Take a fresh look at your lifestyle.

ग्रीन सिग्नल शाळा ते संयुक्त राष्ट्रसंघ- एक प्रवास

0

स्वतः दिव्यांग असताना देखील मनातील सुप्त गुणांना वाव देत फुटपाथवरील मुलांसाठी शाळा सुरु करून सामाजिक कामात स्वतःच्या नावाचा ठसा उमटवत असताना आता संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक युवा शैक्षणिक राजदूत म्हणून काम करत असतानाचे अनुभव आणि एकंदरीत स्वतःचा प्रवास उलगडून सांगणारी दीक्षा दिंडे यांची ‘अमर शिंदे’ यांनी घेतलेली विशेष मुलाखत…

  • संयुक्त राष्ट्रसंघाचीजागतिक युवा शैक्षणिक राजदूतनिवड झाली होती. तो प्रवास कसा सुरु झाला ?

मार्च २०१६ ला जागतिक युवा राजदूत म्हणून माझी निवड झाल्याने माझी ओळख महाराष्ट्रभर झाली. शैक्षणिक कार्यात जबाबदारी  काही निर्मिती मूल्य असलेलं काम कस करता येईल आणि कृतीआधारित शिक्षणाबद्दल  (activity based learning) माझ्या कल्पना मी संयुक्त राष्ट्रसंघाला नमूद केल्या होत्या. त्यादरम्यान स्नेहालय आणि रोशनी सोबत मी वेगवेगळी सामाजिक उपक्रम राबवत होते. उदा. पालक बालक संस्कार वर्ग, प्रौढ शिक्षण वर्ग, महिला बचत गटाची ओळख करून देणे. राजदूत झाल्यानंतर सर्वांना माझ्या कामाची नव्याने ओळख झाली . आमच्या चाळीपासून ते शाळा कॉलेज संस्थेतील सर्वांनी माझ्या कामाची दखल घेतली. त्याचवेळी मी मैत्रिणीच्या सोबतीने झेड ब्रीज खाली भिक्षेकरी मुलांसाठी दोन तासांची शाळा चालू केली होती, तो उपक्रम नावारूपाला आला आणि दोन वर्षे आम्ही प्रामाणिक प्रयत्नातून काम केलं

  • समाजसेवेची तुझी व्याख्या काय ? प्रत्येकाने समाजसेवा म्हणून योगदान कसं द्यावं ?

मी समाजसेवा म्हणून माझा कार्यकौशल्य लोकांना देते. हसतखेळत निरागसपणा जपत गरजूना मदत करणं ,माझं कर्तव्य समजते. मी माझं करिअर सांभाळून स्वतःला सिद्ध करणं महत्वाचं आहे. मी ‘सामाजिक कार्यकर्ती’ म्हणून त्याग करून काम करणं, एका पठडीत स्वतःला अडकवून प्रतिमा सांभाळणं, अवघड असतं आणि सामाजिक कामातून उत्पन मिळवणं चुकीचं आहे. प्रत्येकाने स्वतःचे व्यावसायिक कौशल्य वेळ मदत लोकांना देणं, हा समाजसेवेत खारीचा वाटा असतो.

  • तू आताच सांगितलं कि पुण्यात झेड ब्रीजच्या खाली शाळा सुरु केली, या शाळेच नक्की स्वरूप काय होत ?

सिग्नलला भीक मागणारे भटक्या जातीजमातीचे स्थलांतरित २०० कुटूंब झेड ब्रीज खाली राहतात. आम्ही त्यांच्या पालाजवळ एक चटई टाकून मुलांना भेटू लागलो, काही काळांत मुलांना अभ्यासाची गोडी लागल्यानंतर ‘क कागड्याचा ‘(कावळा) अशी त्यांच्या बोलीभाषेत अक्षर ओळख  शिक्षण दिलं. मुलांना दोन तास लेखन वाचन आणि कृती आधारित खेळातून शिकवण्याचा तो प्रयत्न होता. पूरक आहार आणि खाऊ वर्गणीतून, दानशूर लोकांच्या मदतीने  आम्ही पुरवत होतो. मृण्मयी कोळपे, सेवा शिंदे आणि अनेक मित्रमैत्रिणींनी त्यात शिक्षक म्हणून मोलाचा वाटा उचलला. सध्या तिथे मेट्रोच काम चालू झाल्याने त्या जागेत शाळेसाठी काही बंधने आली.  मात्र दोन वर्षांच्या कालावधीत जवळपास ८० मुले नियमित महानगरपालिकेच्या शाळेत जाऊ लागली. हे त्या ग्रीन सिग्नल शाळेच छोटसं पण महत्वाच यश म्हणावं लागेल.

  • दीक्षा, शिक्षण चळवळीत हे छोटं पाऊल कौतुकास्पद ठरलं, त्यांनंतर तुला शासनाचे राज्य राष्ट्रीय युवा पुरस्कार अनेक बहुमान मिळाले , याबद्दल काय वाटतं ?

-शासनाचा युवा पुरस्कार कामाची दखल घेणारे आहेत. त्यांचा खूप आनंद आहे. पण ह्या सगळ्या कामामागे आईबाबा, घरचे कुटूंबीय आणि सहकारी मित्रपरिवार आहे, हि भावना कायम मनात असते. त्यामुळे माझ्या एकटीचे हे पुरस्कार नाहीत. ते प्रतिकात्मक आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ‘दिव्यांगांचे अधिकार’ व पुरस्काराच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी जाण झाले, कौतुकाची थाप मिळाली आणि अनेक कार्यकर्ते मित्र भेटले. हक्काची अनेक माणसं पाठीशी उभी राहिली. कठीण काळात, काही पुरस्कारांनी माझं घरं सुद्धा चालवलं, कामासाठी, माझ्या शिक्षणासाठी पाठबळ दिलं.

  • एका सामाजिक कार्यकर्तीमागे असणारा परिवार सुद्धा  प्रेरणादायी असतो, तुझे आईबाबा आणि मित्र ह्या प्रवासातले सोबती , त्यांनी दीक्षाला कसं घडवलं ?

माझी आई म्हणजे झाशीची राणीच! लहानपणी शाळेत सोडण्यापासून ते आज पर्यंत ती माझी सारथी आहे. दिव्यांग असल्याने मला पोटाशी बांधून शाळेत, कॉलेजमध्ये, कार्यक्रमांना ती सोडायला येते. दिव्यांग असल्याने मला चालता येणार नाही, शरीरात व्यंग आहे. म्हणून मी कुठे मागे राहणार नाही, ह्यासाठी आईबाबांनी संघर्ष करून मला वाढवलं. बाबा रिक्षा चालवायचे तर आई पूर्णवेळ  शिलाई काम करून संसाराला हातभार लावते. हातावर पोट असणाऱ्या आईबाबांनी मात्र मला, ताईला तळहातावर मोत्यासारखं घडवलं.

  • आईबाबाच्या लाडक्या लेकीचं बालपण सं होतं? काही आठवणी ज्या आज आवर्जून सांगाव्या वाटतात ?

बालपण खरंच सुंदर होतं, आजी आजोबाकडून हट्ट पूर्ण करून घेणं माझं लहानपणापासून अजून चालू आहे. दिवाळी सुट्टीत खूप धमाल होती. भावंड आजोळी किंवा नातेवाईकांकडे दुसऱ्या गावी राहायला जायची. मी मात्र सोनवणे वाड्याची ‘दादा’ असायची. आई अनेक दिवाळी अंक, पुस्तकं आणून द्यायची. वाचनाची भूक तेव्हापासून वाढतच गेली. वाड्यात सगळे बैठे खेळांत जसे की कॅरम, व्यापार, साप-शिडी यात मी उस्ताद होते. क्रिकेट खेळतांना मुलं आठवणीने बोलवायला यायची आणि मी अंपायर म्हणून दादागिरी करायचे. बाबांबरोबर सगळ्या मॅचला ‘चाय के साथ चर्चा’ चालायची मुलगी असून सुद्धा क्रिर्केटचे सगळे अपडेट माहिती असायचे, त्यावेळचे अनेक मित्र आता वेगवेगळ्या व्यवसायात क्षेत्रात काम करतात पण अजूनही आठवणीने भेटायला येतात .

  • दीक्षा शैक्षणिक पद्धतीत बदल घडवण्यासाठी तू काम करते, पण तुझं शिक्षण कस झालं ?

दिव्यांग असल्याने खाजगी शाळांनी प्रवेश नाकारला आणि मी कात्रजच्या महानगरपालिकेच्या शाळेत सातवी पर्यंत शिकले. अभ्यासात हुशार असले, पहिल्या पाचात नंबर आला तरी बाकीचे कौतुक करताना हातचं राखून ठेवायचे, महानगरपालिकेत सहज नंबर येतो, नावाजलेल्या शाळेबद्दल बोलायचे. त्यावेळी नकळत वाटायचं की माझ्यात काहीतरी कमी असणार, मला नाही शक्य होणार स्पर्धा करायला. पण एकीकडे लहान बहिणीला अभ्यासाला पूरक प्रयोग, प्रकल्प होते, जे आमच्या शाळेत नव्हते होत.  मला आत्मविश्वास देणारी एक आठवण सांगते, आठवीत मला येवलेवाडीच्या उल्हास शिक्षण संस्थेच्या शाळेत प्रवेश मिळालेला, त्या वर्षी शाळेत वेगवेगळ्या स्पर्धा होत्या. निबंध, चित्रकला वगैरे वगैरे. मला कसे जमणार हा इतरांनी बोलून बोलून दाखवलेले एक न्यूनगंड माझ्या मनात होता. मात्र सरांनी विचारले ,”दिंडे , तू का नाही भाग घेत?” मी म्हंटल, “सर, मला कसं जमणार ना ?” त्यावेळी सरांनी वादविवाद स्पर्धेत नाव दिलं आणि माझा दुसरा नंबर आला, त्यानंतर मी सगळ्या स्पर्धेत हिररीने भाग घेतला. बक्षिस मिळत गेली तसं मला माझी ओळख मिळत गेली, स्वतःला सिद्ध केलं. सगळ्या मुलासारखं नामांकित शाळेत, त्या प्रवाहात मी येऊ नये. म्हणून बरेच जणांनी वेगवेगळ्या टप्प्यावर नाकारल पण माझ्या पाठीशी आईबाबा, अनेक शिक्षक, मैत्रिणी सोबतीला होत्या. मला जे जे जमतं तितकं करण्यासाठी माझा विश्वास वाढवत ते राहिले. चित्रकलेची आवड असल्याने आईबाबानी प्रोत्साहन दिले, चित्रकलेच्या परिक्षा देऊन मी विशेष गुण मिळवत होते. तेव्हा पुढे अॅनिमेटर होण्याचं स्वप्न पाहू लागलेले.

  • कॉलेजकुमारी म्हणून करिअरची कोणती वाट निवडलीस ?

लक्ष्मीरोडच्या हुजरपागा शाळेच्या कॉमर्स कॉलेजात बारावी आणि BBA केलं. मेरिट लिस्टमध्ये पहिलं नाव लागलेलं, दहावीत ८२% गुणांनी मला माझा अधिकार दिला होता. तोपर्यंत मुख्य प्रवाहात मला दिव्यांगपणामुळे नाकारल गेलं होत. कात्रजच्या पलीकडची दुनिया रोज भेटत होती. अनेक मैत्रिणी बनवल्या, गौरी माझी अभ्यासातली पार्टनर. प्रोजेक्ट सबमिशनच असलेलं टेन्शन आणि त्यावेळी बरोबर तासतास असणाऱ्या जीवलग मैत्रिणी भन्नाट होती. ती अकरावी-बारावी ची दोन वर्षे. अरेना ऍनिमेशनची फि भरण, शक्य नव्हतं.मी ‘सीए’ व्हावं, असं बाबाच स्वप्न होतं. पण BBA करताना ‘कलेक्टर’ व्हायचं म्हणून मनात खूणगाठ बांधली. आईने व्याजाने कर्ज घेऊन मला चाणक्यला शिकवलं. मी एक वर्षाचा वीकेंड फौंडेशन कोर्स केला, स्पर्धापरिक्षेच्या तासांना मी नियमित जात होते. शिस्तपूर्ण वातावरणात, कित्येक दिवस वर्गात बाकीच्या बरोबर ओळख झालीच नव्हती, जुजबी  बोलणं झालेलं. माझं मन तिथं रमत नव्हतं, तिथल्या समन्वयक ताईशी मी प्रॉब्लेम बोलून दाखवले. त्यांनी वर्गाला माझी ओळख करून दिली, वर्गमित्र अनौपचारिक बोलू लागले आणि मग हळूहळू मी सुद्धा मित्रमैत्रिणी जोडत गेले. स्पर्धा परिक्षेच्या वेगवेगळ्या  उपक्रमातून धडपडे मित्र मिळाले, त्यांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वातून मी घडले, मैत्रीचे सारे पैलू मला कळत गेले, आजही आम्ही कामांत हरवलो तरी आठवणीने दंगेखोरपणे एकमेकांची काळजी घेतो ,भन्नाट गोष्टीच चॅलेंज देत-घेत करिअर घडवतो.

