मयुर शेळके यांचा रेल्वेस्थानकावरचा व्हिडिओ वायरल झाला होता.. कोण आहे मयूर शेळके ?
१९९८ साली अमिर खानचा गुलाम हा चित्रपट आला होता. या चित्रपटात एक प्रसंग होता, ज्यात काही उनाडटप्पू मुलं रेल्वेच्या समोर धावण्याची शर्यत लावतात, या चित्रपटाचा नायक असलेला अमिर खान या शर्यतीत भाग घेतो आणि रेल्वेच्या समोर धावताना रेल्वे रूळावर पडलेल्या दिपक तिजोरीला सेकंदाच्या फरकाने बाजूला करून स्वतः बाजूला होतो आणि तो ती शर्यत जिंकतो, हा प्रसंग चित्रपटात पहाताना अक्षरशः अंगावर शहारे यायचे.
पण हे चित्रपटातील दृश्य होतं ते ठरवून सर्वोतोपरी सुरक्षेची काळजी घेवून आणि अनेकवेळा रिहर्सल करून तसेच अनेक रिटेक घेवून चित्रीत केलेलं असतं.ते जितकं थरकाप उडवणारं वाटत असलं तरी ते एक नाटयं असतं..
पण मयूरने केलेल्या धाडसासाठी कोणतीच स्क्रीप्ट नव्हती ना डायरेक्शन होतं ना रिहर्सल होती ना रीटेक होता..होतं फक्त धेय्य आणि विश्वास.. या धाडसात ९९% जीव जाण्याची शक्यता होती पण स्वतः वरील विश्वास आणि नियतीच्या पाठबळामुळे मयूर ने त्या मुलाचे प्राण वाचवून स्वतः देखील सुरक्षित राहून आलेल्या संकटावर मात केली.
पण तो तर सिनेमा होता,त्यात जे घडतं ते नाट्य असतं पण मयूर ने केलं ते अस्तित्वात होतं,खरं होतं,सत्य होतं. म्हणून म्हणावसं वाटतं मयूर “जब भी तेरे सामनेसे राजधानी गुजरेगी तब “राजधानी भी तेरेको सँल्युट करेगी!”
मागील काही दिवसांपूर्वी वांगणी येथे रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या एका लहानग्याचा जीव मयूर शेळके या युवकाने वाचविला.त्या नंतर थोड्याच कालावधीत मयूरचा हा थरारक विडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला.मयूरच्या शौर्याने महाराष्ट्रातील जनता तर भारावली आहे, मात्र आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडवून तो आता तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.
खास बात म्हणजे मयूरने केलेल्या कर्तृत्वाची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करत प्रशंशा केली. “तुमचे कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाहीत. तुम्ही कल्पनेपलिकडेचे काम केले आहे.” अशा शब्दांत शाबासकी दिली. तसेच देशाचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट करुन कौतुक केले.
नेमकं काय घडलं ?
रायगड जिल्ह्यातील वांगणी रेल्वे स्थानकातील देवदुतामुळे लहानगा बचावल्याची घटना नुकतीच समोर आली होती. सात वर्षांचा चिमुकला मुलगा अंध आईसोबत चालताना चुकून रेल्वे ट्रॅकवर पडला. इतक्यात समोरुन भरधाव वेगाने एक्स्प्रेस येत होती. आई जीवाच्या आकांताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आरडाओरड करत होती. तेव्हा रेल्वेचा पॉईंटमन मयुर शेळके देवदुतासारखा मायलेकाच्या मदतीला धावून आला. आपल्या जीवाची पर्वा न करता त्याने अवघ्या सात सेकंदात चिमुकल्याचे प्राण वाचवले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कोण आहे मयूर शेळके ?
कर्जत तालुक्यातील नेरळ येथील तळवडे गावातील रहिवाशी असलेला हा तरुण रेल्वे कर्मचारी मयूर शेळके. वांगणी या मध्य रेल्वे स्थानकावर पॉइंटमन म्हणून मयूर शेळके काम करत आहे.मयूर यांचं बी. ए पर्यंत नेरळ माथेरान इथे झाले आहे. मयूर शालेय स्तरावर किंवा कॉलेज मध्ये असताना विविध खेळात जसे कब्बडी ,रनिंग अश्या खेळांची त्यांना आवड होती.
एकही दिल है, कितनी बार जितोगे?
आता कंपनीने त्यांना न्यू जावा फोर्टी टू मोटारसायकल भेट दिली आहे. दुसरीकडे, त्याचे धाडस पाहता मध्य रेल्वेने त्यांना 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले आहे. मयुरने त्याला मिळणाऱ्या बक्षिसातील अर्धी रक्कम अंध माता संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच रेल्वेकडून मिळालेल्या 50 हजारांपैकी 25 हजार रुपये मयुर शिरसाट कुटुंबाला देणार आहे. आधी शौर्य गाजवून मनं जिंकणारा मयुर आपल्या ठायी असलेल्या दातृत्व गुणाचंही दर्शन घडवत आहे. त्याने घेतलेल्या निर्णयाने मयुरने पुन्हा एकदा सर्वांची मन जिंकली आहेत.
दरम्यान, संगीता शिरसाट या वांगणीच्या एका चाळीत भाड्याच्या खोलीत मुलासह राहतात. रेल्वेत छोट्यामोठ्या वस्तू विकून त्या आपला उदरनिर्वाह करतात. मुलगा साहिल हाच त्यांचा एकमेव आधार असून त्याला वाचवणारा मयुर हा या अंध मातेसाठी खऱ्या अर्थानं देव ठरला आहे. आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवणाऱ्या देवमाणसाचा सन्मान करा, अशी मागणी या अंध माऊलीने केली होती.
आमच्या Nation Mic शी बातचीत करताना मयूर यांनी या पुढे जी जवाबदारी भेटेल ती निष्टेने पार पाडेल असे सांगितले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम