Take a fresh look at your lifestyle.

मनातला रायगड

0
  • सारंग भोईरकर

दैनंदिन रहाटगाडं आणि त्याला जुंपलेला मी. मन आणि मेंदू रोजच्या प्रश्नांशी लढण्यात गुंतलेलो. भावविश्व वगैरे प्रकरण, व्यवहार नावाच्या कधीही न संपणाऱ्या नाटकात येतच नाही. मग असच या सगळ्या गदारोळात कुठे ऑफिसच्या कॅफेटेरियात बसून कॉफी पिताना अचानक पाऊस येतो. समोर लांबवर दिसणारी टेकडी खुणावते, त्याच्याही मागे आणखी दूरवर दिसणारी कुठलीतरी डोंगररांग आपसूक भावविश्व जागृत करते. माझ्या या भावविश्वावर सहयाद्री विराजमान आहे. तो पाऊस, ती टेकडी, ती डोंगररांग मनाला पुण्याच्या नैऋत्येला नेते. तिथे असतो एक उंच डोंगर, सिंहगड नावाचा. त्यावर चढलं आणि भोवताल न्याहाळला की पुन्हा नैऋत्येकडे आणखी दोन डोंगर दिसतात. त्यातला एक असतो तोरणा, तर दुसरा राजगड. मन पुन्हा भरारी घेतं ते थेट राजगडाच्या बालेकिल्ल्यावर. त्या उत्तुंग कड्याचा पश्चिमेला जावं, तर दिसतं खाली पसरलेलं कोकण आणि त्याच्याही थोडं पलीकडे दिसतो तो आणखी एक उत्तान डोंगर. अंगाला तेल लावून, शड्डू ठोकत बसलेल्या पैलवानासारखा. त्याचे ते रौद्र कडे पैलवानाच्या गच्च भरलेल्या पण पिळदार दंड-मांड्यांसारखे. आजवर कितीतरी दुर्ग यात्रीकांना याने भुरळ घातली. पण खर सांगू? ज्या थोर आणि आदय अशा दुर्गयात्रिकाला किंवा दुर्गपतीला याने सर्वात पहिल्यांदा भुरळ घातली ना, त्याने स्वतःच्या अंगभूत दुर्गस्थापत्य कौशल्याने याला जगाच्या इतिहासात अजरामर करून टाकलं.

      “राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फी गडाचे कडे तासिल्याप्रमाणे, दीड गाव उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही, आणि धोंडा तासिव एकच आहे. दौलताबादही पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तू उंचीने थोडका. रायरी दशगुणी उंच. असे देखोन बहुत संतुष्ट जाले आणि बोलीले, तक्तास जागा हाच गड करावा.” ही वाक्ये सभासदाच्या बखरीतली. रायरीच्या किल्ल्याचा शिवाजी महाराजांनी रायगड केला.

      सातवीत असताना शाळेच्या सहलीसोबत पहिल्यांदा पाहिला मी. पण ते फक्त पुसटसं आठवतं आता. पुढे मोठा झालो, रीतसर शिंग फुटली आणि पूर्वजन्मीचं सुकृतच म्हणायचं की व्यसनांच्या मार्गावर चालण्याच्या वयात पावलांची ओळख डोंगरातल्या पाऊलवाटांशी झाली. पुढे या ओळखीचं रूपांतर मैत्रीत, प्रेमात आणि ऋणानुबंधात झाल. या पाऊलवाटांवर रमणारं मन मग शिवचरित्रातही रमायला लागलं. गडांवर का जायचं हे समजायला लागलं. एकातून दुसरं, त्यातून तिसरं अशी पुस्तकं, संदर्भ ग्रंथ आणि या विश्वात रमलेली कितीतरी माणसं सापडत गेली.

      असाच एकदा पुस्तक प्रदर्शनात फिरत असताना एक पुस्तक समोर दिसलं. नाव “दुर्गभ्रमणगाथा”, लेखक: गो.नि.दांडेकर. पुढे ते पुस्तकं आणि तो लेखक मुंजाने झाड धरावं तसं माझ्या मानगुटीवर येऊन विराजमान झाले. त्यातली ओळ न ओळ हे शिकवत होती की, अरे गड पाहायची पण एक पद्धत असते. पायथ्यापासून निघून माथ्याला हात लावून परत येण  म्हणजे गड पाहणं नव्हे. झपाटल्यासारखाच ते पुस्तक घेऊन निघालो मग रायगडाला. दोन दिवस राहिलो तिथे. आप्पांनी लिहिलय ते सगळ बघायचा प्रयत्न केला. पण मन नाहीच भरलं. धुंडाळत राहिलो आणि मग रहस्यकथेतली गुपितं एकामागोमाग एक उलगडत जावीत तसा रायगड उलगडत गेला. कधी पुस्तकांमधून, कधी जुन्या-नव्या अभ्यासकांकडून आणि घडलेल्या कितीतरी प्रत्यक्ष भेटींमधून.

