संयुक्त महाराष्ट्रासाठी सी. डी. देशमुख यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता
महाराष्ट्रातून प्रत्येक पाच वर्षाला खासदार दिल्लीत निवडून जातात. आपल्या कार्य कर्तुत्वाने अनेक खासदारांनी दिल्लीत आपली प्रतिमा निर्माण केली. “दिल्लीतला महाराष्ट्र” अशा बाबतीत विचार करताना राज्यातून दिल्लीत निवडून गेलेल्या अश्याच काही खासदारांचे किस्से
संयुक्त महाराष्ट्रासाठी राजीनामा देणारे सी. डी. देशमुख
तसं पहिले गेले तर सी. डी. देशमुख राजकारणात आलेच अनपेक्षितपणे. कारण देशमुख रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून निवृत्त झाल्यानंतर ईंग्लंडला जावून स्थायिक होणार होते. अगदी त्यांनी आपल्या जाण्याचा दिवस देखील ठरवला होता. पण अचानकपणे जवाहरलाल नेहरू यांच्याकडून त्यांना निरोप आला. पत्रात लिहील होत, “भारताला तुमची गरज आहे. भारत सोडून जावू नका.” नेहरुंना भेटायला सी. डी. देशमुख दिल्लीला गेले. नेहरूंनी त्यांना अर्थमंत्री बनण्याची विनंती केली.
सी. डी. देशमुख विचार करू लागले पण त्यांनी त्यांच्या पत्नीला गव्हर्नर पदावरून निवृत्त झाल्यानंतर इंग्लड स्थायिक होण्याचे आश्वासन दिले होते. (सी. डी. देशमुख यांची पत्नी ब्रिटीश होती) पण योगायोग म्हणावा लागेल. देशमुख दिल्लीत असताना त्यांना त्यांच्या पत्नीच्या निधनाची वार्ता मिळाली. त्यामुळे त्यांनी त्यांचा परदेशी जाण्याचा विचार बदलला आणि मंत्रिपद स्वीकारण्याचा विचार केला.
सी. डी. देशमुख कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात सहभागी झाले. पण ते हाडाचे कॉंग्रेसजन नव्हते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी केंद्रीय नेतृत्वावर दबाव म्हणून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रसने सामुहिक राजीनाम्याची संकल्पना काढली. इतर कॉंग्रेस नेत्यांनी राजीनामी लिहले पण ते कॉंग्रेस नेतृत्वापर्यंत पोहचवलेच नाहीत. पण सी. डी. देशमुखांनी आपला अर्थमंत्री पदाचा राजीनामा सादर केला. नंतर विनंत्या करून देखील त्यांनी तो परत माघारी घेतला नाही. देशमुखांनी राजीनामा देवू नये यासाठी मामा देवगिरीकर आणि खासदार आळतेकर हे त्यांना भेटायला गेले. त्यांना पाहताच सी. डी. त्यांना म्हणाले, “माझा राजीनामा मी सादर केला आहे. आता त्या बाबतीत बोलण्यासारखे काही राहिलेले नाही.”
राजीनामा सादर केल्यानंतर देशमुखांनी पार्लमेंट गाजवले. त्या दिवशी आपल्या संसदीय कार्यकाळात पहिल्यांदा विरोधी बाकावर बसले. त्या दिवशी त्यांनी आक्रमक भाषण केले, गोविंद वल्लभ पंताना उद्देशून ते म्हणाले, “देवरुखचे एक कुटुंब चारशे वर्षापूर्वी उत्तर प्रदेशात गेले आणि तिथेच स्थायिक झाले. आज महाराष्ट्राच्या भवितव्याची जबाबदारी त्याच कुटुंबाच्या एका वारसदाराकडे चालत आली आहे. हा वारसदार म्हणजे आजचे गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत हे होत. माझी एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे कि, महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाचे परिमार्जन करून आमचे गृहमंत्री महाराष्ट्राचे ऋण फेडण्यास पुढाकार घेतील.”
त्याच भाषणात देशमुख पुढे म्हणाले, “लोकशाहीमध्ये जनतेला आपल्या हकासाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे. तो आवाज शांततामय निदर्शनातन उठविला जात असताना राज्यकल्यांनी विवेकपूर्ण आणि सुसंस्कृत वागणुकीचा आदर्श प्रगट केला पाहिजे. पण येथे एक हटवादी मुख्यमंत्री आपल्या नागरिकांच्या रक्ताचा सडा शिंपण्याला सिद्ध झाला आणि त्यालाच गौरवपूर्ण रीतीने केंद्रस्थानी मानाने प्रतिष्ठित करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय राज्यकर्त्यांची मनात महाराष्ट्राबद्दल आकस आहे असा निष्कर्ष न काढायचा तर काय करावयाचे ? साहजिकच या अन्याय्य कृतीचा धिक्कार करण्याशिवाय माझ्या हाती काही उरलेले नाही. आणि त्या धिक्काराचे एक चिन्ह म्हणून मी केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा त्याग करीत आहे.”
मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी सी. डी. देशमुख यांनी दिलेला अर्थमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा, हि मोठी घटना होती. त्यांच्या राजीनाम्यामुळेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीला मोठे बळ मिळाले होते म्हणूनच एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले, ”दिल्लीत स्वाभिमान जिवंत असणारा एकच माणूस आहे तो म्हणजे सी. डी. देशमुख”
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम