“घाशीराम कोतवाल” मधील ती भूमिका आजही स्मरणात
एखाद्या ग्रीक पुतळ्याची आठवण व्हावी, असा चेहरा. म्हटले तर देखणा, म्हटले तर चारचौघांत उठून दिसेल असा. टोकदार नाक, अतिशय बोलके डोळे, थोडासा अनुनासिक स्वर आणि वय लपवण्याची सहज सवय असलेली शरीरयष्टी.
मोहन आगाशे हे नाटय़वर्तुळातील एक लोहचुंबक मानले जातात. महाराष्ट्रातल्याच नाही, तर जगातल्या कुठल्या कुठल्या देशांमध्ये अगदी जिवाभावाची मैत्री असणारे शेकडो जण त्यांच्या आसपास असतात.
पुण्याच्या बी. जे. मेडिकल महाविद्यालयातून मानसशास्त्रज्ञ म्हणून पदवी मिळवल्यानंतर तिथेच नोकरी करणाऱ्या आगाशे यांच्या रक्तात जन्मत:च नाटक भिनलेले होते. उत्पल दत्त यांच्यासारख्या नटाचे नाटक परीक्षेच्या आदल्या दिवशी पाहात बसण्याचे धाडस करणाऱ्या या कलावंताला आयुष्यातली पहिली ओळख मिळाली ती ‘घाशीराम कोतवाल’मुळे. नाटकाचे नाव घाशीराम असले, तरीही त्यातील मध्यवर्ती भूमिका होती नाना फडणविसांची. या भूमिकेतील पदार्पणातच मोहन आगाशे यांनी रंगभूमीला कवेत घेतले. या भूमिकेने त्यांना कलावंत म्हणून जगापुढे आणले. एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवणे धोक्याचे असते, असे आपण म्हणतो, पण आगाशे यांनी त्याला पूर्ण छेद दिला आहे.
आयुष्यात नाटक आणि चित्रपट यातून भूमिका करत असतानाच मानसशास्त्राच्या विषयात सतत काही नवे करण्याची त्यांची ऊर्मी जबरदस्त आहे. इंडियन सायकिअॅट्रिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले, तसेच महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ या संस्थेचे संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द महत्त्वाची ठरली. या क्षेत्रातील शिक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही मोलाचे मानले जातात.
हे सारे करत असतानाच मोहन आगाशे हे नाव सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात समोर येत असते. कधी चित्रपटातील वेगळ्या व्यक्तिरेखेमुळे, तर कधी फिल्म इन्स्टिटय़ूटचे संचालकपद स्वीकारल्यामुळे. कधी जगातल्या कोणत्या तरी भागात नाटक या विषयावरील भाषणामुळे, तर कधी नाटकातील उत्कट अभिनयामुळे. शाळेपासून नाटकाचे वेड लागले, तरी त्या वेडापायी आयुष्य वाहून न देता, उत्तम शिक्षण घेऊन आपली ही मूळ आवड जोपासण्याचे कसब आगाशे यांच्याकडे आहे. ‘घाशीराम’मधील भूमिकेने आगाशे यांना जगात एक वेगळी ओळख मिळाली.
सत्यजित राय, श्याम बेनेगल, गौतम घोष, मीरा नायर, जब्बार पटेल यांच्यासारख्या दिग्गजांप्रमाणेच सुभाष घई, राकेश, ओमप्रकाश मेहरा यांच्यासारख्या व्यावसायिक दिग्दर्शक आणि निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी त्यांना मिळाली. जर्मनीतल्या लुडविक वोकर यांच्याशी आलेल्या संबंधांमुळे ‘ग्रिप्स’ या बालरंगभूमी चळवळीतही त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे .
कितीही छोटी भूमिका असली, तरीही त्यात चमक आणणाऱ्या मोहन आगाशे यांना मराठी नाटय़ परिषदेने जीनवगौरव पुरस्कार देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
– कैलास सुतार
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम