राजेश पायलट यांनी थेट सोनिया गांधींना आव्हान दिले होते
राजस्थानमध्ये सध्या मोठा राजकीय संघर्ष चालू आहे. राजस्थानचे कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट नाराज असल्याने ते कॉंग्रेस सोडणार अश्या चर्चा सुरु आहे. त्यांनी कॉंग्रेस सोडली नसली तरी त्यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत जे बंड केले ते मात्र अजून कायम आहे.
असंच एक बंड सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांनीही केले होते.
राजेश पायलट हे काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. कधी कळी त्यांनी थेट कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे केले होते. पण त्यांनी कॉंग्रेस मात्र कधीही सोडली नाही. सन 2000 मध्ये राजेश पायलट यांचे निधन झाले तोपर्यंत ते कॉंग्रेसमध्येच सक्रीय होते.
राजेश यांचा जन्म १९४५ सालचा. त्यांनी करियर म्हणून भारतीय हवाई दलाची निवड केली. हवाई दलामध्येच जवळपास 13 वर्षे त्यांनी सेवा बजावली आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
पायलट असलेल्या राजेश यांनी संजय गांधी यांच्यामार्फत पक्षात प्रवेश केला आणि १९८० मध्ये त्यांनी राजस्थानमधील भरतपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढली आणि जिंकलीही.
सुरुवातीच्या काळात राजेश संजय गांधी यांच्या जवळचे होते. पण कालांतराने ते राजीव गांधी यांच्याही जवळच्या गोटात सहभागी झाले. गांधी परिवाराच्या जवळ राहत त्यांनी अनेक वर्ष दिल्लीच्या राजकारणात मोठा दबदबा निर्माण केलाच पण राजस्थान मध्येही त्यांनी स्वतःला मानणारा मोठा वर्ग निर्माण केला होता.
१९९१ साली राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कॉंग्रेसच्या नेतृत्वासाठी अंतर्गत वाद निर्माण झाल्यानंतर राजेश पायलट त्यात बरेच सक्रीय होते.
पायलट यांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वासाठी निवडणूकही लढली होती. १९९७ साली कॉंग्रेस अध्यक्ष पदासाठी सीताराम केसरी यांच्याविरोधात निवडणूक पायलट यांनी लढवली. खरतरं दीर्घकाळ बिनविरोध अध्यक्ष निवडण्याची प्रथा असलेल्या कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक ही एक वेगळीच घटना ठरली.
पण या निवडणुकीत पायलट यांना यश आले नाही. सीताराम केसरी यांनी शरद पवार आणि राजेश पायलट या दोन्ही नेत्यांचा पराभव केला.
सीताराम केसरी जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हाच सोनिया गांधी राजकारणात सक्रीय होवू लागल्या. ११९७ सालीच सोनिया यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर पुढच्याच वर्षी १९९८ साली सोनिया गांधी काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या. तर १९९९ मध्ये सोनिया गांधी कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशमधील अमेठी अश्या दोन जागेवरून निवडून आल्या.
सोनिया गांधी लोकसभेत निवडून आल्यावर त्या पंतप्रधान होणार अश्या चर्चा सुरु झाल्या. याच प्रश्नावरून कॉंग्रेसमध्ये दुही माजली. शरद पवार, पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी कॉंग्रेसपासून फारकत घेतली. त्याच वेळी राजेश पायलट हेदेखील कॉंग्रेस सोडणार अश्या चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगल्या. पायलट कॉंग्रेसमध्येच राहिले. पण कॉंग्रेसच्या नेतृत्वापासून त्यांचे अंतर हळूहळू वाढत चालले होते.
२००० साली जेव्हा पुन्हा कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक झाली तेव्हा देखील सोनिया गांधी पुन्हा बिनविरोध अध्यक्ष होण्याच्या वाटेवर असताना च कॉंग्रेसमधलेच बंडखोर नेते जितेंद्र प्रसाद यांनी अध्यक्ष पदासाठी सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढविली.
जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा राजेश पायलट यांनी जितेंद्र प्रसाद यांना समर्थन दिले होते.
अध्यक्ष पदाच्या या निवडणुकीत सोनिया गांधी बहुमताने जिंकल्या. पण सोनिया गांधी यांच्या विरोधात राहूनही राजेश पायलट मात्र कॉंग्रेसमध्ये राहिले. दरम्यान, 11 जून 2000 रोजी राजेश पायलट यांचे एका रोड अक्सिडेंत मध्ये निधन झाले.
एकप्रकारे राजेश पायलट यांनी थेट गांधी परिवाराला आव्हान दिले होते. पण राजकारणाच्या प्रवेशापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत ते कॉंग्रेसमध्ये राहिले.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम