्या आईचा स्वर्गवास झालेला. त्यानंतर तिला आणि तिच्या 5 भावंडांना विल्यम जँकसन स्मार्ट या तिच्या वडीलांनी अतिशय प्रेमाने आणि जबाबदारीने वाढवलं. 1909 मधे एकदा चर्चमधे ” मदर्स डे ” च्या कार्यक्रमाच्या दिवशी चर्चच्या पादरींचे भाषण ऐकून सोनोराला वाटले की वडीलांना पण समान आदर द्यायला हवा.

त्यामुळे तिने चर्चच्या पादरींना तसं सांगितलं आणि त्यांना सुद्धा ते पटलं. मग तिने तिच्या वडीलांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे 5 जून ला हा दिवस साजरा करायची कल्पना सुचवली. पण चर्चच्या पादरींनी वेळ कमी असण्याच्या कारणास्तव तारीख पुढे ढकलली आणि मग जूनच्या तिसऱ्या रविवारी 19 जून 1910 ला स्पोकेन मधे पहिल्यांदा फादर्स डे साजरा केला गेला.

सुरूवातीला फादर्स डे साठी लोक फारसे उत्सुक नव्हते, उलट त्याची फार खिल्ली उडवली गेली. 1920 मधे सोनोरा शिक्षणासाठी शिकागो ला गेली त्यामुळे तिने फादर्स डे चा प्रचार थांबवला. पण 1930 मधे जेव्हा ती पुन्हा स्पोकेन ला परतली तेव्हा तिने तिचा प्रचार राष्ट्रीय पातळी जोमाने सुरू केला. तिला काही व्यावसायिकांची साथ मिळाली.

1972 राष्ट्रपती रिचर्ड निक्सन यांनी फादर्स डे ला कायदेशीर मान्यता देऊन राष्ट्रीय सुट्टी म्हणून हा दिवस घोषित केला. आज 19 जून 2020 मध्ये “फादर्स-डे” ला 110 वर्ष पुर्ण झालेली आहेत.

आई-वडीलांमधे नेहमीच आईच्या पारड्याला जास्त महत्त्व दिले जाते. अनेकदा वडीलांच्या त्यागाला, कष्टाला, त्यांच्या प्रेमाला आपण आईच्या प्रेमापुढे थोडंसं दुय्यमच मानतो. त्यांची महती कुठेतरी कमी मानली जाते. आपण याचा फारसा विचारही नाही करत.

आपले लक्ष वडीलांच्या रागाकडेच जास्त असते. आपल्या चुका आणि अपयशावर चिडलेल्या, नाराज असलेल्या वडीलांच्या काळजातल्या वेदना अनेदा आपल्याला दिसतच नाहीत. आपल्या सगळ्या चुकांना पदरात घेणारी आणि आपल्या जेवणाची काळजी घेणारी आई आपल्याला जास्त जवळची वाटते. पण रस्ता क्रॉस करताना आपल्याकडे आणि गाड्यांकडे टक लावून उभे असलेले वडील आपल्या अनेकदा दिसतच नाहीत. आपण झोपल्यावर आपल्या बेडरूमच्या खिडक्या लावून जाणाऱ्या, आपल्या शिक्षणासाठी दिवसरात्र घाम गाळणाऱ्या, गरज पडली तर आपल्या फी साठी इतरांपुढे स्वाभिमान सोडून हात पसरणाऱ्या वडीलांचं महत्त्व आपल्याला आईच्या तुलनेत तसं कमीच वाटतं, नाही का ?

आपला जन्म जसा आईच्या पोटातून होतो, तसा त्यावेळी तो वडीलांच्या ह्रदयातून सुद्धा होत असतो.

कुटूंबासाठी सगळ्यांत जास्त त्याग हे आपले वडीलच करत असतात. बायको, मुलांसाठी सणावाराला चांगले कपडे घेऊन स्वत: जुने किंवा अगदी साधे कपडे घेणारे हे आपले वडीलच असतात. त्यांच्या सावली आपलं आयुष्य फुलत जातं, पण आपल्याला सावली देताना उन्हामधे त्यांचा जीव जळून जात असतो.

आजच्या दिवशी आपल्या वडीलांना आवर्जुन Happy Father’s day म्हणा. आपण या असल्या “day’s” ला मानत नसलो तरी…

आपले वडील एक साधे शेतकरी असले तरी, आपले वडील “फादर्स डे” या संकल्पनेपासून कोसो दूर असले तरी, आपले वडील आपल्याला कठोर वाटत असले तरी, आपले वडील आपल्यापासून दूर असले तरी, आपलं आपल्या वडीलांशी पटत नसलं तरी म्हणा. कारण आपल्या सुखाच्या फुलांना त्यांच्या अश्रुंनी टवटवीत ठेवलंय.

खरंतर हे असे ” day’s” काय साजरे करायचेत असं अनेकदा बोललं जातं. पण असे दिवस साजरे करण्यात काही वाईट सुद्धा नाहीये ना! रोज प्रेम व्यक्त करतोच ना, मग एक दिवस जरा जास्तीचं प्रेम व्यक्त करूयात!

आणि तसंही प्रत्येक व्यक्तीला जरा स्पेशल ट्रिटमेंट दिलेली आवडतेच की. रोज आपण आईवडीलांना उद्धट बोलतोच मग एखाद्या दिवशी उद्धट न बोलता दिवस थोडासा गोड करूयात. तसंही आजकाल नात्यांमधला संवाद मर्यादित झालाय. त्यामुळे असे दिवस नात्यांना काही क्षणासाठी तरी सोपं करून जातात. चला तर मग आजचा दिवस जगातल्या सगळ्यां वडीलांच्या नावावर करून टाकूयात.

Happy Father’s Day to all the fathers of the world!

  • प्रियंका जगताप

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.