कोरोना नंतरची एक पहाट
काल एका मित्राच्या फेसबुकवर पोस्ट पहिली. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात रस्त्यावरून मोर फिरतायेत, मुक्तपणे… एरवी तिथे माणसांची गर्दी असते. आज माणस घरात कोंडली गेली आहेत. याचं कारण म्हणजे कोरोना व्हायरस..
मागच्या काही दिवसात जगाला कोरोना नावाच एक ग्रहण लागलंय आणि या ग्रहणापासून स्वत:ला वाचवण्यासाठी माणसाने स्वत:ला स्वत:च्याच घरट्यात कोंडून घेतलंय. जगाच्या स्पर्धेत स्वतःला अग्रेसर ठेवण्यासाठी सतत धावणाऱ्या माणसाला कोरोनाने घरात बंदी केलं.
पण तुम्ही विचार केलाय ? आता तुम्हाला, मला सगळ्यांनाच स्वताच्या घरात राहणंही अवघड वाटू लागल आहे. विचार करा, जग जिंकायला निघालेल्या या माणसाला स्वत:च्या घराचं महत्व वाटत आहे का ? मग घरात बसल्या बसल्या माणसाला त्याच्या घराचं, घरातल्या माणसांचं आणि जगण्याचं महत्व पुन्हा कळायला लागलंय. अस वाटतय का ?
आज आपल्याच घरात बसल्या बसल्या आपल्याला अवघडलेपणा आलाय. पण माणसांचा अवघडलेपणा प्राणी, पक्षी आणि निसर्गाच्या मोकळेपणात रुपांतरीत झाला आहे. याची जाणीव होतेय का तुम्हाला !!
रोज सकाळी कर्णर्ककश गाड्यांच्या आवाजाने किंवा अलार्मने येणारी जाग आज चिमण्यांच्या चिवचिवाटाने येते. पहाटेपासून कार्बनच्या धुराने गुदमरणारी हवा आजकाल दिवसभर एकदम टवटवीत वाटते. घराच्या खिडकीत बसून कॉफी पिताना डिजेल पेट्रोलचा दुर्गंध येत नाही. अगदी रोज रात्री कार्बनच्या थरामुळे न दिसणाऱ्या चांदण्याही दिसू लागल्या आहेत. असं वाटतंय आकाशही धुराच्या विळख्यातून सुटायला लागलंय. कालची बातमीही वाचली असेल, प्रदूषण कमी झाल्याने ओझोन वायूच्या थरावर देखील चांगला परिणाम दिसू लागला आहे.
विचार करा थोडा, कोरोना व्हायरस मुळे नक्की काय काय बदललंय !
कोरोनाच्या भीतीने का असेना पण त्यामुळे माणूस माणसाजवळ आलाय. पण निसर्गही त्याच्या मूळ रूपात दिसायला लागला आहे. अगदी मागची काही वर्ष शहरातून पक्षी हरवलेत असं वाटत असताना आज अचानक एवढे पक्षी एकदम आले कुठून हा प्रश्न पडतोय ? खरंतर पक्षी कुठे हरवलेच नव्हते. पण हाँर्नच्या, गाड्यांच्या भेसूर आवाजापुढे त्या नाजूक सुरांचं काही चालत नव्हतं. बरं त्यातूनही आवाज आला तरी तो ऐकण्यासाठी या जगण्याच्या शर्यतीत धावणाऱ्या माणसांच्या कानांना तेवढी उसंत तरी कुठे होती?
अगदी स्वत:चाच आवाज कानापर्यंत पोहचू नये म्हणून कानाची दारं सुद्धा हेडफोन्सने बंद करून टाकणारा माणूस आजकाल हेडफोन्सही थोडा बाजूला करायला शिकलाय. त्यामुळे पाखरांची सुरावट आणि त्याचा स्वत:चा आतला आवाज त्याला खणखणीत ऐकू यायला लागलाय. माणसाला आता जाणिव व्हायला हवी की, जसं आज कोरानाने त्याच्यावर वर्चस्व मिळवून त्याला घाबरवून सोडलंय. तसंच माणसाने सुद्धा मागच्या कित्येक वर्षांपासून निसर्गावर वर्चस्व मिळवून निसर्गाला घाबरवून सोडलंय. ज्याच्या त्याला काहीच अधिकार नाहीये. असो,
पण कोरोना जेव्हा जाईन तेव्हा माणसांच्या रूपात जगाने खुप काही गमवलेलं असेन. पण त्याचबरोबरीने निसर्गाच्या रूपात जगाने पुन्हा खुप काही मिळवलेलंही असेन.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम