Take a fresh look at your lifestyle.

किरण बेदी यांच्यावरील चित्रपटाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एक लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला होता

0

लहानपणापासून आपल्याला जनरल नॉलेज मध्ये एक प्रश्न कायम विचारला जातो. पहिली महिला आय. पी. एस. आणि त्यावर आपण आजवर उत्तर देत आलो. किरण बेदी. पण पहिली महिला आय. पी. एस. यापलीकडे देखील किरण बेदी यांचे बरेच मोठे काम आहे. आपण आज त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

डॉ. किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ रोजी प्रकाशलाल आणि प्रेमलता पेशावरिया यांच्या पोटी अमृतसर मधे झाला. किरण यांचे वडील देखील उत्तम टेनिस खेळाडू होते. म्हणूनच वडीलांप्रमाणेच किरण आणि त्यांच्या दोन बहिणी रिता आणि अनु यासुद्धा टेनिस खेळाडू होत्या.

1966 मधे किरण बेदी राष्ट्रीय जुनियर टेनिस चँपियन बनल्या. 1965 आणि 1978 दरम्यान त्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय टेनिस खेळत राहील्या आणि जिंकत राहील्या. किरण बेदींनी 1973 मध्ये श्रीलंके विरुद्ध भारताचे प्रतिनिधित्व करीत लीयोनेल फोंसेका मेमोरियल टेनिस ट्रॉफी भारताला मिळवून दिली होती.

अमृतसर येथील सेक्रेड हार्ट कॉन्वेंट स्कूलमधे शालेय शिक्षण पुर्ण करून 1968 साली महिला महाविद्यालयातून त्यांनी इंग्रजी विषयात पदवी मिळवून, पुढे 1970 ला पंजाब विद्यापीठातून राज्यशास्त्रात एम.ए केलं. 1988 साली दिल्ली विश्वविद्यालयातून लॉ ची पदवी मिळवून, 1993 मध्ये IIT दिल्ली येथून “ड्रग, शोषण आणि डोमेस्टीक व्हायलेंस” विषयावर शोधनिबंध लिहून, समाजशास्त्रात PHD केली आहे.

“टेनिस कोर्ट”वरील प्रेम

टेनिस कोर्ट वर सरावादरम्यान टेनिस प्लेयर ब्रीज बेदींशी त्यांची भेट झाली. भेटीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. ब्रीज बेदी यांनी प्रपोज केल्यावर किरण त्यांना नाही म्हणू शकल्या नाहीत. पुढे 9 मार्च 1972 रोजी विवाह करून किरण पेशावरियाची किरण बेदी झाली. त्यांना एक साईना नावाची मुलगी आहे.

ज्यावर्षी त्यांचं लग्न झालं त्याच वर्षी म्हणजे 1972 साली इंडियन पोलीस सर्व्हिसेस (IPS) मध्ये “पहिली महिला आईपीएस किरण बेदी” हे पहिल्या महिलांच्या कळपातलं ऐतिहासिक नाव जन्माला आलं.

आय. पी. एस. म्हणून निवड होण्याआधी त्या खालसा महाविद्यालयात राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम करत होत्या. 1975 मध्ये त्यांची पहिली पोस्टिंग नवी दिल्लीमधे झाली व त्यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या परेडला त्या पुरुषांच्या प्रतिनिधी होत्या. त्यानंतर 35 वर्ष अनेक पदांवर यशस्वीरित्या काम करत त्या इतिहास रचत गेल्या. दिल्ली, गोवा, चंडीगड आणि मिजोरम या राज्यांमधे त्यांनी काम केले.

किरण यांची आय. पी. एस. म्हणून निवड झालेल्या बॅचमध्ये 80 IPSअधिकारी पुरुषांमध्ये त्या एकमेव महिला IPS होत्या.

तिहार आणि रेमन मॅगसेसे

दिल्लीतील तिहार कारागृहाच्या मुख्य अधीक्षक असताना त्यांनी कारागृहामध्ये कैद्यांसाठी अनेक सुधारणा केल्या. यासाठी १९९४ मध्ये त्यांना रेमन मॅगसेसे हा आशियाचा नोबल समजला जाणारा पुरस्कार मिळाला. २००३मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव म्हणून पोलीस सल्लागार म्हणून बेदींनी काम केले. 2005 मधे जेल सुधारणेच्या कार्यामुळे त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. 2007 मधे त्यांनी पोलिस खात्याचा राजीनामा देऊन सामाजिक आयुष्यात पाऊल ठेवलं.

२०११ साली देशात भ्रष्टाचारविरोधी चळवळ सुरु झाल्यावर त्या चळवळीत अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यासोबत त्यांनी काम केलं. त्यानंतर काही काळ त्या केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात देखील सक्रीय राहिल्या. जानेवारी २०१५ मध्ये त्या भारतीय जनता पार्टीत सामील झाल्या. भाजपकडून २२ मे २०१६ रोजी त्या पॉंडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर बनवले गेले.

सामाजिक कामांसाठी किरण यांनी “नवज्योती इंडिया फाउंडेशन” आणि “इंडिया व्हिजन फाउंडेशन” अश्या संस्थांची देखील स्थापना केली. त्यांच्या निडर, निस्वार्थ कामामुळे त्यांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

किरण यांच्या आयुष्यावर मेगन डॉनेमन या ऑस्ट्रेलियन निर्मात्याने बनवलेल्या “येस, मॅडम सर !” या इंग्रजी चित्रपटाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एक लाख डॉलरचा पुरस्कार मिळाला आहे तर बार्बारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५०० डॉलरचा पुरस्कार मिळाला. तसेच त्यांच्या आयुष्यावर कर्तव्यम् (तेलुगू), विजयाशांती आयपीएस (तमिळ), तेजस्विनी (हिंदी) हे चित्रपट तसेच स्त्री आणि इन्स्पेक्टर किरण या दूरचित्रवाणी मालिका बनवल्या आहेत.

खरंतर किरण बेदी त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीत अनेक वेळा वादग्रस्त चर्चेत आल्या. त्यांच्यावर अनेक आरोप लावले गेले. जितकं यश त्यांनी मिळवलं तिचकीच टीका सुद्धा त्यांना मिळाली.

पण याच किरण बेदींनी पोलिस खात्यात येऊन महिलांसाठी एका नवा मार्ग निर्माण केला. ज्या काळात त्या या क्षेत्रात आल्या आणि स्वत:ला सक्षमपणे, कणखरपणे सिद्ध करू लागल्या तो काळ पाहता त्यांनी जे काही कार्य केले, जे काही यश मिळवले ते भारताच्या इतिहासातले एक महत्वाचे पर्व म्हणून जगात कायम गौरविले जाईल.

  • प्रियांका जगताप

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.