Take a fresh look at your lifestyle.

रिक्षाचालक ते राजकारणी असा प्रवास करणारे संजय शिरसाट उद्धव ठाकरे यांच्यावर इतके नाराज का ?

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. संजय शिरसाट हे बंडखोर आमदारांपैकी एक आहेत.

0

राज्यात शिवसेना पक्षफुटीच्या चर्चा होत असताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्व आमदारांना भावनिक आवाहन केले होते.

उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहे. संजय शिरसाट हे बंडखोर उमेदवारांपैकी एक आहेत. त्यांनी पत्र लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

संजय शिरसाट यांनी आपल्या पत्रामधून उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. आमदार शिरसाट यांचे पत्र एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटरवरून शेअर केले होते.

रिक्षाचालक ते राजकारणी

संजय शिरसाट हे शिवसेनेचे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी शिरसाट स्वतःचा रिक्षाचा व्यवसाय सांभाळत होते. त्यांच्या राजकारणाची सुरुवात 1985 साली शिवसेनेचे शहर संघटक म्हणून झाली. त्याकाळात त्यांनी पक्षवाढीसाठी काम केले.

राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर 1995 आणि 99 मध्ये मराठवाडा औद्योगिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

2000 साली त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि औरंगाबाद महापालिकेत कोकणवाडी वॉर्डातून नगरसेवक म्हणून निवडून आले. 2001 मध्ये पक्षाने शिरसाट यांच्यावर सभागृहनेते पदाची जबाबदारी सोपवली. 2003 मध्ये स्थायी समिती सभापतिपदी नेमणूक करण्यात आली. 2005 मध्ये ते पुन्हा नगरसेवक वेदांतनगर वॉर्डातून पुन्हा निवडून आले.

2009 साली शिरसाट पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 व 2014 अशा सलग दोन विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. तेव्हापासून संजय शिरसाट सलग निवडून येत आहेत.

भाजप बंडखोरांचा पराभव करून विजयाची हॅट्रिक

2019 मध्ये संजय शिरसाट यांनी भाजपचे बंडखोर राजू शिंदे यांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक केली होती. संजय शिरसाट यांना 83099 तर अपक्ष राजू शिंदे यांना 43045 मते मिळाली. एमआयएमचे अरूण बोर्डे 39211 मत घेऊन तिसऱ्या क्रमाकांवर तर वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट 25500 मतांसह चौथ्या स्थानवर राहिले.

त्याआधीच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे मधुकर सावंत यांनी 54 हजार 355 इतकी लक्षवेधी मते घेतली होती. त्यामुळे त्यावेळी संजय शिरसाट यांचा केवळ 6 हजार नऊशे मतांनी विजय झाला होता.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी

तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यांनतर संजय शिरसाट यांना मंत्रीपदी संधी मिळण्याची आशा होती. पण त्यांना संधी मिळाली नाही. त्यांच्या ऐवजी औरंगाबाद जिल्ह्यातून अब्दुल सत्तार यांना संधी मिळाली.

त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत घातली होती.

आमदार शिरसाट यांना शिवसैनिकाकडून प्रतिउत्तर

आमदार संजय शिरसाट यांना आता सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. शिरसाट यांच्याच औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील एका शिवसैनिकाने पत्राद्वारे आ. शिरसाट यांना जाब विचारला आहे. शिवसैनिक किरण लखनानी यांनी लिहलेले हे पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले आहे

‘मुख्यमंत्री भेटत नाहीत असे म्हणता, तुम्ही तर मतदारांना न भेटता अनेक ‘रात्री’ मुंबईत घालवता याची कल्पना सर्वांना आहे. तुमचे अनेक कारनामे शिवसैनिकांनी पाठीशी घातले आहेत, अशी आठवण करून देत येत्या निवडणुकीत बोलू, असा इशाराच शिवसैनिकाने आ. शिरसाट यांना दिला.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.