८० रुपयांच्या उधारीवर चालू केलेल्या उद्योगाची आज करोडोंची उलाढाल
गेली ६० वर्षे जेवणाची लज्जत वाढवणाऱ्या लिज्जत पापडला घराघरात पोहोचवून जसवंतीबेन पोपट यांनी श्री महिला गृहउद्योगाला बळ दिलं आहे. जसवंतीबेन यांच्या कर्तृत्वाची सरकारनं दखल घेतली आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांमध्ये त्यांच्या नावाची घोषणा झाली.
व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जसवंतीबेन जमनादास पोपट यांना जाहीर झाला. सुप्रसिद्ध लिज्जत पापड उद्योगाच्या त्या संस्थापिका आहेत.
महाराष्ट्राला भूषण वाटेल अशा उद्योगिनीला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. जसवंतीबेन जमनादास पोपट या नावाने कदाचित तुम्ही या उद्योजिकेला ओळखणार नाही. पण तिच्या उत्पादनाची चव चाखली नाही असा भारतीय विरळा! महाराष्ट्रात तर गेल्या दोन पिढ्यांनी याच पापडाची चव जिभेवर कायम ठेवली आहे.लिज्जत पापडचं नाव आणि त्याची चव आपल्या सर्वांनाच माहिती असेल महिला गृहउद्योग लिज्जत पापडच्या जसवंतीबेन यांना पद्मश्री जाहीर झाल्यामुळे महिला उद्योगाचाच सन्मान झाला आहे. या लिज्जत पापडची जन्मकथा सुरू झाली 80 रुपयांच्या उधारीपासून.
7 मैत्रिणींनी घेतला पुढाकार
मार्च १९५९मध्ये मुंबईत गिरगावातील सात महिलांनी ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ या पापड तयार करण्याच्या व्यवसायाला सुरुवात केली. यासाठी जसवंती बेन यांच्यासह त्यांच्या 7 मैत्रिणींनी पुढाकार घेतला होता. मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या या मैत्रिणींमध्ये पार्वतीबेन रामदास ठोदानी, उजमबेन नरानदास कुंडलिया, बानुबेन तन्ना, लागूबेन अमृतलाल गोकानी, जयाबेन विठलानी यांचा समावेश होता. तसंच यामध्ये आणखी एका महिलेचा समावेश होतो जिला पापड विक्रीची जबाबदारी देण्यात आली होती. या सर्वांनी प्रारंभी घरीच पापड बनवायला सुरुवात केली होती.
केवळ महिलाच सहमालक असणारा हा जगातील एकमेव गृहउद्योग आहे. सात गृहिणींनी ८० रुपयांच्या भांडवलासह सुरू केलेला पापड उद्योग आज सोळाशे कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहोचला आहे. ‘कर्रम् कुर्रम् कुर्रम् कर्रम्’ हा मंत्र जपत लिज्जत पापडने ६० वर्षांचा प्रवास यशस्वीपणे पार केला आहे.
सुरुवातीला केवळ पापडाची 4 पाकिटं तयार केली
सर्व मैत्रिणींचा उद्देश हा व्यवसाय करणं नव्हता, तर घर चालवण्यासाठी हातभार लावणं हा होता. त्यामुळे त्यांनी पापड लाटण्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्यांनी केवळ पापडाची 4 पाकिटं तयार केली होती. त्यांनी ही पाकिटं एका व्यावसायिकाला विकली. यानंतर त्यांच्या पापडाला खूपच मागणी वाढत गेली, आज हे पापड संपूर्ण देशात लोकप्रिय झालं आहे.
नामांतर
सुरुवातीला जेव्हा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्या उद्योगाचं नाव ‘श्री महिला गृहउद्योग लिज्जत पापड’ असं होतं. त्यानंतर 1962 मध्ये याचं नामकरण केवळ ‘लिज्जत पापड’ असं करण्यात आलं. लिज्जत हा शब्द गुजराती भाषेतला असून याचा अर्थ ‘टेस्टी’ असा होता. 7 मैत्रिणींनी अवघ्या 80 रुपयांच्या उधारीवर सुरू केलेला पापड व्यवसाय आज ५० हजार स्त्रियांना रोजगार देतो आहे. लिज्जत पापडच्या 60 च्या वर शाखा आहेत. देशभर हा पापड विकला जातो.
केवळ चार पाकिटे सुरवातीला विकली
गच्चीवर केवळ चार पाकिटे आणि रुपये ८० एवढ्या भांडवलावर सात महिलांनी लिज्जतची मुहूर्तमेढ रोवली. या गृहोद्योगाला भरघोस प्रतिसाद मिळू लागला. १९६२-६३ ला संस्थेने १ लाख ८२ हजार रुपयांच्या पापडांची विक्री केली. शेकडो हात संस्थेला जोडले गेले आणि पाहता पाहता शेकडोचे रूपांतर हजारो हातांमध्ये झाले; तर उत्पन्नात लाखाचे रूपांतर कोटींमध्ये झाले. लिज्जत पापडासोबतच १९७४ मध्ये खाकरा, १९७६ मध्ये मसाला, १९७९ मध्ये गव्हाचे पीठ, बेकरीचे उत्पादने सुरू केली.१९८८ मध्ये संस्था साबण उत्पादनात उतरली. ससा साबण बाजारात आला आणि ससा साबणाची वार्षिक विक्री ५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. ‘ससा’मुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सबल झाली.
कोटींची उलाढाल
जगातील ही कंपनी एकमेव आहे जिच्या कामकाजाची वेळ पहाटे ४.३० वाजता सुरू होते. या उद्योगाने असंख्य महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवले. आजरोजी सुमारे ५० हजार महिला या उद्योगाच्या सदस्य आहेत. प्रत्येक सदस्य महिला, सहमालक असल्याने कंपनीचा नफा प्रत्येकीला समान स्वरूपात दिला जातो. आज कंपनीची उलाढाल एक हजार ६०० कोटी रुपये असून, ७० कोटी रुपयांची निर्यात होते. इंग्लंड, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, लेदरलँड्स आदी देशांमध्ये निर्यात होते .
महिला गृहउद्योग लिज्जत पापडाच्या निमित्ताने देशासमोर महिला सबलीकरण काय असतं याचं ठळक उदाहरण घालून दिलं आहे. उद्योग-व्यवसायाबद्दल काडीचीही माहिती नसताना केवळ जिद्द, चिकाटी आणि एकीच्या जोरावर त्यांनी घरगुती व्यवसायाचं गृहउद्योगात रुपांतर करत उत्तुंग झेप घेतली आणि आपल्या पंखाखाली शेकडो महिलांच्या पंखांनाही बळ दिलं.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम