Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस विशेष : महाराष्ट्राला न लाभलेले व भविष्यात लाभणारे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री

0
  • आकाश भरत झांबरे पाटील

महाराष्ट्रात मुंबईपासून ते गडचिरोली पर्यंत व नंदुरबार पासून कोल्हापूर पर्यंत प्रत्येक तालुक्यात स्वतःचा थेट कार्यकर्ता असलेले फार कमी नेते महाराष्ट्रात होऊन गेले. सद्य स्थितीत शरद पवार साहेब सोडले तर असा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे. तो म्हणजे तुमचा आमचा सर्वांचा ‘दादा’. होय आपले ‘अजित दादा’.

असे म्हणतात की दादांच्या नावातच दरारा आहे.पण कोणाच्याही नावात त्याच्या कामाशिवाय दरारा येत नाही. आणि दादांच्या बाबतीतही तसेच आहे ते पुढे येईलच. असंख्य आरोप, अनेक टीका सहन करूनही हा माणूस आज खंबीरपणे उभा आहे. संबंध महाराष्ट्र चालवतोय. दादांच्या कामाची प्रचिती तर अनेकदा अनेक वेळा येतच असते.

आजघडीला महाराष्ट्राच्या पहिल्या फळीत काम करणाऱ्या नेत्यांमध्ये शेतीवाडीशी नाळ जोडलेला हा एकमेव नेता असेल. ज्याने खासदार होण्याआधी शेतात नांगर धरला, गाई म्हशींच्या धारा काढल्या. पुढे राजकारणात आल्यावर सुद्धा दादांनी शेतकरी कष्टकरी वर्गाबाबत मोठ्या आत्मीयतेने काम केले. शेतकरी हिताला प्राधान्य देत काम करीत राहिले. अजित दादा हे एक आहुलीया व्यक्तिमत्व आहे. प्रचंड झपाटून काम करण्याची क्षमता या माणसात आहे.

सकाळी ६ वाजता हा माणूस लोकांच्या सेवेत हजर असतो. आणि हा शिरस्ता राजकारणात काम करायला लागल्यापासून आजतागायत कायम आहे.

मधून अधून बारामतीला पहाटे साडेपाचला दादांनी विकासकामांचा आढावा घेतल्याच्या बातम्या येतात तेव्हा खरोखरच थक्क होईला होतं. कारण दिवसभर प्रचंड काम, असंख्य लोकांच्या भेटीगाठी, कित्येक विषय, कित्येक बैठका, एवढा सगळा व्याप असूनही दादा पहाटे तयार असतात. याचे कौतुक वाटावे तेवढे कमीच आहे. सकाळी कामाला सुरुवात झाली की दादा रात्री उशिरापर्यंत काम करीत असतात.

महाराष्ट्रात असंख्य लोक असतील ज्यांचे प्रश्न दादांनी पहिल्या भेटीत एका एका फोनवर सोडवले असतील. १९९९ ते २०१४ ला सरकारमध्ये असताना सुद्धा दादांनी असंख्य धोरणात्मक निर्णय घेतले. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, युवक, कामगार, उद्योग, सहकार, शिक्षण, इत्यादी विविध क्षेत्रांसाठी दादांनी ठोस भूमिका घेतल्या व अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर कसा राहील याची सातत्याने ते काळजी घेत आले आहेत. पिंपरी-चिंचवड सारखी महानगरपालिका सांभाळत असताना त्या शहराला ज्या पद्धतीने दादांनी घडविले यावरून अजितदादांची विकासाबाबतची दृष्टी लक्षात येऊ शकते.

कोणतेही काम करीत असताना, कोणताही निर्णय घेत असताना राज्यकर्त्यांनी पुढच्या किमान ५० वर्षांचा विचार केला पाहिजे असे दादा आवर्जून सांगत असतात. आणि ते अमलात देखील आणत असतात.

मी मागे सांगितल्याप्रमाणे जसे राज्यात सर्वदूर जनसंपर्क असलेले, रोज सकाळी ६ वाजता कामाला सुरुवात करणारे, लोकांचे प्रश्न पहिल्या भेटीत सोडविणारे दादा हे एकमेव नेते असतील. तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमे व सामाजिक माध्यमांचा उदयानंतर प्रचंड खोटी टीका सहन केलेले सुद्धा दादा हे एकमेव नेते असतील असे मला वाटते. साधारणतः २०१० पासून देशात सोशल मीडियाचा प्रभाव वाढू लागला होता.

तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक मीडिया देखील बऱ्यापैकी हातपाय पसरत होता. तेव्हा २०१४ च्या लोकसभेचे नियोजन काही पक्षांकडून २०१२ लाच सुरू झाले होते. व २०१४ ला सोशल मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचंड प्रभावी असणार हे त्यांनी आधीच ओळखले होते. आणि त्या नियोजनाचा भाग म्हणून त्यांनी देशातील व त्या-त्या राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांवर खोटे आरोप करून बदनामी करण्याचे काम सुरू केले. यात महाराष्ट्रात अर्थातच अजितदादा महत्त्वाचे नेते होते.

त्यामुळे खोटे आरोप करून प्रचंड टीका या माणसावर करण्यात आली. माध्यमांनीही मोठ्या प्रमाणात राळ उठवली. पण दादा खचले नाहीत.

त्यांची बांधिलकी ही महाराष्ट्राच्या जनतेशी होती.ते काम करीत राहिले. पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात त्यांनी अनेक लोकउपयोगी कामे केली.जी खाती सांभाळली त्या खात्यांना न्याय दिला. महाराष्ट्राचे सिंचनक्षेत्र ५ टक्क्यांनी वाढविले. महाराष्ट्राला भारनियमन मुक्त केले. हे सर्व करीत असताना दादा कायमच प्रसिद्धीपासून लांब राहिले. याचा फटका त्यांना निश्चितच बसला. पण ते काम करीत होते. २०१४ ला सत्ता गेली. पण ते जराही डगमगले नाही. महाराष्ट्रभर फिरले, तालुका तालुक्यात गेले. तोच उत्साह,तोच जोश, तोच कामाचा आवाका. लोकांनीही प्रचंड प्रेम दिले.

यावर मला कवी इंद्रजित भालेरावांच्या ओळी आठवतात.

“तू सत्तेत असलास काय नसलास काय,
तुझ्या प्रतिमेला ढळ नाही…
तुझे बळ सत्यात आहे ,
सत्तेत नाही मत्तेत नाही…”

अजितदादा कायमच प्रसिद्धीपासून लांब असल्याचे दिसतात.कधी पत्रकारांच्या गराड्यातही हा माणूस दिसत नाही. आता तरी पत्रकारांनी या दिलदार माणसावर प्रेम करावे व दादांनीही पत्रकारांच्यात रुळावे असे दादांवर प्रेम करणाऱ्या करणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. आपल्या कामावर प्रचंड निष्ठा असलेला हा नेता आहे. २०१९ ला राज्याचे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही दादांची कामाची शैली तीच आहे.

सध्या देशात आणि राज्यात करोनाचे मोठे संकट आहे. या संकट काळातही दादा पडद्यामागून राज्याचा गाडा सुरळीतपणे चालवताना आपणास दिसत आहेत. नुकतेच निसर्ग चक्रीवादळाने राज्यातील काही भागात प्रचंड नुकसान केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दादा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर गेले व शेतकऱ्यांच्या बांधावरून जिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना आदेश देणारे अजितदादा महाराष्ट्राने पाहिले. प्रशासनावर देखील दादांची प्रचंड पकड आहे. प्रशासनात दादांचा आदरयुक्त दरारा असल्याचे सर्वच क्षेत्रातील लोक मान्य करतात. अधिकारी वर्गाला देखील अजितदादांबाबत खूप आदर वाटतो.

बाहेरून कडक व शिस्तप्रिय असणारे दादा हे आतून एकदम मऊ व हळवे आहेत. याचे अनेक किस्से आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देणे, ओरडणे व तेवढेच प्रेम करणे दादांकडून शिकावे. दादांनी महाराष्ट्रातील विविध स्तरातील गोरगरीब कार्यकर्त्यांना त्यांच्या क्षमतेनुसार ताकद देऊन राजकारणात विविध पदे दिलेली अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. अजित दादांचे झटपट काम केल्याचे भारी भारी किस्से आहेत ते महाराष्ट्राला ज्ञात आहेत. दिलेला शब्द पाळणाऱ्या या नेत्याने बरेच लोकांना सांगून आमदार केले व बऱ्याच लोकांना सांगून पडल्याचेही अनेक किस्से आहेत.

प्रचंड दूरदृष्टी असलेला, राज्याच्या विकासाची खऱ्या अर्थाने तळमळ असलेला, जे बोलेल तेच करणारा, महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला हा माणूस आत्तापर्यंत राज्याचा मुख्यमंत्री होऊन जायला पाहिजे होता असे मला मनोमन वाटत आलेले आहे व पुढे या माणूसाने नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे असेही तुम्हाला सर्वांना कायमच वाटत असते.अजितदादा हे लढवय्ये, कष्टप्रिय नेते आहेत ते एक दिवस नक्कीच राज्याचे नेतृत्व करताना दिसतील. शेवटी मी एवढेच सांगतो शरद पवार साहेबांच्या बाबतीत जसे साहेब हे देशाला न लाभलेले सर्वोत्कृष्ट पंतप्रधान आहेत असे बोलले जाते तसेच दादांच्या बाबतीत देखील दादा हे महाराष्ट्राला न लाभलेले व भविष्यात लाभणारे आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री आहेत असे मला वाटते.

दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • आकाश भरत झांबरे पाटील
  • लेखक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहेत

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.