Take a fresh look at your lifestyle.

इंदिरा गांधी यांच्या अटकेला विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यानी विमान हायजॅक केलं होत

काँग्रेस पक्षासाठी गांधी परिवार किती महत्वाचा असतो आणि त्यासाठी काँग्रेस नेते, कार्यकर्ते काय करू शकतात. हे सांगणारा इंदिरा गांधी यांच्या संदर्भातला हा किस्सा… 

0

काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडी कडून चौकशी सुरु आहे. त्यांच्या या चौकशी विरोधात काँग्रेस पक्षाकडून देशभरात निदर्शने चालू आहेत. संसदसे सडक तर काँग्रेस या चौकशी विरोधात रस्त्यावर उतरला आहे.  

देशात मागच्या काही वर्षात काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात कमजोर झाला आहे. त्याचा परिणाम त्यांची आंदोलने, विरोध याच्यावरही झाला आहे. मागच्या काही दिवसात देशभरात काँग्रेसला किती वेळा देशभर आंदोलने करता आली असा प्रश्न विचारला तर त्याच उत्तरही सांगता येणार नाही.

पण गांधी घराण्याच्या विरोधात जेव्हा अशी परिस्थिती येते, तेव्हा मात्र काँग्रेस आक्रमक पवित्रा घेण्याचा विचारात असते. सध्याही सोनिया गांधी यांच्या चौकशीविरोधात काँग्रेस आक्रमक झालेली दिसली. त्याच उदाहरण म्हणजे काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्री, खासदार, आमदार असे सगळे मोठे नेते कित्येक दिवसांनंतर रस्त्यावर उतरलेले दिसले.

याच्याआधी सगळे काँग्रेस नेते कधी एकत्रित रस्त्यावर उतरलेले दिसले होते ?

गांधी परिवार आजदेखील काँग्रेससाठी इतका महत्चाचा आहे का ? कारण पक्षाच्या किंवा देशाच्या इतर कोणत्याही महत्वाच्या मुद्दयापेक्षा काँग्रेस पक्षाला गांधी परिवाराचा कोणताही मुद्दा जास्त महत्वाचा असतो.

काँग्रेस पक्षासाठी गांधी परिवार किती महत्वाचा असतो आणि त्यासाठी काँग्रेस नेते, कार्यकर्ते काय करू शकतात. हे सांगणारा इंदिरा गांधी यांच्या संदर्भातला हा किस्सा… 

आणीबाणी आणि काँग्रेसचा पराभव

पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावल्यानंतर त्यांच्या या निर्णयाविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध झाला. विरोध दडपण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना अटक केली. पण आणीबाणीच्या दोन वर्षानंतर त्यांनी पुन्हा लोकसभा निवडणूका जाहीर केल्या.

आणीबाणी नंतर जाहीर झालेल्या 1977 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे खासदार मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले. अर्थात केंद्रात स्थापन झालेले हे  पहिले बिगर काँग्रेसी सरकार होते

3 ऑक्टोबर 1977 रोजी सीबीआयने इंदिरा गांधींना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली. पण त्यावेळी अगदी दोनच दिवसांनी त्यांची सुटका करण्यात आली. याच वर्षी पुन्हा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित असताना त्यांना दुसऱ्यांदा अटक करण्यात आली.

19 डिसेंबर 1978 रोजी सीबीआयच्या पथकाने इंदिरा गांधींना संसदेतच अटक केली. यावेळी त्यांना आठवडाभर दिल्लीच्या तिहार तुरुंगात राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या अटकेविरोधात देशभरात काँग्रेसवाले रस्त्यावर उतरले. विरोध सुरू केला.

मात्र त्यानंतर युवक काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी कोणी विचारही करणार नाही असे काम केले.

थेट विमानाचे हायजॅकिंग

इंदिरा गांधींच्या अटकेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 डिसेंबर रोजी कोलकाताहून लखनऊ मार्गे दिल्लीला येणाऱ्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण करण्यात आले.

