Take a fresh look at your lifestyle.

कथा – निरागस बालक

0
  • मंगेश पोरे

सायंकाळची वेळ होती. पाऊस जोरदार पडण्याची चिन्ह आकाशान दाखवण्यास सूरुवात केली होती. सोसाटयाचा वारा त्याला मोकळेपणाने साथ देत होता. वीजा अजून कडाडल्या  नव्हत्या, पन कडाडणार हे मात्र नक्की होतं.

मी सवयीनं आज शिकवणी घेण्यास निघालो होतो. आज जरा उशीर  झाला होता, म्हणून सायकल वेगानं घेऊ लागलो. पण कितीही वेग वाढविण्याचा प्रयत्न केला तरीही सायकल वेग घेईना असं वाट्र लागलं. तशीच  कशीबशी विद्यार्थ्यांच्या घराच्या दिशेला सायकल मारू लागलो.

इतक्यात  पावसाची रिमझिम सुरु झाली. माणसाला एखादी गोष्ट नकोशी असते, पण त्याचीच जणू तो काही वाट  पाहत असतो! आताही तसच झालं. पावसाची रिमासम हळूहळू मुसळधारतेकडे वळू लागली. माझ्या अंगावरती तेव्हा रोमांचाऐवजी ‘काटे’ उभे  राहिले. वेगाने पोहचण्यापेक्षा आता सुरक्षितस्थळी पोहचण  महत्वाचं वाटू  लागलं. तशी जागाही जवळ कुठे दिसेना. तत्क्षणी पावसाच्या वेगाने सायकल मारू लागताच समोरुन चिंब भिजलेल्या म्हशीचे रस्त्याच्या मध्यभागी (अन माझ्या रस्त्याच्या  “आडवं”) आगमन  झालं. मग विस्फारलेल्या पाणीयुक्त नेत्रांनी मी विस्फारलो. ब्रेक काही लागेना आणि म्हैस काही हटेना ! म्हशीनें जणु काही नुकतीच पावसाची ‘कविता ‘ वाचली  (ऐकली) असावी अन् टपोरे थेंब झेलत डोळे मिटून थांबली असावी, असा अविर्भाव! घंटीही  सादळलेली! मी एकदम अंगावर सायकल घेउन  येत आहे हे पाहताच तिची समाधी भंग पावली म्हशीनं सरळ सायकलला मिठीत घेतलं  आणि मी हनुमान वेगाने पलीकडे झेप घेऊन वाळूत आडवा झालो.

म्हैस  मात्र काहीच झालं नाही या अविर्भावात “अँथलिटिक्स’च रूप घेऊन पसार झाली. मी गुपचूप इकडे तिकडे बघत वाळू झटकत सायकलकडे आलो . ती उचलून सरळ केली. सादाळलेल्या मनान ‘पायंडा’ मारु लागलो. कित्येक दिवस झाले तो’ पडला होता.

मनात स्वतालाच लाखोळी वाहू लागलो म्हंटलं, ‘पाऊस येणार असताना, (कालही भिजलेलं आठवून शिंक आली) कशाला  शिकवणीला  कडमडायचं ?” पण शिकवणीचे पैसे वेळेवर घेतो म्हटल्यावर वेळेवर जायळा हवं. त्यातून पुन्हा गरीबी! गरीबीला  मरण नाही मग ओघानंच पूर्वजांचाही  मनातल्या मनात यथोचित ‘सत्कार’ केला.

      कसाबसा तिथे पोहचतो तर शिकवणीचा वर्ग सताड उघडा. दिनू व त्याचा भाऊ पावसात भिजन्यात मग्न भिजलेल्या  मनाला दिलास्याची उब देऊन मी खोलीत शिरलो ही पोर मात्र बाहेरचं अजून. ‘दिनु’ तिसरीतील विद्यार्थी. शिकवणीसाठी वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावर, 2 तास आधी येऊन खेळत बसणार. ‘यज्ञु’ –  त्याच्याबरोबर येणारा त्याचा ४-५ वर्षाचा भाऊ  काही काम नसताना त्याच्याआधी “वर्गात  हजर नेहमीच! आज मात्र तोही बाहेरच. दिनू तरी आत यावा नं , पण तो खूपच मग्न. मी येऊनही तो आला  नाही, म्हणून आज आपल्या  आवाजातील जरब  दाखावायची म्हणून जोरात ओरडलो दिनू येतोयस की नाही ? पण  आवाज पावसामुळं गारठला होता- बसला होता,  तो मला माझाच  नीट ऐकू आला नाही,  मग मी जरा बाहेर येवून त्याला खुणेनेच आत बोलावल. तोही नाखुझीनं काकडत आला. पण यज्ञु तिच रेंगाळला . यज्ञु भलताच भिजला होता ,तरी ओलेत रूप गोंडस वाटत होत.मला त्याच्याकडे पाहण्यासा भाग पाडत होता,यज्ञु अज्ञानी असावा पाऊस आजाराबद्दल तसा तो शाळेत जात नव्हता.म्हणूनच अवखळ,अल्लड आणि निष्पाप अनिमिष नेत्रांनी आकाशाकडे  पाहत तो  दाराशी थांबला  होता.पण दिनू मात्र  अंग पुसण्यासाठी वर गेला होता त्याचा पावलांचे आवाज मजल्यावर घुमत होते.मग मी एकटाच बसून त्या बालकाकडे आशेने ,हेव्याने पाहू लागलो. तो पावसाचे एकेक थेंब झेलत होता,पीत होता.ताजा पाउस चाखत होता,आणि पुन्हा आकाशाकडे नवीन थेंब पाहत होता. “सर आज काय घेनार?”असा आवाज ऐकताच गरमागरम कॉफी म्हणण्याचा मला मोह झाला  होता,…. पण मी म्हटलं,”गणित!” शिक्षक प्राणी याहून दुसरं काय बोलणार-मागणार!

भिजलेल्या अन कृष्णमेघांनी  काळवंडलेल्या सायंकाळी तास सुरु झाला, यज्ञु मात्र अजून भिजतच होता. काही वेळानं  तो दारात येऊन डोकं झटकू लागला अचानक तोंडावर उडालेल्या  थेंबामुळे मी सटासट शिंकलो. तशी ती दोन्ही बालके सटासट हसली. मी मात्र हसनं बंद व्हायची  वाट पाहू लागलो. ते कसंतरी केव्हातरी बंद झाल. यज्ञुला बघून माझ मिश्कील मन जाग झालं. त्याची फिरकी घ्यावी म्हणून मी म्हटलं “आज पावसात भिजलास  वाटतं” ? तसा यज्ञु म्हणाला , सर ! तूम्हाला कमी दिसतं का?”

“का रे ? नाही!” मी हसतंच विचारल, “तिथं बाहेर उभ राहून मी काय भजी तळत होतो काय?” यज्ञु

पहिल्याच वारान आमची तलवार बोथट झाली. फिरकी घेताना स्वतःच गरगरल्यासारखे झाल. मी गप्प बसणंच पसंत केलं. मी गप्प बसलेला बघून त्याचा चेव जास्तच चढला. तो आत येऊन दिनूला बाहेर ओढू लागला. मी त्याला समजावू लालो असे करू नये,तसं करु नये सांगून पुस्तकात वाचलेले पावसाचे दुष्परिणाम सांगु  लागलो, पण तो एकेनाच. मी तोंडावर दयाळू आहे असं दाखवत असलो तरी मनानं खूप रागवलो  होतो. तो आला आवाज चढवून, “दिंनडया चल की…. म्हणून ओढू लागला त्याला दोन ठेवून  द्याव्यात असेही वाटू लागलं. तो दिनूला सारखा सारखा ओढू लागला, तसा दिनूही  अंग दिल  सोडून त्याच्याकड रेलु लागला- आणि जाण्याची तयारी दर्शवू लागला.

तेव्हा मी पहिल्यांदा दिनूला एक  ठेवून दिली तसा तो ताळयावर आला व नंतर जागेवर! पण यज्ञु  नामक बालकाची वासलात कशी लावावी पण विवंचनेत मी असतानाच तो आता दिनूशी आवेशाने धरपकड खेळावी तसं ओढू लागला आणि मला उघड उघड आव्हान  देऊ लागला. ओरडू लागला, अंग झटकू लागला. अन् माझी सत्वपरिक्षा पाहू  लागला. मला हा माझा अपमान वाटू  लागला. एका मुलापुढ मी शरण जाऊ का? असं वाटू लागलं. तरीही तो बालक शांत बसेना- आता तर गल्लीत शिकलेले (मोठ्यांकडून ) अपशब्द सरळ तोंडाने वापरून दिनूला बोलावू  लागला, तसा मी पूढे  सरसावलो. मघाशी शब्दांची बोथट झालेली तलवार धारदार बनवून, पुढे  जाऊन खिंड लढवण्याच्या अविर्भावात म्हणालो, “अरे बेन्या! बाहेर हो आधी ! शिक्षकांपुढे  असं वागतात का? चल निघ इथून!”

पण…. तो बालक हलता हलेना

“यज्ञा ! निघतो  की नाही? मी ओरडलो.

” जा सरड्या!” – यज्ञु  .

त्याच्या बुद्धीच त्या रागातही कौतुक वाटलं. पण मी भुलणारा नव्हतो.

“निघतो की देऊ दोन ठेवून ? “- मी.

“द्या बघू !” तो निर्भयपणे ओरडला.

मी त्याच्या दोन मुस्कटात मारण्याचा नुसता अभिनय केला, पण त्यामुळे तो थोडा मागे सारून, मी उठलेलो पाहताच गांगरुन रडत रडत वरच्या मजल्यावर आईकडे  निघून गेला. मला क्षणभर  वाईट वाटलं, पण… क्षणभरचं. त्याला हुसकावण्याचा-हरवण्याचा असूरी आनंद मी मिळवला होता.

आजच्या मनाविरुद्धच्या घटनांमूळ मी चिडलो होतो. इतरांपेक्षा स्वतः वरतीच जास्त कातावलो  होतो. मघाशीच्या त्याच्या बाललीलांना भुलणारं मनच आता त्याला दोन मुस्कटात मार म्हणत होतं. रागाच्या भरातच मी दिनूला आज्ञा सोडली की, “उद्यापासून तुझा भाऊ खाली घेऊन शिकवणीला यायचं नाही!” जर आला तर मी शिकवणी अर्धी  सोडून निघून जाईल. पप्पांनाही  नाव सांगेन तुमच्या!”

माझी धमकी ऐकून दिनू मात्र बावरला. बावरूनच त्याने मुकसंगती देऊन टाकली. समोरचा शांत दिनू बघून मला माझा विजय झाल्यासारखे वाटू लागलं. तास संपवून मी घरी यायला निघालो, तरी  दूरवर कुठतरी यज्ञुच्या रडण्याचा कानामध्ये घुमत होता.

मी घरी आलो तरी माझ मन मात्र कुठेतरी गुंतून पडलंय की काय असा भास होत होता. आजच्या शिकविण्याच जरासुद्धा समाधान मला लाभलं नव्हत. का? त्याच्या रडण्यामुळे? की त्याने आज्ञापालन न केल्यामुळे? की माझा अहंकार दुखावल्यामुळे?? ह्यातील प्रत्येक घटना माझा पिच्छाच पुरवत होती. विसरु  म्हटले तरी विसरू शकत नव्हतो. तो पाऊस -मी दमून -भागून -पडून -आपटून तिथं पोहोचण अन त्या बालकाच भिजण अन त्यानंतरचा साग्रसंगीत कार्यक्रम… याची चित्रे एका मागून एक डोळ्यांपुढून सरकत होती. त्याच तंद्रीत दुसऱ्या दिवशी शिकवणीला निघालो.

आज वाटेत कुणीही आडवे आले नाही, की पाउसही पडला नाही, कदाचित त्यांनीही माझे बोलण ऐकले असावं. माझ्या हास्यासहीत सार काही दडून बसलं होत आज!

 मी गेटमध्ये पोहोचलो तोच वरच्या मजल्यावरून दिनू पायऱ्या उतरतानाचा आवाज येत होता. पण… त्याहून मोठा आवाज कुणाच्यातरी हसण्याचा येत होता. मी चमकून पाहिले माझा विश्वास बसला नाही. तो यज्ञु होता! त्याच्या आईबरोबर हास्यामध्ये डुंबून गेला होता. उडया मारत खाली काहीतरी पाहत होता. गेटचा आवाज होताच यज्ञुन तिकडे पाहिले. तो आता ग्रीलच्या छिद्रांमधून माझ्याकडे पाहत होता. आता त्याच्या हास्याचा आवाज कमी झाला होता. पण… ते त्याच्या गालावर अधिक पसरलं होत. त्याही स्थितीत मला ते नितळ हसण पाण्यावर कमळ फुलावीत तसं दिसले. वाटलं तो ग्रीलमधून हात बाहेर काढून माझ्या दिशेने हलवत होता. त्याची आई मघाशीच आत निघून गेली होती. मी अजून गेटमधून आत यायचा होतो. त्याचं हसण आणि त्यामुळं प्रसन्न वाटनारं वातावरण पाहून मला तरतरीत वाटू लागलं. माझ्या मनात विचार आला, लहान मुलं किती निरागस – निष्पाप असतात. मनातली किल्मिष, वाऱ्यानं धूळ उडवून जमीन साफ करावी, तशी विसरून जातात. अन सदैव अल्लडच राहतात !

गेट मधून आत येताना असेच अनेक प्रफुल्लीत विचार माझ्या मनातही येत होते मी क्षणभर वर टक लावून  पाहिल. यज्ञु मग तिथूनच ओरडला,

 “सर आज पाऊस नाही आणला का ?”मी निरुत्तर  झालो .

कालचा पाऊस आणि कालचं वादळ जिथल्या तिथंच विरून गेल होतं… पण… त्या  निरागसतेला ते कसं उमजाव??

मी इतकंच म्हटल,

“यज्ञु ! खाली ये रे जरा।”

-मंगेश पोरे (लेखक युवा कथाकार असून सध्या सोलापूर जिल्हात ग्रामसेवक पदावर कार्यरत आहेत)

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.