Take a fresh look at your lifestyle.

खासदार झाल्यानंतर मतदारसंघातील प्रत्येक गावात गेलेल्या त्या देशातील एकमेव खासदार असतील

0

तिला आपण एका दिव्यवलयी नेत्याची मुलगी म्हणू शकतो. तिला आपण देशातील सर्वोत्कृष्ट संसदपट्टू म्हणू शकतो. तिला आपण संसदेत सर्वाधिक काळ उपस्थित राहून देखील मतदारसंघात तगडा जनसंपर्क ठेवणारी आदर्श लोकप्रतिनिधी म्हणू शकतो.

तिला आपण ‘जागर जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा’ ही स्त्री-भ्रूणहत्या विरोधी चळवळ राबवून असंख्य मुलींना जन्म देणारी ‘आई’ म्हणू शकतो. किंवा तिला आपण देशात पहिली युवती संघटना स्थापन करून ग्रामीण भागातील, खेड्यापाड्यातील युवतींना व्यासपीठ व नव्या संध्या निर्माण करून देऊन महाराष्ट्राचे पुरोगामित्व पुन्हा एकदा सिद्ध करणारी आधुनिक ‘सावित्री ‘ म्हणू शकतो.

मी इ ७ वी मध्ये असेल, तेव्हाचं थोडं आठवतय तेव्हा आमच्या घरी सकाळ हे वर्तमानपत्र यायचे. त्यात सुप्रियाताई राज्यसभा सदस्य झाल्याचे वाचल होते. पण तेव्हा या बातमीकडे मी काही विशेष लक्ष दिले नव्हते. तेव्हा फार समजतही नव्हते म्हणा. परंतु २००९ ला आमची पूर्व हवेलीची काही गावे ही पुरंदर विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली, जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो.

तेव्हा चौदाव्या लोकसभेसाठी स्वतः पवार साहेब खासदार होते. एव्हाना मला राजकारण थोडं थोडं समजू लागले होते. आपण बारामती लोकसभा मतदार संघाचा भाग असणे ही खरंच कौतुकाची बाब होती. आणि देशातील सर्वोच्च नेता आपला प्रतिनिधी असणार याचा अभिमान वाटत होता. पण याच वेळी साहेबांनी मी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले व सुप्रिया ताई साठी हा मतदारसंघ निश्चित झाला.

तेव्हा मात्र ताईंबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. मला व्यवस्थित आठवतंय मी तेव्हा दहावीत होतो. सुप्रियाताईंचा मतदारसंघात पहिला दौऱ्याचा कार्यक्रम ठरला. ताई येणार म्हणून विशेषत: शरद पवार साहेबांची मुलगी येणार म्हणून स्वयंस्फूर्तीने गावाच्या गाव सजलेली.

मोठ मोठ्या स्वागत कमानी, मोठे होर्डिंग, मोठे मोठे हार, रस्त्यांवर दुतर्फा स्वागतासाठी काढलेली रांगोळी, ताई येणार म्हणून नवीन कपडे घालून स्वागतासाठी उभे असलेली शाळेची मुले, असे साधारणता गावचे ताईंच्या पहिल्या भेटी वेळीचे चित्र होते. त्यानंतर ताई प्रचंड मताधिक्क्याने पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या. ताई पहिल्यांदा लोकसभेत जाताना मला ताईंना मत देता आले नाही याची खंत मला आजतागायत वाटत आलेली आहे.

ताई खासदार झाल्या. कोणत्याही खासदाराबाबत लोकांचा असा समज असतो की, एकदा का एखादा व्यक्ती खासदार म्हणून निवडून गेला तर पुन्हा तो तीन वर्षे तरी दिसत नाही. परंतु ताईंनी लोकांचा हा समज खोटा ठरविला.

कारण खासदार झाल्यानंतर ताई आजतगायत दरवर्षी मतदारसंघातील जवळपास सर्व गावात जातात. आपल्या मतदारसंघातील प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर ताई गेल्या ११ वर्षांत किमान दहा वेळा तरी गेल्या असतील. आणि असा मतदारसंघात जनसंपर्क असलेल्या ताई देशातील एकमेव खासदार आहेत हे मी खात्रीने सांगू शकतो.

याचे एक छान उदाहरण मला सांगावेसे वाटते. मी एकदा मित्रांसोबत रायरेश्वरला ट्रेकिंगसाठी गेलो होतो. रायरेश्वर हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात येते.तो बारामती लोकसभा मतदार संघाचा भाग आहे. त्या ठिकाणी केवळ दहा-बारा कुटुंब वास्तव्यास आहेत. तिथे आम्ही वाई तालुक्यातून चालत गेलो होतो. ती घरे जेथे आहेत तिथपर्यंत जाण्यासाठी किमान सात किलोमीटर अंतर पायीच डोंगरदऱ्यातून जावे लागते.

तिथल्या प्राथमिक शाळेत जाणाऱ्या मुला मुलींशी गप्पा मारत असताना आम्हाला असे समजले की, एवढ्या दुर्गम भागात केवळ तिथे आपण ज्यांचे संसदेत प्रतिनिधित्व करतो अशी काही हाताच्या बोटावर मोजता यावीत इतकीच कुटुंबे राहतात अशा ठिकाणी ताई तीन वेळा गेल्या होत्या. ती मुले खूपच आनंदी वाटत होती. सांगत होती की, होय आम्ही आमच्या खासदारांना पाहिलं, त्या इथे आलेल्या आमच्याशी बोललेल्या, हे सर्व ती मुले कौतुकाने सांगत असल्याचे आम्हाला जाणवले. माझ्या सोबत असलेल्या माझ्या पुणे-मुंबईच्या मित्र-मैत्रिणींना देखील याचे कौतुक वाटत होते. कदाचित त्यांनी कधी निवडणुकीनंतर त्यांचा खासदार प्रत्यक्षात पहिलाच नसेल.

मतदारसंघात एवढा जनसंपर्क असताना उर्वरित महाराष्ट्रात देखील ताईंनी गेल्या दहा वर्षात भरीव काम केल्याचे आपणास दिसते. राजमाता जिजाऊंचा हा महाराष्ट्र, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र. परंतु हा महाराष्ट्र वेगळ्या वळणावर चालला होता.

वंशाला दिवा पाहिजे म्हणून त्या दिव्याला आवश्यक असणारी ज्योत मात्र इथे कोणालाही नकोशी झाली होती. आणि महाराष्ट्रात स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण एवढे प्रचंड वाढले होते की, स्त्री पुरुष गुणोत्तर धडकी भरवीत होते. हे स्त्रीभ्रूण हत्या रोखण्याचे आव्हान कोण पेलणार असा प्रश्‍न राज्यात निर्माण झालेला असताना ताईंनी ते आव्हान स्वीकारले. आणि सुरू झाली ‘जागर जाणिवांचा,तुमच्या माझ्या लेकींचा’ ही स्त्री-भ्रूणहत्या विरोधी चळवळ.

हा क्रांतिकारी उपक्रम संपूर्ण राज्यात पोचविला. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावागावात, खेडोपाड्यात हा उपक्रम पोहोचवण्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. आणि या पुढारलेल्या महाराष्ट्रात लोकांच्या विचारात आमूलाग्र बदल घडवून आणला. व आज राज्यात मुलींच्या जन्मानंतर प्रचंड आनंदोत्सव साजरा केला जातो हे त्याचेच फलित आहे.

ताई एवढ्यावरच थांबल्या नाहीत. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य, शिव शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा या राज्याला लाभलेला आहे. तोच वारसा आदरणीय पवार साहेबांनी पुढे चालविला व महिलांना सर्व ठिकाणी पहिल्यांदा 33 टक्के 50 टक्के आरक्षण दिले. पण राजकीय दृष्ट्या अजूनही महिलांना तितके प्रभावीपणे काम करता येत नव्हते हे ताईंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी देशातील पहिली राजकीय संघटना स्थापन करून महाराष्ट्राचे पुरोगामित्व पुन्हा एकदा सिद्ध केले. आज या व्यासपीठावरून आलेल्या युवती राज्य मंत्रिमंडळात, विधिमंडळात, जिल्हा परिषदांत, जिल्हा बँकांमध्ये प्रभावीपणे काम करताना आपणास दिसत आहेत. ही पुरोगामी महाराष्ट्राला गौरान्वित करणारी बाब आहे. असे अनेक राजकीय, सामाजिक उपक्रम ताईंनी राबविले. ‘उमेद’ त्यातीलच एक.

हे सर्व करीत असताना दिल्लीत संसदेत देखील ताई प्रभावीपणे काम करीत असल्याचे आपणास दिसून येते. त्या देशातील सर्वोत्कृष्ट संसदपटू आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. बालकामगार विधेयकावर ताईंनी 24 जुलै 2016 रोजी 16 व्या लोकसभेत केलेले अभ्यासपूर्ण भाषण मी संसदेत बसून ऐकले होते हे मला विशेष सांगावेसे वाटते.ताईंची लोकसभेत अभ्यासपूर्ण भाषण करण्याची कला, लोकसभेत सर्वाधिक उपस्थिती, चर्चेतील सहभाग, सर्वाधिक प्रश्न या सर्वांमुळे ताईंचे स्वतःचे एक वेगळे आदरयुक्त वलय तयार झाल्याचे मी दिल्लीत स्वतः वारंवार अनुभवलेले आहे.

मागच्या लोकसभेत ताईंची संसदेतील उपस्थिती ही ९६ टक्के इतकी होती. ती राष्ट्रीय सरासरीच्या खूप जास्त होती. ताई एकूण १५२ चर्चेत सहभागी होत्या. याची राष्ट्रीय सरासरी ६७.१ एवढीच आहे. ताईंनी एकूण ११८६ प्रश्न लोकसभेत विचारले. याची राष्ट्रीय सरासरी अवघे 292 प्रश्न एवढीच आहे. ताईंनी तब्बल २२ खासगी विधेयके मांडली.

त्यांनी लोकसभेत मांडलेल्या लाखो खाजगी कर्मचाऱ्यांना दिलासा देणाऱ्या ‘राईट टू डिस्कनेट’ या खासगी विधेयकाची ही देशभरात खूप चर्चा व कौतुक झाले. या संसदीय कार्याचे वारंवार विशेष कौतुक झाले. यात सलग तीन वर्ष फेम इंडियाचा नारी शक्ती उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार तसेच सलग सहा वर्षे संसद रत्न पुरस्कार व आत्ता 2020 संसद महारत्न पुरस्कार. हे सर्व पुरस्कार त्याचेच द्योतक आहेत.

शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, संयुक्त राष्ट्रांच्या ७० व्या आमसभेत अन्न सुरक्षेबाबत भारताची लक्षवेधी भूमिका मांडताणाही खा. सुप्रिया सुळे आपणास दिसतात व मतदारसंघातील अतिशय दुर्गम भागातील लोकांशी त्यांच्या घरात जाऊन जेवताना, बोलतानाही खा. सुप्रिया सुळे आपणास दिसतात. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची प्रचिती आपणास यावी.

  • आकाश भरत झांबरे पाटील
  • महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस: राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
  • मो : 9767813939

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.