एकेकाळी वडील व मित्रांकडून कर्ज घेतले; आज अब्जाधीशांच्या यादीत समावेश
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य, पुण्यातील ‘पर्सिस्टंट सिस्टीम’ या कंपनीचे संचालक आनंद देशपांडे यांचा गुरुवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य, पुण्यातील ‘पर्सिस्टंट सिस्टीम’ या कंपनीचे संचालक आनंद देशपांडे यांचा गुरुवारी जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला. ते सर्वसामान्य कुटुंबामधून पुढे आलेले नेतृत्व आहे. देशपांडे यांच्या पर्सिस्टंट सिस्टीमची संपत्ती एक अब्ज डॉलर्सहून अधिक असल्याची माहिती ‘फोर्ब्स’ने दिली.
पर्सिस्टंट या डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल इंजिनिअरिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘पर्सिस्टंट’चे संस्थापक आनंद देशपांडे हे पुण्याचे पहिले ‘टेक बिलेनियर’ बनले आहेत.
गेल्या दोन दिवसांत ‘पर्सिस्टंट’च्या समभाग मूल्यात (शेअर व्हॅॅल्यूत) झालेल्या वाढीमुळे देशपांडे अब्जाधीश बनले आहेत.
बोटावर मोजण्याइतके अब्जाधीश
पूनावाला, कल्याणी, बजाज यांच्यासारखे हाताच्या बोटावर मोजण्याइतके अब्जाधीश पुण्यात असले तरी हे सर्व उद्योगपती प्रामुख्याने उत्पादन क्षेत्रातले आहेत. टेक्नॉलॉजीमधले पहिले अब्जाधीश पुणेकर देशपांडे ठरले आहेत. आनंद देशपांडे यांच्याकडे ‘पर्सिस्टंट’चे तीस टक्के शेअर्स आहेत. त्यांची आजची किंमत १ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त म्हणजेच सुमारे साडेसात हजार कोटी रुपये आहे.
पर्सिस्टंट कंपनीची स्थापना
महाविद्यालयीन शिक्षणानंतर अमेरिकेमध्ये चांगल्या नोकरीच्या आशेने गेलेले देशपांडे वयाच्या २८ व्या वर्षी पुन्हा मायदेशी परत आले आणि त्यांनी स्वत:चा उद्योग सुरु केला.
अमेरिकेमध्ये काम करताना जमवलेले २१ हजार डॉलर्सच्या भांडवलावर त्यांनी उद्योग सुरु केला.
यामध्ये त्यांना त्यांचे वडील दादा देशपांडे यांनीही काही आर्थिक मदत केली आणि पार्सिस्टंट कंपनीची स्थापना झाली. १९९० मध्ये त्यांनी आपल्या कंपनीची स्थापना केली.
८० टक्के महसूल अमेरिकेतून येतो
देशपांडे यांनी सन १९९० मध्ये त्यांच्याकडची शिल्लक आणि वडील व मित्रांकडून घेतलेले कर्ज यातून २१ हजार डॉलर्स उभे केले आणि पर्सिस्टंट सिस्टिम ही टेक कंपनी पुण्यात सुरू केली. आज ही कंपनी ५६६ दशलक्ष डॉलर्सची आहे. पर्सिस्टंटच्या एकूण व्यवसायातील ८० टक्के वार्षिक महसूल अमेरिकेतून येतो. उर्वरीत वीस टक्के युरोपीय देश आणि भारतातून येतो.
४५ देशांमधील कर्मचारी कंपनीचा भाग
फोर्ब्सनुसार आज पर्सिस्टंटचे वार्षिक उत्पन्न हे ५६.५ कोटी डॉलर इतकं आहे. ही कंपनी डेटा मॅनेजमेंट, डिजिटसल इंजिनीअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करते. देशपांडे यांनी पाच सहकाऱ्यांच्या मदतीने सुरु केलेल्या या कंपनीत आता १४ हजारांहून अधिक इंजीनीयर्स आणि कर्मचारी काम करतात. जगभरातील ४५ देशांमधील कर्मचारी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या या कंपनीचा भाग आहेत.
उत्पन्नात १३ टक्के वाढ
पर्सिस्टंटमध्ये आज ४५ देशांमधले १४ हजार तंत्रज्ञ काम करतात. टीसीएस, इन्फोसिस, विप्रो यांच्याप्रमाणेच जागतिक प्रतिष्ठा मिळवणारी ही ‘लिस्टेड कंपनी’ आहे.मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीने उत्पन्नात १३ टक्के वाढ केली. कंपनीचा निव्वळ नफा ३८ टक्क्यांनी वाढून ६२ दशलक्ष डॉलर्सवर गेला.
सामाजिक क्षेत्रातही मोठं काम
केवळ आयटीच नाही सामाजिक बांधिलकी जपण्याचं कामही देशपांडे करत आहेत. त्यांनी सहा वर्षांपूर्वी ‘दे आसरा’ नावाच्या फाउंडेशनची स्थापना केली आहे.सामाजिक बांधिलकी जपणारं आणखीन एक उदाहरण सांगायचं झाल्यास नुकतेच देशपांडे कुटुंबाने पुणे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांसाठी ४५० घरं असणारा एक प्रकल्प स्वत:च्या पैशातून उभारुन दिलाय.
देशपांडे यांच्या कंपनीच्या नावाचा म्हणजेच पर्सिस्टन्सचा मराठीमध्ये सातत्य असा अर्थ होतो.
हेच सातत्य त्यांच्या औद्योगिक भरभराटी बरोबरच सामाजिक बांधिलकी जपण्याच्या कामामध्येही दिसून येत आहे. या फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
मराठी उद्योजक कमी असतात अशी टीका वारंवार होताना दिसते. अशा परिस्थितीमध्ये देशपांडे कुटुंबियांच्या माध्यमातून केले जाणारे हे प्रयत्न कौतुकास्पदच म्हणावे लागतील.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम