पर्बतो से आज मै टकरा गया
भिरभिरत्या नजरेने मी बराच वेळ सोनमर्गला जाणारी गाडी शोधत होतो. श्रीनगरच्या भागातून सोनमर्गसाठी बसेस मिळतात, हे मला लाल चौकातील एका माणसाने सांगितलं होतं. लाल चौकात फिरताना मनावर थोडं दडपण आलं होतं. सरकारी बसेस हा प्रकारच जणू काश्मीर खोऱ्यात अस्तित्वात नाही अशी शंका यावी इतकी वाईट अवस्था वाहतूक यंत्रणेची आहे. सगळीकडे खाजगी वाहतूक. एकदाची मला सोनमर्गसाठी सुमो गाडी मिळाल्यावर मी खिडकीत बसुन बाहेरील नजारे बघू लागलो.
जीवनात प्रथमच काश्मीरला आलो होतो. पहिलीच वेळ होती हिमालयात येण्याची. लहानपणापासून इच्छा होती हिमालयाच्या रांगा बघाव्यात. हिमालयातील सूर्योदय, सूर्यास्त अनुभवावा. मी चाललो होतो सोनमर्गला “जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग” या पर्वतारोहन केंद्रातून अठ्ठावीस दिवसांचा “बेसिक माऊंटेनिअरिंगचा” अभ्यासक्रम करायला.
त्याच्या दहाएक वर्षांपूर्वी वर्तमानपत्रात एक लेख वाचला होता भारतातील पर्वतारोहन केंद्रांद्दल. भारतात एकूण पाच माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. हे भारतीय सरकार आणि सरंक्षण मंत्रालयाअंतर्गत येतात. यात अगदी माफक दरात अठ्ठावीस दिवसांचा कडक अभ्यासक्रम करून घेतला जातो. येथे शिकायला संरक्षण सेवेतील मुलं मुली येतातच पण सामान्य नागरिकांनासुद्धा हा कोर्स करता येतो. वयाच्या चाळीशीपर्यंत स्त्री पुरुषांच्ना कडक शिस्तीत , सम्पूर्णतः भारतीय संरक्षण सैन्याच्या नियमावलीमध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. सामान्य नागरिकांना कधीही सैन्याच्या कडक शिस्तीतील कामाचा अनुभव घेता येत नाही , त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम सर्वोत्तम पर्याय आहे.
संरक्षण सैन्याबद्दल खूप कुतूहल आणि आदर असल्याने अनेक वर्षांपासून माझी तीव्र इच्छा होती पर्वतारोहन केंद्रातून कोर्स करण्याची. यामुळे एक आयुष्यभराचा अनुभव मिळणार हे माहिती होतं. त्यामुळे दोन वर्षांपासून मी सर्व पर्वतारोहन केंद्राशी संपर्क ठेवला होता. पण येथे संधी मिळणे सोपी नसतं याचा अनुभव येत गेला.
नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग, उत्तरकाशी, येथे प्रवेश मिळायला किमान दोन ते तीन वर्षांपूर्वी आवेदन पत्र भरावं लागतं. तीच परिस्थिती हिमालयन माऊंटेनिअरिंग केंद्राची. हे दोन्ही केंद्रे आशियातील सर्वोत्तम पर्वतारोहन केंद्रे समजली जातात. देशभरातून मुलं मुली येथे शिकायला येतात.
हे सर्व पर्वतारोहन केंद्रे हिमालय भागात आहेत. कडक पर्वतारोहनाचे प्रशिक्षण देऊन पर्वतारोहक येथे तयार केले जातात शिवाय निसर्गाप्रति प्रेम, कृतज्ञता शिकवली जाते. देशप्रेम अंगी भिनतं. ज्यांना संरक्षण सेवेत जाता आले नाही ते इथे येऊन आपली ती इच्छा काही प्रमाणात पूर्ण करू शकतात. या केंद्रात सहविद्यार्थी हे वायुदलातील, आर्मीमधील असतात. शिवाय देशभरातुन विद्यार्थी येतात. त्यामुळे विचार, मन विशाल होतं.
माफक शुल्कात अठ्ठावीस दिवसांचे प्रशिक्षण , सोबत घालायला युनिफॉर्म , विंडचिटर्स, जोडे आणि पर्वतारोहनासंबंधित साहित्य वापरायला मिळतं. ज्यांची किंमत बाजारात प्रचंड असते. याशिवाय चविष्ट पोटभरून शाकाहारी, मांसाहारी अन्न , दूध, त्रिकाळ चहा मिळतो. त्या त्या प्रदेशाची खाद्य संस्कृतीची जवळून ओळख होते.
कंगन नावाचं श्रीनगर कारगिल महामार्गावरील छोट्याश्या गावी
मी पोहचलो. जणू पाकिस्तानात आलोय असं येथील वातावरण. फील येतं. इथून पुन्हा
सुमो गाडीतुन सोनमर्गला निघालो. तोवर कुठेही सुंदर निसर्गाचं दर्शन झालं
नव्हतं. पण कंगन पार केलं आणि काश्मिरी सौंदर्याची लयलूट सुरू झाली. काही वेळात
एका वेगाने वाहणाऱ्या नदीची संगत सुरू झाली. ती सिंध नदी हे पुढे कळलं. प्रवासात
दोनदा लोखंडी पूल लागले. तो पूल ओलांडून गाडी गेली. नद्यांवरील हे लोखंडी पूल
काश्मिरची एक वेगळी खासियत आहे. वातावरणातील
थंडावा खूप आल्हाददायक वाटत होता. नदीच्या शेजारी छोटी हॉटेल्स होती. त्या
हॉटेल्सच्या समोर छोटे बाकडे टाकले होते. मध्येच नदी आणि रस्ता दोघेही वळण घेत
होते. गाडीत काश्मिरी गाणी सुरू होती. नदी उथळ असल्याने शुभ्र दुधाळ पाणी
मधूनच चमकायचं.
मी गाडीच्या मागच्या मोठ्या काचेतून माझ्या कॅमेर्याने सतत फोटोज
काढत होतो. एका क्षणी गाडीने वळण घेतलं आणि माझ्या ह्रदयाला स्पर्श करणारं अप्रतिम
दृश्य मला दिसलं. समोर बर्फाच्छदीत तीन शिखर दिसले. पश्चिमेकडे कलत असलेल्या
सूर्याची किरणं त्यावर पडत होती. त्यामुळे ते चमकणारे तीन शिखर थेट ह्रदयाला जाऊन
भिडले. मला एकदम गहिवरून आलं. उत्कट अष्टसात्विक भाव निर्माण झाले…अंगवार रोमंच
उठले…आणि डोळ्यात अश्रू जमा होऊ लागले. त्या क्षणी मला सर्वांचा विसर पडला.
माझ्या शेजारी बसलेली मुलं, सुरू असलेलं काश्मिरी गाणं
सर्वांचाच विसर पडला. हिमालय बघण्याचं माझं स्वप्न पूर्ण झालं होतं…आजवर
गोष्टींच्या पुस्तकातून हिमालयाबद्दल वाचलं होतं… मनाने कल्पनेत हजारो वेळा
बघितलं होतं; पण आज पहिल्यांदा ‘याची
देही याची डोळा…’पाहत होतो… मी डोळे भरून ते दृश्य पाहत
राहिलो. मी ते दृष्ट डोळ्यांमध्ये साठवू पाहात होतो. तेव्हा कल्पना नव्हती,
की का ते दृश्य, ते पर्वत आणि ते शिखर आजपासून
मी पुढचे 26 दिवस रोज पाहणार आहे.
डोळ्यांमधील अश्रूंमुळे ते दृश्य धूसर होत होतं. मला एकदम जाणवलं, की आपली ही अवस्था शेजारच्या लोकांना दिसली, तर त्यांना विचित्र वाटेल. म्हणून मी त्यांच्याकडे पाठ करून बसलो. पुढील पाच मिनिटांत एका ठिकाणी गाडी थांबली. तेच ‘सोनमर्ग’ होतं. बाहेर अप्रितिम दृश्य होतं. दूरदूर हिरवीगार कुरणं पसरलेली. खूप सारे काळे, तपकिरी, पांढरे घोडे चरत होते. दृष्टी जाईल तिथे पर्वतरांगा दिसत होत्या. आजवर मैदानावरील छोटी कुरणं बघितली होती; पण इथे कित्येक मैदानं मावतील इतकी लांबच लांब हिरवी-सोनेरी कुरणं होती. सोनमर्ग कुरणांसाठी प्रसिद्ध आहेच. रस्त्यावर ‘कारगिल’, ‘द्रास’चे अंतर सांगणारे बोर्ड, माईलस्टोन दिसत होते. त्यावेळी मी ‘राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक’ वर उभा होतो. कारगिलकडे जाणारे भारतीय आर्मीचे हिरवे ट्रक्स, त्या ट्रक्समध्ये असलेले शस्त्रधारी जवान, आर्मीचे ट्रक्स, टेम्पो, बसेस एकसारखे कारगिलकडे धावत होते. खूप मस्त दृश्य होतं ते. वेगळीच अनुभूत होत होती. सोनमर्ग हे अगदी छोटं गाव. कारगिलकडे जाणार्या हायवेवरच हे गाव आहे. एकेकाळी या गावातून तिबेटशी रेशीमाचा व्यापार चालायचा. ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाचं शुटिंग सोनमर्गलाच झालं आहे.
बेसिक माऊंटेनिअरिंगचा (बीएमसी)
हा कॅम्प अगोदर पहलगामला होणार होता आणि गूगलमहाराजने
दिलेल्या माहितीनुसार ऑगस्ट – सप्टेंबर पहलगामचं वातावरण हे ‘प्लेझंट’
असतं; पण कोर्स सुरू व्हायच्या चार दिवस अगोदर
असं कळालं, की कोर्स पहलगामला होणार नसून सोनमर्गला होणार
आहे आणि सगळ्यांनी थेट सोनमर्गला पोहोचायचं आहे. सोनमर्गच्या वातावरणाविषयीदेखील ‘प्लेझंट क्लायमेट’ असंच गुगलेश्वरानं म्हटलं होतं;
पण हे क्लायमेट तर ‘प्लेझंट’ नसून तीव्र थंड होतं. म्हणून मी त्या दुकानातून एक बॉडी फॉर्मर, लेदरचे हँडग्लोव्स आणि सॉक्स घेतले. एव्हाना संध्याकाळचे पाच वाजले होते.
लवकरात लवकर कॅम्पला पोहोचणं आवश्यक होतं. पण प्रचंड भूक लागली होती. जवळील एका
हॉटेलात मी राजमा चावल आणि चेहरा प्यायलो. मी हॉटेलच्या काउंटरवर पैसे देताना
त्यांना ‘थाजिवास ग्लेशिअर’कडे
जाण्याचा रस्ता आणि ‘जेआयआयएम’च्या
कॅम्पबद्दल विचारलं, तर तो म्हणाला, ‘‘अच्छा
आप जिम के स्टुडंट हो! रोज सुबह आपके लोक यहॉं तक पिटी और रनिंग के लिए आते है!
लेकिन वह कॅम्प तो बहुत दूर है यहॉं से! ‘एस.डी.ओ.सी.’
दो कि.मी. पिछे रह गया और वहॉं से उपर चार कि.मी. आपका कॅम्प है!’’
मी मनात म्हटलं , बापरे, सहा कि.मी. जायचंय आणि तेदेखील एवढी जड बॅग घेऊन. त्या हॉटेलात काही
बंगाली तरुण जेवायला थांबले होते आणि त्यांनादेखील ‘ग्लेशिअर’
बघायला जायचंच होतं. मला त्या बंगाली तरुणांच्या गाडीतून जाता यावं
म्हणून तो हॉटेलवाला त्या तरुणांना विनंती करत म्हणाला,
‘‘इन्हे भी थाजिवास के पास ही जाना है। रास्ते मे ही इनका
माऊंटेनिअरिंग का कॅम्प लगा है। प्लीज इन्हे वहॉं तक छोड दो!”
त्या तरुणांनी मांजरीने चेहर्यावर मूत्रविसर्जन करावं तसा चेहरा
केला. मलाच अवघडल्यासारखं झालं. मी त्या हॉटेलवाल्याला ‘आउट
ऑफ ग्रॅटिट्यूड’ धन्यवाद म्हणत मी जातो पायी म्हटलं. तरीही
तो मला थांबवत म्हणाला ‘‘रूको आप, मै
कुछ जुगाड करता हूँ।’’ पण त्या दिशेने कुणीच जाणारं नव्हतं
त्यामुळे त्या हॉटेलवाल्याने मला स्वतःच्या कारमधून कॅम्पपाशी सोडलं. मी त्या
हॉटेलवाल्याला मनापासून धन्यवाद म्हटलं आणि कॅम्पहून परतताना त्याला पुन्हा भेटून
जायचं ठरवलं. काश्मिरी माणसाचा आलेला हा एक सुखद अनुभव.
समोर मोकळं मैदान होतं. त्यात दहा बारा मिलिटरी रंगाच्या
कापडाचे तंबू ठोकले होते. बरीच मुलं दिसत होती. आजूबाजूने मोठमोठे पर्वत होते.
मैदानाला लोखंडी कंपाऊंड होतं. मी गेटमधून आत गेलो. तेवढ्यात एकाने विचारलं, ‘‘अभी
आए हो क्या? बीएमसी?’’ आणि मला एका
बेंचवर बसायला सांगितलं. एका मुलाने मला चहा आणि बिस्किटं आणून दिली. माझं स्वागत
तर मस्तच झालं होतं; पण दुसर्या दिवशीपासून मला रगडून घेणार
आहेत, याची मला जरासुद्धा कल्पना नव्हती. मला कॅम्पला यायला
तीन दिवस उशीर झाला असल्याने उशीर का झाला, याचं लेखी कारण
लिहून द्यावं लागलं.
संध्याकाळी मला इन्स्टिट्यूटचा युनिफॉर्म देण्यात आला. मुलांच्या
युनिफॉर्मचा रंग राखाडी होता, तर मुलींचा तपकिरी. विंड
चिटरसोबत प्रत्येकाला एक जाडी स्लीपिंग बॅग, एक ताट, पेला, चमचा देण्यात आला. रोज ते स्वतःच धुऊन स्वतः
जवळ नीट ठेवायचं. मुलांचे एकूण पाच टेन्ट्स होते. मी शेवटी आल्याने मला
पाचव्या नंबरचा तंबू मिळला. त्यामध्ये फक्त माझ्यासकट सहाजण होते. जी खरंतर एक
चांगली गोष्ट होती. कारण इतर तंबूमध्ये पंधरा मुलं होती. तंबू बर्यापैकी मोठा आणि
जाड, मिलिटरी खाकी रंगाच्या जाड कापडापासून तयार केला होता.
त्याला एक छोटी कापडी खिडकीसुद्धा होती.
तिथला दिनक्रम आणि कार्यपद्धती ही तिन्ही संरक्षण दलांमध्ये जशी
असते तशीच होती. रोज सकाळी ६.५५ वाजता ‘फॉलइन’ची शिट्टी वाजली, की कोणत्याही परिस्थितीत मैदानात
हजर व्हायचं. हजर होताना, आर्मीमध्ये ‘इन-थ्रीज’
उभे राहाण्याची पद्धत असते, तशाचप्रकारे उभं
राहायचं. म्हणजे एका रांगेत तिघेजण. सकाळी ‘फॉल इन’ झाल्यावर ‘पीटी’ होणार.
यामध्ये रोज सहा किलोमीटर धावावं लागणार… त्यानंतर व्यायाम, स्ट्रेचिंग इ. .त्यांनतर ८.५५ ला पोटभरून नाश्ता, साडेनऊनंतर
मात्र दिवसभर काम, ट्रेनिंग सुरूच. यानंतर दुपारी तीन किंवा
चार वाजता क्लास, मग सायंकाळी ६.५५
वाजता पुन्हा ‘फॉलइन’च्यावेळी मोजणी
होणार, पायांची तपासणी होणार, तब्येतीची
चौकशी होणार. काही त्रास असल्यास त्याची चिकित्सा, रोज
हे सर्व रेकॉर्ड्स इन्स्टिट्यूटच्या प्रिन्सिपलकडे जाणार. इन्स्टिट्यूटचे
प्रिन्सिपल हे कर्नल होते. .रात्री ७.५५ वाजता जेवण, रात्री
साडेनऊपर्यंत तंबूत झोपायला जाणं. याशिवाय दररोज एका तंबुतील सदस्यांनी रात्री दहा
ते पहाटे पाच वाजेपर्यंत दोघा दोघांनी मिळून दोन दोन तास पहारा द्यायचा. हा
दिन-रात्रक्रम मला कळला.
तिथे सोनमर्गला, ग्लेशिअरला पायथ्याशी विज
यंत्रणा नसल्यामुळे रोज सायंकाळी सात ते साडेनऊ एवढाच वेळ काय ते जनरेटरवर लाईट्स
लावले जात. बरोबर साडेनऊ वाजता लाईट्स बंद व्हायचे. संपूर्ण कॅम्प अंधारात गुडूप
व्हायचा. मुलांचे एकूण पाच आणि मुलींचा एक, असे
गिर्यारोहणाच्या विद्यार्थांचे एकूण सहा तंबू होते. प्रमुख इंस्ट्रक्टरांचे
स्वत:चे वैयक्तिक छोटे तंबू होते. हे फक्त एक व्यक्ती झोपू शकेल, असे निळ्या रंगाचे छोटे तंबू खूप आर्कषक वाटत होते. स्वयंपाक करण्याचा एक
स्वतंत्र मोठा तंबू होता. एक लायब्ररी, एक दवाखाना, असे दोन आणखी तंबू होते. ‘बडी पेअर’ ही आर्मीची एक पद्धत आहे. म्हणजे एका व्यक्तीसोबत त्याचा एक मित्र
नेहमी आवाराच्या बाहेर जाताना सोबत असेलच. कोणीही कुठे-कधीही एकटं जायचं नाही.
सकाळच्या कार्यक्रमास जातानासुद्धा!!!
सकाळच्या-रात्रीच्या जेवणाच्या वेळी आणि नाश्त्याच्यावेळी किचनचे
मुलं टेबलावर भाजी-पोळी-वरणाचे पातेले आणून ठेवायचे. मग मुलं हातात
ताट-पेला-चमचा घेऊन रांगेत उभं राहून अन्न घेऊन आजूबाजूला बसून भोजन करत. तिथेच ‘डायनिंग टेंट’सुद्धा होता! पहिल्या रात्रीचं जेवण
करायला मी निघालो. स्वयंपाकघराच्या म्हणजे स्वयंपाक तंबूच्या बाहेर जेवणाचे पात्र
ठेवल्याची घोषणा झाली! आणि मी ताट-पेला धुऊन रांगेत उभा राहिलो. उकडलेल्या
बटाट्याची गरमागरम भाजी, पोळी, सोबतीला
गाजर-लिंबू-मुळा, चवीला आवळ्याचं-मिरचीचं लोणचं आणि गोडात
शेवयांची खीर, असं मस्त खाद्यान्न प्रकरण होतं; पण माझी तीन दिवसांची दगदग…थोडा मानसिक ताण यामुळे मला नवीन जागी खूप
जेवण गेलं नाहीच! जास्त कोणाशी न बोलता मी माझं जेवण आटोपलं. थंडी वाजत
होतीच. त्यातल्या त्यात ताट-पेला धुण्यासाठी ग्लेशियरचच बर्फासारखं गारेगार पाणी!!
पाइपने ते पाणी आणून थोड्या अंतरावर भांडी धुण्याची जागा केली होती. तिथे आपापले
ताट-पेले धुण्यासाठी गर्दी होण्याआधीच मी लवकर सर्व आटोपून माझ्या बिळात म्हणजे
आमच्या पाच नंबरच्या तंबूत शिरलो!
हातापायांवर दुपारीच घेतलेले लेदर आणि लोकरीचे मोजे चढवले…
डोक्यावर लोकरीचं शिरस्त्राण चढवून स्लिपिंग बँगची चेन ओढून त्यात गपचूप आत शिरलो.
स्लिपिंग बॅग मध्ये झोपण्याचा अनुभव मात्र मस्त होता. काहीतरी थ्रिलिंग, अँडव्हेंचरस वाटत होतं. आर्मी कॅम्पमध्ये, आर्मीच्या
टेंट्समध्ये, आर्मीच्या स्लिपिंग बगमध्ये, आर्मीच्या गिर्यारोहण इंस्टिट्यूटमध्ये, दूर काश्मिर
मुलूखात, पर्वतांनी चारी बाजूने वेढलेल्या मैदानात… हिमालय
की गोद मे झोपण्याची मजा खूपच थ्रिलिंग अडव्हेंचरस होतं. थंडी आणखी वाढली होती. मी,
माझं पातळ; पण उबदार ब्लँकेट स्लिपिंग
बॅगमध्ये कोंबून कसंतरी स्वत:भोवती गुंडाळलं. तरीही कुडकुडत होतोच.
सकाळी जाग आली. हातावरील घड्याळ पाहिलं सव्वा सहा झाले होते… थंडी
खूपच वाजत होती. बाहेर निघायची इच्छा होत नव्हतीच; पण उपाय
नव्हता! बाहेर येऊन ताजतावना झालो. सहा पंचावनला ‘फॉल इन’ची शिट्टी वाजली तसे सर्वजण मैदानात जमले. समोरचं बर्फ़ाच्छदीत शिखर
उगवत्या सूर्याच्या प्रकाशात सोनेरी झालं होतं.हेच ते शिखर होतं, जे मी सुमोतून सोनमर्गला येताना खाली पाहिलं होतं आणि माझ्या डोळ्यात
आनंदाचे अष्टसात्विकतेचे अश्रू जमा झाले होते. इंस्ट्रक्टरची धावण्याची आज्ञा
झाली. कॅम्पपासून खाली सोनमर्गकडे जाणार्या डांबरी रस्त्याने धावायचं; पण 10000 फुटांवर धावणं हे काय भयंकर प्रकरण
असतं, याचा यत्किंचितही अंदाज नव्हता.
सोनमर्ग हे नऊ हजार फुटांवर आहे आणि आम्ही जवळपास साडे-नऊ हजार फुंट
उंचावर होतो. मी समुद्रसपाटीपासून शंभरे फुटांवर राहाणारा प्राणी अचानक दोन
तासांच्या वेळात नऊ हजार फुटांवर आलेला होतो. मला एक महिन्यापूर्वी मलेरिया झालेला,
जेवण महिन्याभरापासून नीट न झालेलं. अशा अवस्थेत मी अनेक मानसिक ताण
घेऊन काही गोष्टी, जबाबदार्यांपासून दूर पळून येथे आलो
होतो. त्यामुळे अजुनच अपराधी, तणावात, नैराश्यात
होतो. शिट्टी वाजली आणि इतरांसोबत मीदेखील धावू लागलो. पन्नास पावलंही टाकली नसतील
आणि माझा श्वास लागला. जोराने धापा लागल्या! पळणं कठीण झालं. गती पूर्ण मंदावली.
मी कसंतरी एकेक पाऊल टाकत हळुहळू धावू लागलो. मागून इंस्ट्रक्टर ओरडत होते.
थांबायचं नाही. पूर्ण स्टॅमिना लावा! सतत कडक सूचना सुरूच होत्या. माझ्या मागचे
सर्व पुढे निघून गेले. मी शेवटी राहिलो.
बिचार्या माझ्या दोन्ही नाकपुड्यांनी श्वास ओढून आणालेला
प्राणवायू आणि फिलटर्ड होऊन जाणारा ऑक्सीजन हा माझ्या देहाला पुरतच नव्हता! म्हणजे
नगरपालिकेच्या नळातून येणारी पाण्याची धार छोटी असते. म्हणून टिल्लू पंपाने पाणी
जोराने ओढून घ्यावं तसा मी मुखाचा ‘ऑ’ करून
जोरजोरात श्वास ओढून कसातरी धावत येऊन कॅॅम्पमध्ये पोहोचलो. तरीही कितीतरी वेळ
माझा, ‘मालामाल लॉटरी’मधला धक्क्यामुळे
जबडा उघडाच राहिलेला राजपाल यादव झाला होता. माझ्याही जबड्यातून शब्द नव्हते,
तर हवाच निघत आत-बाहेर होत होती. कितीतरी वेळ मी गुडघ्यावर वाकून
लांब श्वास घेत राहिलो.
मी जोरजोराने श्वास घेत राहिलो. पार दम निघून गेला होता आणि मी
पुरेपूर दमलो होतो. थोडा वेळ स्थिर राहिल्यावर श्वासही स्थिरस्थावर झाला. घशापर्यंत
आलेलं फुफ्फुस पुन्हा आपल्या जागी गेलं. छातीचा भाता शांत झाला. इथल्या प्रचंड
थंडीतही मी घामाने पूर्ण डबडबलो होतो.
समोर चहा आणि नाश्ता लागला होता. मी, माझ्या
तंबूत जाऊन पेला घेऊन बाहेर आलो. प्रत्येक तंबूच्या बाहेर एक पाण्याचा कंटेनर
ठेवलेला होता. कंटेनरमधील पाण्याने मी पेला धुतला तोवर बरेच जण आपापले पेले – ताटं
घेऊन महाप्रसादाच्या रांगेत लागले होते. मीही निमूटपणे रांगेत लागलो. बटाट्याच्या
भाजीचे आणि पराठ्यांचे पातेले भरलेले होते. उकडलेली अंडी होती. जे शुद्ध शाकाहारी
होते त्यांच्यासाठी ‘दलिया’ हा उत्तर
भारतीय खीर रूपी पदार्थ मिळत होता. मी, माझ्या ताटात ब्रेड्स
आणि पोळ्यांची चळत भरली आणि पेला काठोकाठ चहाने भरून घेतला. भरपेट नाश्ता केला.
प्रमुख इंस्ट्रक्टर “राजेंद्र राय” जे कारगील युद्धातही लढले होते त्यांनी आज आपल्याला शॅक क्लाइंम्बिंगसाठी
जायचंय, ही सूचना दिली. राजेंद्र राय हे गुरखा रेजिमेंटकडून
लढले होते आणि सध्या ‘जवाहर इस्टिट्यूट ऑफ मॉंऊटनेअरिंग
इस्टिट्यूट’ (पहलगाम) मध्ये प्रमुख इंस्ट्रक्टर म्हणून
कार्यरत आहेत. अ रिअल जेन्युअन स्ट्रॉंग मॅन विथ फूल ऑफ स्किल्स! त्यांच्या
हाताखाली अजून चार इंस्ट्रक्टर होते आणि एक लेडी इंस्ट्रक्टर. मी येण्यापूर्वीच
सर्वांना क्लाइंम्बिंगचे दोर देण्यात आले होते. मलाही एक मिळाला. सकाळी सव्वा नऊला
आम्ही जमलो आणि क्लाइंम्बिंग साईटकडे ‘रांगेत’ निघालो. जंगलातून एक वाट जात होती. घनदाट अप्रतिम देवदार वृक्षांचं जंगल
होतं! अंगावर दोर गुंडाळून आम्ही निघालो. दोन किमी जंगलातून जाणारी वाट खाली
महामार्गाला मिळत होती. समोर जाताच सिंध नदी आणि तिच्यावरील लोखंडी पूल दृष्टीस
पडला. खूप सुंदर दृश्य होतं. ही जागा काही हिंदी पिक्चरमधून दिसली होती. चालल्यावर
शॅक क्लाइंम्बिंगची जागा दिसली.
उंचच पहाड! दगडाचा पहाड! त्याच्या शेजारी एक छोटासा दर्गा होता.
तिथे सर्वप्रथम इंस्ट्रक्टर्सने चादर चढवली आणि आम्हाला ‘इन
थ्रीज’मध्ये उभं करून सर्वांना आपापल्या आवडत्या दैवतांना
प्रार्थना करायला सांगितली. प्रार्थना अशासाठी, की कुठलाही
अपघातात न होता ट्र्रेनिंग सुयोग्यरितीने पार पडो. त्यानंतर आम्हाला त्या ‘शॅक’बद्दल इंस्ट्रक्टर्सनी माहिती सांगायला सुरुवात
केली. ते ऐकून आश्चर्य, अभिमान, आनंद
वाटला!
नोव्हेंबरपासून सोनमर्ग भागात बर्फवृष्टी होऊ लागते, सात ते आठ फुटांचा बर्फ पडतो. त्यामुळे सोनमर्ग भागात कोणीही राहत नाही.
जशी अशी थंडी वाढू लागते तसतसे पर्वतावरील राहणारे प्राणी ;अस्वल
, चित्ते हे खाली येऊ लागतात ते खाली आल्यावर
घोड्यांना सुद्धा मारतात हे मला बर्फ नदीच्या किनारी असलेल्या मॅगी आणि कावा विकणाऱ्या
दुकानदाराने सांगितलं होतं. आम्ही राहायचो तिथे वीज सुविधा उपलब्ध नव्हती त्यामुळे
कॅम्पमध्ये फक्त जनरेटरद्वारे रात्री सहा ते आठ दोन तास वीज सुरू असायची. रात्री
नऊ नंतर संपूर्ण अंधार असायचा. त्यामुळे ही वॉचमनशिप निकडीची असायची. मी बाहेर
येऊन आधीच्या पहारेदारांना सुटी दिली. ते आपल्या तंबूत झोपायला परत गेलेत. माझ्या
साथीदाराला गुजराती मुलाला बरं नसल्याने त्यालाही झोपायला सांगितलं. त्या दिवशी मी
एकटाच होतो पहारेकरी.
मी बांबू घेऊन एक चक्कर मारून फिरलो. सगळं चिडीचूप होतं. गूढ
वातावरण पण प्रसन्न होतं. वातावरणात भीतीचीे स्पंदनं नव्हती. आजूबाजूचे पर्वत
अंधारात अक्राळविक्राळ भासत होते. थंडी प्रचंड होती, नक्कीच
त्या रात्री तापमान दोन ते तीन डिग्रीपर्यंत असावं. तीन चक्कर मारून थंडीत कुडकुडत
आत तंबूच्या तोंडाशी खुर्चीवर जाऊन बसलो. रात्रीचे दीड मोबाईलमध्ये शास्त्रीय संगीत
कमी आवाजात लावून बसलेलो होतो. आजूबाजूला घनदाट अंधार. तारे चमकत होते.
तेव्हा माझं लक्ष समोरील पर्वतावर गेलं. आणि आश्चर्यचकित झालं. त्या
उंच डोंगराच्या शिखरावर एक लाल केशरी प्रकाश चमकत होता.
जरी चारी बाजूंनी पर्वत होते तरी उत्तरेकडील पर्वत इतरांपेक्षा बराच
स्पष्ट आणि जवळ दिसायचा. प्रॉमिनंट शिखर असलेला तो पर्वत होता. तेव्हा मी त्याच
पर्वताकडे तोंड करून बसलो होतो, मला जे दिसलं ते
आश्रचर्यकारक आणि बुद्धीला चालना देणारं होत , समोरच्या
पर्वतावर गोलाकार प्रकाश स्पष्ट दिसत होता,, मला आश्रचर्य
वाटत होतं, तो गोलाकार स्थिर प्रकाश बघून! काय होतं ते??
काय असावं ते? कोणी असावं का तिथं??
बर्फावरून चालण्यासाठी आम्हाला थाजीवास ग्लेशिअर्सला घेऊन जायचे. हे ग्लेशिअर्स त्या त्रिकुट शिखर असलेल्या डोंगरपाशीच होतं. रोजचा तो बारा किमीचा ट्रेक व्हायचा. शेकडो वर्षांपूर्वीपासून जमलेला तिथे बर्फ होता त्या ग्लेशिअर्सचा. तिथे गेल्यावर पायात खिळ्याचे जोडे घालून, सर्व प्रशिक्षण अगदी काळजीपूर्वक दिले जाई. हा भाग “बर्फाच्या त्सुनामीचा” अॅव्हलॉंचेसचा असल्याने काळजीपूर्वक वावर करणे गरजेचं असायचं. एकदिवस बर्फावरून चालण्याचं प्रशिक्षण सुरू असताना जोरदार बर्फाचा कडा कोसळला. सर्वजण प्रचंड घाबरलेत. नंतर मात्र सगळे जोरात हसायला लागलेत. काही जणांनी येथे तिरंगा आणला होता. बर्फाच्या कड्यावरून हाती तिरंगा घेत मुलं फोटो काढत.
दरम्यान ‘गणपतीचा’ उत्सव आल्याने परवानगी घेऊन काही मराठी विद्यार्थ्यांनी दररोज रात्री गणपतीची आरती करण्याची परवानगी मागितली. एकाच्या पाकिटात गणपतीचा फोटो होता. तो खुर्चीवर ठेऊन आमच्या सहाव्या तंबूत गणपतीची ‘स्थापना’ करण्यात आली. कारण त्या तंबूत आम्ही सहा जणच असू. रोज संध्याकाळी “फॉल इन” रिपोरटिंग आटोपल्यावर सहाव्या तंबूत गणपतीची आरती केली जात. दररोज कोणीतरी वेगळा प्रसाद आणत. “गणपती बाप्पा मोरया”चा जयघोष काश्मीरच्या सोनमर्गच्या त्या पहाडी भागात होई. अनंत चतुर्दशीला गणपतीचं विसर्जनही झालं. खुप मजा आली.
दररोजचा दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी दहा किमी धावणे, मग अर्ध्या विद्यार्थ्यांचा खाली तीन किमी शॅकवर पर्वतारोहनाचा , विविध प्रकारच्या तंत्राचा सराव, तर बाकी विद्यार्थ्यांचा ग्लेशिअर्सला हिमकड्यावरून चालण्याचा सराव, इतर तंत्रांचा सराव होई. दरम्यान दररोज सकाळी धावताना क्रमाक्रमाने रेस पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव टिपून घेतले जाऊ लागले. कारण परीक्षा दोन दिवसांवर ठेपली होती. विविध प्रकारांत विद्यार्थ्यांना बक्षिसे मिळणार होती. आज्ञाधारक विद्यार्थी, सर्वोत्तम विद्यार्थी, सर्वोत्तम धावक, पर्वतारोहक आणि अजून काही.
शेवटी परीक्षेचा दिवस उजाडला. धावण्याची परीक्षा झाली.
पर्वतारोहनाची, बर्फावरून चालण्याची , कडा
पार करण्याची परीक्षा झाली. ‘थेरी’ परीक्षा
आणि व्हायवा परीक्षा झाली. एकोणतिसाव्या दिवशी सर्वांचा ‘फेअरवेल’
कार्यक्रम झाला. जवाहर पर्वतारोहन केंद्राचे प्रिन्सिपल कर्नल
उपस्थित होते. त्यांच्या हातून विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. खूप सारे फोटोज काढून
आम्ही तो स्वर्गीय परिसर सोडला. ते आजूबाजूचे जंगल, दररोज
दिसणारे ते तीन मुखी शिखर, आजूबाजूच्या पर्वतरांगा, ती छोटी नदी जिथे खाल्लेल्या अन्नाचा हिशोब दिला जाई. हे सर्व सोडून
जाताना मन जड झालं होतं.
पर्वतारोहन केंद्रे येथे फक्त पर्वतारोहन शिकवले जात नाही तर संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहणार अनुभव प्राप्त होतो. निसर्गाप्रति प्रेम वाढतं. देशाबद्दल कृतज्ञता निर्माण होते. रोजच्या डबक्यातील आयुष्य जगताना निर्माण होणारी मी, माझं छोटे विचार दूर होतात. भारतीय सैनिक किती खडतर आयुष्य जगतात याची जाणीव होते. सर्वसामान्य , सिव्हिल लोकांनाही येथे प्रशिक्षण मिळत असल्याने ही केंद्रे आर्मी आणि सिव्हिल आयुष्याला काही काळ जोडणारी ही केंद्रे आहेत.
हा कोर्स करून झाल्यावर अनेकांची आयुष्य, दृष्टिकोन कायमसाठी बदलतो. एकदातरी अंगातील मस्ती, रग सकारात्मकरित्या जिरवायला किमान बेसिक माऊंटेनिअरिंग कोर्सतरी नक्की करावा.
– अभिजित दिलीप पानसे
सदर लेख यापूर्वी पारंबी दिवाळी अंक २०१८ मध्ये पूर्वप्रकाशित आहे
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम