Take a fresh look at your lifestyle.

“भूकेल्यांचा अन्नदाता – रॉबिन हूड आर्मी”

0

समाजात अनेक प्रकारचं दुखः आहे. ते दुखः दूर करण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे मग देणाऱ्याचे हात हजार असं सातत्याने घडत असतं. रॉबिन हूड आर्मीच्या बाबतीतही अगदी तेच झालं. भुकेल्यांना अन्न दिलं पाहिजे एवढीच भूमिका घेऊन हिंदुराव गोरे नावाचे सामाजिक कार्यकर्ते स्वतःला वाहून घेऊन कामाला लागले आणि बघता बघता काही महिन्यात भूक भागलेल्यांचा आकडा थेट लाखोंमध्ये गणला गेला. एका रात्रीत घडलं नसलं तरी अविरत करत असलेल्या कार्यामुळे लाखो गोरगरीब, अनाथ, वृद्धांना रॉबिन हूड आर्मीने आपुलकीचा घास भरवला आहे. कोणताही कागदोपत्री करार नाही, कोणतीही अपेक्षा नाही. अशा कामाच्या स्वरूपाने आपला व्यास वाढत वाढत बराच मोठा केला आहे. 

सामाजिक जाणीवा जागृत झाल्या की अशा महान कार्याची सुरुवात होते. अगदी तशीच सुरुवात रॉबिन हूडची झाली. चार वर्षांपूर्वी दिल्लीतील नील गोस या सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या व्यक्तीने याची मुहूर्तमेढ रोवली. श्री. नील गोस एकदा जेवण करण्यासाठी एका हॉटेलामध्ये गेले. पोटभर जेवून झाल्यानंतर उरलेले जेवण टाकून देण्याऐवजी गरजूंना वाटू असं वाटलं आणि त्यांनी ते जेवण गरीब कुटुंबातील व्यक्तीला दिले. मात्र त्यावेळी त्यांना लक्षात आलं की एवढं जेवण तर त्यांना पुरतच नाही. त्यांना अजून जेवण लागेल. त्यानंतर मात्र त्यांनी सहकाऱ्यांना सोबत घेतलं आणि हॉटेलमधील उरलेले जेवण पुन्हा त्या गरिबांना पहिल्यांदा दिलं. या प्रक्रियेच्या दरम्यान मात्र एक ठिणगी सतत तेवत होती ती म्हणजे या सर्व घटकांचं पुढं काय! आणि सुरुवात झाली रॉबिन हूड आर्मीची. रॉबिन हूड म्हणजे श्रीमंताकडून घेणारा आणि गरिबांना देणारा अशी ओळख या निमित्ताने निर्माण झाली आहे. मात्र एवढ्यानं थांबवत नव्हतं. गरीब फक्त एवढेच नाहीत तर अजून जगभरात असणाऱ्या गरिबांचे काय? वाटोळे होणाऱ्या अन्नाचे काय ? यातून ही चळवळ वाढली पाहिजे यासाठी पुढाकार घेतला. आता रॉबिन हूड आर्मीचे काम जगभरात १७ देशांमध्ये, भारतातील १०३ शहरांत सुरू असून, या १०३ शाखांमधून उत्कृष्ट नियोजनासह जास्तीत जास्त लोकांपर्यंत जेवण पोहोचविण्याच्या कामात सोलापूर शाखेचा पहिल्या दहामध्ये क्रमांक लागतो. आजपर्यंत जगभरात तब्बल ९० लाखांपेक्षा जास्त गरजूंना जेवण देणारी ही आगळीवेगळी आर्मी आहे.

सोलापुरात ही चळवळ सुरु होण्यामागेही अशीच एक गोष्ट आहे. नेहा भास्कर या मुलीने एका कार्यक्रमादरम्यान प्रा. हिंदुराव गोरे यांना रॉबिन हूड आर्मीविषयी सांगितलं. त्याचा गांभीर्यानं विचार करत सोलापुरातील गरिबांसाठी ही चळवळ व्यापक प्रमाणात राबविण्याचं ठरवून कामाला सुरुवात केली आणि आज त्याचं व्यापक रूप उभं आहे. 

