Take a fresh look at your lifestyle.

वारी सांगण्या-ऐकण्यापेक्षा ती अनुभवण्याचा सोहळा आहे

0

वारी म्हटलं कि तुमच्या डोळ्यासमोर काय येत ? पायी चाललेली दिंडी, लहान थोर सगळेच प्रत्येकाला माऊली- माऊली म्हणत. विठ्ठलाचा गजर करत देहू-आळंदी पासून पंढरपुर पर्यतचा प्रवास म्हणजे वारी. हा प्रवास म्हणजे एक उत्साह असतो, आनंद असतो, जल्लोष असतो. पण यावर्षी हे सगळ असणार नाही.

यंदा कोरोनामुळे पायी वारी रद्द करण्यात आली आहे. पण वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा सूरु ठेवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात म्हणून थेट बसने पालखी पंढरपुरात पोहचवली जाणार आहे. पण वारीच्या या प्रवासाला एक इतिहास आहे, परंपरा आहे. याविषयी आपण जाणून घेवूया !

पंढरपूर म्हटले की डोळ्यासमोर येते तो वारीचा जल्लोष . पंढरपूरच्या वारीचा आल्ल्हाददायी सोहळा सांगण्यापेक्षा आणि ऐकण्यापेक्षा ती अनुभवाची मज्जा न्यारीच आहे.

आषाढ महिन्यातील (जून -जुलै ) शुक्ल पक्षातील अकरावी तिथी हि प्रथमा एकादशी म्हणून ओळखली जाते. तसेच या तिथीला महाएकादशी म्हणून ओळखण्यात येते. दर महिन्याला शुक्ल आणि कृष्ण पक्षात अश्या वर्षाला २४ एकादशी असतात त्यातील आषाढी आणि कार्तिकी एकादशीला अनन्य साधारण महत्व असते.

यंदा १ जुलै २०२० बुधवार रोजी आषाढी एकादशी आहे. ३० जुन २०२० रोजी सायंकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी एकादशी सुरु होणार असून ०१ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी समाप्त होईल.

नवीन लग्न झालेल्या नववधूला आषाढी एकादशीला माहेरी आणण्याची प्रथा आहे. (या दिवशी वैकुंठाचे दार उघडे असतात हि मान्यता आहे ) आषाढी एकादशी या दिवशी सर्व देवतांचे तेज शक्ती एकवटलेले असते असे मानले जाते. साक्षात भगवंताचा वास असलेली पंढरपूर नगरी म्हणजे भक्तांसाठी जणू पृथ्वीवरचे वैकुंठच आहे.

पूर्वीच्या काळात शेतकऱ्यांची पेरणी झाल्यावर मधातला जो रिकामा असायचा त्यात भक्त या दिवसाला पंढरपूरला म्हणजेच विठोबाच्या वारीला जायचे वारीवरून परत शेतातील पिक बहरून यायचे, हि वारी आणि वारकरी संप्रदाय पद्धती १००० वर्षापासून सुरु आहे.

तसेच चैत्र महिन्यात सुरु झालेल्या मराठी नववर्षातील हा पहिला सण म्हणून पण ओळखला जातो. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात या दिवसापासून देव चार महिने निद्रेत जातात ते कार्तिक एकादशीला जागे होतात असे सांगितले जाते.

मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांने होऊन वरदान दिले होते की, तू कोणाकडूनही मरणार नाहीस शिवाय एका स्त्रीच्या. त्यानंतर या वरामुळे उन्मत झालेले राक्षस देवांनाच त्रास देऊ लागले. तेव्हा इतर देवांसह महादेव पण काही करू शकत नव्हते तेव्हा ते एका गुहेत जाऊन लपले. त्यावेळी या देवांच्या श्वासातून एक देवता निर्माण झाली, त्या देवीचे नाव एकादशी होते. त्या दिवशी देवालाही उपवास पडला होता म्हणून एकादशीच्या उपवासाची प्रथा पडली. अशी एक पौराणिक कथा सांगितले जाते.

आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी याला चातुर्मास म्हणतात. धार्मिकतेने विचार केला तर या चार महिन्याच्या काळात देवाची निद्रा चालू असते.तसेच हा चार महिन्याचा काळ पावसाळ्याचा असतो या काळात विविध प्रकारचे जीव जंतू ,कीटक उत्पन्न होतात.सूर्याचे प्रखर तेज पृथ्वीपर्यंत रोज पोहचत नाही. आजारपण रोगराई वाढीस लागते.

त्यामुळे चातुर्मासाच्या या काळात उपासना , नामस्मरण , योग करण्यावर भर दिला जातो आणि संकट आलीच तर भक्ताचा विठूराया त्यांना या संकटातून वाचवेल हा त्यांचा दृढ विश्वास होता. तसेच विठूराया आत्ताही आपल्याला कोरोना विषाणूपासून वाचवेल याच आशेवर यंदाही भक्तगण आषाढी एकादशी साजरी करतील आणि परंपरा जपतील.

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखमाई दिसे दिव्य शोभा

  • निधी गौरखेडे

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.