Take a fresh look at your lifestyle.

प्रतिभाताई पाटील ते मृणाल गोरे : महाराष्ट्राला न लाभलेल्या महिला मुख्यमंत्री

आपल्या राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झाली नसली तरी राज्याच्या राजकारणात आजवर अशा अनेक महिला नेत्या होऊन गेल्या, ज्याच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी झाली पण ज्यांना संधी मिळाली नाही.

0

काल मुंबईमध्ये वस्ताद लहुजी साळवे यांच्या २२८ व्या जयंती कार्यक्रमात बोलतांना, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महिला सुद्धा विराजमान होऊ शकते असं म्हटलंय. उद्धव ठाकरे यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल का अशी चर्चा सुरु आहे ?

उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्याचे रक्षण करण्यासाठी आपण शिवशक्ती, भीमशक्ती आणि लहू शक्ती एकत्र आल्यास देशात एक मोठी ताकद उभी राहू शकते. गद्दार मूठभरही राहिलेले नाहीत आणि निष्ठावान डोंगराएवढे आहेत. आपल्याला राज्यात पुन्हा सत्ता आणायची आहे. आपला व्यक्तीच मुख्यमंत्री पदावर असेल, मग ती महिला असो किंवा पुरुष.”

उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर शिवसेनेतेही अनेक महिला नेत्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा केली जात आहे, यात रश्मी ठाकरे यांच्या नावाची जास्त चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा सुरु केली आहे. अशी आताची यादी वाढत जाऊ शकते.

पण आपल्या राज्यात एकही महिला मुख्यमंत्री झाली नसली तरी राज्याच्या राजकारणात आजवर अशा अनेक महिला नेत्या होऊन गेल्या, ज्याच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी झाली पण ज्यांना संधी मिळाली नाही. अशाच काही महिला नेत्यांविषयी.

प्रतिभाताई पाटील

वयाच्या २७ व्या वर्षी विधानसभेत निवडून येऊन प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती पदापर्यंत आपला राजकीय प्रवास केला. पण त्यांना मुख्यमंत्री पदाने मात्र कायम हुलकावणी दिली. १९७८ साली शरद पवार यांनी राज्यात पुलोदचा प्रयोग केल्यानंतर राज्यातील काँग्रेसची सत्ता पहिल्यांदा गेली. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री झाले.

तेव्हा काँग्रेसकडून विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पहिल्यांदा प्रभा राव आणि नंतर प्रतिभाताई पाटील यांच्या खांदयावर देण्यात आली. पुढे शरद पवार यांच सरकार बरखास्त करण्यात आलं पुन्हा काँग्रेसच सरकार आलं आणि सर्वधारणपणे विरोधी पक्षनेता मुख्यमंत्रीपदाचा प्रमुख दावेदार असतो. तशीच प्रतिभाताई यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली. पण अनेक दावेदारांच्या वादात मुख्यमंत्री पदाची माळ शेवटी अंतुलेच्या गळ्यात पडली.

शालिनीताई पाटील

शालीनीताई पाटील यांची महाराष्ट्रातील एक ओळख म्हणजे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी. पण त्यांनी या ओळखीच्या पलीकडे स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण केलं होतं. १९५७ च्या सांगलीच्या लोकल बोर्डाच्या निवडणुकीपासून सुरु करून शालिनीताई मंत्रीपद आणि मुख्यमंत्री पदाच्या दावेदारही झाल्या.

जेव्हा इंदिरा गांधींनी शरद पवारांचं पुलोद सरकार खाली खेचलं आणि राष्ट्रपती राजवट लावली. त्यावेळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शालिनीताई पाटील यांचं नाव आघाडीवर होतं. याबद्दल स्वतः शालिनीताईंनी आपल्या संघर्ष या आत्मचरित्रात म्हटलं आहे कि त्यांच्या नावाची चर्चा थेट इंदिरा गांधी यांच्यापाशी झाली होती. मात्र त्यांचाच आरोप आहे की वसंतदादा पाटलांनी त्यावेळी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिल नाही.

बॅरिस्टर अंतुले मुख्यंमत्री झाल्यानंतर शालिनीताई मंत्रिमंडळातल्या नंबर दोनच्या मंत्री झाल्या. अंतुलेना ज्या सिमेंट घोटाळ्यामुळे राजीनामा द्यावा लागला त्यामागेही शालिनीताईचा सहभाग असल्याचे बोललं गेलं पण तरीही त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मात्र मिळाली नाही.

प्रमिलाकाकी चव्हाण

प्रमिलाकाकू चव्हाण यांची आज पटकन कळणारी अशी ओळख सांगायची म्हटलं तर त्या आपल्या राज्याचे माजी मुख्यंमत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई. दाजीसाहेब चव्हाण यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांनी प्रमिलाकाकीना लोकसभेचे तिकीट दिल आणि त्या निवडूनही आल्या. त्यांनतर त्या सलग दोन वेळा खासदार होत्या.

याच काळात काँग्रेस विभागली गेली. पण प्रमिलाकाकी मात्र इंदिरा गांधी यांच्याच सोबत इंदिरा काँग्रेसमध्ये राहिल्या. त्यावेळी त्यांना इंदिरा काँगेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं. शरद पवार यांचं पुलोदच सरकार बरखास्त झाल्यानंतर झालेल्या निवडणूका प्रमिलाकाकीच्या नेतृत्वात लढल्या गेल्या आणि जिंकल्याही. या वेळी प्रदेशाध्यक्ष असलेल्या प्रमिलाकाकीच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी चर्चा झाली पण त्यांना संधी मात्र मिळाली नाही.

मृणाल गोरे

मृणाल गोरे यांना महाराष्ट्राच्या इतिहासातील लढवय्यी नेता म्हणून कायम ओळखलं जात. त्यांच्या आंदोलनांनी त्यांना राज्यभर प्रसिद्धीही मिळवून दिली होती. पाणीवाली बाई ते लाटणेवाली बाई अशी ओळख निर्माण झालेल्या मृणालताईंच्या नावाची देखील मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा झाली होती. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत अनेक राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.

जनता दलाला मोठं यश मिळालं होत. राज्यात दोन काँग्रेस विभागल्या गेल्यामुळे जनता दलाला फायदा झाला होता. राज्यात कोणाला बहुमत नसल्यामुळे अपक्ष आणि इतर पक्षाच्या मदतीने जनता दलाने मुख्यमंत्रीपदासाठी मोर्चेबांधली करायला सुरु केली होती.

त्यावेळी एस एम जोशी यांनी स्वतः मुख्यमंत्री पदासाठी नकार दिल्यास त्यांच्याजागी मृणाल गोरे यांना मुख्यमंत्री करण्याच्या चर्चा झाल्या पण ऐनवेळी दोन्ही काँग्रेस एकत्र आल्याने जनता दलाला आणि पर्यायाने मृणाल गोरे यांना मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली.

आजघडीला अनेकदा सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होतात. अधून मधून रश्मी ठाकरे, यशोमती ठाकूर यांच्या नावाच्याही चर्चा होतात. पण पहिली महिला मुख्यमंत्री कोण होणार? याच नक्की उत्तर मात्र येणारा काळच देईल तुम्हाला कोण महिला मुख्यमंत्री होईल असं वाटतं ?

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.