Take a fresh look at your lifestyle.

माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?

0

मराठी साहित्य विश्वात गदिमा आणि पुल यांची नावे जगमान्य आहेत. त्यांच्या लेखनामुळे मराठी साहित्य समृद्ध झाले आहे. पण विचार करा जर पुलं किंवा माडगुळकरांना विचारलं तुम्ही नक्की काय करता ? तर ते काय उत्तर देतील.

असाच एक किस्सा घडला होता बारामती मध्ये आणि तो स्वतः शरद पवार यांनीच सांगितला.

२००३ साली शरद पवारांनी बारामतीत गदिमांच्या नावाने मोठे सभागृह बांधले, त्याच्या उदघाटन प्रसंगी शरद पवारांनी हा किस्सा सांगितला होता.

बारामतीमध्ये साहित्यमंडळातर्फे एक कार्यक्रम घेण्याचे ठरले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग. दि. माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे यांना आणायचे ठरले, दोघांनी ते मान्यही केले. मराठीतील दोन मोठे साहित्यिक आपल्याकडे येणार म्हंटल्यावर बारामतीकर ही खुश होते.

शरद पवार नुकतेच तेव्हा बारामतीतून उदयास येणारे तरुण राजकीय व्यक्तिमत्व होते. म्हणून आयोजकांकडून दोघांना आणायची जवाबदारी शरद पवारांवर टाकण्यात आली.

दोन दिग्गज लोकांना आणायचे म्हटल्यावर त्यासाठी चार चाकी गाडी पाहिजे. पण तेव्हा सर्वात मोठी पंचाईत म्हणजे त्यावेळी शरद पवारांकडे गाडी नव्हती ! (असं खुद्द शरद पवारांनीच सांगितले आहे) त्यांना एस.टी तर टाकून आणता येणार नाही. अशावेळी पवारांनी एक आयडिया केली आणि त्यांनी एका श्रीमंत बागायतदाराला पकडले व त्याची गाडी मिळवली. त्या गाडीमधून ठरल्याप्रमाणे दोघे आले.

कार्यक्रमानंतर दोघांना परत सोडण्यासाठी पवार त्यांना घेऊन निघाले, ज्या बागायतदाराची ती गाडी होती त्याला ही अचानक शहरात काही काम निघाल्यामुळे तोही बरोबर निघाला, टिपीकल व्यापारी असतात ना तसा तो होता जाडजूड, काळाकुट्ट अगदी अंधाराच्या सावली सारखा, हाताच्या पाचही बोटात सोन्याच्या आंगठ्या,गळ्यात चेन.

पवारांनी दोघांची ओळख करुन दिली “हे ग.दि.माडगूळकर व पु.ल.देशपांडे मोठे लेखक आहेत हं!”,”बरं बरं नमस्कार नमस्कार!” बागायतदारांनी ओळख करुन घेतली.मग हवापाण्याच्या गप्पा सुरु झाल्या.गप्पा रंगात आल्या आणि अचानक बागायतदार महाशयांनी बॉम्बच टाकला

“माडगूळकर व देशपांडे साहेब पण नक्की तुम्ही करता काय हो?”

म्हणजे धंदापाणी वगैरे असेल,लेखकाला खरच पैसे मिळतात का? व तो पोट कसे भरतो हा सामान्य माणसांना प्रश्न पडणे स्वाभाविक आहे त्यात महाशय तर हाडाचे व्यापारी बागायतदार! पण त्यांच्या त्या प्रश्नाने शरद पवारांची झाली पंचाईत !

कारण गदिमा म्हणजे अती कोपिष्ट व्यक्तिमत्व. आता दोघे काय उत्तर देतात याची पवारांना चिंता वाटू लागली. पण पुल शांतपणे उत्तरले “

हे माडगूळकर आहेत ना ते पोस्टाच्या बाहेर बसुन लोकांना चिठ्या लिहून देतात व मी त्यांच्या शेजारी बसुन छत्र्यांच्या काड्या दुरुस्त करतो!”.

पूल च्या उत्तराने वातावरण बदलून गेले आणि पुन्हा नवीन चर्चा सुरु झाली. हा झाला अर्थात विनोदाचा भाग! पण धान्याची कोठारे भरणार्‍याला कदाचित माहितही नसेल की येणार्‍या अनेक पिढयांसाठी मराठी साहित्यात अशी लाखो कोठारे ज्यांनी भरुन ठेवली आहेत असे दोन साहित्यिक आपल्याबरोबर आहेत.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.