Take a fresh look at your lifestyle.

गिरीश प्रभुणे, जसवंतीबेन पोपट आणि सिंधुताई : कोण आहेत पद्म पुरस्कार विजेते

0

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सहा जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारने रजनीकांत देवीदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर गिरीश प्रभुणे, नामदेव कांबळे, परशुराम आत्माराम गंगावणे, जसवंतीबेन पोपट आणि सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करून गौरवण्यात आलं आहे.

कोण आहेत हे पद्म पुरस्कार विजेते त्यांच्याबद्दलचा हा आढावा

गिरीश प्रभुणे

गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. सामाजिक कार्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे. उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी काम केले.

प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत.

पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यातही पारधी समाजातील मुलींना शिक्षण मिळावं, पारधी समाजाचं पुनर्वसन व्हावं यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संस्था कार्यरत आहे.

‘भटके-विमुक्त समाज परिषदे’च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूरजवळील वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांसाठी त्यांनी काम केले. चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मधील भटक्या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी त्यांनी कार्य केले. पारधी समाजाच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. या गुरुकुलमध्ये पारधी समाजातील 200 मुले आणि 150 मुली शिकत आहेत. प्रभुणे यांनी 1970 पासून पारधी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.

नामदेव कांबळे

गावकुसाबाहेरील स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. नामदेव कांबळे हे साहित्यिक आहेत. ते वाशिम येथे राहतात. वाशीममधील शिरपूर गावात शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बारावीनंतर वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसला प्रवेश मिळाल्यानंतर प्रथम वर्षातच त्यांना अपयश आले. या नैराश्येतून साहित्य क्षेत्राकडे वळलेले कांबळे यांनी त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. वाशीम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेत ते शिक्षक होते. याच शाळेत त्यांनी सुरुवातीला सुरक्षा रक्षकाचीही नोकरी केली.

त्यांनी राघववेळ, ऊन सावली आणि सांजरंग या तीन कांदबऱ्या लिहिल्या आहेत. या तिन्ही कादंबऱ्यांमधून त्यांनी गावकुसाबाहेरच्या स्त्रियांच्या वेदनांना वाचा फोडली आहे.

गावकुसाबाहेरच्या स्त्रियांना साहित्यात स्थान देण्याचा कांबळे यांचा हा प्रयोग नवीन होता. राघववेळ’ या कांदबरीसाठी 1995 साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.याच कादंबरीला ह.ना. आपटे, बा.सी. मर्डेकर व ग.त्र्यं माडखोलकर पारितोषिकही मिळाले.

त्यांच्या राघववेळ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कारही जाहीर झालेला आहे. या कादंबरीचा बंगाली भाषेतही अनुवाद झालेला आहे. त्यांच्या नावावर एकूण आठ कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, चार कविता संग्रह, ललित लेख आदी साहित्य संपदा आहे.त्यांच्या या अतुलनीय योगदानामुळेच त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे.

परशुराम गंगावणे

परशुराम गंगावणे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी पारंपरिक लोककला जतन आणि प्रसार करण्याचे काम करत आहेत. आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी ही लोककला जोपासली असल्याने त्यांचे कार्य विशेष ठरले. परशुराम गंगावणे यांना कलेसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

गंगावणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील आहेत. त्यांनी पिढ्यानपिढ्या चालत आलेली कळसूत्री बाहुल्यांची कला जपली आहे. त्यांनी वडील आणि आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवू आदिवासी कलेचा हा वारसा जपला आहे. त्यांनी गुरांसाठी बांधकाम केलेला गोठा आणि गुरे विकून त्याचे छोटेखानी आर्ट गॅलरी म्युझियम बनवले.

आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरिटेबल ट्रस्ट नावाने नोंदणी करून त्यात पपेट, चित्रकथी, कळसूत्रीची अगदी शिस्तबद्ध मांडणी केलेली आहे.त्यांनी विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेटी बचाओ बेटी पढाओ, व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान, एड्स अवेरनेस आदी विषयांवर कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून जनजागृतीही केली आहे.

जसवंतीबेन जमनादास पोपट

90 वर्षीय जसवंतीबेन पोपट यांनाही पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. त्यांना उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देण्यात आला आहे. ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’च्या त्या सहसंस्थापक आहेत.80 रुपये उधारीवर जसवंतीबेन यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाची उलाढाल शेकडो कोटींची असून हजारो महिला कर्मचारी येथे काम करतात. या उद्योगाच्या माध्यमातून जसवंतीबेन पोपट यांनी ४५ हजार महिलांचं जीवन बदललं. त्यांना रोजगार दिला.

त्यांनी मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या जसवंतीबेन आणि त्यांच्या सात मैत्रीणींच्या पुढाकाराने हा उद्योग 1965 साली सुरू झाला. आपल्या घराला हातभार म्हणून महिलांनी हे काम सुरू केले आणि बघता बघता लिज्जत पापड घराघरात पोहचला.केवळ महिलाच सहमालक असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग होता.

सात गृहिणींनी ८० रुपये उधार घेऊन सुरू केलेला पापड उद्योग आज 1600 कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहोचला आहे.

गेली 60 वर्षांपासून त्यांनी हा व्यवसाय दमदारपणे सुरू ठेवला आहे. त्यांच्या व्यवसायात आज 45 हजार महिला असून त्यांच्या देशभरात 62 शाखा आहेत.महिला गृहउद्योग लिज्जत पापडाच्या निमित्ताने देशासमोर महिला सबलीकरण काय असतं याचं ठळक उदाहरण घालून दिलं आहे.

सिंधुताई सकपाळ

अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनाही उल्लेखनीय सामाजिक कार्य केल्याबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित झाल्या.

वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नव्हतं. नवऱ्याने चारित्र्याचा संशय घेऊन त्यांना घराबाहेर काढलं. घरच्यांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली.

त्यामुळे त्या परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. एकदा तर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. अनेक दिवस भीक मागितल्यानंतर त्या स्मशानातही राहिल्या. त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी ममता बाल सदनची स्थापनाही केली. पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत १०५० मुले या राहिलेली आहेत.

सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.

त्यांनी पुण्यता बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.