इंडियन एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक 410 संध्याकाळी 6 च्या सुमारास दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरणार होते. या बोईंग 737 विमानात 126 प्रवासी होते. संध्याकाळी 5.45 च्या सुमारास दोन तरुण आपल्या जागेवरून उठले आणि विमानाच्या कॉकपिटमध्ये घुसले.

कॉकपिटमध्ये घुसल्यानंतर या दोन तरुणांनी वैमानिकांना आपल्याजवळ बॉम्ब आणि बंदूक असल्याचे सांगितले. त्यामुळे हे  विमान हायजॅक झाल्याचे घोषित करा, असे सांगितले. असं म्हणताच, विमानात सूचना गेली कि, “आपले विमान हायजॅक झाले आहे आणि आपण आता दिल्लीत उतरत नाही. आपण पाटण्याकडे जात आहोत.”

त्यानंतर काही काळानंतर विमान पाटण्याऐवजी वाराणसीला जाणार असल्याचे सांगण्यात आले. शेवटी हे विमान वाराणसीला उतरले.

अपहरणकर्ते युवक काँग्रेसचे कार्यकर्ते

या विमानाचे अपहरणकर्ते भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे नावाचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते होते.

विमान अपहरणाची माहिती मिळताच वाराणसीपासून लखनऊ ते थेट दिल्लीपर्यंत मोठी खळबळ उडाली. वाराणसीमध्ये विमान उतरल्यानंतर उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री राम नरेश यादव यांनी अपहरणकर्त्यांशी फोनवर चर्चा केली.

अपहरणकर्त्यांनी केंद्र सरकार समोर तीन मागण्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये यात पहिली मागणी होती, सरकार कडून इंदिरा गांधी यांना जी अटक झाली आहे, त्यांची सुटका करावी. दुसरी मागणी होती, सरकारने इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यावर सुरू असलेले सर्व खटले संपवले पाहिजेत. शेवटची आणि तिसरी मागणी होती कि केंद्रात सत्तेवर बसलेल्या जनता सरकारने राजीनामा द्यावा. त्यावेळी देशात काही दिवसापूर्वी जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान होते.

यावर शेवटी अपहरणकर्ते आणि सरकार यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या. दोन्ही बाजूने सौदेबाजीचे प्रयत्न सुरू झाले. या सगळ्या चर्चेत सकाळ झाली.

विमान अपहरणकर्ते भोलानाथ पांडे आणि देवेंद्र पांडे

तोपर्यंत एक अपहरणकर्ता असलेल्या भोलानाथ पांडेचे वडील वाराणसी विमानतळावर पोहोचले. त्यांनी त्या दोघांशी फोनवर बोलून त्यांना समजावून सांगितले. अखेरीस दोन्ही अपहरणकर्ते विमानातून बाहेर पडण्यास तयार झाले आणि अशा पद्धतीने अपहरणाचे नाट्य नाट्यमय पद्धतीने संपले.

शेवटी विमान हायजॅक करण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक आणि बॉम्ब प्रत्यक्षात खेळण्यातील बंदूक आणि क्रिकेटचा चेंडू असल्याचे नंतर उघड झाले.

विमान अपहरणातील आरोपी असणाऱ्या पांडे यांना याबद्दल काँग्रेस पक्षाकडून परतावा देखील मिळाला. त्यांना पुढे काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली आणि ते आमदारही झाले. 

विमान हायजॅकिंग मध्ये सहभागी बलियाचे रहिवासी असलेले भोलानाथ पांडे नंतर काँग्रेसचे दोन वेळा (1980 ते 1985 आणि 1989 ते 1991) आमदार झाले. 1991 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेश मधील देवरिया जिल्ह्यातील सलेमपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पराभव झाला.

पुढे 1996, 1999, 2004 आणि 2014 मध्येही त्यांनी सलेमपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली पण प्रत्येक वेळी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. 2009 मध्येही त्यांचा अगदी जवळच्या फरकाने पराभव झाला. तर दुसरे अपहरणकर्ते देवेंद्र पांडे यांची गणना काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि गांधी घराण्याच्या जवळचे कार्यकर्ते अशी होते.

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.