Take a fresh look at your lifestyle.

निवडणूक आयुक्त राहिलेल्या नीला सत्यनारायण यांनी चित्रपटासाठी देखील काम केले होते

0

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक आयुक्त झालेल्या पहिल्या महिला अधिकारी म्हणून नीला सत्यनारायण आपणा सर्वांना माहित होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समोर आलं होतं. मुंबईच्या प्रसिद्ध सेव्हन हिल्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आहे. काल वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

अतिशय कडक अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात ओळख होती.

नीला सत्यनारायण यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९४९ रोजी मुंबई इथे झाला होता. नीला सत्यनारायण ह्या १९७२च्या बॅचच्या (आता निवृत्त) सनदी अधिकारी असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणुक आयुक्त होत्या. नीला सत्यनारायण यांचे शालेय शिक्षण मुंबई, पुणे आणि नाशिक येथे झाले. नंतर त्यांनी इंग्रजी वाङ्मय या विषयात पदवी व पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. १९७२ साली त्या आय.ए.एस ची परीक्षा पास झाल्या होत्या .

मोठी कारकीर्द

नीला सत्यनारायण यांनी सनदी अधिकारपदाच्या ३७ वर्षांच्या कारकिर्दीत महसूल खाते, गृहखाते, वनविभाग, माहिती आणि प्रसिद्धी, वैद्यक आणि समाजकल्याण, ग्रामीण विकास यासारख्या अनेक खात्यांत सनदी अधिकारी म्हणून काम केले. मंत्रालयात त्यांनी वेगवेगळ्या पदावर सचिव म्हणून काम केले आहे. त्या महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव देखील होत्या. त्यांच्याकडे काही काळासाठी राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी देखील होती.

2009मध्ये त्यांना राज्य निवडणूक आयोगाच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा बहुमान मिळाला होता.

धारावीत काम करताना तिथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना त्यांनी निर्यातक्षम चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले .

“मतदार व्हा अभियान”

नीला सत्यनारायण यांच्या कार्यकाळात विकसीत दळणवळण तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणुकांचे व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षमतेने व पारदर्शकपणे पार पाडण्यात आले. या कार्यकाळात अनेक महत्वाचे निर्णय जसे – निवडणूक व्यवस्थापन प्रकल्प, मतदार व्हा अभियान, ग्रामपंचायतीतील नवनिर्वाचित महिला सदस्याकरिता ‘क्रांती ज्योती’ प्रकल्पातंर्गत प्रशिक्षण कार्यक्रम, मतदारांची गैरसोय टाळण्याकरिता मतदार केंद्रीत सुधारणा, बहुसदस्यीय निवडणूक पध्दतीची यशस्वीपणे अंमलबजावणी, मतदान यंत्रात सुधारणा व अद्यावतीकरण, नोटाची अंमलबजावणी आणि अनर्ह करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

चित्रपटांसाठी देखील केले काम

याशिवाय त्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे १५० कविता लिहिल्या असून त्यांनी काही मराठी चित्रपटांसाठी आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून ‘बाबांची शाळा ‘ हा मराठी चित्रपट निघाला आहे . त्याचे संगीत दिग्दर्शन त्यांनीच केले होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.