Take a fresh look at your lifestyle.

हेडमास्तर डॉ.शंकरराव चव्हाण यांनीच सचिवालयाचे मंत्रालय नामकरण केले

शंकरराव चव्हाण हे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधी गृहांचे सभासद राहिले.

0

थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकांची आयुष्ये घडली, त्यांच्या नेतृत्वाने एक महान आणि कर्तव्य संपन्न नेताही या देशाला दिला. भारत देशाचे माजी गृहमंत्री, महाराष्ट्राचे दोन वेळचे माजी मुख्यमंत्री, सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून ज्यांनी राजकारण केले व त्यातही समाजकारणास दुजोरा दिला, ते जलपुरुष, जलप्रणेते, मराठवाड्याचे भाग्यविधाते डॉक्टर शंकररावजी चव्हाण साहेब.

कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख, निष्कलंक चारित्र्य असलेल्या साहेबांनी नेहमी दूरदृष्टी बाळगली. हाती घेतलेल्या कामात पूर्णतः स्वतःला झोकून देण्याचा शिरस्ता त्यांनी कायम पाळला.

या लोककल्याणकारी नेत्याचा जन्म १४ जुलै १९२० रोजी पैठण मधल्या एका शेतकरी कुटुंबात झाला. आर्थिक स्थिती जेमतेम असली तरी परंपरागत वारकरी कुटुंबातील आईवडिलांनी त्यांच्यावर व त्यांच्या भावंडांवर त्याग, समर्पण व स्वाभिमानाचे संस्कार केले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पैठण येथे झाले. पुढे उच्च शिक्षणासाठी ते हैदराबाद येथे आले. उस्मानिया विद्यापीठातून ते बीए. एल.एल.बी. झाले. १९४५ मध्ये ते वकील झाले.

त्यांच्यावर तरुणपणापासूनच स्वातंत्र्यसेनानी रामानंद तीर्थ यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या सल्ल्यावरून ते मराठवाडा मुक्ती संग्रामात सहभागी झाले. या मुक्ती लढ्याला यश आले आणि १३ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकरराव चव्हाण यांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

१९४८ मध्ये ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. १९४८-४९ मध्ये ते नांदेड जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस झाले. १९५२ मध्ये निवडणुकीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले, तरीही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत सहकारी क्षेत्रात व कामगार वर्गात आपल्या कार्याची मोहोर उमटवली.

१९५६ चाली ते नांदेड चे नगराध्यक्ष झाले. तेव्हा पासून त्यांच्या कर्तृत्वाचा वारू चौखूर उधळण्यास सज्ज झाला.

त्याच दरम्यान ते नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक या पदांवर त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. १९५६ साली मराठवाडा महाराष्ट्रात सामील झाला. त्यावेळी त्यांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले पुढे १९६० मध्ये ते महाराष्ट्रात विकासाचा मंगल कलश आणणार्‍या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळात पाटबंधारे आणि वीज खात्याचे मंत्री झाले.

तेव्हापासूनच पाटबंधारे विभागाशी जडलेले नाते त्यांनी आपल्या कर्तृत्वातून अबाधित ठेवले. पुढील काळात महाराष्ट्राला व पर्यायाने मराठवाड्याला सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी या अनुभवांचा त्यांना मोठा फायदा झाला. उमेदीच्या वयात त्यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा ध्यास घेतला होता व याच दिशेने त्याची पावले पडत होती. नंतर १९७२ पासून १९७५ पर्यंत त्यांनी आपली आपलं आवडतं कृषीखातं सांभाळलं.

ज्या घडीची मराठवाडा आतुरतेने वाट पाहत होता ती वेळ आली, मराठवाड्यातील गोरगरीब शेतकरी यांच्यासाठी आपले पद आहे, असे मानणारा उमदा नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला. डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री झाले आणि मराठवाड्याचा भाग्योदय झाला.

मुख्यमंत्री म्हणून त्यांनी रखडलेली कामे हाती घेतली. त्यांनी लोकभावनेचा आदर केला. कारकिर्दीच्या शेवटपर्यंत सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कार्य केले. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात वाड्या, वस्त्या, पाडे यांना भेटी देऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन तात्काळ निपटारा करण्याचा त्यांनी सपाटा लावला. महाराष्ट्राच्या नोकरशाहीला प्रशासनाला त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात एक शिस्त लावली.

मुळात ते होतेच करड्या शिस्तीचे.
आपल्या कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणारे व रात्री उशिरापर्यंत राहून काम करणारे ते महाराष्ट्राच्या इतिहासातील कदाचित एकमेव मुख्यमंत्री असावेत.

त्यांच्या शिस्तीमुळे त्यांचा मित्रपरिवार व त्यांच्याशी सलगीने राहणारे लोक त्यांना प्रेमाने व आदराने “हेडमास्तर” म्हणत.

पुढे हाच “हेडमास्तर” हा शब्द महाराष्ट्राच्या “राजकारणातील हेडमास्तर” म्हणून सर्वांना परिचयाचा झाला. साहेबांनी मिश्कीलपणे त्याचाही स्वीकार केला.

पूर्वी मंत्रालयास “सचिवालय” म्हटले जाई सचिवालय हा शब्द बदलून त्यांनी “मंत्रालय” हा शब्द रूढ केला.

मुख्यमंत्रीपदावर असताना साहेबांनी अनेक कामे मार्गी लावली. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा राहिला आहे. शेती, जलसिंचन, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक विभाग या सर्व आघाड्यांवर त्यांनी निर्विवाद यश मिळवून दाखवले. साहेबांना दुसर्‍यांदा मुख्यमंत्रीपदावर बसल्याचे पाहण्याचे सद्भाग्यही महाराष्ट्रातील जनतेला लाभले.

राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद अशा केंद्र व राज्यातील चारही प्रतिनिधी गृहांचे साहेब सन्माननीय सभासद राहिले होते.

त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात उठून दिसणारी व लोककल्याणकारी कामगिरी म्हणजे अर्थातच “जलसिंचन”. पाटबंधारे मंत्री असताना त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी वाटपात त्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्यातील कणखरपणा चे दर्शन घडवणारी होती. गोदावरी, पूर्णा, आणि मांजरा या धरणामुळे मराठवाड्याचा खऱ्या अर्थाने विकास झाला. जायकवाडी धरण हे त्यांच्या दूरदृष्टीचे फलित होय. म्हणूनच त्यांना “जलपुरुष” या पदवीने लोकांनी गौरविले.

त्यांच्या प्रश्न हाताळण्याला राजकीय समजुतीची किनार होती. ती हे १९७५ मध्ये त्यांनी हाताळलेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन ते ध्यानात येते. देशाच्या गृहमंत्रीपदी विराजमान असतानाची त्यांची कारकीर्द विलक्षण गाजली. त्यांना मिळालेले संरक्षण मंत्री पद हा महाराष्ट्राचा बहुमान होता.

देशाचे अर्थमंत्री असताना त्यांनी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला ही त्यांची “भूतो न भविष्यती” अभिनव कल्पना होती. सन्माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर या देशात गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री अशा चार मोठ्या खात्यांचा सांभाळ करणारे स्वर्गीय डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेब हे नेते होते.

त्यांच्या नंतर त्यांचा वसा आणि वारसा अत्यंत समर्थपणे चालवणारे, महाराष्ट्राचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेले व सध्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री, नामदार अशोकराव चव्हाण हे त्यांच्या विचारांची पालखी वाहताना दिसतात.

अतिशय कृतार्थ भावनेने शंकराव चव्हाण साहेबांनी या जगाचा निरोप घेतला आणि मागे उरली त्यांनी करून ठेवलेली लोककल्याणाची डोंगराएवढी कामे.

“दिव्यत्वाची जेथे प्रचिती,
तेथे कर माझे जुळती….”

  • प्रा. बालाजी गाढे पाटील
  • प्रवक्ते, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
  • मो. न. 9657575424

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.