      ते म्हणतात बघा, नात्याची मजा ते हळुवारपणे उलगडण्यात असते. माझं आणि रायगडाचंही तसच झालं. तो थोडा कळत गेला, थोडा उमजत गेला. ते कळणं, उमजणं आजही चालूच आहे आणि शेवट पर्यंत चालूच राहील. एखादा गड वारंवार पाहणं हे एखादं पुस्तक पुन्हापुन्हा वाचण्यासारखच असत. एखाद्या वाक्याला नवाच अर्थ लागावा तसच गडाचं आहे. म्हणजे कसं, की पावसाळ्यात ढगात हरवून बसलेले गंगासागर आणि त्याच्या काठावरचे ते स्तंभ, एखाद्या तारकांनी ओसंडून वाहत असलेल्या अमावस्येच्या रात्री वेगळेच भासतात. 

      हिरोजी इंदलकर (इटळकर, इंदुलकर अशीही त्याची आडनावे मिळतात) या महाराजांकडे असलेल्या स्थापत्यशास्त्रज्ञाने भर समुद्रात जसा सिंधुदुर्ग रचला, तसाच रायगड सजवला. एखाद्या माणसाने अतिशय कौतुकाने आपल घर बांधावं ना अगदी तसच महाराजांनी रायगड बांधला. हिरोजी तर आपण काय काय रचलय याची यादीच एका शिलालेखात देतो.

त्याने रचलेली राजसभा तर अचंबित करणारी. राजसभेत तुम्ही कुठेही साधं कुजबुजलात, तरीही सिंहासनावर बसलेल्या छत्रपतींना ते एकू जातं. (हा प्रयोग आजही करता येतो. फक्त त्यासाठी कुणीही त्या सिंहासनाच्या चौथार्‍यावर चढायची गरज नाही. त्याच्या खाली उभं राहूनच ते करावं). आणखी एक चकित करणारी गोष्ट सांगू. जिथे महाराज सिंहासनावर बसतात तिथूनच समोर राजसभेच्या प्रवेशद्वारातून (म्हणजे नगारखाना) पूर्वेला लांबवर महाराजांचे दोन दुर्गसखे दिसतात. एक राजगड आणि दूसरा तोरणा उर्फ प्रचंडगड.

      वळणावळणाची असलेली गडाची मुख्य वाट जेव्हा शब्दशः महाकाय अशा दोन बुरुजांच्यामधे येऊन गचकन काटकोनात उजवीकडे वळते तेव्हा त्या बुरुजांच्या पोटात लपवलेला तितकाच प्रचंड महादरवाजा समोर येतो. त्यातून आत शिराव तर समोर डेड एन्ड. इथली वाट कुठे, तर डाव्या हाताला वळलेली एक चिंचोळी पट्टी. ते वळणही सुखाचं नाही तर जवळ जवळ आजच्या यू-टर्नच्या आकारातलं. या पट्टीतून फारतर तीन-चार माणसं जाऊ शकतील एकावेळी. संपली का वळणं? तर नाही हो. पुढे वीस पावलांवर परत एक उजवी चढण. आणि गम्मत म्हणजे ही सगळी वाट बुरुजावर उभ्या असलेल्या सैनिकांच्या थेट माऱ्याखाली. इथेही जर तुम्हाला वाटत असेल की आलो आपण एकदाचे गडात तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की अजून साधारण सहाशे फुट चढून गेल्यावर तुम्ही मुख्य गडात याल आणि त्याच्याही वर आहे तो बालेकिल्ला. महाद्वाराच्या या बांधणीला गोमुखी बांधणीचा दरवाजा म्हणायचं. त्याचा गाईच्या मुखाशी संबंध नाही, तर पूर्वीच्या काळी जपासाठी जी एक पिशवी लोकं जपमाळ धरलेल्या हातात घालायचे आणि संपूर्ण हाताला जो एक आकार मिळायचा त्या आकाराशी आहे. महाद्वाराच्या बुरुजांना लागून जी तटबंदी धावते ती थेट टकमकीच्या दिशेला काही अंतर जाऊन थांबते. पण विस्मयाची गोष्ट अशी या तटबंदीच्या वर आणखी काही फुटांवर हिलाच समांतर अशी आणखी एक तटबंदी बांधलेली दिसते. कौतुक इथे संपत नाही. खर कर्तृत्व हे आहे की, हे सगळं बांधकाम कड्याच्या उतारावर केलेलं आहे. जिथे माणूस नीट उभा राहायची मारामार, तिथे यांनी त्या प्रचंड शिळा एकमेकांवर रचून तटबंदी बांधली. बर बांधली ती ही इतकी भक्कम की आज साडेतीन-चार शतकांनी देखील ती दिमाखात उभी आहे. गडाच्या पायथ्याला असणारा नाना (किंवा नाणे) दरवाजा आणि त्याचा बुरूजही असाच. हा दरवाजा दोन कमानी असलेला. गडाच्या घेर्‍यात असलेल्या दाट जंगलात लपलेला. शत्रू नाहीच भेदू शकत हो हे भक्कम दरवाजे.

      रायगड ऐन कोकणात. अरबी समुद्रावरून येणारे पावसाचे ढग आपला सगळा ऐवज आधी रायगडावर मोकळा करतात. चार महिने महामुर पाऊस पडतो इथं. पण वर बालेकिल्ल्यातल्या पालखी दरवाज्यात किंवा खाली महादरवाज्यात पाणी म्हणून साठत नाही, ते वाहुन जावं म्हणून केलेली सोय आजही नीट दिसते. जे काही पाणी आज साठतं ती त्यांच्याकडे होत असलेल्या दुर्लक्षतेमुळे आणि न झालेल्या डागडुजीमुळे.

      स्वच्छ भारत अभियानाच्या जमान्यात वावरत असताना आणि आजही शौचासाठी शौचकूप वापरा हे सांगावं लागण्याच्या काळात रायगडावरचे ठिकठिकाणी बांधलेले शौचकूप आणि घाण बाहेर जाण्यासाठी केलेली व्यवस्था आठवत राहते. रामचंद्रपंत बावडेकर जे राज्याभिषेकासमयी अष्टप्रधानात अमात्य होते, त्यांनी लिहिलेला “आज्ञापत्र” हा ग्रंथ शिवरायांची दुर्गनिती सांगतो. किती बारीक गोष्टींचा विचार त्या थोर दुर्गसाधकाने केला होता याचं प्रत्यंतर ठाई ठाई येत राहत. या आज्ञापत्रातल्या “दुर्ग आणि त्यांची व्यवस्था” या प्रकरणातलं पहिलच वाक्य आहे, “संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग”. हा ग्रंथ मी अनेक वेळा वाचला. पण एकदा असाच एका वाक्यावर अडलो. ते वाक्य होतं, “तैसेच गडावरी आधी उदक पाहून किला बांधवा”. याचा साधा अर्थ असा होतो की डोंगरावर गड बांधायचा झाला तर त्यासाठी जे निकष लावायचे त्यातल्या महत्वाच्या निकषांपैकी एक म्हणजे पाणी. हे वाक्य मला त्यावेळी खूप पटलं कारण नेमका तेव्हाच आमच्या संपूर्ण परिसरात पाण्याची भयंकर बोंब सुरू होती. रायगडावर पाण्यासाठी आठ मोठे तलाव आहेत आणि छोटी मोठी मिळून जवळपास तीस पाण्याची टाकी आहेत. गडाच्या प्रत्येक भागाची पाण्याची गरज ही स्वतंत्रपणे भागवली आहे. म्हणूनच टॉमस निकल्स या इंग्रजाने रायगडाबद्दल लिहून ठेवलेलं एकच वाक्य इथे देतो. तो म्हणतो, “पुरेसा अन्नसाठा जर गडावर असेल तर अपुर्‍या शिबंदीनीशी हा गड संपूर्ण जगाविरुद्ध लढू शकतो”.

      मला अनेक मित्र विचारतात की, रायगड नक्की कधी पाहावा? या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर आहे, कधीही. कारण निसर्ग स्वतःच्या रूपाची सगळी कोडकौतुकं इथे भागवून घेतो. पौषात किंवा माघात म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीच्या पुढे मागे गेलात तर बराच तांबूस झालेला आणि काही ठिकाणी हिरवा राहिलेला आणि पहाटे शेकोटीशिवाय पर्यायच उरणार नाही अशा कडाक्याच्या थंडीतला रायगड तुम्हाला दिसेल. पुढचे अडीच महीने मात्र फक्त भकाभका आग ओकणारा सूर्य, रसरसून तापलेले ते कडे, बाराचं तर सोडाच पण सकाळी नऊचं ऊनही बाधणारं. वैशाख वणवा असा पेटलेला असताना, मे महिन्याच्या शेवटी शेवटी उन्हाच्या कडाक्याला घामाच्या धारांची जोड मिळायला लागते. त्यातच एखाद्या संध्याकाळी टकमक किंवा हिरकणीवर आपण रहाळ न्याहाळत उभं असावं तर पश्चिमेकडून काळ्या ढगांची फौज, शत्रू चालून यावा तशी सूर्याला झाकोळत अवघा आसमंत व्यापते. वारा वाहतो, पडतो, पुन्हा वाहतो. हजार ढोल-ताशे एकत्र वाजल्यासारखा गडगडाट होतो. विजाही आपली हौस भागवून घेतात आणि कुठल्यातरी बेसावध क्षणी एखादा वीराने शत्रूसैन्यावर आवेशाने तुटून पडावं तसा पाऊस येतो. वाळून झडून गेलेल्या रानगवताची, जमिनीत जीवंत असलेली मुळं याचीच वाट पाहात असतात. आणखी एक दोन वळीव पडले की इवलं-इवलं रानगवत आपलं हिरवं डोक बाहेर काढून टकामका बघायला लागतं. तिथून पुढे तीन-साडेतीन महीने गडावर ढगांच राज्य असतं. जुन्या मराठी कवितांमध्ये असतो ना तसा हिरवा शालू पूर्ण गड पांघरून असतो. सगळी तळी-टाकी ओसंडून वाहतात. त्यांचे छोटे छोटे ओहोळ होतात, ते मोठया ओहोळांना जाऊन मिळतात आणि प्रेमिकेच्या ओढीने निघालेल्या प्रियकरासारखे ते कड्यावरून स्वतःला लोटून देतात. धबधब्यांना उत येतो. श्रावणात तर डोळ्यांना केवळ मेजवानी. दोनच महिन्यांपूर्वी ज्याचं दर्शनही नको वाटत होतं तो सूर्य हवाहवासा वाटायला लागतो. गडाच्या आसमंतात आणि भवतालात हिरवा सोडून रंग शोधावा लागतो. संपन्नतेची सगळी लक्षणं रायगड अंगावर वागवत असतो. पण निसर्गाचा सगळा नखरा भाद्रपदात. पूर्वेला भवानी टोकापर्यंत पसरलेल्या त्या विस्तीर्ण माळावर, इकडे हिरकणीकडे आणि आणखी कुठे कुठे धम्मक पिवळ्या, शुभ्र पांढर्‍या, जांभळ्या-गुलाबी फुलांचे गालिचे अंथरलेले असतात. कशी सुंदर ती फुलं, कसे त्यांचे रंग. देवाघरच हे देणं. काय पुण्य केलय आपण म्हणून हे आपल्याला पाहायला मिळतय असे विचार येण्याइतपत भान हरपून जायला होतं. नवरात्र-दिवाळीच्या आगेमागे पर्यंत हे टिकतं. डिसेंबर संपता संपता फुलं नाहीशी होतात, गवताचा रंग हिरव्याचा पिवळ्याकडे झुकायला सुरुवात होते. निसर्गाच एक चक्र पूर्ण होतं.

      कधी कधी रायगडाच्या त्या अवशेषांमधून फिरताना वाटून जातं की किती अन काय काय पाहिलय याने. आज ज्यांची नाव घेताच आपली छाती अभिमानाने फुलून येते अशी किती माणसं या इथं वावरलीयेत. मराठी, हिंदू आणि भारतीय अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेकही याने जसा पाहिला, तशीच औरंगजेबाची मोगलीमिठीही याने सहन केली. एक गोष्ट सांगतो. शिवाजी महाराज गेल्यावर औरंगजेब पाच लाख फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. औरंग्याच्या फौजा संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या.

फेब्रुवारी १६८९ च्या एक तारखेला शंभुराजे कैद झाले. मराठ्यांचा छत्रपती पकडला गेला असला तरी मराठे हरले नव्हते. मराठ्यांची महाराणी येसूबाईसाहेब तर इथेच या गडावर पाय घट्ट रोवून उभ्या होत्या. श्ंभुछत्रपती म्हणजे स्वतःचा नवरा पकडला गेलाय हे समजल्यावर एखादी बाई हातपाय गाळून बसली असती. पण ही शिवरायांची सून होती. तिने राजाराम महाराजांचं मंचकारोहण घडवून आणलं आणि एक जाहीर आव्हान औरंजेबाला दिलं. पुढे संभाजी महाराजांचा वध औरंगजेबाने केल्यावर, औरंगजेबाची एक सेना झुल्फिकारखानाच्या नेतृत्वाखाली रायगड जिंकायला आली. वेढा पडू लागला. गडावर महाराणी येसूबाई, राजाराम महाराज, शंभूपुत्र शाहूमहाराज, राजकुटुंब, मंत्रिमंडळ आणि इतर शिबंदी. इथेही बाई पुढे झाल्या. म्हणाल्या, रायगड पडला तर अवघेच पकडले जाऊ. कुणी नेतृत्व करायला उरणारच नाही. म्हणून मग एका अत्यंत अवघड वाटेने म्हणजे वाघ दरवाजाने (ज्या दरवाज्याच्यापुढे वाटच नाही. असलाचं तर एक सातशे-आठशे फुट उभा कडा आहे. या दरवाज्याची निर्मिती ही सुद्धा शिवरायांच्या दुर्गनीतीचा भाग) राजाराम महाराज बाहेर पडले. तिथून ते आधी प्रतापगडावर आणि पुढे जिंजीला गेले. हा जिंजीचा किल्ला आज तामिळनाडूत आहे. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस हा किल्ला जिंकून, जुनं बांधकाम पाडून, पुर्णपणे नवीन बांधकाम इथे केल होतं. त्याचा उपयोग पुढे असा झाला. जिंजी स्वराज्याची तिसरी राजधानी ठरला. याच जिंजीच्या किल्ल्यातून राजाराम महाराजांनी मराठ्यांची दुसरी आघाडी उघडली आणि मोगलांविरुद्धची झुंज चालू ठेवली. पण मागे रायगडाचं काय झाल? रायगड पडला ती तारीख ३ नोव्हेंबर १६८९. शाहूराजे आणि महाराणी येसूबाई कैद झाल्या. पुढे ३० वर्ष येसूबाईसाहेब मोगली कैदेत होत्या. त्यांच्याच सुपुत्राने म्हणजे पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराजांनी हिदवी स्वराज्याचं रूपांतर मराठा साम्राज्यात केलं. निर्विवादपणे संपूर्ण अठरावं शतक मराठ्यांनी भारतावर राज्य केलं. दिल्लीच्या बादशाहीला, मराठ्यांना शेवटी आपलं संरक्षक नेमावं लागलं. याची परिणीती पुढे अशी झाली की इंग्रजांना भारत मोगलांकडून नाही तर मराठ्यांकडून घ्यावा लागला. पण या वैभवशाली मराठी पराक्रमाच्या गंगेचा स्त्रोत हा रायगडाचा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होता. नकळत मी समोर असलेल्या सिंहासन चौथार्‍याला मुजरा करतो.

      रायगड हा विषय असा एका लेखात वगैरे संपवण तर सोडाच, त्याच्या सगळ्या अंगांना हात घालणही अशक्य. तो खर तर आहे महाकाव्याचा विषय. नुसता तो संपूर्ण बघायचा, त्याच्या चारही टोकांना जाऊन यायचं तर दोन अखंड दिवस हवेत. त्याच्या पायथ्याला असलेल्या अनेक गोष्टी,जस की काही समाध्या, वाघबिळ वगैरे गोष्टींना सुद्धा वेळ द्यावा लागतो. त्याची प्रदक्षिणाही करता येते. म्हणजे तो चहू अंगांनी न्याहाळता येतो. त्याच्या त्या कड्यांची उंची, दाहकता लक्षात येते. पाचाडही पाहावं लागत. तिथे असलेला मासाहेब जिजाऊंचा वाडा बघावा लागतो. तिथूनचं पुढे असलेली, महाराजांनी बांधलेली मासाहेबांची जी समाधी, तिच्यावर डोक ठेवावं लागत.   

      मघाशी म्हटलं बघा, की आता जरा जरा परिचयाचा झाला आहे पण संपूर्ण ओळख मात्र पटलेली नाही अजून त्याची. त्यासाठी अजून खूप वेळा त्याची वारी करावी लागेल. खूप, खूप वाचन आणि अभ्यास अजून बाकी आहे. मात्र जेवढा पाहिला आहे आणि आवळसकर, गो.नि.दांडेकर,डॉ.पराडकर, घाणेकर आणि इतर अनेक अभ्यासकांच्या संशोधनातून जेवढा समजावून घेता आला आहे, तेवढा इतरांना दाखवू मात्र शकतो. गेल्या अनेक वेळा तर कोणी तरी सुहृद सोबत होतेच. निमित्तावरच टपलेला असतो मी आता, कुणी चल म्हणायचा फक्त अवकाश.

      गडावरुन हिंडताना, बरोबर आलेल्या सवंगड्यांना गड सांगताना, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, तोंड आणि मेंदू त्यांचं काम करत असतात आणि मन मात्र एक वेगळच अवधान राखून असत. शिवाजी नावाचं चैतन्य रायगडाच्या संपूर्ण आसमंतात भरून राहिलं आहे. आपल उर्वरित आयुष्य एका अंगाला सारून जर पूर्ण त्याच्या स्वाधीन झालं ना तर ते अनुभवता येतं. ते चैतन्य मला सगळ्यात जास्त जाणवतं ते समाधीपाशी. फक्त त्या वेळी आपण समाधीपाशी एकटं असलं पाहिजे, मग त्याचा उत्तम अनुभव घेता येतो. तिन्हिसांजेची वेळ उत्तम. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहतो अंतर्मनातून. सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यावरून खाली पाहताना आणि भोवताल निरखताना, काहीतरी उदात्ततेची, भव्यतेची जाणीव होते ना अचानक,तशीच जाणीव होते तिथं. शांत बसून राहावं समाधी समोरच्या त्या दगडी फरशीवर.     एक नूतन सृष्टीकर्ता आपल्या समोर चिरनिद्रा घेत असतो. त्याचा जन्म दुर्गावरचा, तो वाढला दुर्गांवर, त्याने राज्यही निर्माण केलं ते दुर्गांच्या अंगाखांद्यावर आणि निर्मिलेलं सगळ मागे टाकून तो अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेला ते ही एका दुर्गावरच. त्याची समाधीही त्याच्या कर्तृत्वाला साजेशीच. ती बांधली सुद्धा त्याच सह्याद्रीतल्या काळ्या पथ्थरांनी. त्या समाधीच्या पूर्वेला त्याने बांधलेलं राजगड नावाचं घरटं, त्याच्या शेजारी तोरणा, हात जरा लांब केला तर स्पर्श करता येईल एवढ्या अंतरावर असलेला लिंगाणा, शेजारचा कोकणदिवा आणि त्याला लागून असलेले प्रचंड कडे, कावल्या बावल्याची खिंड, रायलिंग, मानगड, तळातून वाहणार्‍या काळ व गांधारी नद्या, भराट वारा, कोसळणारा पाऊस, कडाडणारं ऊन या सगळ्याच्या सानिध्यात तो विसावलाय. चिंतन करू जाता वाटत राहतं,किती दगदग, किती कष्ट. किती जखमा शरीराला नि मनाला. किती विरह जीवलगांचे, सवंगड्यांचे. कुठे आग्रा, कुठे सूरत आणि कुठे जिंजी. किती नि कसे कसे शत्रू. पण या सगळ्यावर मात करून पस्तीस वर्ष फक्त एकच विचार. स्वराज्य, स्वराज्य, हिंदवी स्वराज्य. कस निभावल हे सगळं याने? उत्तर शोधायला गेलं की, त्याचं रूप, त्याचा प्रताप, त्याचा साक्षेप आठवत राहतात. कळत जातं की, “सकल सुखांचा त्याग करून त्याने हा योग साधलाय”. डोळे मिटून मी बसून राहतो तसाच. आपण तृणवत आहोत याची खात्री पटते आणि “थोडेतरी काही विशेष करावे” असं अतिशय अतिशय वाटून जातं. अंधार दाटतो. चांदण्याही लुकलुकतात. मंद वारा वाहात राहतो.

       परतीच्या वाटेवर पाचाडच्या खिंडीत मागे वळूवळू त्याला पाहून घेतो. गाडी थांबवून हात जोडून नमस्कार करताना त्याला विचारतो, “आता परत रे कधी?”. स्वतःशीच हसतो. घरी येऊन आंघोळीला बसल्यावर पायाची माती काढायला लागतो. कितीही मनात असलं तरी ती रायगडाची माती मी आता अंगावर वागवू शकत नसतो. भावविश्व मागे राहिलेलं असतं, व्यवहार सुरू झालेला असतो.

– रंगो भोईर (सारंग भोईरकर)

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.