Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेकडून राज्यसभा मिळालेल्या प्रियांका चतुर्वेदी कोण ?

0

नुकतेच महाराष्ट्र विधानसभेतून निवडून दिले जाणाऱ्या राज्यसभा जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, दिवाकर रावते असे अनेक जण इच्छुक असताना राज्यसभेची माळ प्रियांका चतुर्वेदी यांच्या गळ्यात पडली.

प्रियांका चतुर्वेदी यांचे अचानक जाहीर झालेले नाव पाहता अनेकांना प्रश्न पडला. आता या प्रियांका चतुर्वेदी कोण ?

प्रियांका चतुर्वेदी राजकारणात सक्रिय झाल्या काँग्रेसमधून. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात २०१० साली झाली. काँग्रेसने २०१२ मध्‍ये त्‍यांना उत्तर पश्‍चिम मुंबईतील भारतीय युवा काँग्रेसच्‍या सचिव पदाची धुरा सोपवली. तर त्यानंतर लगेच २०१३ मध्ये त्यांना काँग्रेसच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करेपर्यंत त्या काँग्रेस प्रवक्‍त्‍या या नात्‍यांनी टीव्‍ही चॅनलेवरील चर्चेमध्ये काँग्रेसची बाजू मांडताना दिसत होत्या.

प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेस का सोडली ?

लोकसभा निवडणुकीच्या काळात एका कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्ताच्या गैरवर्तनवरूना त्या नाराज होत्या. त्याची त्यांनी काँग्रेस हायकमांडकडे तक्रार देखील केली होती. चतुर्वेदी यांच्या तक्रारीनंतर काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या आठ स्थानिक नेत्यांना पक्षातून निलंबित केले होते. पण नंतर काही दिवसातच त्या निलंबित नेत्यांना काँग्रेसने पुन्हा पक्षात सामील करून घेतले होते. पक्षाच्या या भूमिकेमुळे चतुर्वेदी काँग्रेसवर नाराज होत्या, त्यावेळी ट्विटरवर आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. पण पक्षाकडून दखल न घेतल्याने प्रियांका चतुर्वेदी यांनी काँग्रेसच्या प्रवक्तेपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

चतुर्वेदी यांच्या काँग्रेस सोडण्यामागे मथुरा प्रकरण मानले गेले असले तरी लोकसभा निवडणुकीत तिकीट न मिळण्यावरून देखील त्या नाराज असल्याचे बोलले जात होते. लोकसभा निवडणुकीत चतुर्वेदी मुंबईमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. पण त्यांच्या ऐवजी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना तिकीट दिले गेले.

शिवसेनेत प्रवेश

काँग्रेस सोडल्यानंतर काही दिवसात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत दाखल झाल्या. अगदी शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे त्यांनी हातात शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला. प्रियांका चतुर्वेदी यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामागे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांचा सहभाग असल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.

प्रियांका चतुर्वेदी यांचा हातात शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश

राजकारणापलीकडची ओळख

प्रियांका चतुर्वेदी फक्त राजकारणातच सक्रिय आहेत असं नाही. राजकारणापलीकडे देखील त्यांची ओळख आहे. त्या तहलका, डीएनए आणि फर्स्टपोस्ट अशा नियतकालिकामधून स्तंभलेखन करत असतात. त्याचबरोबर त्या पुस्तकपरीक्षणाचा एक ब्लॉग चालवतात, त्यांचा तो ब्लॉग भारतातील टॉप -10 मध्ये ब्लॉग मध्ये मानला जातो. त्याव्यतिरिक्त ते दोन NGO देखील चालवतात.

शिवसेनेच्या अनेक जेष्ठ नेत्यांना डावलून प्रियांका चतुर्वेदी यांना शिवसेना पक्षाने राज्यसभा दिली आहे. त्यामागे चतुर्वेदी यांची इंग्रजी आणि हिंदी भाषेवर उत्तम पकड हा महत्वाचा मुद्दा मानला जातोय. त्याबरोबर दिल्लीच्या उच्चभ्रू वर्तुळात चतुर्वेदी यांचा उत्तम जनसंपर्क आहे. त्यामुळे दिल्लीत शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.