Take a fresh look at your lifestyle.

संस्कार (कथा)

0

निनादचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं. त्यानं अतिशय बिकट परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती फारच बेताची! घरात आईवडील, दोन बहिणी, धाकटा भाऊ आणि स्वतः निनाद असं सहा जणांचं भरलं कुटुंब. त्यात निनाद सर्वात मोठा. निनाद लहानपणापासून अतिशय हुशार असल्यानं त्यानं इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरची पदवी मिळवली. भाऊ बहिणींचंही शिक्षण सुरू होतं. सगळ्यांना घरच्या परिस्थितीची जाणीव होती. आईबाबांनी खूप कष्ट घेऊन, प्रसंगी कर्ज घेऊन त्यांचं शिक्षण सुरू ठेवलं होतं!

निनादला मात्र आणखी पुढे शिकायचं होतं… पण त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव असल्यानं त्यानं नोकरी करता करता पुढील शिक्षण घ्यावे असे मनाशी पक्कं ठरवलं. मग त्यानं नोकरी मिळवण्यासाठी बर्याच कंपन्यांमध्ये आपले ‘रिझ्युम’ सादर केले. मात्र दुर्दैवानं म्हणावा तसा प्रतिसाद त्याला मिळत नव्हता. एक दिवस त्याला अचानक एका मोठ्या कंपनीचा मेल आला… मुलाखतीसाठी त्याला बोलावण्यात आलं होतं. मुलाखत लगेच दुसऱ्याच दिवशी सकाळी दहा वाजता होती. त्यामुळे निनादनं लगबग करून आवश्यक कागदपत्रं तयार करून ठेवली.

   घरी एकच दुचाकी गाडी होती अन् ती सुध्दा निनादचे बाबा घेऊन जायचे. त्यामुळे त्याला बसनं जाणं भाग होतं. दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून निनाद आपलं सर्व आवरून तयारीला लागला. आईबाबांना सांगून लवकरच तो घराबाहेर पडला. घरापासून बसस्थानक थोडं लांब असल्यानं तो घाईघाईनं चालू लागला. थोडा पुढं गेल्यावर समोरच त्याला रस्त्यावर गर्दी दिसली. एवढी गर्दी कशासाठी जमली असणार … निनादनं कुतूहल म्हणून पुढं जाऊन डोकावून बघितलं…आणि तो बघतच राहिला! तेथे रस्त्यावर एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट जाणवत होत्या! चौकशी केली असता त्या तरूणाच्या दुचाकीला कोणीतरी मागून जोरदार धडक देऊन पळून गेल्याचं निनादला समजलं. बघणारे लोक त्याठिकाणी हळहळ व्यक्त करत होते. मात्र कोणीही त्या तरूणाला मदत करावी म्हणून पुढे येत नव्हते. निनादनं ते द्रुश्य बघताच त्याच्या मनात आलं… आपण थोडी मदत करून पुढे जावं… त्यानं जमलेल्या लोकांना विनंती करून बघितली., पण कुणीही काही प्रतिसाद दिला नाही. लोक बघायचे आणि निघून जायचे. निनाद विचार करू लागला…”मुलाखतीला जावं की नाही. नोकरी मिळवणं पण खूप आवश्यक आहे. त्यामुळे घरी आईबाबांना नक्कीच हातभार लागणार होता! काय करावं? याला दवाखान्यात घेऊन जावं की मुलाखतीला जावं..!” 

मनाच्या दोलायमान स्थितीत असतानाच ‘माणुसकी खातर आपण याला मदत करावीच’ असा विचार पक्का करून निनादनं एक रिक्षा थांबवली. मग रिक्षाचालकाच्या मदतीने त्या अपघातग्रस्त तरूणाला जवळच्या दवाखान्यात लगेच दाखल केलं. त्यावेळी त्याची शुद्ध हरपली होती! नंतर त्या तरूणाच्या खिशातून मोबाईल काढून ‘आई’ लिहिलेला नंबर लावला आणि “थोडी दुखापत झाली आहे … घाबरण्यासारखं काही नाही. तुम्ही सावकाश या, तोपर्यंत मी इथं आहेच” अशा प्रकारे व्यवस्थित बोलून निनादनं त्यांना दवाखान्याचा पत्ता सांगितला. एव्हाना त्या तरूणावर उपचार सुरू झाले होते. थोड्याच वेळात त्याचे आईबाबा पण तेथे पोहचले. त्यांना  निनादनं सगळी माहिती दिली आणि तेथेच थांबून उपचार पूर्ण होईपर्यंत मदत केली. तेवढ्या वेळात तो  मुलाखतीला जाणं पण विसरून गेला होता! त्या तरूणाचे आईबाबा आपले डोळे पुसत त्याचे आभार मानत होते …. ” तुम्ही जर याला वेळेवर याठिकाणी आणलं नसतं तर… काय झालं असतं एक तो देवच जाणे!”

त्या तरूणाच्या आईबाबाकडून निनादला त्याचं नाव अतुल असल्याचं कळलं. तो एका मोठ्या कंपनी मध्ये मँनेजर च्या हुद्द्यावर कार्यरत होता. सकाळी त्याला उशीर झाल्याने तो घाईघाईतच घरून निघाला होता. आणि घरापासून थोड्या अंतरावर त्याला अपघात झाला होता. एकुलता एक असलेला अतुल त्याच्या आईवडीलांसाठी जीव की प्राण होता! त्याला बहीण भाऊ कोणी नव्हते. निनादनं स्वतः चा मोबाईल नंबर अतुलच्या आईबाबांना दिला आणि सांगितले, “कधीही आवश्यकता वाटली तर मला फोन करा मी तुमच्या मदतीला लगेच येतो.” मग तो रात्री उशीरा घरी परतला.

 निनादच्या घरी सगळे त्याचीच वाट बघत होते. घरी पोहचताच त्याने घडलेला सर्व प्रकार सविस्तर पणे सांगितला. त्याच्या आईबाबांना निनादनं केलेल्या अचाट कामगिरी बद्दल, त्याच्या सहकार्याबद्दल मनस्वी समाधान वाटले. बाबा म्हणाले, “नोकरी काय पुन्हा मिळेलच पण गेलेला जीव परत मिळाला नसता आणि त्याच्या आईबाबांचा आधार कायमचा हरपला असता!”

निनाद दिवसभराचा दमलेला असल्यानं हातपाय, तोंड धुवून ‘फ्रेश’ झाला. नंतर जेवण आटोपून तो गाढ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो दवाखान्यात गेला तेव्हा अतुल शुध्दीवर आला होता व आता तो बोलण्याच्या मनःस्थितीत होता. त्याच्या आईनं अतुलला निनादची ओळख करून दिली. त्यानं कोणत्या परिस्थितीत त्याला दवाखान्यात दाखल केलं, आणि त्यामुळे निनादला मुलाखतीला जाता आलं नाही वगैरे सर्व सविस्तर सांगितलं. मग अतुलनं मनापासून त्याचे आभार मानले अन् त्याच्या शिक्षणाबद्दल माहिती विचारली. निनादनं त्याला स्वतःबद्दलची इत्यंभूत माहिती दिली. अतुलनं लगेच आपल्या एका मित्राला फोन केला आणि आपल्या अपघाताची थोडक्यात माहिती दिली. मग निनादचा सर्व ‘बायोडाटा’ त्याला कळवला. त्याचा तो संबंधित मित्र एका कंपनीचा ‘डायरेक्टर’ होता. त्याच्या कंपनीत हुशार इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरची गरज होतीच. फोनवर त्या मित्रानं सर्व कागदपत्रासह निनादला दुसऱ्या दिवशी त्याच्या कार्यालयात पाठवण्यास सांगितलं. फोनवर बोलणं झाल्यावर अतुल निनादला हसत म्हणाला… “आपण आता चांगले मित्र झालो आहोत, म्हणून औपचारिकता अजिबात चालणार नाही. त्यामुळे कुठलेही आढेवेढे न घेता तू उद्या या कंपनीत मुलाखती साठी जायचंच..” निनादनं त्याच्या हातातील कागद घेतला आणि सद्गदित होत म्हणाला, “खरंच तुम्ही माझ्यासाठी खूप मोठं काम केलंय….”

“अरे आपल्या जिवलग मित्राला तुम्ही आम्ही म्हणायचं नसतं आणि मित्राला फक्त थोडी मदत करतोय फार जास्त काही नाही. कळलं का निनाद..?”

नकळत निनादच्या डोळ्यात अश्रू जमा झाले! त्यानं अतुलचा हात हातात घेतला अन् घट्ट दाबला.मग त्याच्या आईबाबांना नमस्कार करून त्यांचा निरोप घेतला आणि घरी जायला निघाला.

दुसऱ्या दिवशी सकाळी तयारी करून निनाद उत्साहात घराबाहेर पडला. त्यापूर्वी त्यानं न चुकता आईबाबांचे आशीर्वाद घेतले. अतुलनं सांगितलेल्या पत्त्यावरील कंपनीत निनाद वेळेवर पोहचला. नंतर राजेशकुमार अशी पाटी लागलेल्या केबिनमध्ये तो गेला… “गुड माँर्निंग सर, मी निनाद बोरकर मला….”

“अरे वा… या या मिस्टर निनाद. तुमच्याबद्दल मला अतुलनं बरंच काही सांगितलं आहे. प्लीज बसा तुम्ही”…. निनादचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच राजेशकुमार यांनी त्याचं स्वागत केलं. निनादला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला. मग त्यानं आपले कागदपत्रं टेबलावर राजेशकुमार यांच्या समोर ठेवले. निनादची निरनिराळी प्रमाणपत्रं बघून त्याच्यातील ‘टँलेन्ट’ची कल्पना त्यांना आली. अतुलनं त्याच्या अपघातापासूनची सर्व हकिकत राजेशकुमार यांना आधी दिली होतीच. त्यामुळे निनादला त्यांनी त्याच्यातील परोपकारी व्रुत्ती आणि प्रामाणिकपणा बघून नोकरीवर दुसऱ्या दिवशीपासून रुजू होण्यास सांगितलं. तेव्हा निनादचा आनंद गगनात मावत नव्हता! त्याने राजेशकुमार यांचे खूप आभार मानले आणि बाहेर पडला.

  निनादनं एका दुकानातून मिठाईचा बाँक्स विकत घेतला. मग रस्त्यावर असलेल्या फळविक्रेत्याकडून काही फळं घेतली आणि तो सरळ दवाखान्यात गेला. तिथं अतुल नुकताच झोपून उठला होता.त्याला फळं देत निनादनं त्याला नोकरी मिळाल्याचं सांगितलं. अतुल अत्यानंदानं म्हणाला, “अरे मस्तच यार, खूप खूप अभिनंदन! आता पार्टी हवीच…”

 “हो नक्कीच…मला तुझे कसे आभार मानावे हेच कळत नाही…”

“हो का? मग असू दे रे आभार मानू नकोच…” हसतच अतुल उठण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र त्याला प्रचंड वेदना होत होत्या. त्याच्या पायात फ्रँक्चर असल्यानं पूर्ण विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यामुळे अतुलला अजूनही काही दिवस दवाखान्यात काढण्याशिवाय पर्याय नव्हता. नंतर काही वेळाने निनादनं अतुलचा निरोप घेतला आणि तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडला.

 निनादला आता कधी एकदा घरी पोहचतो असं झालं होतं. नोकरी मिळाल्याची खुशखबर त्याला घरी सगळ्यांना द्यायची होती. घराजवळ आला तेव्हा त्याचा धाकटा भाऊ निषाद बाहेरच भेटला. त्याला सोबत घेऊन निनाद आनंदात घरी गेला. त्यानं आईबाबांना नोकरी मिळाल्याची बातमी देत आईच्या हातात मिठाईचा डबा दिला. त्याच्या आईनं तो देवासमोर ठेवला. सर्वांनी देवाला नमस्कार केला. आईबाबांना आता क्रुतक्रुत्य झाल्याचं समाधान वाटत होतं!

      निनाद रोज न चुकता दवाखान्यात अतुलला भेटायला जात होता. आता दोघंही खूप चांगले जिवाभावाचे मित्र झाले होते. दोघांच्या कुटुंबाचे स्नेहसंबंध दिवसेंदिवस द्रुढ होत गेले. आता निनादच्या बहीणभावाचं शिक्षण व्यवस्थित होत असल्यानं त्याला खूप समाधान वाटत होतं. कधीकधी निनादच्या मनात विचार यायचा… आईवडिलांनी केलेल्या योग्य संस्कारामुळेच आपण अतुलला झालेल्या अपघातात मदत करण्यास उद्युक्त झालो. आज त्याच्यासारखा एक जिवाभावाचा मित्र तर मिळालाच शिवाय अपेक्षेपेक्षा चांगली नोकरी सुध्दा मिळाली.

–           विनोद श्रा. पंचभाई

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.