आता BBA नंतर IGNOU मधून इतिहासात मी ह्या वर्षी MA पूर्ण केलं. सध्या Adventura Mantra मध्ये part time coordinator म्हणून कार्यालयीन काम पाहते, सोबतच UPSC ची तयारी सुरु आहे.

  • तुझ्या सामाजिक कामाबद्दल काही ठळक तपशील सांग .  

माझा स्वभाव सामाजिक जास्त असं म्हणावं लागेल, भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर हसतखेळत दोन गोष्टी कराव्या, त्याचं व्यक्तिमत्व समजून एक बॉण्ड जपण्याचा प्रयत्न असतो. कॉलेजच्या वर्षात चाणक्य आणि सप महाविद्यालयातील काही मित्रांनी मिळून परित्राणाय संस्था सुरु केलेली , आता ‘रोशनी‘ नावाने त्यांच काम चालतं.

* पिरियड प्रोजेक्त (मासिक पाळीसंदर्भात जनजागृती)

* ‘किताब एक्स्प्रेस (वाचन चळवळ)

* वही आमची भविष्य तुमचं

असे अनेक लोकोपयोगी उपक्रम संस्थेने राबवले. रीडर-रायटर क्लबसाठी बारा महिने वेगवेगळे कार्यकर्ते स्वतः माझ्याकडे उत्साहाने संपर्क साधतात, विनामोबदला मदत करतात.कात्रज परिसरात ‘स्नेहालय‘ च्या माध्यमातून काही वर्षे मी शनिवार रविवार वस्तीशाळेत संस्कार अभ्यास वर्ग घेत होते. मुलांच्या पालकाबरोबर संवाद साधत गेले तसे प्रौढ साक्षरता वर्ग चालवले.

उत्तराखंड , चेन्नईच्या आपत्ती दरम्यान लोकसमूहाला मदतीसाठी वेड्यासारखं तळमळीने काम करत आलो. आम्ही कार्यकर्त्यांना सामाजिक सेवेची काम करताना देखावा करण्याचं टाळत आलो. कोणताच आव न आणता मदत करणं , समाधानाची खरी फिलींग नक्कीचं देतं.

दीक्षा तुझ्या भविष्यातील कामांच स्वरूप काय असेल? कोणती विचारसूत्र आदर्शतत्व तू फॉलो करण्याचा प्रयत्न करते ?

शिक्षणाद्वारे लोककल्याण सकारात्मक बदल हि मुख्य जबाबदारी मी जागतिक युवा राजदूत म्हणून मानते. काही मूलभूत गोष्टींवर जनजागृतीसाठी मला लोकांशी भेटत बोलत राहायचं, काम करत समस्यांचे उपाय-उत्तर शोधत राहायचं.

१ सर्वसामावेशकता :- जात, धर्म , लिंग , वय , शिक्षण , आदी कोणत्याही कसोटीवर भेदभाव न करता सर्वसमानभावनेने इतरांबरोबर एकत्रित आयुष्य जगणं
२ दिव्यांगसाठी सुगमता व इतर अधिकारांचे जनजागृती (accessibility)
३ मासिक पाळी व स्त्रियांचे आरोग्य प्रबोधन , सबलीकरण.
४ वंचित व मुलींना शिक्षणाधिकार मिळू देण्यासाठी वेगवेगळ्या लोकस्तरांवर काम करत राहणे.
पण ह्या साऱ्या उपक्रमांत पारंबीच्या वाचकांची साथ मला हवी आहे, हे मात्र नक्की…

मुलाखत आणि शब्दांकन – अमर शिंदे

सदर मुलाखत पारंबी दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रकाशित झालेली आहे

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.