यशवंतराव चव्हाण म्हणाले होते, “वसंतरावांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला शेतकरी मुख्यमंत्री लाभला आहे”
वसंतराव नाईक यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे. १ जुलै १९१३ च्या दिवशी वसंतराव नाईक यांचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात कायद्याची पदवी घेऊन त्यांनी काही दिवस पुसद येथे वकिली केली. नंतर ते राजकारणात सक्रीय झाले. पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष झाले १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी ते पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष आले.
पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. (तेव्हा विदर्भ मध्य प्रदेश मध्ये होते) १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते. पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर १९६३ साली ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले.
आंतरजातीय विवाह
वसंतराव कॉलेज मध्ये शिकत असतानाच त्यांचा स्नेह नागपूरमधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. त्यातूनच त्यांचा १९४१ साली आंतरजातीय प्रेमविवाह वत्सलाबाई यांच्याशी झाला. त्या काळात अश्या आंतरजातीय विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली होती. त्यामुळे पुढची काही वर्षे वसंतराव यांना आपल्या घरांपासून दूर राहावे लागले. पण त्यांनी आपला निर्णय सिध्द केला. लग्न करण्यापूर्वी त्यांनी पूर्ण विचार केला होता. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत.
शेतकरी मुख्यमंत्री
वसंतराव नाईक यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरच नव्हे तर शेतीच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रावरही उमटवलेला आहे. त्यांच्यानंतर शेती क्षेत्रासाठी एवढ भरीव काम करणारा एकही मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला नाही, असंही काही लोक आवर्जून सांगतात.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनीच एकदा म्हटले होते, “मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला असे अभिमानाने सांगण्यात आले. मी शेतकऱ्याचा मुलगा असलो तरी शेतकरी नाही. पण वसंतरावांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिला शेतकरी मुख्यमंत्री लाभला आहे. त्यांनी राज्याच्या शेतकऱ्यांमध्ये जो विश्वास निर्माण केला त्यामुळे महाराष्ट्राचाच नव्हे तर भारताचा गुंतागुंतीचा (शेतीचा व अन्नधान्याचा) प्रश्न आपण सोडवू शकू, अशी आशा निर्माण झाली आहे.”
शेती मोडली तर लोकशाही मोडेल
१९७१ साली महाराष्ट्र काँग्रेसच अधिवेशन नाशिकमध्ये भरवण्यात आले होते. या अधिवेशनाला जेष्ठ नेते, तत्कालीन परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे उपस्थित होते. या अधिवेशनात वसंतराव नाईक यांनी अतिशय रोखठोक पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. अधिवेशनात बोलताना वसंतराव म्हणाले होते, “या देशातील लोकशाही बळकट झाली तर ती शेतीमुळेच होईल. शेतीमधील संपन्नतेमुळेच होईल. लक्षात ठेवा, शेती मोडली तर लोकशाही मोडेल.”
फक्त एवढ्यावरच ते थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले कि “हा देश गरीब आहे; महाराष्ट्र गरीब आहे, हे वारंवार सांगत बसू नका. ही गरीबी नष्ट करण्यासाठी, देशाची संपत्ती वाढविण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय आपल्या समोर नाही. माझ्या समोर एकच पर्याय आहे, तो म्हणजे संपत्ती वाढविण्यासाठी उपलब्ध साधने नीटपणे वापरली गेली पाहिजेत. शेतीचे उत्पादन वाढविणे, शेतीमालाला योग्य भाव मिळवणे, हेच मार्ग मला तरी संपन्नतेचे आणि समृद्धीचे वाटतात” आज एवढ्या वर्षानंतर देखील त्यांचा हा विचार तुम्हाला, आम्हाला विचार करायला लावणारा आहे.
… तर मला फासावर द्या
वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्न,धान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचा निश्चय केला होता. ते फक्त निश्चय करून थांबले नाहीत. तर त्यांनी त्या प्रकारचे कार्य करून दाखवले. एका जाहीर सभेत ते म्हणाले होते
“मी अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वावलंबी करू शकलो नाही तर मला फासावर द्या”
नाईक यांनी केलेली हि फक्त घोषणा नव्हती. त्यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला. काहीही झालं तरी चालेल पण आपलं राज्य अन्न धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेच पाहिजे. अशी भूमिका घेवून वसंतराव कामाला लागले. देशी बियाण्यांमधून उत्पन्न कमी येते. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हायब्रीड बियाण्याच्या वापराला प्रोत्साहन दिले. राज्यभर त्याचा प्रचार सुरु केला. तेव्हाच्या विरोधी पक्षांनी हायब्रीड चा बराच अपप्रचार केला. पण त्यांनी हा अपप्रचार मोडून काढला. त्यासाठी स्वतः शेतीत प्रयोग केले.
रोजगार हमी योजना
आपल्या देशात आजपर्यंत शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही, असा आरोप राजकीय नेत्यांवर केला जातो. पण वसंतराव नाईक याला अपवाद आहेत. त्यांनी फक्त शेतकरी नाहीतर शेतमजुरांचाही विचार केला. दुष्काळात शेतमजुरांना रोजगार पुरवणारी रोजगार हमी योजना त्यांनी महाराष्ट्राला दिली. काही वर्षापूर्वी हीच योजना आता केंद्र सरकारनेही स्वीकारली आहे.
आजघडीला महाराष्ट्र ज्या शेती क्षेत्रात स्वयंपूर्ण आहे. त्याचा पाया हरित क्रांतीच्या रूपाने वसंतराव नाईक यांनी घातला होता. त्यांच्या सन्मानार्थ वसंतराव नाईक यांच्या जयंतीला राज्य कृषीदिन साजरा केला जातो.
आमचे नवनवीन लेख आणि व्हिडीओ वाचण्यासाठी आणि पाहण्यासाठी क्लिक करा
फेसबुक | युट्यूब | ट्विटर | इंस्ताग्राम | टेलिग्राम