पोलीस दलातून निलंबित मराठी माणसाने गुजरातच्या रेकॉर्डब्रेक विजयात मोदींना सर्वाधिक साथ दिली आहे
गुजरात निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पेलणारे आणि गुजरातला रेकॉर्ड ब्रेक यश मिळवून देणारे सी आर पाटील नेमके कोण आहेत? गुजरात विधानसभेचा इतिहासात बदलणारं हे मराठी नेते गुजरातमध्ये कसे?
गुजरातमध्ये मोदींची जादू पुन्हा चालली आणि काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. १९८५ मधील कॉंग्रेसच्या सर्वात मोठ्या विजयाचा रेकॉर्ड भाजपने मोडीत काढत गुजरातमध्ये कॉंग्रेसला धूळ चारली आहे. २७ वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री पुन्हा सत्तेत आलाय.
पण यावेळी भाजपला मिळालेलं यश हे एका मराठी माणसाच्या नेतृत्वाखाली मिळालंय. ते कसं? तर भाजपचे गुजरातचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली. गुजरात निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी पेलणारे आणि गुजरातला रेकॉर्ड ब्रेक यश मिळवून देणारे सी आर पाटील नेमके कोण आहेत? गुजरात विधानसभेचा इतिहासात बदलणारं हे मराठी नेते गुजरातमध्ये कसे?
पाटील मूळचे धुळ्याचे
गुजरातच्या विक्रमी विजयातील एक महत्वाचे नाव प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील. सूरतचे खासदार आणि गुजरात भाजपचे अध्यक्ष अशी त्यांची आताची राजकीय ओळख. पण मूळचे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील असलेले, मराठी असलेले पाटील सुरत मध्ये गेले. तेथे स्थायिक झाले. भाजपात गेले, निवडणूका जिंकले आणि आता निवडणुका जिंकवूनही देतात.
पोलीस दलातून निलंबित, म्हणून राजकारणात
1975 साली ते गुजरात पोलिसांत भरती झाले. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे 1984 मध्ये त्यांनी पोलिसांची एक संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही कृती वरिष्ठांना आवडली नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
त्यानंतरही त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा मुद्दा सोडला नाही. त्यांनी सरकारी नोकरीवर पाणी सोडून संघर्षाचा मार्ग पत्करला. तेव्हा त्यांच्यातील नेतृत्वगुण पहिल्यांदा जगाला दिसले आणि त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
1980 साली भाजपात प्रवेश केल्यानंतर पाटील यांनी 1995 ते 1997 व 1998 ते 2000 पर्यंत जीआयडीसीचे नेतृत्व केले होते. 2009 मध्ये नवसारी मतदार संघातून लोकसभेवर पोहोचले. त्यानंतर 2014 व 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा विजय झाला. 2019च्या निवडणुकीत त्यांनी सुमारे 6 लाख 89 हजार 668 च्या मताधिक्याने विजय संपादन केला होता. जुलै 2020 मध्ये त्यांची गुजरात भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली. पण नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या 2 वर्षांतच त्यांनी पक्षाला एका नव्या उंचीवर पोहोचवले आहे.
दिडशे जागा जिंकणारच
निवडणुका प्रचारात सी.आर. पाटील यांनी “आपण दिडशे जिंकू” असे सांगितले त्यावेळी भाजपा मधील कुणाचाही विश्वास बसला नव्हता. अपवाद मोदी-शहा यांचा होता. सगळे नीट जमून आले तर विक्रम करू याची पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना खात्री होती. दिडशे जिंकू असे म्हणणाऱ्या सी.आर. पाटील यांच्या मागे मोदी-शहा खंबीरपणे उभे राहिले.
दिडशे जिंकू हे आपले उदगार प्रत्यक्षात आणण्यासाठी सी.आर. पाटील यांनी किमान दीड वर्ष आधी काम सुरू केले होते. त्या दिड वर्षातील ग्राउंड वर्क कामी आले आहे आणि निवडणुकीच्या निकालात त्याचे चित्र देखील दिसले. याआधी भाजपने अनेक ठिकाणी राबवलेली पन्ना प्रमुख हि योजना सी.आर.पाटील यांनीच सुरुवातीला राबवली होती.
पक्षातलं वजन वाढलं
सी.आर.पाटील अध्यक्ष म्हणून यशस्वी होतील का ? असा प्रश्न विचारून त्यांचे नेतृत्व स्वीकारण्याची तयारी नसलेल्या काही प्रमुख नेत्यांना तिकीट नाकारले गेले. राज्य भाजपातील एक प्रस्थापितांचा गट पाटील अध्यक्ष म्हणून अपयशी ठरावेत यासाठी प्रयत्नशील होता. अश्या सगळयांना दीडशे जिंकून सी. आर. पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिडशे जिंकण्याने सी. आर.पाटील यांचे राज्यातील आणखी वजन वाढले आहे. एवढं मात्र नक्की.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम