Take a fresh look at your lifestyle.

रसगुल्ल्यामुळे बंगालच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते

0

नुकतेच बंगाल मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. ममता बनर्जी तिसऱ्यांदा बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. पण बंगालच्या राजकारणात अशी एक घटना घडली होती. ही घटना म्हणजे फक्त एका रसगुल्ल्यामुळे एका व्यक्तीचे मुख्यमंत्रीपद गेले होते.

देशाच्या राजकारणात अनेक मुख्यमंत्र्यांना एखाद्या घोटाळ्यामुळे राजीनामा देताना पाहिले असेल, पण आज अशा एका मुख्यमंत्र्याची गोष्ट, ज्यांचे मुख्यमंत्रीपद एका रसगुल्ल्यामुळे गेले होती. त्याचाच किस्सा. 

किस्सा आहे १९६५ सालचा. प्रफुल्ल चंद्रसेन हे बंगालचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री असलेल्या चंद्रसेन यांनी बंगालच्या प्रसिद्ध खाद्यपदार्थ रसगुल्ल्यावर बंदी घातली. बंगालचा रसगुल्ला हा फक्त बंगाल राज्यातच नाही तर बाहेर राज्यात सुद्धा प्रसिद्ध होता. चंद्रसेन यांनी घेतलेला निर्णय हा एखाद्या हुकूमशहा सारखाच होता. त्यामुळे तिथला हा निर्णय लोकांना पटणारा नव्हता. पण निर्णय घेण्यामागे चंद्रसेन यांचा उद्देश हा चांगलाच होता.

अशात राज्यातच रसगुल्ल्यावर बंदी असणे हे लोकांना न पटणारे होते. चंद्रसेन यांनी घेतलेल्या निर्णयाचा परिणाम थेट त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर झाला. त्यांनी घेतलेल्या रसगुल्ला बंदीच्या निर्णयामुळे ते १९६७ पुन्हा मुख्यमंत्री बनू शकले नव्हते. चंद्रसेन यांनी हा निर्णय घेतला. त्यामागे त्यांना सत्ता गमावण्याची भिती होती, पण तरीही त्यांनी हा निर्णय घेतला आणि पुढे नको तेच घडले. त्यांनी सत्ता गमावली पण आजही त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचे स्मरण केले जाते. काही लोकप्रिय निर्णय किती महत्वाचे असतात, हे त्यांनी दाखवून दिले होते.

का घातली होती रसगुल्ल्यावर बंदी ?

त्यावेळी राज्यातील दुग्धजन्य पदार्थाची कमतरता लक्षात घेत चंद्रसेन यांनी रसगुल्ला बंदीचा निर्णय घेतला होता. त्यांना असे वाटते होते की जर रसगुल्ल्यावर बंदी घातली तर माता आणि नवजात मुलांसाठी भरपुर दुध उपलब्ध होईल, त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला होता.

कोण होते  प्रफुल्ल चंद्रसेन ?

१० एप्रिल १८९७ मध्ये बंगालमध्ये जन्म घेतलेल्या चंद्रसेन यांचे बालपण बिहारमध्येच गेले होते. त्यांचे देवघर येथून शालेय शिक्षण झाले होते, पुढे त्यांनी पदवी घेतल्यानंतर त्यांना इंग्लडला जायचे होते, पण त्यांनी महात्मा गांधीचे भाषण ऐकले आणि त्या भाषणाचा त्यांच्यावर मोठा परिणाम झाला . त्यानंतर त्यांनी देशातच शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी असहकार चळवळीच काम करण्यास सुरुवात केली. पुढे ते गांधीवादी नेते म्हणून लोकप्रिय झाले, ते बिधानचंद्र रॉय सरकारमध्ये कृषीमंत्रीपदावर होते. तेव्हा त्यांनी शेतकऱ्याचे विविध प्रश्न सोडवले.

आणि राजकारणाला उतरती कळा लागली

१९६२ मध्ये ते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा त्यांनी अन्नपुरवठ्याच्या सुधारणेविषयी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते. जेव्हा १९६५ मध्ये जेव्हा त्यांनी रसगुल्ला बंदीचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांची लोकप्रियता कमी झाली. १९६७ च्या विधानसभेत चंद्रसेन पराभुत झाले. तेव्हापासून त्यांच्या राजकारणाला उतरती कळा लागली. मोठमोठ्या पदावर काम केल्यानंतरही त्यांनी कधीच सरकारी गोष्टींचा लाभ घेतला नाही. ते आजीवन ब्रम्हचारीच होते. अखेर २५ सप्टेंबर १९९० मध्ये त्यांचे एका आजाराने निधन झाले होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.