Take a fresh look at your lifestyle.

‘फक्कड’ची गोष्ट

0

खरं सांगायचं तर ही कुठली गोष्ट नाही पण ह्याला एका ‘ब्रॅंड’चा आत्तापर्यंतचा प्रवास म्हणू शकता.
कोणताही ‘ब्रॅंड’ म्हणला की ‘मॅनेजमेंट’ आली आणि त्याच्याच भाषेत बोलायचं झालं तर कुठल्याही ब्रॅंडची सुरुवात ही त्यामागील व्यक्तींपासून होत असते, तशीच ती इथेही झाली. कर्मधर्मसंयोगाने ती व्यक्ती मी स्वतःच असल्याने गोष्टीचा लेखकही मीच ! त्यामुळे आधी माझा झालेला प्रवास इथे सांगायला लागतोय. पण आपण स्वतः कोणी थोर वगेरे व्यक्ती नसल्याने ह्याला ‘आत्मकथन’ सारखे जड शब्द वापरण्यापेक्षा ‘गोष्ट’ हे सुटसुटीत नाव घेणंच इथे योग्य वाटतंय.        

आमच्या घरचा व्यवसाय हा मी प्राथमिक शाळेत असताना सुरु झाला. बिझनेसच्या बाबतीत ‘पॅशनेट’ असलेल्या वडिलांनी मोठ्या कंपनीतल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा देऊन शब्दशः घरातच प्लास्टिक मोल्डिंगपासून सुरु केला. तो यथावकाश ‘स्पेशालिटी प्लास्टिक इंजीनियरींग कॉंपोनंटच्या’ मोठ्या व्यवसायात बदलला. पण सुरुवातीला ‘पेन’ हे आमचं पहिलं प्रॉडक्ट ! वडील संध्याकाळी कामावरून आल्यावर दिवसाआड बॉलपेन-फौंटन पेन मोल्डिंग करायचे. आई दुसऱ्या दिवशी ती तयार करून ठेवायची आणि संध्याकाळी वडील स्टेशनरी स्टोर्स मध्ये विकायला लागायची. त्या धंद्यात नफ्याचं त्याहीकाळी अत्यल्प होतं. ३-३.५ रुपये/लिटर पेट्रोल असतानाही, दुचाकी घेऊन डिलिव्हरी टाकणे परवडायचं नाही. (ती बिलं त्यांनी अनेक वर्ष जपून ठेवली होती) त्यामुळे दिवसभर कंपनीत नोकरी करून आल्यावर, सायकलवर पेन सप्लाय करायला जायचे. मला सगळ्याची फार झळ पोचायची नाही किंवा त्याची जाणिव व्हायचं तेव्हा वय नव्हतं, पण व्यवसायातली आर्थिक प्राप्ती यथातथाच होती. त्यामुळे सुरुवातीला वडिलांच्या व्यवसायाला हातभार म्हणून हाताला चव असलेल्या माझ्या आईनी दर आठवडयाला घरातून इडली सांबार बनवून विकायचा, जेवणाचे डबे द्यायचा किंवा कोकणातली मेतकुट, कुळीथ पीठासारखी उत्पादने विकण्यापासून ते आजचा एक नावाजलेला मराठी ‘ब्रॅंड’, ‘पितांबरी’ ,पुण्यात पहिल्यांदा आणून विकण्यापर्यंत अनेक पूरक व्यवसाय केले. आईला मदत म्हणून शाळेत जातायेता पुण्यातल्या  पेठांमधून, त्या मालाची सायकलवरून डिलिव्हरी करणे, त्याचं चलन करून हिशोब घरी देणे अशी बारीकसारीक कामे करायला लागायची. त्यातून किराणा मालाचं ‘मार्केट’म्हणजे काय? ते थोडफार शिकता आलं.

कामगार म्हणून स्वतःच्या करियरची सुरुवात करून त्या कंपनीत सेक्शन इंचार्जपर्यंत पोचलेल्या वडिलांनी ८४ साली नोकरी सोडून, पूर्णवेळ व्यवसाय सुरु केला. त्यानंतर मला काम देण्यातही आपला वेळ दवडला नाही आणि साधारण आठवीत असल्यापासून अस्मादिकांची प्रत्येक मोठ्या सुट्टीतला बरेच दिवस, सिंहगड रस्त्यावर नेलेल्या कारखान्यात जायला लागला लागलो. सुरुवातीला (इच्छा नसताना) झाडू मारणे, मशीन साफ करणे ही कामे करायला लागली. काहीच दिवसात हीच कामे करताना त्यातलेही बारकावे लक्षात यायला लागले. मग ती कामे आवडीने करायला लागलो. आता त्याचा विचार करताना त्यातून झालेला  मुख्य फायदा लक्षात येतो, की खूप लहान वयापासून आपल्या मनातली ‘कामाची लाज’ हा प्रकार कायमचा नाहीसा झाला. कोणतही कष्टाचं काम कधीच लहान नसतं हा समज, कोणीही न बोलता मनात कायमचा कोरला गेला.

