Take a fresh look at your lifestyle.

मोदक पहिले तरी तोंडाला पाणी सुटते, पण या मोदकांचा इतिहास आपल्याला माहिती आहे काय ?

गणेश चतुर्थी, संकष्टी, विनायकी, एकादशीनिमित्ताने मोदक हवेतच. बाप्पा आणि त्याचे प्रिय मोदक यांचं नातं पक्कं आहे.

0

होळी म्हटली की पुरणाची पोळी, संक्रांतीला तिळाचे लाडू तसं गणेश चतुर्थीला मोदक हे समीकरण इतकं घट्ट आहे की गणपतीबाप्पांच्या नुसत्या स्मरणानेही अनेकांच्या डोळ्यांसमोर २१ मोदकांचं ताट तरळू लागतं.

काही सण आणि पदार्थ यांच एक अतूट नात असतं.

गणेश चतुर्थी, संकष्टी, विनायकी, एकादशीनिमित्ताने मोदक हवेतच. बाप्पा आणि त्याचे प्रिय मोदक यांचं नातं पक्कं आहे.

एकाच वेळी, एक गोड पदार्थ म्हणून,धार्मिक कार्यातील नैवेद्याचा भाग म्हणून आणि अस्सल मराठमोळ्या खाद्य संस्कृतीचा राजदूत म्हणून इतका मान लाभलेला अन्य पदार्थ नसावा. आपल्यासाठी आपली खाऊगिरी व मोदक यांच्यामध्ये प्रश्नांचं जाळं कधी विणावंसं वाटत नाही.

अनेक गणेश कथांपैकी एका कथेत या मोदकाचा उगम सापडल्यासारखा वाटतो.

पुराणकाळात देवीदेवतांनी अमृतापासून बनवलेला दिव्य मोदक देवी पार्वतीला देऊ केला. देवी पार्वतीचे दोन पुत्र स्कंद आणि गणेश त्या मोदकास पाहून भुलले. आपणासच हा दिव्य मोदक मिळावा असा हट्ट करू लागले. पार्वतीने त्या दोघांनाही मोदकाचे वर्णन करून सांगितले आणि त्याउपर जो पुत्र धर्माचरणात श्रेष्ठता बाळगेल त्याला आपण तो मोदक देऊ, असे आश्वस्त केले.

त्याक्षणी स्कंद तीर्थक्षेत्रांची परिक्रमा करण्यास गेला तर गणेशाने फक्त मातापित्यांना प्रदक्षिणा घातली. देवी पार्वतीने पूजा, यज्ञ, मंत्र, तीर्थक्षेत्रे एकीकडे तर मातापिता एकीकडे असे मत व्यक्त करत गणेशाच्या बाजूने कौल दिला आणि गणेशाचे मोदकाशी नाते जुळले ते कायमचे.

मोदक नामक पदार्थ व गणपतीचा ऋणानुबंध प्राचीन आहे हे मात्र यातून नक्की अधोरेखित होते. मोदकाचा उल्लेख जुना असला तरी आपण आज जे उकडीचे वा तळलेले मोदक खातो त्याचीच पाककृती पूर्वापार प्रचलित आहे वा नाही याबाबतीत संदेह निर्माण होतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे अगदी प्राचीन काळापासून लाडवांनाही मोद देणारे या अर्थाने काही ठिकाणी मोदक म्हटले आहे.

उकडीच्या मोदकाचे धागेदोरे सापडतात

आपण खातो त्या मोदकांची पाककृती कधी प्रत्यक्षात आली याचा निश्चित कालखंड सांगता येत नाही. इसवी सन ७५० ते १२०० या दरम्यान वर्णिल्या गेलेल्या काही पदार्थामध्ये मात्र या उकडीच्या मोदकाचे धागेदोरे सापडतात. खोबरं न वापरता इतर वेगळी सामग्री वापरून गोड सारणाच्या साहाय्याने तयार एका पदार्थाची पाककृती मोदकांशी मिळतीजुळती आहे.

मात्र त्या पदार्थाचे नाव ‘ठडुंबर’ असे नमूद केले गेले आहे. मोदकासारखीच पाककृती असणाऱ्या एका अन्य पदार्थाला ‘वर्षील्लक’ असे म्हटले आहे. मात्र त्याच्या पाककृतीत दुधाचा वापर दर्शवला गेला आहे. तांदळाचे पीठ वापरून बनवल्या गेलेल्या एका पदार्थाला मोदकच म्हटले आहे.

मोदकाचे विविध प्रकार

विविध पदार्थाच्या पाककृतींच्या मिश्रणातून आताच्या मोदक नामक पदार्थाचे रूप सिद्ध झाले असावे. त्यातही खोबऱ्याचे, खव्याचे, पुरणाचे, सुक्यामेव्याचे हे आणि असे विविध मोदक प्रकार आपण अनुभवू शकतो. मोदकाचा बाह्य़ आकार निश्चित आहे.

मोदक वळता येणं ही कला आहे. पाककौशल्यात सुबकपणाचा निकष ठेवला तर मोदक आपली छान परीक्षा घेतो. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात मोदक होतात, पण योग्य ती उकड, गोलसर पारी, कंजूसपणा झळकेल इतकं कमीही नाही व मोदकाला मोडेल इतकं जास्तही नाही असं सारण, रेखीवपणे जुळत जाणाऱ्या पाकळ्या व अखेर तो कोचदार तुरा हे सगळ्यांनाच जमत नाही.

मोदकावर विविध प्रयोग होताना आपण पाहतो

आतलं सारण आापापल्या पाककौशल्यानुसार बदललं जातं. अनेकदा पाककला स्पर्धामधून किंवा टीव्ही कार्यक्रमांतून मोदकावर विविध प्रयोग होताना आपण पाहतो. त्याचं कारण मोदकाच्या रूपात दडलेलं आहे. मोदकाच्या पोटातली पोकळी या प्रयोगांसाठी आपल्याला खुणावते.

गणपतीबाप्पांच्या या लाडक्या नैवेद्याचं सध्या होणारं स्थित्यंतर खूप सुखावणारं आहे.

अनेक लग्नांमध्ये मराठी स्वीट कुझीन म्हणून मोदकांची वर्णी लागू होतेय. मराठी लग्नातच नव्हे तर पंजाबी गुजराथी लग्नातही मोदकांची मागणी वाढतेय. लग्नाच्या केटरिंगमधल्या काकूंचं झटपट मोदक करण्याचं कसब अनेकांना अचंबित करतंय.

गुलाबजाम, अंगुरबासुंदी, जिलेबी यांच्या जोडीला आपले मोदकराव तुपाच्या धारेसोबत पंगतीची शोभा वाढवताना दिसू लागले आहेत. हा बदल खरंच खूप आश्वासक आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.