Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात कशी झाली ? काय आहे इतिहास

राज्याच्या कुस्ती क्षेत्रात मनाची असलेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू होत आहे. स्पर्धेसाठी मातीचे आखाडे आणि मॅट सज्ज झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का हि स्पर्धा सुरु होण्यामागे नक्की काय इतिहास आहे. 

0

कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा खेळ आणि याच कुस्ती मध्ये राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे ‘महाराष्ट्र केसरी’.  आजपासून पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा सुरु होत आहे. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे  62 वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन पुण्याच्या कोथरूडमधील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत होणार आहे.

10 जानेवारी  ते 14 जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.  यावर्षी स्पर्धेत राज्यभरातून तब्बल 900 कुस्तीपटूंनी सहभाग नोंदवणार  आहेत.  हा सगळ्यात कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी हा मुद्दा आहेच पण या स्पर्धेची सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का ? नसेल माहित तर हेच आपण जाणून घेणार आहोत. 

स्थापनेमागची पार्श्वभूमी 

महाराष्ट्र्र केसरी स्पर्धंची पार्श्वभूमी समजावून घ्यायची असेल तर त्याआधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची माहिती घ्यावी लागेल. कारण महाराष्ट्र्र केसरी स्पर्धेची सुरुवात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून झाली.

स्वातंत्रपूर्व काळात कुस्तीला राजाश्रय देणारी संस्थाने खालसा झाल्यामुळे कुस्तीला उतरती कळा लागली होती.

तशाही परिस्थितीमध्ये काही ठिकाणी स्पर्धा होत असत तिथे भांडणे आणि वादामुळे गोंधळ होत असे. याच काळात पुण्यात मामासाहेब मोहोळ यांच्या पुढाकारातून पुणे राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना झाली आणि त्याच्या माध्यमातून पुण्यात शांततेत कुस्ती स्पर्धा पार पडू लागल्या.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना

त्यामुळे अशीच एखादी संघटना राज्य पातळीवर व्हावी म्हणून मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे यांच्या माध्यमातून पुण्यात २ ते ४ ऑक्टोबर १९५३ रोजी अधिवेशन घेऊन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करण्यात आली.

कुस्तीचा प्रचार-प्रसार आणि या क्षेत्रातील अडीअडचणी सोडवणे हाच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा उद्देश होता. 

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीची काही वर्ष संघटनेचा प्रचार-प्रसार यात गेली. १९५३ च्या पुण्यातील स्थापना अधिवेशनानंतर १९५५ ला मुंबईमध्ये, १९५८ ला सोलापुरात तर १५५९ ला सांगलीत अधिवेशन झाले.

याच काळात १९५९ साली राष्ट्रीय पातळीवर अजिंक्य मल्ल ठरवण्यासाठी हिंद केसरी स्पर्धा सुरु झाली होती. पहिल्याच वर्षी महाराष्ट्रातील श्रीपती खंचनाळे हिंद केसरी झाले होते. त्यामुळे त्याच धरतीवर राज्यात देखील अशी स्पर्धा सुरु करावी असा निर्णय सांगलीच्या अधिवेशनात घेतला गेला. 

पहिल्याच वर्षी महाराष्ट्र केसरीचा निर्णय अनिर्णयीय

१९५९ च्या सांगली अधिवेशनातील ठरावानुसार १९६० च्या नागपूर अधिवेशनात स्पर्धा घेण्यात आली. कोल्हापूरचे हूंचकट्टी आणि सांगलीचे मारुती काकती यांच्यात कुस्तीही झाली. पण ठरलेल्या वेळेत कुस्ती न झाल्याने पहिल्याच वर्षीचा महाराष्ट्र्र केसरीचा निकाल अनिर्णयीत राहिला. त्याच्या पुढच्या वर्षी १९६१ च्या औरंगाबाद अधिवेशनात मात्र महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा पहिला निकाल लागला.

यावेळी झालेल्या स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या दिनकर दह्यारी यांनी पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

दिनकर दह्यारी यांनी जिंकलेल्या पहिल्या स्पर्धेपासून आजवर ६०हुन अधिक वेळा महाराष्ट्र्र केसरी स्पर्धा पार पडली. आज या स्पर्धेला मोठं वलय आहे, दरवर्षी हजारो कुस्ती शौकीन याची आतुरतेने वाट पाहतात. 

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.