कुणाच्या शुभकार्यात अन्न शिल्लक राहिले असेल, कुठेही हॉटेलमध्ये अन्न शिल्लक राहिले असेल अथवा कुठेही खाण्यालायक अन्न शिल्लक राहिले असेल तर ते जमा करायचे आणि गरजूंपर्यंत पोहोच करायचे या निर्मळ भावनेने १५ ऑगस्ट २०१७ रोजी या उपक्रमाला सुरुवात झाली. काही बोटावर मोजण्याइतक्या समविचारी मित्रांना सोबत घेऊन प्रा. हिंदुराव गोरे यांनी पुढे होऊन हे सुरु केलं. आतापर्यंत २५० वेळा ड्राईव्हचे यशस्वी आयोजन केले गेले आहे. दररोज किमान ११ कुष्ठरोगी लोकांना ताजे अन्न दिले जाते. ४ स्वयंसेवकावर सुरू झालेली संस्था आज माणूस – माणूस जोडत तब्बल २४९ स्वयंसेवकांवर पोहोचली आहे. शिल्लक राहिलेल्या अन्नाची नासाडी न करता ते अन्न किमान गोरगरीब लोकांच्या पोटात जावे यासाठी दररोज १०० स्वयंसेवक काम करतात. आता रॉबिन हूड आर्मीचा विस्तार वाढत जातोय. एक एक स्वयंसेवक यात जोडत असताना तब्बल १५० पेक्षा जास्त हॉटेल्स तर ५० पेक्षा मंगल कार्यालयांशी करार केला आहे. त्यामुळे आता रॉबिन हूडची व्याप्ती वाढली आहे. रॉबिन हूडच्या स्थापनेनंतर आजपर्यंत शेकडो लोकांनी संपर्क साधत अन्नदान केले आहे. हे विस्तारणारे कार्य वाखाणण्याजोगे आहे मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संस्थेने आजपर्यंत एक रुपयांचाही आर्थिक व्यवहार केला नाही. बँक खातेही काढले नाही. पारदर्शकता जपत समाजहिताचे काम अविरत सुरु आहे. १५ ऑगस्ट २०१७ रोजी दानशूर लोकांकडून अन्न स्वीकारून जवळपास १३ हजार भुकेल्यांची पोटं भरून करण्यात आली. 

होटगी मठाच्या संकल्पसिद्धी कार्यक्रमादरम्यान राहिलेले सर्वाधिक म्हणजेच जवळपास तीन हजार लोकांचे शिल्लक अन्न होटगी मठाचे मठाधिपती यांनी रॉबिनहूड आर्मीला सुपूर्द केले होते. अशा विविध ड्राईव्हमधून सातत्याने आपलेच रेकॉर्ड मोडत रॉबिन हूड आर्मीची घोडदौड सुरु आहे.

सोशल मिडियाच्या माध्यमातून या चळवळीला व्यापक रूप येत आहे. ना कुणाला विनंती केली जाते न कुणाला निमंत्रण दिलं जातं. वाटेल तो व्यक्ती स्वयंसेवक म्हणून या आर्मीत सहभागी होऊन मदत करू शकतो. सोलापूर शहरातील तब्बल २७ गरीब वस्त्यांमध्ये जमा झालेले अन्न वाटले जाते. अन्न शिल्लक असल्याचा मेसेज मिळाला की तात्काळ स्वयंसेवक जे ताब्यात घेतो आणि वस्त्यांमध्ये वाटले जाते. सर्व स्वयंसेवकांना हिरवा टी शर्ट आणि एक शिट्टी दिलेली आहे. विशिष्ट वस्तीमध्ये जाऊन शिट्टी मारली की गरजू व्यक्ती येऊन ते जेवण घेऊन जाते. इतक्या नियोजनबद्ध हे काम अविरतपणे सुरु आहे. 

येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेत प्रत्येक गरजूला पोटभर जेवण मिळाले पाहिजे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रॉबिन हूड आर्मीचे प्रा. हिंदुराव गोरे अभिमानाने सांगतात. आता युवकही मोठ्या प्रमाणात त्यांच्या या कार्यात सहभागी होत आहेत. श्रीमंताकडून घेऊन गरिबांना अन्नदान करणारी ही आगळीवेगळी रॉबिन हूड आर्मी अखंड गरजूंचा अन्नदाता ठरावी ही अपेक्षा ! 

– विकास विठोबा वाघमारे, ८३७९९७७६५०

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.