 झाडू मारण्यासोबतच मशीन साफ करताना रोज त्याचे ऑयलींग करणे वगेरे कामं करताना ‘प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचं’ महत्व समजत गेलं. ह्या सगळ्या कामांचा पुढे खूप उपयोग झाला, आजही होतोय.
मोठा होत असतानाच कंपनीतल्या कामाचं स्वरूपही बदलत होतं. कंपनीची वाढ व्हायच्या सुमारासच, बारावीनंतर एकीकडे शिक्षण सुरु ठेवून घरच्या व्यवसायात पूर्णवेळ दाखल झालो.
त्यात मशीन मेंटेनन्स, कामगार प्रश्न, वकील, सरकारी लोकांबरोबर बोलणं, कारखाना शिफ्टिंग, नवी टीम बनवणे, आहेत त्या रिसोर्सेस मधून ऑर्डर्स वेळेवर पूर्ण करणं असे सगळेच अनुभव एकेक करत मिळत गेले. व्यवसायाच्या गरजेमुळे कॉलेज (आणि कँटीन) फक्त पार्टटाईम अटेंड करून एकीकडे कॉमर्समध्ये पदवीधर झाल्यावर घरच्यांच्या थोडं मनाविरुद्धच पुढचं ‘मॅनेजमेंट’चं शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला, ते शिक्षण मात्र आजतागायत सुरु आहे. ह्या शिक्षणाने मधल्या काळात आपण (ही) क्रमिक शिक्षण घेऊ शकतो हा आत्मविश्वास परत दिला.        

माझ्या मते ‘मॅनेजमेंट’च्या शिक्षणाचा आपल्याला होणारा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, हे शिक्षण घेत असताना आपण नेहमी करतो, त्या कामाच्या मागे असलेली ‘थियरी’, त्याचे मोजमाप, त्याच्या पद्धती आणि अनेक “सो कॉल्ड” विद्वान लोक, अशिक्षितांच्या तोंडावर वाट्टेल तश्या फेकतात त्या ‘जार्गन्स’ आणि त्या मागचा खरेपणा/फोलपणा समजतो. तिथेही काही उत्तम गुरु मिळाले. ते पार्टटाईम शिक्षण झाल्यावर व्यवसायात काम करतानाच, ‘मॅनेजमेंट’विषयाशी संबंधित युनिव्हर्सिटीचे इतरही काही पदव्युत्तर पार्टटाईम डिप्लोमा केले. भविष्यातल्या कामात उपयोगी पडतील असे वेगवेगळ्या विषयांवरचे छोटेमोठे कोर्सेस केले, सेमिनार्सना हजेरी लावली. त्या सगळ्याचाच कुठेनाकुठे उपयोग होत रहातो. उदाहरणार्थ, ‘ग्राफालॉजी’ म्हणजेच हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखायचा एक कोर्स केला होता. त्याचा प्रत्यक्ष माझ्या कामाशी संबंध शून्य ! पण त्यातून व्यक्तींचे स्वभाव न भेटताही समजायला लागले. तो कोर्स केल्यानंतर काही महिने फावल्या वेळात पुणे पोलीसांकरता, तत्कालीन पोलीस कमिशनरांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेगारांचे स्वभाव ओळखायची एक ‘असाईनमेंट’ करायला मिळाली. त्याचा उपयोग पुढे स्वतःच्या कंपनीत माणसे कामाला ठेवायला, एखाद्याला काम देताना किंवा अनेक प्रसंगी आजही होत असतो.

एकीकडे कंपनीत मशीनवर ‘फुल टाईम’ कामगाराची सुरु असलेली ड्युटी संपली. स्वभावातल्या कुतूहलामुळे त्या काळात फक्त एक चांगला ‘मशीनिस्ट’ होण्यापलीकडे आपण जे काम करतोय त्याचं प्रत्यक्ष कामातलं ‘अॅप्लिकेशन’ डोळसपणे बघायची सवय लागली. काही काळ सेल्सचे काम करायची संधी आली. त्यानिमित्ताने महाराष्ट्रात, देशात अनेक ठिकाणी औद्योगिक प्रदर्शनांना भेटी देता आल्या, त्यात स्वतःच्या कंपनीचा स्टॉल लावता आला. त्यातून अनेक अनुभव येत गेले, महाराष्ट्राबाहेरचे काही मोठे कारखाने बघायला मिळाले. सेल्स आणि मार्केटिंग मधली ‘गॅप’ हळूहळू भरून निघत होती. आजूबाजूला नेहमी सुरु असलेल्या कामाच्या गरजेच्या अनेक गोष्टी, सोप्या करून घ्यायला शिकलो. मनात अनेक ‘प्रॉडक्ट’ च्या आणि अनेक वेगवेगळ्या कल्पना सुचायला लागल्या. त्यातूनच कंपनीत तयार होणाऱ्या ‘प्रॉडक्ट’ मधे ‘व्हॅल्यू अॅडीशन’ करून स्वतःची काही ‘प्रॉडक्ट’ बनवायला लागलो. त्याकाळी प्रत्येक गोष्टीत मला, माझ्या गियरबॉक्स वर होऊ शकणारी ‘प्रॉडक्ट’ दिसायची. अगदी एखादा इंग्रजी ‘हॉरर मुव्ही’ बघताना देखील एखादी कल्पना सुचायची. तसेच एखादी घटना मनात कधी,कशी उगम पावेल आणि त्याचा वापर आपण कधी करू हे आपल्यालाही कधी सांगता येत नाही. अशीच एक घटना पुण्यात अनुभवायला मिळाली २००१ किंवा २ मध्ये. आठवण म्हणून फार चांगली म्हणता येणार नाही पण तिने मनात कायमचं घर केलं. आयसीसी ट्रेड टॉवर बांधण्याआधी मराठा चेंबरनी त्याच जागी पहिल्यांदा इंडस्ट्रीयल एक्स्पो भरवायला सुरुवात केली.

आम्ही काही मित्रांनी आमच्या क्लबमार्फत तिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीयल प्रॉडक्टसकरता एकत्र स्टॉल्स घेतले होते. प्रदर्शनात भरपूर इंडस्ट्रीयल प्रॉडक्ट असली तरीही बोफोर्स सारख्या तोफा ठेवल्याने आणि सर्वसामान्य लोकांनाही मुक्त प्रवेश असल्याने प्रदर्शनात सगळ्यात जास्ती गर्दी व्हायची ती खाण्याच्या पदार्थांच्या दालनात. आम्ही सगळे मित्र रोज त्या दालनात घरून आणलेले आमचे डबे घेऊन जेवायला जात असू. त्याबरोबर तिथले थोडेसे काही पदार्थ घेऊ म्हणून पदार्थाची यादी बघायचो, त्यात एकही पदार्थ ‘मराठी’ नसायचा. माझ्या आठवणीप्रमाणे कॉंन्ट्रॅक्टर/सब कॉंन्ट्रॅक्टर कोणीतरी पंजाबी इसम होता. वास्तविक पंजाबी माणसांशी माझं चांगलं पटतं. पण त्या माणसाला मी, “इथे मराठी पदार्थ का नाहीत?” विचारल्यावर त्यांनी मला “हे प्रदर्शन ‘चांगल्या लोकांचे’ आहे,त्यामुळे मराठी पदार्थ ह्या प्रदर्शनात चालणार नाहीत. आम्ही फक्त पंजाबी, जैन, चाट आणि कॉंटीनेंटलच पदार्थच ठेवतो” असं उद्दाम उत्तर दिलं होतं. ते ऐकून तरुण मराठी रक्त एकदम सळसळलं ! म्हणजे? इथे येणारी मराठी माणसं चांगली नसतात? आणि हे एक उत्तर भारतीय आम्हाला पुण्यात येऊन सांगणार? स्टॉलवर इतर कोणी नसल्याने त्याला चांगलं समजावून सांगण्यायेवढा वेळ माझ्याकडे नव्हता, ते एका अर्थी बरंच झालं ! पण मी प्रदर्शनाच्या त्या चार दिवसात मीही त्याच्याकडे इतर काहीच विकत घेतलं नाही. प्रदर्शन संपल्यावर शांतपणे विचार केला. ह्याला कारण आपण मराठी लोकंच आहोत. तेव्हापासून आपण एक तरी मराठी पदार्थ जगात पोचवायचा, त्याचा एक भाग व्हायचं अशी सुप्त इच्छा मनात कायमची मुक्काम करायला आली. पण त्यावेळेचा व्यवसाय वेगळा होता, तिथे ‘फूड’शी संबंधित काहीच नव्हतं.

एकीकडे प्रॉडक्ट डेव्हलप करतच होतो. माझ्या ताब्यात दिलेल्या  ‘मिनीएचर गियरबॉक्स’ पासून अनेक वेगवेगळी ‘एंड प्रॉडक्ट’ करायला लागलो. त्यात मोटराईझ्ड स्क्रू ड्रायव्हर, लस्सी मेकर केले. इंस्युलेटेड मिनी बार्बेक्यू करून त्याला ‘कबाब मेकर’तयार केले. फ़ाईव्ह स्टार हॉटेलातल्या प्रदर्शनात भाग घेऊन तेही भरपूर विकले. पण ह्यातली बहुतांशी प्रॉडक्ट ही काळाच्या आधी केली, ही एक चूक झाली.
२००० सालच्या सुमारास भारतात अनेक नव्या बँका, मोबाईल फोन कंपन्या सुरु झाल्या. मल्टीप्लेक्स, मॉल्स उभे राहायला लागले. एवढे वर्ष परंपरागत पद्धतीने सुरु असलेल्या सगळ्याच क्षेत्रात अचानक मोठी स्पर्धा सुरु झाली. नवीन कंपन्या जाहिरातीचे मोठे बजेट घेऊन मार्केटमध्ये आल्या. त्यातून भारतात आत्तापर्यंत दुर्लक्षित अश्या एका निराळ्याच क्षेत्राचा उदय झाला. तो म्हणजे Visual Merchandising. कस्टमर्सना आकर्षित करणाऱ्या नवनव्या ‘अॅड डिस्प्ले’ची गरज भासायला लागली. “माझ्याकडून गियरबॉक्स घेऊन अॅडव्हर्रटाईझमेंट करता लागणारे डिस्प्ले करून विका”, ही आयडिया अनेकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी कोणी करत नाही तर, आपणच करून विकू! ह्या इर्षेने वेगवेगळ्या प्रकारचे डिस्प्ले बनवले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक कस्टमर्स, सबंध भारतातून यायला लागले. त्याच सुमारास वडिलांनी स्वत:ची  वेगळी कंपनी सुरु करायला लावली. आणि अशी अनेक ‘प्रॉडक्ट’ तयार करायला लागलो. गियरबॉक्सवर आधारीत अनेक इंडस्ट्रीयल प्रोजेक्टस करून द्यायला सुरुवात केली. काही मशीन्स तयार करून दिली. उदा:सराफांची काम करणाऱ्या लोकांना, सोन्याच्या बांगड्या बनवायचं मशीनची ‘प्रॉडक्टीव्हीटी’ वाढवून देणे, इत्यादी. दिवसभरात स्किल्ड वर्कर कडून होणाऱ्या बांगड्या मग अर्ध्या तासात व्हायला लागल्या. ह्यातूनही परत मोठा अनुभव मिळाला. पण टेक्निकल पेक्षाही कमर्शियलच जास्ती !

आमच्या मिनी गियर बॉक्सेसचं मोठं ‘सेल्स अॅप्लिकेशन’ प्रोटोटाईप्स आणि इंजिनियरिंगच्या वियार्थ्यांच्या प्रोजेक्टस मध्ये होतं. आम्ही आधीही ह्या लोकांना सप्लाय करायचो पण तो ‘सेल’ पुरेसा नव्हता. ह्या ‘प्रॉडक्ट’ चे फायदे अनेक होते. मग काही इंजिनियरिंग कॉलेजेस मध्ये प्रोफेसर्सना प्रत्यक्ष जाऊन भेटलो. त्यांना ह्या प्रॉडक्टचं महत्व पटवून द्यायला लागलं. त्या निमित्ताने अनेक प्रोफेसर्सबरोबर चांगली रिलेशन्स झाली. त्यांनी पाठवलेल्या आणि इतरही विद्यार्थ्यांना माझ्या स्वतःच्या कारखान्यात प्रोजेक्टकरता लागणारी इतरही ‘प्रॉडक्ट’ नाममात्र दरात पुरवायला लागलो. मुख्य म्हणजे त्यांना माझ्याकडे असलेल्या जागेचा मुक्तपणे वापर करून द्यायला लागलो. अनुभवाने त्यातून खरोखरच इंजिनियरिंगची खरी आवड आणि कल्पकता असलेली मुलं भेटायला लागली. मी चुकत नसेन तर, साधारण २००० सालाच्याच सुमारास ‘आयआयटी’ मधल्या ‘टेकफेस्ट’च्या धर्तीवर पुण्यातल्या काही इंजिनियरिंग कॉलेजेसनी ‘रोबोटिक्स’ वरच्या खुल्या स्पर्धा आयोजित करायला सुरुवात केली. बहुतांशी सगळ्याच स्पर्धांमधे सगळ्या मुलांनी ‘रोबोटिक व्हेईकल’ तयार करून त्यांची आपापसात स्पर्धा लावायचे. सुरुवातीला मीही काही मुलांना तश्या ‘व्हेईकल’तयार करून दिल्या. पण कालांतरानी त्यात मुलांची ‘क्रियेटिव्हीटी’ फार मर्यादित रहाते असं लक्षात आलं. ती ‘क्रियेटिव्हीटी’ मर्यादित न राहू देता त्यांनी स्वतःच्या कल्पनेचा मुक्त वापर करून चांगल्यात चांगला प्रोजेक्ट तयार करावा आणि इंडस्ट्रीमधून त्याला मागणी यावी आणि ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम आपण करावं, अशी एक संकल्पना डोक्यात आली. त्यासाठी माझ्या क्लबमधले माझे सिनियर मित्र आणि रिटायर्ड विंग कमांडर श्री. चतुरसाहेब ह्यांच्या सोबत ‘रोबोत्सव २००४’, हे विद्यार्थ्यांची कोणतीही कल्पना कमी न लेखता, त्यांच्या कल्पनांची  आपापसात होणारी भारतीय स्तरावरची स्पर्धा+ रोबोटिक्स आणि इंडस्ट्रीयल ऑटोमेशन ह्या विषयाला वाहिलेले पहिले इंडस्ट्रीयल एक्स्पो पुण्यात फेब्रुवारीमध्ये केलं. त्यात पुण्याच्या COEP कॉलेजच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटनी आयोजनात उत्स्फूर्त मदत केली. किर्लोस्कर ऑईल इंजिनचे आणि मराठा चेंबरचे तत्कालीन चेअरमन श्री.अतुल किर्लोस्कर ह्यांच्या हस्ते रोबोला फित कापायची व्हॉईस कमांड देत नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रदर्शांनाचं उदघाटन झालं. जगातल्या सगळ्यात मोठ्या दुर्बिणींच्या प्रोजेक्टचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉ.गोविंद स्वरूप ह्यांनी आणि विद्यार्थी, इंडस्ट्री, आयआयटी कानपूर इथले प्रोफेसर्स, मी ज्यांना सप्लाय करत होतो ते R&D दिघी, भाभा ऑटोमिक रिसर्च इथल्या उच्चपदस्थांनी रोबोटिक्सकरता आम्ही करत असलेल्या कामामुळे अगदी प्रेमानी हजेरी लावली. त्यांनी तसेच पुण्यातल्या ‘पारी’ सारख्या ख्यातनाम कंपनीच्या MD नी आमच्याकडे रोबोटिक्स विषयावर सेमिनार दिली. रोबोटिक्स विषयात काही न समजणाऱ्या पण कुतूहल असणाऱ्या सर्वसामान्य लोकांसाठी इथे त्याच्या इतिहासापासून आत्तापर्यंतचे त्याचे उपयोग ह्याची  माहिती देणारे बूथ लावले होते. चार दिवस जवळपास २०,००० लोकांनी प्रदर्शन अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. पण ही इव्हेंट पुढे सुरु ठेवणं आम्हाला काही कारणांनी जमलं नाही. काही काळानी माझ्या स्वतःच्या युनिटचे पुन्हा घरच्या व्यवसायात हस्तांतरण करून, घरच्याच कंपनीत लक्ष द्यायला सुरुवात केली. १९९४ ते २०१४ व्यवसायात पूर्ण २० वर्ष दिल्यावर मध्ये घरच्या व्यवसायाला कंटाळलो आणि त्याच्याशी संबंधित कुठलाही व्यवसाय करायचा नाही असं ठरवून, घरच्यांच्या संमतीने एका जुन्या मित्राबरोबर रियल इस्टेटमध्ये प्लॉटींगचा व्यवसाय करायला थेट नागपूर गाठलं. एक नातेवाईक आणि काही जुजबी ओळखी सोडल्या तर नागपुरात इतर कोणीच आधीपासून ओळखीचं नव्हतं. खिशात फारसे पैसेही नव्हते. कंपनीत काम केल्याच्या पुंजीवर थोडेफार पैसे मिळाले होते, त्यातले बरेचसे एक दुचाकी घेण्यात गेले.
आधी फक्त एकदा नागपूरला येऊन गेलो होतो. त्यात ऐन एप्रिलचा उन्हाळा. नवीन शहर, नवीन काम, त्यात नागपूरच्या “ओ भौ,कायले चिंता करून र्हायले? होऊन जाईल ना सावकाश?” टाईप संथ कामाची सवय नव्हती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात त्याच्याशी मॅच करून घेणं फार अवघड गेलं. पण नंतर रुळलो, नागपूर आवडलं. चांगल्या मित्रपरिवारामुळे स्कीममधले काही प्लॉट विकता आले, परत एका वेगळ्या कामाचा अनुभव मिळाला. नागपुरात एकटाच रहात असल्याने रोजचे दोन्ही जेवण  बाहेरच होत असे. कामानिमित्त सावनेर किंवा भंडारा रोड, उमरेड अगदी चंद्रपूरपर्यंत फिरायला मिळालं. त्यानिमित्ताने नागपूरमधले किंवा आसपासचे प्रसिद्ध असलेले तर बहुतेक सगळे फूड जॉईंट पालथे घातले. नागपुरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार काही चांगले मित्रही मिळाले. पण घरी मुलगा अगदीच लहान असल्याने नागपुरात ४-५ वर्ष राहून काम करायचा बेत रद्द करून ६ महिन्यात बराच बरावाईट अनुभव घेऊन परत आलो. घरची कंपनी पुन्हा बघायची ऑफर नाकारून, पुन्हा एकदा फारशी माहिती नसलेला म्हणजे टुरिझमचा व्यवसाय करायचा विचार नक्की करून पुण्यात परतलो.
वर्षभर तोही करून झाला, त्यासाठी एक दुकान भाड्याने घेतलं. त्यात ग्रुप टूर्स बरोबरच कोकणापासून ते विदर्भापर्यंत वर्षभर पिकनिकला जाता येतील अश्या ६०-७० ठिकाणी हॉटेल्स, बंगले, होम स्टे द्यायला सुरुवात केली. रोज न चुकता ११-१२ तास ऑफिसमध्ये बसून काम करत बसायचो. पण ह्या व्यवसायात मन रमत नव्हतं. मन रिकामं होतं, त्या वेळी अचानक आपल्याला थोडंबहुत लिहिता येतं, हा साक्षात्कार झाला.
एक दोन मित्रांना पहिला लेख वाचायला दिला. त्यातून थेट लोकसत्ताच्या सोशल मीडियामध्ये ब्लॉग लिहायची संधी मिळाली. त्यानिमित्ताने दररोज नाही पण अधूनमधून लिहायला लागलो. तसे काम सोडून आवडीचे विषय अनेक आहेत. त्यातही चित्रपट, गाणी आणि सगळ्यात जास्ती म्हणे ‘चविष्ट खाणं’ ह्यावर मनापासून प्रेम. त्यामुळे सुरुवातीला त्यावर लिहायला लागलो. ब्लॉगला बऱ्यापैकी वाचकसंख्या मिळायला लागली. मग मिळालेल्या एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मचा उपयोग समाजापेक्षा काही कारणांनी /दुर्दैवाने वंचित राहिलेल्या घटकांसाठी करावा. जे लोक खडतर परिस्थितीतही कोणापुढे हात न पसरता कष्ट करून, स्वतःच्या पायावर उभे राहतात, त्यांच्यावर एक लेखमाला लिहिली.

त्याच सुमारास टुरिझमचा व्यवसायासाठी घेतलेले दुकान सोडून, सिंहगड पायथ्याला एक आमराई असलेला बंगला चालवायला घेतला. तिथे होम स्टे द्यायला सुरुवात केली. व्यवसायही चांगला चालायला लागला. तरीही मुळात ‘प्रॉडक्ट बेस्ड ’ काम त्यातूनही मोनॉपोली असलेलं काम केलेलं असल्याने  १०-२०% टक्के देण्याघेण्याच्या ह्या व्यवसायात मनापासून रमत नव्हतो. त्याचवेळी किमान एक मराठी पदार्थ जगभरात पोचवायची जुनी कल्पना डोक्यात पुन्हा शिरली. पण तो पदार्थ कुठला? तर जो पदार्थ आपण अगणितवेळा बाहेर खाल्लेला आहे. फक्त आपणच नाही तर उभ्या महाराष्ट्रात ज्याचे लाखो चाहते आहेत त्या मिसळीची निवड ह्यासाठी केली. मग तो पुढे आणायचा तर कसा? तर सुरुवातीला हक्काच्या आगी म्हणे आमराईतच ‘मिसळ महोत्सव’ करायची कल्पना नक्की केली. त्यावेळी नाशिकमध्ये श्री.विश्वास ठाकूर ह्यांनी आयोजित केलेला मिसळ महोत्सव, महाराष्ट्रात पहिल्यांदाच झाला होता. पण पुण्यात किंवा इतर शहरात दुसऱ्या कोणी हा प्रयत्न केला नव्हता. ठाकूरसाहेबांनी त्याचं आयोजन नेमकं कसं केलं होतं ते जाणीवपूर्वक न विचारता, स्वतःच्या कल्पनेनी नियोजन करायला सुरुवात केली. निवडलेली तारीख जेमतेम पंधरा दिवसांवर होती. सिंहगडची आमराई पुण्यात असली तरी लांब आहे, काम कसं करणार? तुझ्याकडे ह्यासाठी लागणारी टीम आहे का? स्टॉलवाले कोण येतील? त्यांना तुझ्याबद्दल विश्वास वाटेल का? अश्या असंख्य प्रश्नांना अक्षरशः फाट्यावर मारत काम करायला सुरुवात केली.
आमच्या आमराईचे मालक आणि मित्र राजुशेठ लोहकरे, डोणज्याचे सरपंच श्री.पारगे, जाणते ग्रामस्थ आणि त्याहीपेक्षा स्नेही म्हणून जास्ती जवळचे श्री.आप्पा नानगुडे, ह्यांच्या सारख्या मातब्बर मित्रांमुळे इतर कुणाला सहसा न मिळणारं गावाचं संपूर्ण सहकार्य मिसळ महोत्सवाला लाभलं.
पुणेरी, कोल्हापुरी, नाशिकची, उपासाची अश्या वेगवेगळ्या चवींच्या मिसळी महोत्सवात आणता आल्या. बजेटची वानवा असल्याने जाहिरातीसाठीही पैसे नव्हते. पण पुन्हा एकदा येवढे वर्ष जोडलेला मित्रपरिवार मदतीला धावून आला. नुसत्या इव्हेंटपेक्षाही त्यामागे असलेला हेतू  समजल्यावर फेसबुकवरच्या मित्रांनी मिसळ महोत्सवाची पोस्ट प्रचंड व्हायरल केली. त्याच बळावर पुणे शहरापासून २० किलोमीटर अंतर, नवरात्रातले उपासाचे दिवस असे अनेक ‘ऑडस’ तीनेक हजार लोकांनी तीन दिवसात महोत्सवाला भेट दिली.

पहिला महोत्सव यशस्वी झाल्यावर दुसरा ” मिसळ आणि बरंच काही ” हा  महोत्सव पुण्यात सहकारनगरात आयोजित केला. त्याचे आयोजन काहीश्या मोठ्या प्रमाणावर करता आले. त्याच्याआधी काही दिवस आधी एक प्रयोग म्हणून ख्यातनाम शेफ देवव्रत जातेगावकर ह्यांचा टिफिन रेसिपीज ह्या स्पेसिफिक थीम देऊन एक कुकरी शो केला. मिसळ महोत्सवाचे उदघाटनही प्रसिद्ध शेफ श्री.विष्णु मनोहरजी ह्यांच्या हस्ते केलं. ह्या  मिसळ महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे मिसळ ह्या पदार्थाची परंपरा जपलेल्या काही नामवंत व्यक्ती, संस्था ह्यांचे जाहीर सत्कार केले. ह्यात दादरच्या प्रसिद्ध हॉटेल आस्वाद, नाशिकला मिसळ महोत्सवाची मुहूर्तमेढ रचणारे श्री. ठाकूर, महाराष्ट्रातील मिसळीचे अजूनही सुरु असलेले  सगळ्यात जुने वैद्य उपहार गृह ,गेले अनेक वर्ष पुणेरी मिसळीची परंपरा जपणारे बेडेकर उपहार गृह ह्यांचे सत्कार विष्णुजींच्या हस्ते केले. ह्या सगळ्यात सातव हॉलचे संचालक श्री. अनिल आपटे आणि परिवाराचे सहकार्य लाभले. हा महोत्सवही दणक्यात पार पडला. दोन्ही महोत्सवात आलेल्या मित्रमंडळींबरोबरच, जमेल  तेवढ्या इतरही पाहुण्यांना आवर्जून भेटत होतो. व्यवस्थेबद्दल , त्यांनी खाल्लेल्या  मिसळींबद्दल, इतरही पदार्थांबद्दल त्यांची मतं घेत होतोत्यातून मनात अनेक आडाखे बांधले जात होते.

हा महोत्सव झाल्यावर पुन्हा विचारात पडलो की आपल्याला जर किमान एक मराठी पदार्थ जगभरात पोचवायचा असेल तर फक्त महाराष्ट्रातल्या एका शहरात मिसळ महोत्सव करुन तो उद्देश कितपत साध्य होणार ? मग ह्यापुढे काय ? ह्या महोत्सवातून माझा झालेला वैयक्तिक फायदा म्हणजे हजारो लोकांच्या मिसळीच्या आणि एकंदरीत खाण्याच्या  मग पॅकेज्ड फुड च्या माध्यमातून जर आपल्याला लोकांना आवडलेली मिसळ देता आली तर आपण जगभरातील लोकांपर्यंत पोचू. असा विचार करुन स्वतःच्या रेसिपीची मिसळ पॅकेज्ड फॉर्म मधे बनवायच्या प्रयोगाला सुरुवात केली. आपल्या प्रॉडक्टमधे कोणत्याही पद्धतीचे कृत्रिम रंग किंवा प्रिझर्व्हेटिव्हज वापरायचे नाहीत, हे पहिल्याच दिवशी ठरवलं होतं. त्यासाठी इतरांपेक्षा जास्ती किंमत मोजायला लागणार होती. त्यासाठी आत्ताच्या घडीला उपलब्ध असलेल्या सगळ्यात चांगल्या पॅकेट्सची निवड केली. मग मिसळीवर अनेक प्रयोग सुरु झाले. अनेक वेगवेगळे मिसळ मसाले वापरून बघितले. शेवटी स्वतःच्या पसंतीच्या २-३  मसाल्यांचे कॉंबीनेशन करुन बनवलेली मिसळ, घरात,अनेक मित्रमंडळींवर प्रयोग करुन तयार झाली. जास्तीतजास्त लोकांना आवडेल अश्या अंदाजानी मिसळ झाली खरी पण, तोपर्यंत त्याचे नाव नक्की केलं नव्हतं. मुंबईचा माझा  जिवलग मित्र मनोज प्रभू ह्यानी पहिल्याच झटक्यात त्यासाठी ‘ फक्कड ‘ नाव सुचवलं. हे नाव ताबडतोब पक्कं केलं आणि पॅकिंग बनवायच्या कामाला लागलो. नेहमीप्रमाणे अनेक अडथळे इथेही वाट बघत होते. कोणत्याही सरकारी नियामांचे उल्लंघन करायचं हे नक्की होतं त्यामुळे आवश्यक असलेल्या सगळ्या परवानग्या, लायसन्स, लॅब टेस्ट्स करण्यात वेळ गेला. प्रसिद्ध फोटोग्राफर श्री. सतीश पाकणीकर ह्यांनी फक्कडच्या प्रॉडक्टचे फोटो अतिशय मन लावून आणि स्वतःचा वेळ देऊन काढले. असे तयार झालेले पॅकिंग करुन पुण्यातली सगळ्यात जास्ती फुड्स शॉपीजची चेन असलेल्या ‘ अग्रज’ च्या श्री. बाळासाहेब थत्ते ह्यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यांनी केलेल्या बहुमूल्य सुचनांचा पॅकेट्सवर अंतर्भाव करेपर्यंत, देशात GST ची अंमलबजावणी सुरु झाली. मग त्यासाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण केले. पहिले पॅकेट अग्रजच्या पहिल्या दुकानात ठेवतानाच, मार्केटमधे फक्त मिसळ देऊन उपयोग नाही, हे लक्षात आलं. मग तातडीने पुणेरी पद्धतीची अळुची भाजीही पॅकेज्ड फुड मधून मार्केटमधे आणली. पदार्थांची ट्रायल घेताना, माल पॅकिंग करताना सौभाग्यवतींची साथ होतीच. पण सुरुवातीला अनुभव येण्यासाठी फक्कडचे मार्केटिंग, डिलिव्हरी आपण स्वतःच करायची हे मी नक्की ठरवलं होतं. त्याप्रमाणे दुकानांची यादी केली. मालाची डिलिव्हरी द्यायला स्वतः जायला लागलो. त्यामुळे सगळ्या दुकानदारांशी वैयक्तिक परिचय होत गेला. काऊंटरच्या माल विक्रीचा , वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या कमीशनचा,योग्य वेळी डिलिव्हरी करण्याचा अंदाज आला. मार्केटमधे पॅकेट्स आणल्यानंतरचा काळ सगळ्यात मोठ्या कसोटीचा होता. कारण त्याच्या चवीबद्दल तिऱ्हाईत व्यक्तींकडून अभिप्राय मिळणं माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे होते. जवळजवळ पहिले १० दिवस एकही पॅकेट विकले गेले नाही. पण ज्या दिवशी विकले गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहिले पॅकेट घेणाऱ्या व्यक्तीने उरलेली सगळी पॅकेट्स खरेदी केली. हे कळल्यानंतरचा क्षण माझ्यासाठी आयुष्यातील एक महत्वाचा क्षण म्हणावा, इतपत महत्वाचा होता. कारण येवढ्या लहान पॅकेटमधे माझा आत्तापर्यंतचा इंजिनिअरिंग, कॉमर्स, मार्केटिंग, ॲडव्हर्टायझिंग, कॉपीरायटिंग ह्या सगळ्याचा अनुभव एकवटलेला आहे. त्याला मिळालेली दाद म्हणजे लगेच ‘ रिपीट ‘ झालेला पण मी न पाहिलेला फक्कडचा पहिला कस्टमर ! व्यापक पसरलेल्या मित्रपरिवाराने माझ्या ह्या प्रयत्नालाही  मनापासून साथ दिली आणि नाव नवीन असूनही फक्कड इतरांपेक्षा खूपच लवकर प्रसिद्ध झालं.

आता फक्कड चे अर्धा डझन पदार्थ पुण्यात साधारण ५० दुकानात नियमितपणे सप्लाय केले जातात. गाजर हलव्यासारखे काही पदार्थ होलसेल मधे फक्त हॉटेल्सना सप्लाय केले जातात. ह्या पॅकेट्सच्या स्पेशालिटीमुळे ह्याला फ्रिजमधे ठेवायची गरज लागत नाही. ह्याचे जवळपास ९५% कुकिंग झालेली असल्याने फक्त पाणी घालून , फक्कडचा प्रत्येक पदार्थ फक्त ५ मिनिटात तयार होतो. अगदी मॅगीपेक्षाही कमी वेळात ! त्यामुळे  स्वयंपाकात विशेष प्रावीण्य नसलेली कोणतीही व्यक्ती फक्कडचा प्रत्येक पदार्थ स्वतः करु शकते. त्यामुळे हीच चव आपण जशी जगभरात पोचवू शकतो तशीच ह्याचा उपयोग एकेकट्याने हॉटेल व्यवसाय करु पहाणाऱ्या प्रत्येकाला होऊ शकतो.  फक्कडचे पहिले फ्रेंचायझी आऊटलेट म्हणजेच स्नॅक्स सेंटर थेट गुजरातच्या राजधानीत गांधीनगरला सुरु झालं. गेल्या वर्षातल्या व्यवसायानंतर जास्ती चांगला व्यवसाय करण्यासाठी आता तिथेच नवीन जागेचा शोध सुरु आहे.

हे करताना स्वतःच्या लिखाणाची हौस भागवायला फेसबुकवर लिहित होतो. त्यावेळी Abp माझा ह्या अग्रगण्य टिव्ही चॅनलकडून त्यांच्या सोशल मीडियावर ब्लॉग लिहिण्याची विचारणा झाली. बाहेर फिरण्याच्या निमित्ताने अनेक वर्ष हातगाडीपासून ते ५ स्टार्स हॉटेल्समधे केलेल्या खाद्यभ्रमंतीचा  आणि आता २ वर्ष हॉटेल चालवायचा आणि इंस्टंट फुड्सच्या व्यवसायाचा अनुभव, मे २०१७ पासून ‘फुडफिरस्ता’  नावाने दर आठवड्याला लिहायला सुरुवात केली. Abp माझा सारख्या मोठ्या व्यासपीठामुळे  त्याला वाचकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय.

आगामी वर्षात, फक्कड करता आणि स्वतःच्या मनातल्या कोपऱ्यात धृवपद मिळवलेल्या मिसळीकरता अनेक पुढचे प्लॅन डोक्यात तयार आहेत. त्यांची माहिती आत्ता देता येत नाहीये. पण येत्या वर्षात फक्कड आणि मिसळ ही दोन्ही नावे अजून मोठ्या उंचीवर नेऊन, मराठी लोकांना अभिमान वाटेल अस कार्य करण्याची खात्री मात्र नक्कीच देतो.

फक्कडचा आत्तापर्यंतचा प्रवास वाचल्याबद्दल मनापासून आभार.

  • ©अंबर कर्वे

आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम

Leave A Reply

Your email address will not be published.