हिंदी वाल्यांना मराठी सिनेमाची भुरळ
तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्राचं असं स्वतःच बरंच काही आहे, ज्याच्यावर मराठी माणसाने गर्व करावा. पण आजच्या घडीला मला सगळ्यात जास्त कमालीचा वाटतो, तो म्हणजे आपला मराठी सिनेमा. आज त्याच्यावरच बोलायचंय. पण त्याआधी थोडा इतिहास.
लक्ष्या-महेश-अशोक, त्रिमूर्तीचा धुमाकूळ
माझं बालपण पुण्यातलं. आयुष्याची सुरुवातीची २० वर्षे महाराष्ट्रात. मग २००३ ला उत्तर भारतात गेलो आणि तिकडचाच होऊन राहिलो. ८३ चा जन्म. म्हणजे आमचं पिक्चर पाहायचं वय झालं नाईंटीझ मध्ये. त्यावेळी सिनेमा बघण्याचं एकमेव साधन म्हणजे दूरदर्शन.
आठवड्यातून एक पिक्चर बघायला मिळायचा आणि तो जवळजवळ दर वेळी विनोदीच असायचा. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ किंवा महेश कोठारे (कधी-कधी तर तिघेही), हेच काय ते बघायला मिळायचे. वयानुसार खूप आवडायचे सुद्धा ते. लक्ष्या-अशोक ची जोडी तर प्राणप्रिय होती. तर सांगायचं असं की त्यावेळी संपूर्ण मराठी सिनेमा हा विनोदावर तरंगत होता आणि त्यातून बोर झाला तर ‘माहेरची साडी’ पाहून हमसून हमसून रडत होता. सिनेमाघरांमध्ये रुमाल वाटप झाल्याचं मी ‘याची देही याची डोळा’ पाहिलं आहे बरं का! ‘माहेरची साडी’ ची ऑडियो कॅसेट घरा-घरात पाहिली आहे. माझ्याही होती.

पुढे मग मी दिल्लीला गेलो आणि हे सगळं इकडंच राहिलं. मराठी पुस्तकं मिळायची कशीबशी, पण मराठी सिनेमा अगदीच सुटला. खूप मोठा गॅप आला. तब्बल दशकभर मोठा आणि मग २०१४ च्या सुमारास एक करामत झाली. एक दिल्लीचा मित्र मुंबईला आला होता. त्याने सहज फोन केला आणि विचारलं ‘काय आणू’? कसं काय माहीत पण मी म्हटलं, ‘जमलं तर एक मराठी पिक्चरची डीव्हीडी आण’. त्याने आणली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं.
ती डीव्हीडी होती ‘जोगवा’ ची.
‘जोगवा’ ने अगदी गदागदा हलवलं
२००९ साली रिलीज़ झालेल्या चित्रपटाचे नाव मी पहिल्यांदा २०१४ मध्ये ऐकलं. ते सुद्धा निव्वळ योगायोगान. ‘जोगवा’ पाहिला आणि मी अगदी हरखून गेलो. मराठी सिनेमामध्ये असलं काही मी कधीच पाहिलं नव्हतं. काय तो विषय, काय ते डायरेक्शन आणि काय ती एक्टिंग! अगदी अप्रतिम! मला कल्पना सुद्धा नव्हती की माझ्यामागे मराठी चित्रपटसृष्टि एवढी श्रीमंत, एवढी समृद्ध झाली आहे. ‘जोगवा’ सारखे सिनेमे बनवत आहे. माझ्यासाठी ही एक खूप गोड सूचना होती आणि आश्चर्याचा धक्का ही. मी इंटरनेट चाळला आणि माझ्या समोर जणू अलिबाबाची गुहाच उघडली.

कितीतरी मराठी चित्रपट मिळाले ज्यांच्या बाबतीत फ़क्त वाचूनच मला रहावेनासं झालं. लिस्ट बनवली. काही अनधिकृतरित्या डाउनलोड केले. काहींची ऑनलाइन डीव्हीडी मागवली आणि मग पुढचे काही महीने फ़क्त आणि फ़क्त मराठी सिनेमाच पाहिला. तो काळ आपल्या आयुष्याचा मस्त काळ होता राव. एका पिक्चरने घातलेली भुरळ कमी पडण्याआधीच दूसरा मनात घर करायला सज्ज असायचा. चंगळच होती खूप. सलमान सारख्यांचे वेडे-वाकडे हावभाव बघून आणि बिनडोक स्क्रिप्ट वर बनवलेले बेचव हिंदी सिनेमे पाहून वैतागलेल्या मला या नवीन जगाने अगदी मोहून टाकलं. तेव्हापासून हा नवा मराठी सिनेमा आपला सखा ठरलाय.
कालांतराने ‘दी लल्लनटॉप’ या हिंदी न्यूज पोर्टल/चॅनेल वर नोकरी मिळाली. तिथे मनासारखं काम करायची सूट होती. मी एक मराठी सिनेमाची सीरिज सुरु केली. ‘चला चित्रपट बघूया’ नावाने. सुरुवातीला फक्त टेक्स्ट मध्ये. यामध्ये मी दर आठवड्याला एका मराठी सिनेमावर लिहायचो. कसा आहे, काय खास आहे, का बघितला पाहिजे वगैरे वगैरे. नंतर व्हिडिओ सीरिज पण सुरु केली. सीरिज चांगलीच पॉप्युलर झाली. मराठी माणूस तर बघतच होता, हिंदी प्रेक्षक पण आवर्जून पाहू लागले. आणि मग चौकशी करू लागले कि अमुक चित्रपट कुठे पाहावा.
काय आहे या नवीन मराठी सिनेमात?
एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर हा नवीन मराठी सिनेमा डेरिंगबाज आहे. ह्याला पडण्याची भीती दिसत नाही आहे. अर्जुना सारखा याचा फक्त आणि फक्त स्क्रिप्टवरच डोळा दिसतोय. एक चांगली कथा आणि काही मुरलेले कलावंत यांची सांगड घालून देखणी कलाकृती बनवण्याचा फॉर्मुला सापडलेला दिसतोय मराठी चित्रपट जगाला.
कितीतरी मराठी सिनेमे आहेत ज्यांचे विषय पाहून मेकर्सच्या धाडसाचं कौतुक करावसं वाटतं. ‘जोगवा’चे उदाहरणच घ्या ना. यल्लमा देवीच्या नावाने भिक्षा मागून जगणाऱ्या एका वंचित वर्गाच्या आयुष्यात डोकावणारा हा चित्रपट अगदी थरारून सोडतो. त्यांची घुसमट प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचते. आणि ते पण थोडं सुद्धा मेलोड्रॅमॅटिक न होता. उपेंद्र लिमयेंच काम अगदी टॉप क्लास आहे. मला अजूनही त्यांचे ‘लल्लाटी भंडार’ या गाण्यातील लालसर डोळे आठवतात. आणि अंगावर काटा उभा राहतो.
मग ‘नटरंग’ पाहिला. अतुल कुलकर्णीनी गुणा कागलकर बनून जे केलय ते त्यांच्या आयुष्यातील एव्हरेस्ट मानायला हरकत नसावी. कितीतरी असे चित्रपट आहेत जे पुन्हा-पुन्हा पाहिले. ‘गाभ्रीचा पाउस’, ‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’, ‘रिंगण’, ‘चुंबक’, ‘शाळा’, ‘देऊळ’, ‘फॅन्ड्री’, ‘बालक-पालक’, ‘देवराई’, ‘७२ मैल – एक प्रवास’….. यादी खूप मोठी आहे.
मराठीत असे सिनेमे बनू लागलेत याचं श्रेय महाराष्ट्राच्या दर्शकांना ही दिलंच पाहिजे. त्यांनी कथापरक सिनेमे उचलून धरले म्हणूनच शक्य झालं आहे हे. मराठी चित्रपटसृष्टी स्वतःवरून ‘फक्त विनोदी किंवा रडका पिक्चर बनवणारी इंडस्ट्री’ चा टॅग काढून टाकण्यात यशस्वी झाली आहे, याचं थोडं-थोडं क्रेडिट निर्मात्यांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांच्या वाट्याला आलं पाहिजे. आश्चर्य नव्हे की राष्ट्रीय पुरस्काराच्या लिस्ट मध्ये हल्ली खूप मराठी सिनेमे दिसू लागलेत.
काका, याला हिंदीवाल्यांपासून वाचवा
‘सैराट’ चा ‘धडक’ बनला. खूप गाजला ही. जाह्नवी कपूरचं करियर भन्नाट सुरु झालं. पण ‘धडक’ मध्ये आर्चीची धग आणि परश्याचं निरागस प्रेम मिसिंग होतं. नागराज मंजुळेंच्या टचची तर बातच सोडा. ‘धडक’ इतका चकचकीत होता कि डोळे दिपले आणि इमोशन्सचा फ्युज उडाला. माझा तर या विचारानेच थरकाप उडतो की हिंदीवाल्यांनी ‘फॅन्ड्री’ ला हात लावला तर? काय करून ठेवतील देव जाणे!
जब्या आणि त्याच्या परिवाराला मुंबईच्या झोपडपट्टीत नेतील आणि हिंदीमधल्या क्लीशे नावाच्या कोठडीत डांबून टाकतील. काळ्या चिमणीचं प्रतीक कसं दाखवणार? मसक्कली नावाचं कबूतर ठेवतील कदाचित. ते जरी सोसून घेतलं तरी शब्दा-शब्दातून दृश्यनिर्मिती करणारी गाणी कशी लिहितील? ‘झिंगाट’च्या मीटर मध्ये गाणं बसवण्यासाठी त्यांनी केलेले ‘टल्ली, मुंगफल्ली’ सारखे फडतूस प्रयोग लक्षातच असतील सगळ्यांच्या.
“खरकाट्या ताटावर, रेघोट्याची झालर,
हातावर पोट, बिदागीची झुणका भाकर”
या सारखं जबर कसं लिहिता येईल? अवघ्या नऊ शब्दांत दलितांच्या आयुष्याचा अवघा अहवाल दिला गेलाय.

तर सांगायची गोष्ट अशी की मराठी सिनेमाचं वैशिष्ट्य जपायचं असेल तर हिंदी वाल्यांकडून त्याला वाचवलंच पाहिजे. साऊथच्या पिक्चर्सची वाताहत करून आता त्यांचा डोळा मराठी सिनेमावर रोखला गेलेला दिसतोय. मराठी माणसा जागा होच तू. गमतीची गोष्ट अशीही कि अजय देवगण, अक्षय कुमार, संजय दत्त वगैरे स्टार लोक स्वतः हिंदीत बेकार, घाणेरडे सिनेमे करतात आणि मग निर्माते बनून चांगल्या, देखण्या मराठी चित्रपटात पैसे लावतात. पश्चाताप करतात कि स्वतःचं नाव टिकवण्याची धडपड आहे देव जाणे. तसं पाहिलं तर यात हिंदीच्या प्रेक्षकांचीही घोडचूक आहेच म्हणा. ‘रेस थ्री’, ‘स्टुडन्ट ऑफ दि इयर’ सारख्या भिकार चित्रपटांना भरमसाट कमवून दिल्यावर कोणता प्रोड्युसर चांगली कथा पाहत फिरणार आहे?
हिंदी वाल्यांकडे चांगल्या कथांची, कहाण्यांची खूप कमतरता आहे. पण मराठीत तशी स्थिती नाही आहे. हे एक हिंदी पट्टीचा माणूस सांगतोय. विश्वास ठेवा त्याच्यावर. मराठी सिनेमावाल्यांनो, उत्तरेकडून संकट येत आहे. तुमच्या संपत्ती वर नजर आहे कुणाची तरी. सांभाळा तिला. कुठंतरी लपवून ठेवा. कडीकुलुपात. किल्ली हवी तर तुंबाडच्या खोतांना द्या. ते जपतील.
- मुबारक
- (लेखक दिल्ली येथे ‘दी लल्लनटॉप’ पोर्टल मध्ये पत्रकार आहेत)
सदर लेख पारंबी दिवाळी अंक २०१९ मध्ये पूर्वप्रकाशित आहे.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम