हजार पोरांची आई (कथा)
पाहुणेरावळे कुठून कुठून घवाघवा गोळा होऊन आले. अशी शोककळा, की सारं गाव चिनभिन. एकुलत्या एका लेकाचा असा अकाली मृत्यू. दुःखानं असा घेराव घातला की कसं होतं अन् काय झालं? नुस्ता राहंकाळ! गाव हळहळलं..शोभाची तर दोनदा दातखीळ बसली. तिला सावरायचं कसं? वेळेनं तिला अवघड दु:खाच्या तोंडी नेवून ठेवलं होतं. शोभाचा सासरा मुका झाला; अन् सासूचं दुःखाचं गाणं सरता सरत नव्हतं..
माझा का भाऊऽऽ लई गुणाचा गंऽऽ बायीऽऽ
कधी कुनाच्या का वाट्याला बी गेला न्हायीऽऽ
माझा का भाऊ पाखरागत उडून गेला गं बायीऽऽ
देवाला का यवढा आवडला गं बायीऽऽ
देव का घेऊन गेला गं बायीऽऽ
ये देवाऽऽ कसा रेऽऽ मोहून घेतला रे माझा मोहनाऽऽ
ये मोहनाऽऽ कसा रे कुडं लपून बसला रे सोन्याऽऽ
तू लावून ठिवलेली झाडं का माला इच्यारतील; त्यायला काय सांगू रे आता?
मरताना माझा सोन्या आई म्हण्ला आसंल का?
कसा त्या लायटीच्या वायरीनं घात केला गं बायीऽऽ
कशी काळ व्हऊन धावून आली गं बायीऽऽ
ये देवाऽऽ रांडकीच्याऽऽ कसा तोडून नेला माझ्या काळजाचा घडऽऽऽऽ
ये मोहना आता कुनाच्या तोंडाकडं पाहू रे राजाऽऽ
तू का माला आता हाक मारशील का राजाऽऽ
मी का हाक मारल्याव तू धावत येशील ऽऽ
ये मोहना ऽऽ ऽऽ
बाई माझं ग कोकरू कुड्ल्या रानात का हरवलं ऽऽ
त्याला का रस्ता घावना बाई ऽऽ
जमलेल्या आयाबायांच्या काळजाला घरं पडत होते. आतडं पिळवटून निघत
होतं. त्या आईचं आभाळ असं फाटलं, की त्याला टाका घालायला सोय
नाही. तरी बाया बयाबाईच्या दुःखाला कवळू पाहत होत्या. तिला समजावू पाहत होत्या;
पण बयाबाईचं दुःख काही शांत होत नव्हतं. ते तर काळजाचा ठाव घेऊ
लागलं होतं. बायाही गांगरून गेल्या. तरी सावरायला बिलगल्या,
“बया आता उगी बायी; ते का आपल्या हातातंय का?”
“मोहनावर येळच आली व्हती!”
“देवानं बोलवणं धाडलं त्याला, कुनाला का आडवता येतं?”
“त्यानं ठिवलं आपल्याला त्याची कैना गायला मागं!”
“गुणाचाच व्हता तेवढा म्हणून त देवाला आवडला!”
असा कसा आवडला आत्याबायीऽऽ मी त् कुनाला दादा म्हणूऽऽ
माला त् कोन आई म्हनंलऽऽ”
वानीतिनीचा तेवढा व्हता न् बायीऽऽ”
देवानं माला का नेलं न्हायी नं बायीऽऽ
त्याचे जायचे दिवस व्हते का बायीऽऽ
“उगी बस बया! असं नको येड्यावानी करू. सगळ्यायलाच जायचं हाये! आपुन का मागं ऱ्हायला आलो का? सांग बरं माझे बबडे!”डोळे पुसता पुसता साताळ्याची म्हातारी म्हणाली
“त्या पोरीचा त जनम जायचाय; तिच्याकडं पाह्य! तिचं दुख का कमीय!”
बयाबाईनं शोभाला कवटाळलं अन दु:खाची ओवी सुरु केली.
शोभा तुझा का हंस उडोनी गेला, तुला का मागं ठिवलं ग बायी!
