Take a fresh look at your lifestyle.

रावणाची जन्मकथा

0

‘रावण – राजा राक्षसांचा’ या कादंबरीने मिळालेली ओळख निश्चित आनंद देणारी आहे. रावण हा विषय मला लंडनला जाताना विमानात सुचला, तो सुचला होता वाचण्यासाठी. भारतात परत आल्यावर मी रावणावरील पुस्तकांचा शोध घेऊ लागलो. सर्व पौराणिक पुस्तकांच्या दुकानात रावण विषयीची त्रोटक माहिती असणारी पुस्तके हातात आली. त्यात वाल्मिकी रामायण, प्र. न. जोशींची पुराणे, प. वि. वर्तकांची वास्तव रामायण अशी पुस्तकं हाती आली. सोबतच गुगल आणि युट्युब आणि कित्येक पीडीएफ आणि व्हिडिओ बघितले त्यातून रावण मला दिसू लागला. डोक्यात विचारांची चळवळ सुरू झाली. रावणावर, भारतीय पौराणिक कथेमधील सर्वात मोठ्या खलनायकावर एक पुस्तक नसावं याने जरा अस्वस्थ झालो. दरम्यानच्या काळात रावणावरच्या एक दोन कादंबऱ्याही वाचल्या. पण त्या रावणावर नसून रामायणावर होत्या. पत्नी अमृताशी बोलताना खरंतर तिच्याशिवाय रावण ही कादंबरी मी लिहू शकलो नसतो. तिने मला रावणावरील पुस्तक लिहिण्यास प्रोत्साहित केलं. मग लिखाणाचा कोणताही अनुभव नसताना मी कादंबरी लिहिण्याचं निश्चित केलं. व्यवसायामुळे लिहिणं पुढे पुढे ढकलत गेलो. एक दिवस रात्री सहज 2 पानं लिहावीशी वाटली. रावण समजून रामायणातील प्रत्येक घटनेकडे बघू लागलो. 

वाल्मीकि रामायण, कंबन रामायण या रामायणामधील कथा जरी तीच असली तरी वाल्मिकी नंतर प्रत्येक रामायणात कित्येक प्रसंग जोडल्याच लक्षात आलं. नंतरच्या रामायणातील सर्वच पात्रांचं दैवीकरण केलं गेलं. त्यामुळे वाल्मिकी रामायणच प्रत्येक पात्राला मानवीय समजून लिहायला सुरुवात केली

रावणाला कुंभकर्ण, विभीषण, शूर्पणखा एवढेच भाऊबहीण आहेत अशी मला माहिती होती, परंतु नंतर महोदर, महापार्श्व, खर, दूषण, कुंभनसी असे नऊ भावंड होते असं समजलं. रावणाच्या जन्माविषयी शोध घेऊन मी कादंबरीचा आराखडा बांधला.

तसा मी प्रत्येकात नायक शोधत होतो. त्यात मी रावणा मध्ये नायक शोधु लागलो. कित्येक लोकांशी चर्चा केली. प्रत्येक जण रावणाच्या विद्वत्तेचं कौतुक करायचा. त्याने फक्त एक चूक केली, त्याने सीतेचं अपहरण करायला नको होतं. पण सीता पळविण्या आधी रावणाच्या बहिणीचं नाक कापलं होतं हे सगळे सहज विसरायचे. मग काहीजण म्हणाले रामायण काल्पनिक आहे. मग प्रश्न पडायचा कि काल्पनिक कथेतील नायकावरून आज कित्येक वर्षानंतर सरकार कसं स्थापन होत असेल? रामायणातील कित्येक पात्रांना दैवत म्हणून भारतीय समाजाने मान्यता दिली आणि रावणाला खलनायक म्हणून. रावण लिहितोय म्हणल्यावर काहीजण म्हणाले रावणाचं उदात्तीकरण नको. पण वाल्मिकी रामायणात रामाने आणि लक्ष्मणाने रावण मरताना त्याचा गौरव केला. याला उदात्तीकरण म्हणता येईल का..?

खरंतर आज रामायण वाचलेले लोक फार कमी आहेत आणि रामानंद सागर कृत रामायण बघितलेल्यांची संख्या जास्त आहे. मला रावण आधी प्रतिनायक वाटायचा मी त्याच्या जळतानाचा सोहळा दसऱ्याच्या दिवशी बीडमध्ये पाहिला. रावणावरील अभ्यासानंतर जाणवलं तो प्रतिनायक नाही तर एक स्वयंभू नायक आहे. त्याला समजण इतकं सोपं नाही. माझ्या मनात फक्त नायकांची एक प्रतिमा तयार होती. कुणाचाही राग किंवा द्वेष न ठेवणारा नायक, कुटुंबावर प्रेम करणारा नायक, उच्च कोटीची महादेवावर भक्ती असणारा नायक, नवनिर्मितीचा ध्यास असणारा नायक, ज्ञानाची भूक असणारा नायक, संघर्ष करून स्वसामर्थ्यावर उभा असणारा नायक, मग त्याला नायक म्हणणारे मी शोधू लागलो. गौंड, आदिवासी, भटके अशा कित्येक जमातीमध्ये लोकगीतात तो मला दिसला. तोपर्यंत मला माझी जाणीव आणि नेनिव समजायला लागली, आणि ठरवलं आता भोपळा लावून पोहणं बस आणि पुस्तक लिहायला जोरात सुरूवात केली.

पुस्तक लिहिणं संपलं, आणि मग प्रस्तावना लिहिताना त्या वेळेस विचार आला, “खरंच विमानात बसल्यावर रावण मला आठवला का..?” चार वर्षापासून विचारांचा सुरू असलेल द्वंद्व  थांबलं. रात्री झोपताना डोक्यात शांतता आली, मी बघता बघता रावण वाचला, अनुभवला आणि लिहिला. पण हा पुस्तकाचा प्रवास विमानातील प्रवासातून नाही हे लक्षात आल्यावर मला आठवलं, ‘माझं गाव वंजारवाडी, माझे वडील, आजोबा मला सगळे आठवले ज्या जमातीतून आलो त्या पूर्वजांच्या भटकंतीचा प्रवास आठवला. कित्येक वर्षापासून हातात कोयता धरलेल्या माझ्या वाडवडिलांचा संघर्षाल आठवला.

पुस्तक तयार झाल्यावर लोक वाचत नाहीत. कशाला पुस्तक लिहिलंस? अशा कित्येक प्रश्नांनी बेजार झालो तरीही स्वतःची प्रकाशन संस्था काढून पुस्तक पूर्णत्वाला नेलं.

मी काही दिवसांपूर्वी परत स्वतः जमा केलेले संदर्भ गुगल वर शोधू लागलो तर मिळेनात. गुगल वरील कन्टेन्ट डिलीट करणारी यंत्रणा काम तर करत नाहीये ना असा प्रश्न पडला. ग्रंथालयातील पुस्तकं गायब होतात, हे नवीन पिढीचं दुर्दैव आहे. काहीजण फेसबुक वरील पोस्ट चोरली तरी राग राग करतात पण त्यांना आपल्या परंपरेच्या इतिहासाचा डाटा नाहीसा होतोय ,चोरला जातोय याचा काहीच राग येत नाही. पोस्ट पुरतं मर्यादित ज्ञान आपल्याला अजून मर्यादित ज्ञानाकडे घेऊन चाललंय याची त्यांना जाणीवही नाही. जुनी पुस्तकं आपण वाचली पाहिजेत, कन्टेन्ट स्वतः शोधला पाहिजे तरच भविष्याकडे आपल्याला जाता येईल. रावणाला एक स्वतंत्र नायक म्हणून वाचलं तर निश्चित आपल्यातील द्वेषभावना कमी होईल हे निश्चित शेवटी महादेव सर्वांचं भलं करो..”

शरद तांदळे

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.