Take a fresh look at your lifestyle.

२६/११ च्या त्या चार दिवसात काय काय घडलं होतं ?

२६/११ च्या त्या रात्री १६० हून अधिक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. सोबतच मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. या दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला. पण त्या रात्री नेमकं काय काय घडलं

0

२६/११ हे दोन शब्द उच्चारले कि तुम्हा-आम्हा सगळयांना एका कटू प्रसंगाची आठवण करून देतात. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला झाला आणि तो २६/११ मराठी लोकांच्या मनावर कोरला गेला. या घटनेला १४ वर्षं उलटून गेली तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

२६/११ च्या त्या रात्री १६० हून अधिक लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले होते. सोबतच मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. या दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला. पण त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊ.

२६ नोव्हेंबर २००८ च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली. लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता. हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं. सुरुवातीला हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता. पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्याच्या गांभीर्याचा अंदाज येऊ लागला.

लिओपोल्ड कॅफेपासून गोळीबाराला सुरुवात

मुंबई पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांनी नंतरच्या काळात दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी दोन दोन गटांमध्ये विभागले होते. लिओपोल्ड कॅफेमध्ये पोहोचलेल्या दोन दहशतवाद्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला. या कॅफेमध्ये बरेच फॉरेनर्स येतात. कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.

त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि तिथून पळ काढला. सरकारी आकडेवारीनुसार लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले होते.

छत्रपती शिवाजी टर्मिनस

लोकल आणि रेल्वे मुंबईची लाईफलाईन आणि त्यातही छत्रपती शिवाजी टर्मिनस अर्थात सीएसटी हे कायम लोकांनी गजबजलेल स्टेशन. आजची सीएसटी हे देशातील सर्वांत व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. नेहमीप्रमाणे त्याही दिवशी सीएसटीवर मोठ्या संख्येने प्रवासी हजर होते. दहशतवाद्यांनी तिथंही अंदाधुंद गोळीबार केला.

इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.

त्यानंतर पोलिसांनी अजमल कसाबला पकडलं. पुढे त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला. सीएसटीवर झालेल्या गोळीबारात ५८ लोक मृत्युमुखी पडले होते.

ओबेरॉय हॉटेल

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये अनेक जगप्रसिद्ध हॉटेल आहेत. त्यातल्या काही प्रमुख हॉटेलमधी ओबेरॉय हॉटेलची गणना होते. बिझनेस क्लास लोकांमध्ये ओबेरॉय हॉटेल खूप फेमस आहे. २६/११ च्या दिवशी दहशवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन घुसले.

असं म्हटलं जातं की, त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं. नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं.

ताज हॉटेल

पहिल्यादा मुंबईला गेलला कोणीही व्यक्ती असेल तर मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया च्या समोर असलेल्या ताज हॉटेलच्या आयकॉनिक इमारतीसमोर जाऊन फोटो काढतोच. पण याच ताज हॉटेलच्या आयकॉनिक इमारतीला लागलेली आग हि २६/११ चा हल्ला म्हटल्यानंतर आठवणारी पहिली प्रतिमा असते. दहशतवादी हल्ल्याची हि ओळख जी कधीच विसरता येणार नाही.

१०० हुन अधीक वर्ष जुने असलेल्या ताज हॉटेलमधून समोर पसरलेला अरबी समुद्र दिसतो. २६/११ च्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती. नेहमीप्रमाणे बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते. अचानक दशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. सरकारी आकडेवारीनुसार हॉटेल ताजमध्ये एकूण 31 लोक मृत्यमुखी पडले आणि इथंच चार दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.

कामा हॉस्पिटल

कामा हॉस्पिटलची आजघडीची मोठी आठवण म्हणजे या हॉस्पिटलबाहेर झालेल्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले होते. कामा हॉस्पिटल १८८० साली बांधलेल मुंबईमधील प्रसिद्ध धर्मादाय हॉस्पिटल आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण आलेल्या दशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलिस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला. याच कारने ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले होते.

नरिमन हाऊस

या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसलाही टार्गेट केलं. नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी काही परदेशी नागरिकांना ओलीस ठेवलं. ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे. याठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असतात. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एनएसजी कमांडो हेलिकॉप्टरच्या मदतीने नरिमन हाऊसला लागून असलेल्या इमारतीवर उतरले आणि नरिमन हाऊस मध्ये प्रवेश केला.

एनएसजीने केलेल्या कारवाईमध्ये दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं, पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही. इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.२६/११ च्या त्या कटू प्रसंगाना आज १४ वर्ष उलटून गेली. पण २६/११ त्या हल्ल्यामुळे भारतीयांच्या मनावर झालेली ती जखम मात्र कायम आहे. न भरून येण्यासारखी…

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.