तुमच्या जोडीला का कुणाची नजर भवली ग बाई
तुला का काही सांगून गेला ग बाई
तुझ्या दु:खाची कथा कुणाला सांगू ग बाई
.
मोहनला सतीगती लावलं. रात्री भावकीतले बरेच लोक जमले होते. गावातून
कुणी कुणी भाजी-भाकरी वाढून आणत होतं. कडूघास काढायचा असतो; म्हणून
भावकीतले पंगत धरून जेवायला बसले. शोभा उगी ताटावर बसली होती. तिच्या गळ्याच्या
खाली घास उतरणार होता का? तिनं घास उचललाच नाही. तिच्या
दुःखाचा तर पारावार नाही. तिचं कुंकू हिसकावून नेलं होतं. तिचा जोडीदार अर्ध्यातच
खेळ मोडून निघून गेला होता. बयाबाई तिचं दु:खं मोकळं करत होती. शोभाचं दु:ख मुकं
झालं होतं. ती आतल्या आत कुढत होती. भावकीतली आजीबाई आग्रह करू लागली.
“बायी, कडू घास काढावा लाग्तो. आसं नको करू!”
“तुझ्या सासू-सासऱ्याकडे पाह्य! आता तूच त्यांचा लेक!”
“शोभा पोरी आम्हाला कळत का न्हायी. तुझं डोंगरायवढय!”
“मरण कुणाला चुकलं का बाई?”
“आता तुला दु:खाला पाठ द्यावी लागेल बाई.”
शोभाची तर शिळा झाली होती. ती भिंतीला पाठ टेकून बसली होती. मुकी मुकी. हाकेला वव देत नव्हती की येईल त्याला ओळखत नव्हती. शुद्धच हरपल्यासारखी. तिला कसं कळावं भूक लागलीय? तिला कळलंही असतं तरी तिनं उचललाच नसता घास! तिच्यासाठी चारी दिशाच गोठून गेल्या होत्या. दिवस दुश्मनासारखा तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला होता. सुखाच्या वाटा काट्या-कुट्यात गुडूप झाल्या होत्या. तिच्यासाठी एक एक दिवस वर्षाएवढा झाला होता. आयाबायांनी शोभाच्या आईला खुणावलं.
“ये माझे वासरे, बायी कडूघास काढ गं!” शोभाची आई म्हणाली.
“…………………….”
“बोल ग पोरी काहीतरी! नको असं आत घोटू घोटू!”
“……………………”
शोभाच्या आईनं जमलेल्या आया-बायांकडे पाहिलं. त्यांना ते जाणवलं की शोभा रडत नाहीये! ती रडली पाहिजे. तेव्हा कुठे तिचं दु:ख मोकळं होईल. तिच्या आईला तर काहीच सुधरेना. तिचं काळीज धडधडू लागलं. एकुलती एक लेक. या वयात रांडव झाली. देवाने कसं अवघड दु;खाच्या जागी आणून उभं केलं होतं. न रडणाऱ्या पोरीला रडायला लावायची जिम्मेदारी आपल्यावर सोपवली होती. ती हुमरून आलेल्या तोंडाने लेकीला म्हणाली,
“शोभा, ये माझे वासरे रड ग!”
“………………………” शोभा फक्त भिटीभिटी पहात होती.
“ये तुझा नवरा मेला, अग रांडकी झालीय तू!” तिला गदा गदा हलवत रागाने आई म्हणाली,
शोभाने हंबरडा फोडला.
तिच्या आईने तिला कवटाळलं.
तिचं आक्रंदन दाही दिशांचा घसा फाडू लागलं..
चिमण्या-पाखरांनीही दाणे दाणे वेचता वेचता थबकून
डोळे पुसावे; अशी गत..
शोभा रडली रडली; पण अन्नाला काही शिवली नाही. शोभाच्या सासू- सासऱ्यानंही अन्नपाणी घेतलं नाही. असली कसली कडूघासाची रीत. काळजाचा घड तोडून नेला. कसं जेवायचं? दुःखाचा डोंगरच्या डोंगर; पण तो शोभाला चढून जावाच लागणार होता. कसं काढणार होती ती तिचं अख्खं आयुष्य? अन् कशाच्या आधारावर? लग्न होऊन चार वर्षंही उलटली नव्हती, तोच डाळिंबाच्या बागात विजेचा शॉक लागून मोहन मरतो. त्यासाठी तो आजचा दिवस निवडतो. असं कसं बसलं होतं दु:ख दबा धरुन?
रानगावच्या कृषी महाविद्यालयात मोहन अन् शोभा भेटले. मोहन शेवटच्या
वर्षाला, तर शोभा प्रथम वर्षाला शिकत होती. मोहनचं शेतीप्रेम
शोभा जाणून होती. प्रेमाच्या आणाभाका त्यांनी काही घेतल्या नाहीत. चिठ्ठ्याचपाट्या
एकमेकांना लिहिल्या नाहीत. मोहनला असल्या भाकडगोष्टीत रस नव्हता. माझे विचार तुला
पटले, तुझे विचार मला पटतात; म्हणून आपण छान संसार करू शकतो!
असं पहिल्याच भेटीत शोभाला मोहननं सांगून टाकलं होतं. शोभालाही हा मुलखावेगळा
माणूस खूप भावला होता. एक दिवस तर मोहन शोभाला म्हणाला,
“शोभा, माझा संसार जरा निराळाय!”
“ठाऊकंय मला!”
“मी शहरात नोकरी करणार नाही. आमची वीस एकर शेतीय. त्यात मला डाळिंबाचा बाग लावायचाय! शोभा झाडांवर फार प्रेमय माझं. आईचं लेकरावर असावं तसं!”
“झाडं तुझी पोरंच म्हण की!”
“अन तू त्यांची प्रेमळ आई व्हावं. हीच माझी अपेक्षा!”
“अपेक्षा काय व्यक्त करतोस मोहन, त्यांची आई होणं हे माझं कर्तव्यच असणार आहे!”
“बघ बरं नंतर शब्द फिरवायची!”
“मोहन तू मला आवडला, म्हणून काही तुझं शरीर आवडलं नाही मला! तुझ्या याच विचारांवर मी प्रेम करते! शब्द का फिरवू मी? अरे झाडांचा मलाही लळा आहेच की!”
“एका झाडवेड्याची ही खरी झाडवेडी!”
दोघेही हसले होते.
काही वर्षं उलटली असतील. शोभाचं अन् मोहनचं लग्न झालं. शोभा
झाडवेड्याची बायको झाली. रोपट्याचं झाड होतं. पानाफळांनी बहरून येतं; पण शोभाच्या झाडाला फळ काही आलं नव्हतं. बोलता बोलता लग्नाला चार वर्षं
उलटून गेली, तरी मूल काही झालं नाही. डॉक्टरी तपासण्या
झाल्या. शोभाच्या गर्भ पिशवीत दोष होता. शोभानं मग मोहनमागे लकडाच लावला,
“मोहन, माझं ऐका. मुलासाठी तरी करून आणा बायको. आम्ही बहिणी बहिणी होऊन राहू; पण मला मूल हवंय!”
“शोभा, तो विषय पुन्हा नको.”
“असं का करता? माझं ऐका.”
“शोभा, तुला कितीदा सांगितलं मी! माझं ऐक, वीस एकरांत उगवून आलेल्या माझ्या झाडांची आई व्हो. एका मुलाची गोष्ट करते. अगं, हजार मुलांची आई तू व्होशील!”
त्या घडीला शोभाला नमतं घ्यावंच लागलं.
आज मात्र खरोखर त्याच्या त्या हजार पोरांची आई ती झाली होती.
पण लोकांना कोण समजाविल?
दारावर लोक येऊन जात होते. मरणदार असं हंबरड्याचं; त्याचा भर जराही ओसरला नव्हता. पुरामागून पूर सुरूच. एकुलत्या एका लेकाचं असं आबगी जाणं; आईबाप तरी कसं सहन करणार होते? शोभाची स्थिती का वेगळी असणार! तिच्या आसवांची नदी जराही सुकत नव्हती. आयाबाया येत होत्या, शोभाला घेरून बसत होत्या. तिच्या दु:खाच्या फांदीला गोंजारून सोडत होत्या. फांदी गहिवरून जात होती. ती हिंदकळून दु:खाचा अमाप शिडकावा आयुष्यावर होत होता. आयाबाया दु:खाला जिभळी लावत होत्या..
“पोरीनं आता कश्याच्या आधारावर आयुष्य काढावं बायी!”
“हावं नं बायी, पाठीपोटी एकादंबी लेकरू न्हायी!”
“माती हिर्वी व्हया पाह्यजे व्हती.”
“लेकरात आज न् उद्या दुख इसरली असती!”
“देवबी लई उलट्या काळजाचाय बाई!”
“कसं काढावं बाई पोरीनं उन्हाचं जिणं?”
“कसी वं येळ आली बयाबाई ही?”
“लाईट आली म्हणं, मोटर चालू करतो अन् वायरीवर पाय पडला!”
“काळंच वो वाट पात व्हता!”
“माझा मोहन जेवत्या ताटावरून उठला!” मोहनची मावशी म्हणाली,
“माझ्या भाऊनं माळरानात नंदनवन फुलवलं!” मोहनच्या आईला पुन्हा उबळ आली.
“एकादं पोरसोर पाह्यजेल व्हतं बाई. पार वसबूड झाला!”
मोहनचा दशक्रिया विधी झाल्यावर शोभाच्या आई- वडिलांनी शोभाच्या सासू- सासऱ्यांकडे विषय काढला,
“रावसाहेब, काय करायचं आता!”
“अप्पासाहेब, तुमची लेकय. तुम्हीच ठरवा!”
“मुलबाळ असतं तर मनाला समज घातली असती; पण तिचं पूर्ण आयुष्य पडलंय, ते कसं उन्हात वाळत घालायचं?”
“अप्पासाहेब, तुम्ही जसं शोभाचे वडील आहात तसाच मीही आहे. माझीही ती लेकच आहे. त्यामुळे मलाही तिचं हित कळतं. म्हणूनच मीही काही स्वार्थापोटी बळ बांधणार नाही. तिचं आयुष्य असं वाया जाणं मलाही आवडणार नाही!”
शोभाच्या वडिलांनी शोभाच्या सासऱ्याचा हात हातात घेतला. शोभाच्या सासऱ्याच्या डोळ्यांतून पाणी आलं अन् लहान मुलासारखं ते रडत राहिले. शोभाच्या वडिलांनी लहान मूल शांत करावं तसं त्यांच्या पाठीवर हात थापटत शांत करण्याचा प्रयत्न केला. गदगद करत रावसाहेबांचं आभाळ शांत झालं. जरा वेळानं शोभाचे वडील शोभाला म्हणाले,
“शोभा, पोरी आवर!”
“काय म्हणता अप्पा?” शोभा घर आवरता आवरता म्हणाली.
“चल आता आमच्याबरोबर!”
“कशी येऊ अप्पा?”
“का बरं?”
“आमच्या वीस एकरांतल्या पोरांचा बाप तर काळानं हिरावून घेतला. त्यांच्या आईला नका त्यांच्यापासून दूर करू. माझी पोरं अनाथ होतील अप्पा!”
“काय म्हणते पोरी?” अप्पांना हुंदका आला. शोभाच्या आईलाही. वेळेचेही डोळे ओले झाले होते. पाणी नव्हतं तेवढं शोभाच्या डोळ्यांत.
आई-अप्पा निरोप घेऊन निघून गेले. शोभा सासू- सासऱ्यांना घेऊन मळ्यात
निघाली. तिथे शोभाची हजार पोरं शोभाची वाट
पाहत होती… हजार पोरांची आई दमदार पावलं उचलत झपझप पुढे निघाली… तिला तिच्या
हजार पोरांच्या डोळ्यांतले अश्रू पुसायचे होते. त्यांची आई होऊन खवदव काढायची
होती. त्यांना आंजारायचं होतं, गोंजारायचं होतं. हजार
पोरांच्या आईचा पान्हा दाटून आला होता..!
ऐश्वर्य पाटेकर मु. पो. काकासाहेबनगर ता. निफाड जि. नाशिक ४२२३०८
मो. ९८२२२९५६७२
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम